गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

2150. दोन घडीचा डाव... सूधारलेली बायको

 बरेच दिवस बघतोय मेघना, तू काहीतरी विचित्रच वागतीयेस. काय झालंय तुला ?
कुठे काय शेखर? मी तर तशीच आहे.
कुठे तशीच आहेस? हल्ली तुझं अजिबात लक्षच नसतं माझ्याकडे. आठवडा झाला बघतोय, एकही सूचना देत नाहीयेस तू मला ? नाहीतर सकाळी उठल्यापासून तुझी भुणभुण असायची माझ्यामागे. आता अगदी जेवढ्यास तेवढं बोलतीयेस तू माझ्याशी. बाहेर असल्यावर एकही फोन नसतो तुझा हल्ली ?
वा .. म्हणजे बरं आहे, बायको बोलली तरी तुम्हाला त्रास आणि नाही बोलली तरी त्रास. 
तसं नाही ग. बोलावी पण सतत बोलत बसू नये, एखाद्या गोष्टी वरून सारखं सारखं मागे लागू नये.
हं, म्हणजे तुला वाटेल तेव्हा आणि तुला हवं तेच बोलावं. आणि तुझा मूड बघून, हो ना ?
असं कुठे म्हटलं मी, मेघना ?
म्हणत नाहीस, पण नको असेल तेव्हा झिडकारतोस ना ? 
सगळं तुझ्या मर्जीने असतं तुझं. दुसऱ्याच्या मर्जीचा विचार तरी येतो का रे शेखर, कधी तुझ्या मनात ? खरं सांगू, मलाच कंटाळा आला आता तुझ्या मागे लागण्याचा. म्हटलं जाऊ दे करु दे, काय करायचंय ते. आपला जीव कशाला जाळा, आपली किंमत नाही तिथे. 
एवढं लगेच टोकाला कशाला जाते ग  ?
मग काय सतत तुझं हडतुड करणं सहन करत बसू का ? तुझं तुला कळतं की सगळं, लहान नाही तू. मीच वेडी होते, जे तुला उगाच काही ना काही सांगत होते. ऑफिसला जाताना नीट पोटभर खावं हे काय माहीत नाही तुला ? पण तू गडबडीत अर्धवट टाकून उठतोस. ते बघून मला कसंनुसं होतं, म्हणून मी तुझ्या पाठी लागते, तर तू माझ्यावर डाफरतोस. 
कुणी सांगितलंय मला, स्वतःचा इंन्सल्ट करून घ्यायला. जाऊ दे तिकडं, कळतं की सारं काही तुला. 
वेळेवर डबा खावा म्हणून तुला फोन करते तर, तुला कधी कधी 'हो' हा एक शब्द बोलायला जड जातो. कधी तर माझा फोन उचलायलाही जड जातं. हट्, कुणी सांगितलंय मला, असले स्वतःला पाडून घेण्याचे उद्योग करायला. तसं तुला तर कळतंच की सगळ. बाहेरच्यावर जास्त विश्वास ठेवू नको, त्यापेक्षा घरच्या, जवळच्या लोकांना जप, त्यांना वेळ दे म्हटलं, तर आलीये मोठी शहाणपणा शिकवणारी, म्हणत तू हिणवतोस. सोड काय पडलंय मला, ठोकर खाशील तेव्हा समजेल बरोबर. 
तू तर मोऽऽऽठा शहाणा आहेस, तुला बरंच काही कळतं. स्मोकिंग सोड, ड्रिंकिंग सोड, फास्ट ड्रायव्हिंग सोड ,थोडतरी घरात लक्ष दे, का सांगू मी तुला सारखं सारखं ? का मागं लागू तुझ्या हे सोड अन् ते सोड करत ? आणि एवढं सांगून ऐकतोस का तू? इरिटेड होतं तुला बायकोचं अति काळजी करणं. बस तिकडं बोंबलत. कुणी सांगितलंय मला स्वतःच्याच लाईफची पर्वा नसलेल्या माणसासाठी झुरत बसायला.
तुला काय कळत नाही का तेवढं ? सोडलं मी, सोडलं सगळं. खूप घेतला कमीपणा मी तुझ्यासाठी, आणि मिळवलं काय, तुझं मला प्रत्येक गोष्टीत ग्रँटेड पकडणं? मला नाही आठवत रे तू कधी माझी अती काळजी केलेली, मला नाही थांबवलस तू कधी घरच्या आणि ऑफिसच्या कामाने पिचून गेलेली बघताना, ना माझी तब्बेत जपायचे सल्ले दिलेस कधी ? ॲक्चुली काय आहे ना, तू तुझ्याकडेच बघत होतास फक्त आणि मी मूर्ख ही तुझ्याकडेच बघत होते फक्त.
ना तू माझ्याकडे पाहिलं ना मी माझ्याकडे पाहिलं इतके दिवस. म्हणून ठरवलं, आता बस्स झालं तुझं कौतुक.
अगं पण मेघना, मला सवय झाली ना तुझ्या तशा वागण्याची. मी ते सगळं मिस करतोय.
हो ना बायकोने पुढे पुढे करणं, आपल्याला अवास्तव महत्व देणं, करणारच रे तू मिस. 
तुला एवढं लागत असेल, वाटलं नाही मला कधी मेघना ?
माझा विचार करत असतास तर वाटलं असतं ना? मी होते अशीच, तुला डिवोटेड बनून बसलेली. तुझ्या एका हाकेला कायम धावणारी. आता कसं वाटतंय, कुणी आपल्यासाठी अवेलेबल नसलेलं बघून ? मी अगदी सेम फिल करत होते एवढी वर्ष. म्हणूनच कंटाळले आणि ठरवलं, नवरा तर काही केल्या सुधारणार नाही, आपणच सुधारूया. काढून टाकूया त्याच्यावरचा जीव आपला म्हणजे सर्व आपोआप कमी होईल. नको घेऊया त्याच्या कुठल्याच गोष्टीत इंटरेस्ट एवढा, की आपलं स्वतःचच महत्व कमी होईल. एवढं सोप्प नाही ते, पण प्रयत्न करून नक्कीच जमवीन. तशीही तुला कुठे आहे माझी गरज ?
नको ग असं बोलू मेघना. गरज आहे मला तुझी. असं तोडू नको मला. तू पाठीशी आहेस म्हणूनच मी आहे खरंतर. 
हो कां? हे आज कळलं मला. तुझं वागणं तर पाठीशी असणाऱ्या माणसाला पार दाबून टाकणार होतं. यापूर्वी कधी दाखवून दिलंस मला, आठवतंय का तुला ? शब्दातून नाही की कृतीतून ही नाही. कुणी का असेना प्रत्येकाला कौतुकाची थाप, आपलेपणाचा स्पर्श हवाच असतो. नुसतं ग्रँटेड पकडून ठेवणं आणि तुटायला आलं की सावरल्यासारखं करणं, नाही चालत काही.
आय एम सो सो सॉरी.. प्लिज माफ कर. पण ते सगळं पुन्हा चालू कर पहिल्यासारखं. खूप त्रास होतोय मला. 
आपल्याकडे कुणी लक्ष देणारं, आपल्याला अतिमहत्व देणारं हातातून निसटत जातंय म्हणून होतोय का त्रास,   शेखर?
नको ग बाई, एवढे कोड्यात टाकणारे प्रश्न विचारुस, मी नाही एवढा तुझ्यासारखा प्रत्येक गोष्टीवर डोकं घासत बसणारा. पण मी सांगतोय ना तुला मी आता तुला जपण्याचा प्रयत्न करेन, तुझं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न करेन. एक चान्स तर दे. .असं झटकू नको मला. 
जमतंय का बघ. खूप अवघड आहे स्वतःचं सोडून, दुसऱ्याचं मन जपणं, कठीण जाईल तुला. जमवलंस तर ठिक, नाहीतर मी पकडला आहेच रस्ता सुधारण्याचा, मनात आणलं तर कधीही चालू पडेन मी, एकदाही मागे वळून न बघता. मग नंतर कितीही पस्तावलास तरी दुसरा चान्स नसेल, एवढं पक्कं लक्षात ठेव.
दोन घडीचा डाव .. 
मूसाफीर .....
याला जिवन ऐसे नांव ...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...