गुरुवार, १४ ऑगस्ट, २०२५

2168. तू तेव्हा तशी

  शेवटचा पेशंट चेक करत होतो,इतक्यात सानिकाने इंटरकॉमवर विचारले,"सर, रुचिरा साठेंचा फोन आहे, त्यांना तुमच्याशी बोलायचं आहे."
"अशा कुठल्याही व्यक्तीला मी ओळखत नाही. मोबाईल नंबर घेऊन ठेव. मी नंतर बोलतो." मी परत पेशंटला काही सूचना दिल्या आणि फॉलोअपसाठी पाच दिवसांनी बोलावलं. 
आजचे पेशंट झाले होते. साडेनऊ वाजून गेले होते. हॉस्पिटलला रात्रीचा एक राउंड मारायचा होता. प्रीतीला फोन लावला, "प्रीती,मला वर यायला अजून अर्धा तास लागेल. तुला भूक लागली असेल तर जेवून घे."
"माझं जेवण झालंय मानस. मला ऍसिडिटीचा त्रास होतो तुला माहितीय." 
"ओके" मी मोबाईल बंद केला. अनेक वर्षांपासून हाच संवाद. मला कधीतरी वाटायचं की प्रीतीने माझी वाट बघावी. दोघांनी गप्पा मारत जेवावं. जरी प्रीती डॉक्टर नसली तरी, एखादी चॅलेंजिंग केस आली की प्रीतीशी डिस्कस करावं असं वाटायचं पण प्रीतीला ह्यात काडीचाही इंटरेस्ट नव्हता. प्रीतीचे पपा होते तोपर्यंत त्यांच्याशी बोलणं व्हायचं. ते एक नावाजलेले सर्जन. त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळालं. पण पपांना जाऊन दोन वर्षे झाली आणि माझा गुरू हरवला. मुलाचं फिल्ड अगदीच वेगळं. तो इंजिनिअर असल्यामुळे तो फक्त श्रोता असतो. मी केबिनच्या बाहेर आलो. बाहेर बेंचवर साखरे नर्स, भागवत नर्स कॉफी घेत होत्या. मला बघून दोघी लगेच उठून उभ्या राहिल्या.
"प्लिज बी सीटेड. आरामात कॉफी घ्या. आज तुमची नाईट ड्युटी न?"
"हो सर,सर तुम्हाला करू एक कप कॉफी?"
"नो थँक्स,मी आता राउंड मारून वरच जातोय."
  राउंड मारून मी वर घरी गेलो. प्रीती झोपायच्या तयारीतच होती. "आलास तू. जेवण गरम करू, की वेळ आहे अजून? आज सुलभाताई रात्रीच्या नाहीत. त्यांच्या मुलाला बरं नाहीय,म्हणून त्या घरी गेल्या आहेत." प्रीतीने जांभई देत विचारलं.
"जेवण गरम करून टेबलवर ठेव आणि तू झोप. मी जरा फ्रेश होतो."
    जेवताना अचानक ती रुचिरा का कोण ती आठवली. कोण असेल ही? इतक्या रात्री माझ्याकडे काय काम असेल? उद्या फोन करून बघावं. नेहमीप्रमाणे एकटाच जेवलो. झोप येत नव्हती. डॉक्टर असल्यामुळे झोपेच्या गोळ्यांचे दुष्परिणाम ठाऊक होते. डॉ.सुमती क्षेत्रमाडे यांची 'युगंधरा' वाचायला घेतली. अनेकदा पारायणं झाली होती. युगंधराचा कणखर निर्णय,तिचं आणि अभिजितचं असफल प्रेम, सगळं वेगळ्याच विश्वात न्यायचं. डॉक्टर असून एक अतिशय संवेदनशील लेखिका. वाचताना कधीतरी झोप लागली.
   दुसऱ्या दिवशी फारसे पेशंट नव्हते. मी सानिकाला आत बोलावलं.
"सानिका, काल रुचिरा का कोण त्यांचा फोन आला होता न,त्यांचा मोबाईल नंबर दे मला. मी कॉल करतो."
"हो सर, देते." सानिकाने लगेच मला नंबर दिला.
 नंबर डायल केल्यावर जरा वेळाने पलीकडून फोन रिसिव्ह केला,"सॉरी डॉक्टर, जरा वेळ लागला फोन घ्यायला."
"इट्स ओके. तुम्ही काल फोन केला होता न? काय काम होतं, कळू शकेल का?"
" मी एस.राव कॉलेजची प्रिन्सिपॉल बोलतेय.आमच्या कॉलेजचा वर्धापन दिन आहे तर तुम्ही चीफ गेस्ट म्हणून यावं अशी माझी इच्छा आहे. येत्या पंधरा तारखेला वर्धापन दिनानिमित्त काही कार्यक्रम आहेत. रविवार असल्यामुळे आपण फ्री असाल."
  हा इतका गोड आवाज,उगाच कुठेतरी ऐकल्यासारखा वाटत होता. पण आठवत नव्हतं.
"डॉक्टर"...
"ओह सॉरी,मी अपॉइंटमेंट्स बघून तुम्हाला कळवतो. माझा सेक्रेटरी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल." 
"ओके डॉक्टर, पण प्लिज दोन दिवसात सांगितलं तर बरं होईल,म्हणजे तुम्हाला शक्य नसेल तर मला दुसरा विचार करावा लागेल. आफ्टरऑल यु आर अ बिझी पर्सन." 
"येस, मी कळवतो." मी फोन बंद केला. तो गोड आवाज मात्र पाठलाग करत होता.
मला कुठल्याही अपॉइंटमेंट्स नसल्यामुळे मी चीफ गेस्टचं आमंत्रण स्वीकारलं. अशा अनेक कार्यक्रमांना मला बोलावणं यायचं त्यामुळे तिथे दोन शब्द बोलायची सवय झाली होती. ड्रायव्हरने गाडी पार्क केली आणि मी कॉलेजच्या ऑडीटोरियमकडे निघालो. दारातच मला पुष्पगुच्छ दिला आणि मी वर बघितलं.
"वेलकम डॉक्टर."
   तोच गोड आवाज, हनुवटीवरचा काळा तीळ,ती कुरळ्या केसांची महिरप,तोच तजेलदार गोरा रंग.  चेहऱ्यावर प्रचंड तेज आणि आत्मविश्वास. कॉटनच्या कडक इस्त्रीच्या साडीत तिचं रूप खुललं होतं.
"आदिती तू?" मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो.
"डॉक्टर, तुमची हरकत नसेल तर आपण कार्यक्रम झाल्यावर बोलू. कार्यक्रम सुरू व्हायला अजून थोडा अवकाश आहे. आपण प्लिज बसा. मी चहा पाठवते." आदितीने मला हॉलमधे नेलं.
तिची कार्यक्रमासाठी चाललेली लगबग, तिच्या अवती भवती फिरणारे सगळे जुनिअर्स बघून मला कौतुक वाटलं. हीच का ती आदिती? आत्मविश्वासाचा पूर्ण अभाव असलेली, अगदीच साधारण बुद्धी,नेहमी पडतं घेण्याचा स्वभाव....आदिती... किती काळ मागे नेलं तू मला.... 
  आदिती माझ्या आत्याची पुतणी. उन्हाळ्यात मी आत्याकडे जायचो तेव्हा आम्ही सगळी मुलं पत्ते खेळत असू. आदिती कायम हरायची. तिचा तो रडका चेहरा बघून आम्ही तिला अजूनच चिडवायचो. आदिती माझ्यापेक्षा फक्त सहा महिन्यांनी लहान होती. अतिशय भित्री, मागे मागे राहणारी. आत्मविश्वास शून्य. पण तिच्या आवाजात फारच गोडवा होता. बोलायला लागली की ऐकत राहावं असं वाटायचं. वयात आलो तसे तिच्याबद्दल आकर्षण वाटायला लागले. तिचा गोरा रंग, कुरळे केस, हनुवटीवरचा काळा तीळ मला मोहात पडत होता. आदितीचा सहवास मला हवाहवासा वाटायला लागला. तिलाही माझ्याविषयी ओढ वाटतेय हे मला जाणवलं. बारावीचं वर्ष आलं. माझी हुशार विद्यार्थ्यांमधेच गणना होत होती. मी डॉक्टर व्हावं अशी आईबाबांची इच्छा होती. मी अगदी जोमाने अभ्यासाला लागलो. आदितीचे विचार डोक्यातून बाजूला केले. बारावी झाल्यावर आदितीजवळ आपल्या भावना व्यक्त करू असे ठरवले. बारावीची परीक्षा संपली. सगळे पेपर उत्तम गेले होते. आता मेडिकलच्या एन्ट्रन्सचा अभ्यास करायचा होता. 
   मला मेडिकलला ऍडमिशन मिळाली पण आदितीला जेमतेम साठ टक्के मिळाले होते. तिने आर्टस् घेतले. आदितीसाठी वेडा झालेलो मी. अचानक तिचे मार्क्स बघून वेगळ्या विचारात पडलो. आदिती माझ्याशी कुठल्या विषयावर बोलणार? माझ्या आणि तिच्या बुध्दयांकात खूप तफावत होती. मला इतका साधारण लाईफ पार्टनर नको होता. केवळ चूल आणि मूल करणारी पत्नी नको होती. मी तिला टाळू लागलो. आदितीच्या ते लक्षात आलं. तिने आत्याकडे येणं बंद केलं. काही दिवसांनी कळलं की ती मुंबईला तिच्या मावशीकडे शिकायला गेली. माझ्या मेडिकलच्या अभ्यासात मी आदितीला पूर्णपणे विसरलो. आत्याजवळ देखील तिची कधी चौकशी केली नाही. 
     माझी बारावीची क्लासमेट, प्रीती देसाई हिचे वडील आम्हाला गेस्ट लेक्चर द्यायला यायचे. त्यांची माझ्यावर मर्जी होतीच. प्रीती त्यांची एकुलती एक मुलगी. ती बीएससी करत होती. डॉक्टर देसाईंनी एक दिवस मला सरळ विचारलं, "यंग बॉय,तुला प्रीती लाईफ पार्टनर म्हणून आवडेल का? माझा इतका मोठा व्याप प्रीती सांभाळेल असं वाटलं होतं पण तिला मेडिकलला जाण्यात अजिबात रस नव्हता. तुझ्यासारखा हुशार मुलगा ह्या हॉस्पिटलची जबाबदारी योग्य रीतीने घेईल असं मला वाटतं. विचार करून निर्णय घे. मी प्रीतीशी बोललोय. तिची हरकत नाही."
     प्रीतीने एकदा आम्हा सगळ्या बारावीच्या क्लासमेट्सना घरी पार्टी दिली होती. तेव्हाच त्यांचं ते हॉस्पिटल, ते ऐश्वर्य बघून माझे डोळे दिपले होते. मला ते भव्य हॉस्पिटल, ते ऐश्वर्य खुणावू लागलं. मी डॉ. देसाईंना होकार दिला. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि मी प्रीतीशी लग्न केलं. सगळं आयतं मिळालं होतं,मला फक्त सांभाळायचं होतं. हॉस्पिटलच्या गेटवर डॉ. मानस किणीकर ही माझ्या नावाची पाटी बघितली आणि जग जिंकल्यासारखं वाटलं. वर्ष सरली पण प्रीतीशी लग्न करून देखील माझी पार्टनर विषयीची बौद्धिक भूक भागली नाही. एमएससी असूनही तिने करिअर केलं नाही. तिला सतत शॉपिंग, रमी खेळणे, पार्लर ह्यातच इंटरेस्ट होता. आमच्या दोघात वाद फारसा झाला नाही पण सुसंवादही नाही. कधीकधी मला वाटायचं, प्रीती माझ्यावर उपकार केल्यासारखी वागते. तिच्या वडिलांमुळे मला सगळं सहज मिळालं होतं ही तिची भावना आहे असं वाटायचं.  ज्या कारणासाठी मी आदितीला दूर लोटलं होतं, ती माझी मानसिक भूक तशीच राहिली.
"डॉक्टर, कार्यक्रमाची वेळ झालीय,येताय न?" त्याच मंजुळ आवाजाने मला भानावर आणलं.
माझा यथोचित सत्कार झाला. आदितीने माझं भरभरून कौतुक केलं. तिचं वक्तृत्व, तिच्या आवाजाचे माधुर्य,प्रेक्षकांना भारावून टाकणारे होते. एका साधारण बुद्धिमत्ता असणाऱ्या ज्या मुलीला मी दुखावलं होतं, ती माझ्या विषयाचा पूर्ण अभ्यास करून बोलत होती. मला अपराधी वाटलं. 
     त्या दिवशी सर्वांसमक्ष आदितीशी बोलू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी तिला फोन केला, 
"आदिती,काल किती आत्मविश्वासाने बोललीस. अभिनंदन. तुझ्यातला हा बदल सुखावून गेला."
"मानस, ह्याचं सगळं श्रेय माझ्या नवऱ्याला जातं. मल्हार साठे. माय लाईफ पार्टनर. आम्ही एकाच कॉलेजमधे होतो. मल्हार मला एक वर्ष सिनिअर होता. त्याचा मुख्य विषय इंग्रजी साहित्य होता. ओळख झाली, भेटी वाढल्या. तुझ्यापासून दुरावल्यावर माझा न्यूनगंड आणखीनच वाढला होता. पण मल्हारने मला माझ्यातल्या सुप्त गुणांची जाणीव करून दिली. मी बीएला मराठी वाङ्मय हा विषय घेतला होता. मल्हारने माझ्यात वाचनाची गोडी निर्माण केली. इंग्रजी साहित्य वाचायला दिलं. मला एम ए,एमफिल करायला लावलं. आणि एक दिवस घरी येऊन आईबाबांकडे माझा हात मागितला. मी कुठलाही विचार न करता त्याला होकार दिला कारण एका सुरवंटाचं त्याने फुलपाखरू केलं होतं. तो सध्या बिगीनर्स कॉलेजचा इंग्रजी विभागाचा प्रमुख आहे. मला एक मुलगी आहे. आर्या तिचं नाव. तिला वडिलांसारखं इंग्रजी साहित्यात करिअर करायचं आहे. तुझ्याबद्दल काकूकडून कळलं होतंच. आणि  एक हुशार डॉक्टर म्हणून तू प्रसिद्ध आहेस,हे देखील माहिती होतं. एकदा घरी ये. मल्हारशी आणि आर्याशी ओळख होईल. बाय, ठेवते फोन. जरा घाईत आहे."
  आदितीने माझी काहीही चौकशी न करता फोन बंद केला. पण मी तरी का अपेक्षा करतोय? त्या क्षणी हे ऐश्वर्य, हे हॉस्पिटल सगळं पोकळ वाटायला लागलं. सगळं सुख असूनही काहीतरी कमी आहे असं प्रकर्षाने जाणवलं. माझा अहंकार, माझा स्वार्थ गळून पडला.
   आदिती,मी चुकलो,मला माफ कर
  
               ××समाप्त××
  ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...