भेट होणं म्हणजे खरं तर आनंदाचा क्षण असतो.त्या व्यक्तीचा सहवास हा हवाहवासा वाटणारा असतो. पण जेव्हा काही भेटी या शेवटच्या असतात,तेव्हा मनाला किती यातना होतात ते त्या व्यक्तीलाच माहित.
व.पु. म्हणतात... सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही. शेवटची भेट ही मात्र मनाला चटका लावणारी असते हे नक्की. अंथरुणाला खिळलेले वडील जेव्हा मुलीकडे बघत असतात, तेव्हा त्यांच्याकडे ती मुलगी मागे वळून नाही बघू शकत.
कारण इतक्या वर्षांचा सहवास, एकत्र घालवलेले क्षण डोळ्यासमोर आले की मनाचा तोल ढासळतो. शेवटी इथे देखील संबंध येतो तो आठवणींचा.
व.पु. म्हणतात तसं.... काही काही औषधं आणि आठवणींना एक्सपायरी डेट नसते.
आज एक माझ्या घरातलंच उदाहरण तुमच्याशी शेअर करते. म्हणजे बघा, भेटी या शेवटच्या कशा असतात.
माझ्या आजोबांची तब्येत बरीचं खालावली होती. आम्ही सगळे त्यांना सकाळी नऊ वाजता भेटून गेलो, आपल्याचं जवळच्या माणसाला जेव्हा शेवटच्या क्षणी मरणयातना सहन कराव्या लागतात तेव्हा ते दुःख बघून आपला देखील बांध फुटतोच हो, तेच घडले.
माझ्या आईच्या हातून कोल्ड ड्रिंक घेऊन तिला निरोप दिला व का कुणास ठाऊक त्यांना ही चाहूल लागली असावी की ही भेट शेवटची आहे आणि जायलाचं हवे का आत्ता,असं म्हणत होते. आम्हाला देखील ही कल्पना नव्हती की पुढे काय होणार ते. आम्ही निघालो आणि अर्ध्या वाटेवर गेलो आणि आजीने फोन करून सांगितलं की आजोबा गेले. ही शेवटची भेट ठरली.अश्रूंचा बांध फुटला,पण व्यक्ती परत येणार नव्हतीच.
तेव्हा वाटतं, आठवणींना वार्धक्याचा शाप नसतो. ध्यानीमनी नसताना होणारी भेट आणि तीही शेवटची हे पचवणं खरंच कठीण असतं हो.
मला या शेवटच्या भेटीवर जे गाणं आहे ते आठवतं. व.पु. म्हणतात... वियोगाची दहशत एका क्षणात रंगपंचमीची धुळवड करते. 'वो कौन थी' हा चित्रपट सर्वांनीचं पाहिला असेल.अभिनेत्री साधना आणि मनोज कुमार यांच्यावर 'लग जा गले' हे जे गाणं चित्रित झालं आहे,त्यातली एक एक ओळ ऐकताना मन आपल्या प्रिय व्यक्तीकडे धाव घेते.
आपण जेव्हा प्रेमात पडतो ते विरहाची कल्पना करुन निश्चितच नाही.पण अशी कठीण वेळ जेव्हा आयुष्यात येते,तेव्हा निर्णय घेताना द्विधा मनस्थिती होते.
तुम्हाला सांगते. एखाद्या मुलाला काही कारणास्तव आपल्या आवडत्या व्यक्ती पासून दूर जायची वेळ आली आणि त्या मुलीला त्याने जर विचारलं की मला शेवटची भेटशील का? मुलगी जरी भेटायला गेली,तरी त्याला समोर बघून सर्रकन मागच्या आठवणी डोळ्या समोर फेर धरून नाचू लागतात.
डोळे हे पाण्याच्या रुपाने त्याच्या वरचं प्रेम दाखवत असतात पण तो थांबणार नाही,दूर जाणारचं आहे हे पचवणं कठीण जातं. त्याने मारलेली मिठी ही ती कधीच विसरू शकत नाही. मग या चित्रपटातील गाण्यांच्या ओळी तिथे साजेशा आहेत-
लग जा गले के फिर ये हंसी रात हो ना हो,
शायद फिर इस जनम मे, मुलाकात हो ना हो..
व.पु. जे म्हणतात ते नेहमी पटतं, 'अश्रू हे कितीही प्रामाणिक असले तरी त्यांच्यात भूतकाळ परत आणण्याची ताकद नसते.'
तुमचे एखाद्या व्यक्ती सोबत निर्माण झालेले अनुबंध हे ती भेट शेवटची आहे या जाणीवेने मन कुरतडतात. आपल्याला जे आयुष्य आहे त्यात अशा घटना घडल्या तर मन सैरभैर होते. कसं आहे. सवय ही अशीचं लागत नाही. त्यासाठी सहवास निर्माण व्हावा लागतो.
प्रत्येक भेट ही वेगळी असते. काही भेटी या अनेक सुंदर क्षण देतात, तर शेवटची भेट ही मात्र मनात कालवाकालव करते.
माणसाला नेहमी आपलं असं कोणी तरी लागतचं. मघाशी लिहिले त्याप्रमाणे, आजारी व्यक्ती ही जास्त दिवस अंथरुणाला खिळून राहू नये असं आपल्याला वाटतंच.पण, तुम्हाला सांगू, आपला त्यांच्यात जो जीव अडकलेला असतो ना,तो सतत मन बेचैन करतो. इथे परत व.पु. म्हणतात ते खरं आहे, 'मन म्हणजे मरे पर्यंत नष्ट होत नाही ते मन.'
लांब राहणारी व्यक्ती ही जेव्हा निघण्याच्या तयारीत असते,त्या वेळी पाऊल उचलत नाही आणि घरी गेल्यावर पण साधा फोन जरी वाजला आणि काही बातमी समजली तर वाटतं ही भेट शेवटची होती.म्हणून म्हटलं.
तुमच्या भावना या शेवटच्या भेटीत ओठांपर्यंत येऊन देखील बाहेर येत नाही.कारण त्या मनाच्या पल्याड असतात. त्यामुळे, येणारा प्रत्येक क्षण हा आनंदाने जगला पाहिजे.होणारी भेट ही देखील तृप्तता करणारी व्हावी हीच इच्छा असते.
शेवटी काय...!भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरे., इति व.पु.
मानसी देशपांडे,विरार
--------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा