" मॅडम..राशन कार्ड रिन्युअल करुन पाहिजे होतं "
"तीन दिवसांनी या" मॅडम ठसक्यात म्हणून गेली.
"अहो मॅडम आम्ही या राशन कार्डवर कधी धान्याची उचल करीत नाही फक्त माझ्या आईच्या पायाचं ऑपरेशन आहे त्याकरिता दवाखान्यात हवंय."
"मग मी काय करू. तो तुमचा प्रॉब्लेम आहे माझा नाही "
"मॅडम तुमचं बरोबरच आहे पण आज माझा लहान भाऊ कामानिमित्त मुंबईला चाललाय तर त्याचेसोबत पाठवता येईल नाहीतर तेवढ्याच करीता मला जावे लागेल आणि ऑपरेशनला सुद्धा तितकंच विलंब होईल "
मॅडम चं पूर्ण लक्ष मोबाईल वर कोणत्या तरी ग्रुप वर मॅसेज करण्यात व्यस्त.
"तुम्हाला सांगितलं ना तीन दिवसानंतर या..मला पूर्वीचीच भरपूर कामं आहेत "
" मॅडम आता 11 वाजून 30 मिनिटं झालीत. आज तीन वाजता हे राशन कार्ड तुमच्याच कडुन रिन्युअल करुन जर नाही नेलं ना तर मी राऊत नाही."
त्या सिनियर क्लर्क ला धमकी देऊन मी बाहेर पडलो. वाटलं होतं आपल्या ओळखीची आहे. लवकर कामं करुन देईल पण ही तर आपल्याकडे बघायलाही खाली नाही.. आता आपण धमकी तर दिली पण कोणाच्या भरोशावर.. सालं डोकं धरून बसलो त्याच फूड सेक्शन च्या समोर.
"थोड्या वेळानी सहज म्हणून इकडे तिकडे पहायला लागलो. समोर पाटी दिसली तहसीलदार राहुल देशमुख... एकदम आशेचा किरण निर्माण झाला. अरे आपला बी. एड. चा मित्र सांगत होता की त्याचा जिगरी दोस्त राहुल तुझ्या आर्वीतच जॉईन झालाय म्हणून. तो कितीदा म्हणत होता त्याची भेट घे..
तिथून उठलो.. समोर बसलेल्या प्यून ला सांगितलं कुणी अभिजीत राऊत भेटायला आलेत म्हणून साहेबांना सांग. तोही साला चिडून उत्तर देऊ लागला साहेब कामात आहेत. त्याला पुन्हा सांगितलं एकदा जा आणि फक्त निरोप दे नाहीतर तुला महाग पडेल.कुठली हिम्मत असं बोलताना येत होती कुणास ठाऊक म्हंटलं जे होईल ते बघुन घेऊ. तो सुद्धा बुचकळ्यात पडला उठून सरळ आत गेला.. आणि पुन्हा बाहेर आला " साहेब तुम्हाला बोलावत आहेत "
मी आत गेलो..साहेब मी अभिजीत राऊत..
"अरे हो मला बाळासाहेब नेहमी सांगायचा तुझ्याबद्दल आधी बस जरा खुर्चीवर मग बोलू की निवांत "
"मला एक कामं होतं.. राशन कार्ड रिन्युअल करायचं होतं "
"मग त्याकरिता माझेकडे आलाय की सहज भेटायला? "
" मला त्याच कामाकरिता आज यावं लागलं त्या निमित्याने तुमची भेट झाली हा भाग वेगळा "
" एकतर मला साहेब आणि तुम्ही आम्ही करू नको.. बरं सांग काय अडचण आहे त्यात? "
" तिथली मॅडम म्हणते मला भरपूर कामं आहेत... "
तहसीदार उठून उभे झालेत.. "चल माझ्या सोबत बघू आपण काय ते..."
आम्ही दोघे फूड सेक्शनला.. मॅडम पुन्हा व्हाट्स अँप वर व्यस्त. तहसीलदार आल्यामुळे पूर्ण सेक्शन उठून उभा झाला ही सुद्धा मोबाईल बाजूला ठेवत उभी झाली.
" मॅडम तुम्हाला भरपूर कामं आहेत का? तुम्ही सांगितलं नाही कधी.. तुम्हाला अजुन एक मदतनीस हवाय का... "
" नाही... नाही....सर काय झालं? "
" यांना तुम्ही तीन दिवसांनी बोलावलं साधं कार्ड रिन्युअल करायला होतं नाही तुमच्याकडून.. तुम्ही करीत नसाल तर आणा मीच करुन देतो.... "
" नाही सर.. करते मीच करते... आत्ताच देते.. "
" अभिजीत कार्ड चं कामं झालं की मला भेटून जा.. "
" काहो तुम्ही तर एकदम साहेबांकडेच गेले.. "
" माझं कार्ड देताय नं...?
पुढल्या दहा मिनिटात कार्ड माझ्या हातात होतं.. मीही मग घड्याळा कडे बघत.. " मॅडम आता तर फक्त एकच वाजला.. मी तर तुम्हाला तीन वाजता कार्ड नेईल बोललो होतो.... "
" बरं मॅडम मला सांगा तुम्ही अनुकंपा तत्वावर लागल्या नं... "
"...हो... त्याचं काय..?"
" तुमचे मिस्टर वारले त्या वर्षी तुमची मुलगी दहावीला होती नं...? "
" हो.. तीला तुम्ही राऊत सरांची ट्युशन लाऊन दिली होती आणि तुमचा पगार पेन्शन रेग्युलर व्हायचा होता म्हणून त्यांनी वर्षभराची फी सुद्धा घेतली नव्हती."
"हो हे सगळं खरंय.. पण मला का सांगताय..?"
"मॅडम... मीच तो राऊत.. किती लवकर बदललात तुम्ही...? "
सगळं सेक्शन हा संवाद कान देऊन ऐकत होता आणि वर फॅन सुरु असताना सुद्धा मॅडम घाम पुसत होत्या.
अभिजीत राऊत........!!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा