"ऑर्डर... ऑर्डर" न्यायाधीशांनी सर्वांना शांत राहायला सांगितले.
" श्री विजय पाटील तुम्हाला याबद्दल काही बोलायचे आहे का?" सर्वजण विजयाकडे पाहू लागले.
पण विजय कसल्यातरी विचारात मग्न होता. आज त्याच्या चेह-यावर कोणतीच काळजी दिसत नव्हती. उलट नकळत एक स्मित हास्य उमटले त्याचबरोबर डोळ्यांतून पाणी वाहत होते ते पण कोणाचीतरी आठवण येत होती म्हणून. आज विजयला आपले आयुष्य सार्थक झाल्यासारखे वाटत होते. पुन्हा एकदा न्यायाधीशांनी विजयला हाक मारली,
"श्री विजय पाटील... मी तुम्हाला परत विचारतो आहे. तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही तुमचा वकील नेमू शकता... तुम्हाला काहीच बोलायचे नाही का?" विजय अजूनही शांतच होता एखाद्या पुतळ्यासारखा.
"या केसचा अंतिम निर्णय दोन दिवसांनी होईल तोपर्यंत हे न्यायालय स्थगित केले जाते." असे म्हणून न्यायाधीश निघून गेले.
सायंकाळचे ५ वाजले होते. पोलीस विजयला न्यायालयातून पोलीस कस्टडीत घेऊन जात होते. मिडिया तोपर्यंत कोर्टासमोर जमा झाली होती व ह्या केसाची बातमी Breaking News म्हणून सर्वत्र पसरवायला सुरवात केली होती. विजय पुन्हा त्या कोठडीतच्या एका कोप-यात बसला होता. ३ तासानंतर रात्रीच्या वेळी एक पत्रकार तेथे आला व म्हणाला,
"इन्स्पेक्टर दीक्षित... मला विजय पाटील यांना भेटायचे आहे."
"तुम्ही कोण?"
"मी दिपक पाटील... पत्रकार म्हणून काम करतोय..."
"माफ करा. रात्रीचे ८ वाजून गेले आहेत. ह्यावेळेस तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. तुम्ही एक काम करा. तुम्ही उद्या सकाळी ठीक १० वाजता येथे या."
"साहेब... मला त्यांना भेटणे खूप गरजेचं आहे. कृपया फक्त ५ मिनिटे भेटू द्या. मी त्यापेक्षा जास्त वेळ घेणार नाही..." दोन्ही हात जोडून दिपकने इन्स्पेक्टर दीक्षित यांना विनंती केली.
"ठीक आहे पण ५ मिनीटांपेक्षा जास्त वेळ तुम्हाला देता येणार नाही." म्हणत इ . दीक्षित यांनी हवालदाराला बोलवून दिपकला विजयकडे घेऊन जाण्यास सांगितले.
विजय खाली मान करून दोन्ही गुढग्यावर हात ठेऊन बसला होता. 'विजय' म्हणून दिपकने हाक मारली. जेंव्हा विजयने दिपकला पाहिले तेंव्हा तो ताडकन उठून त्याला बिलगला व हुंदके देत रडू लागला. दोन मिनिटे दिपक काही बोलला नाही. त्यानंतर म्हणाला,
"रडू नकोस... मला तुझ्याशी खूप काही बोलायचे आहे."
"पण आता खूप वेळ झाला आहे." विजयने सांगितले.
"पण तू असे काही करशील ह्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही. मला प्रथम वाटले दुसरा कोणीतरी विजय असेल. पण मिडीयाने जेंव्हा बातमी पसरवली त्यावेळी मी मुंबईवरून तात्काळ तुला भेटायला आलो. खरं काय आहे? हे सांगशील का मला..."
"न्यायालयात जे सिद्ध झाले तेच खरे आहे."
"पण का? काय गरज होती हे सर्व करण्याची?"
"ती फार मोठी गोष्ट आहे. जाऊ दे... कदाचित न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर मी सांगेन. बरं ... तुझं कसं चाललंय? घरचे सगळे ठीक आहेत ना?"
"मला मुलगी झाली. हे पेढे पण तुझ्यासाठी आणले आहेत." पेढे देण्यासाठी दिपकने पिशवीतील बॉक्स पुढे केला.
"अरे व्वा.." म्हणतं विजयने एक पेढा खाल्ला व एक आपल्या जिवलग मित्राला म्हणजेच दिपकच्या तोंडात चारला.
"दोन दिवसांनी ह्या केसचा अंतिम निर्णय आहे. माझी इच्छा आहे की तू त्यावेळी न्यायालयात हजार रहावेस. येशील ना?"
"हे काय विचाराने झाले मित्रा... नक्की येईन." इतक्यात हवालदाराने दिपकला हाक मारली.
"ओ साहेब... तुमची ५ मिनिटे पूर्ण झालीत."
"चल... निघतो मी. दोन दिवसांनी भेटू." असे म्हणून शेवटचे अलिंगन देऊन दीपक निघून गेला... पुन्हा विजय त्या कोठडीच्या एका कोप-यात जाऊन बसला व कसल्यातरी विचारात गुंग होता. त्याला त्याचा भूतकाळ क्रमाक्रमाने आठवू लागला होता...
७ वर्षांपूर्वी : ...
"आई, पप्पा कसे आले नाहीत अजून?" सोनल बोलली.
"येतील गं ... त्यांची यायची वेळ झाली आहे." सुप्रियाने उत्तर दिले.
"पण रात्रीचे ९ वाजून गेले आहेत. इतका वेळ पप्पांना कधीच लागत नाही." स्वप्नील म्हणाला.
"कदाचित काम जास्त असेल... बरं. तुम्ही दोघे जेवणाच्या टेबलजवळ बसा. मी ५ मिनिटात त्यांना फोन लावून खाली येते." म्हणत सुप्रिया फोन करण्यासाठी गेली. सोनल आणि स्वप्नील धावत जेवणाच्या टेबलापाशी गेले. सुप्रियाने विजयला फोन लावला व म्हणाली,
"अहो... अजून आला नाहीत तुम्ही? काही अडचण तर नाही ना? मुलांना व मला काळजी वाटते म्हणून फोन केला."
" काही अडचण नाही. मी ऑफिसमधुन १ तासांपूर्वी निघालो आहे पण समोर एक अपघात झाला असल्यामुळे ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. १० मिनिटात येतो मी... तोपर्यंत जेवणाची ताटे तयार ठेव." विजयने सांगितले.
"ठीक आहे... सावकाश या." एवढे बोलून सुप्रियाने फोन ठेवला व खाली जेवणाच्या टेबलापाशी गेली.
"काय झालं आई? पप्पांना अजून किती वेळ लागणार?" सोनल म्हणाली.
"येतीलच १० मिनिटात... ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. पण लवकर येतील."
"मला तर जोराची भूक लागली आहे." म्हणत स्वप्नील चेहऱ्यावर उदाशीचे भाव आणू लागला.
"त्यांनी जेवणाची ताटे तयार ठेवायला सांगितली आहेत. तुम्ही सुरु करा तोपर्यंत येतील ते."
"नाही..." दोघेही एकदम बोलले.
"बरं ठीक आहे. थोडावेळ वाट पहा."
तिघेही एकदम शांत बसले. १५ मिनिटांनी दरवाजाची बेल वाजली. सुप्रियाने दरवाजा उघडला. विजय पावसात थोडा भिजला होता. हे पाहून सुप्रियाने लगेच त्याला प्रश्न केला,
"अहो... रेनकोट असताना भिजला कसे काय? आणि तुमचा रेनकोट कुठे आहे?"
"सांगतो... सर्वकाही सांगतो. अगोदर आत तर येऊ दे." म्हणत विजय घरात आला तसेच त्याच्याबरोबर घडलेला प्रसंग सांगायला सुरवात केली.
"तो रेनकोट मी एका वृद्ध माणसाला दिला."
"म्हणजे?... मला काही समजले नाही."
"तुला म्हणालो होतो ना, मी ट्रॅफिकमध्ये अडकलोय. सी.बी.एस. जवळ खूप गर्दी होती. त्यात खूप पाऊसही पडत होता. मी गाडीवर होतो तेंव्हा माझे लक्ष शेजारी गेले. एक वयोवृद्ध माणूस पावसात भिजून थंडीने कडकडत होता. माझ्या डाव्या बाजूच्या एका इमारतीच्या कोप-यात तो बसला होता. मी गाडी तिथेच ठेवली व माझा रेनकोट काढून त्याला दिला. त्याच्या चेह-यावरचे स्मित हास्य पाहण्यासारखे होते. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला जणू तो मला आशीर्वाद देत होता. इतक्यात ट्रॅफिक पुढे सरसावल्याची जाणीव मला झाली. मी पटकन गाडीवर बसलो व घरी आलो."
"तुमचं हे नेहमीचंच आहे. मनात आले की कोणालाही निःसंकोचपणे मदत करत असता. बरं... आधी अंग पुसून घ्या व जेवायला या. मुलं केंव्हापासून वाट पाहात बसली आहेत.
" दोनच मिनिटात येतो." म्हणत विजय फ्रेश होण्यासाठी गेला. थोड्यावेळाने आता चौघेही जेवायला बसले होते.
पाटील परिवार... एकदम सुखी परिवार. मध्यमवर्गीय कुटुंब असले तरीही प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असायचे. विजय खाजगी कंपनीत नोकरीला होता. सुप्रिया त्याची पत्नी घरी शिवणकाम करत असे. स्वप्नील बी. ई. सिव्हील च्या पहिल्या वर्षी शिकत होता व ११ वी विज्ञान शाखेत कोमल शिकत होती. दिवसभर प्रत्येकजण आपापल्या कामात मग्न असायचे. परंतु रात्री न चुकता एकत्र जेवायला बसायचे.
सर्वजण जेवण आटोपून आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. सुप्रिया थोड्या वेळाने किचनमधील काम आटोपून बेडरूममध्ये गेली. विजय तेथे अगोदरच आचार्य चाणक्यांचे पुस्तक वाचत बसला होता. त्या पुस्तकांमधील एक वाक्य त्याला मनापासून भावले," सापाला, रस्त्यातील काट्यांना तसेच शत्रूला दगडाने ठेचून काढले पाहिजे." विजय पुस्तक वाचण्यात इतका गुंग होता की सुप्रिया वरती आली आहे याचे त्याला भानच नव्हते. तेवढ्यात सुप्रिया म्हणाली,
"अहो, रात्र खूप झाली आहे. झोपा आता." विजयने पुस्तक बाजूला ठेवले आणि झोपी जाण्याचा प्रयत्न करू लागला. परंतु बराच वेळ गेला तरी त्याला झोप येईना. सुप्रियाला न काळात त्याची जाणीव झाली. तिने लाईट लावली व विचारले,
"काय झालं?"
"काही नाही."
"काही नाही तर मग अजून जागे कसे आहात? कसल्या विचारात मग्न आहात?"
"मुलांच्या..."
"पण का?"
"बघता-बघता मुले मोठी झालीत, समजलेच नाही. त्यांच्या शिक्षणाची काळजी वाटते. सोनल ११ वी सायन्सला आहे. तिला डॉक्टर व्हायचे आहे आणि स्वप्नीलला इंजिनीयर. ह्या दोघांच्या शिक्षणाच्या खर्चाचा विचार करत होतो.
"असा विचार करणं तसेच तो तुमच्या मनात याबद्दल येणं साहजिकच आहे. पण एक सांगू तुम्हाला, तुम्ही ह्या दोघांच्या शिक्षणाच्या खर्चाची अजिबात काळजी करू नका. जर जास्तच आवश्यकता भासली तर आपण शैक्षणिक कर्ज काढू पण मुलांच्या शिक्षणात काहीही कमी पडू द्यायचे नाही. कारण शिक्षणच व्यक्तीला त्याच्या आयुष्यात मोठे, समृद्ध आणि समजूतदार बनवते."
"खरं आहे तुझं. अडाणी माणसाचे आयुष्य कष्ट करण्यातच वाया जाते तर याउलट शिकलेला ज्ञानी मनुष्य, धडपड करून, प्रयत्न करत काही ना काही मार्ग काढत नोकरीला लागतो."
"बरं... चला, झोपा आता. खूप वेळ झाला आहे. रात्रीचे ११ वाजून गेले आहेत. उद्या परत तुम्हाला कामावर जायचे आहे ना?"
"हो... ठीक आहे. good night..."
"good night..." म्हणून सुप्रिया झोपी गेली. लगेच विजयचाही डोळा लागला.
दुस-या दिवशी सकाळी ९ वाजता विजय ऑफिसला चालला होता. स्वप्नील व सोनल दोघेही कॉलेजला जाण्याची तयारी करत होते. सुप्रिया व मुलांचा निरोप घेऊन विजय घराबाहेर पडला. एका तासानंतर ऑफिसमध्ये पोहोचला.
"विजय, चल चहा घेऊ..." नितीनने विजयला हाक मारली.
"हो चल." म्हणत विजय आणि नितीन ऑफिसच्या बाहेर जवळच असलेल्या चहाच्या टपरीवर आले.
नितीन विजयचा खास व जिवलग मित्र होता. दोघेही एकाचवेळी ह्या ऑफिसमध्ये कामाला लागले होते. ह्या दोघांची एकमेकांशी ओळख मुलाखतीच्या वेळी झाली होती. विजय नितीनला प्रत्येक गोष्ट सांगायचा. मग ती व्यक्तिगत स्वतःबद्दल असो किंवा कुटुंबाबद्दल. नितिनही खुल्या मनाचा. तोसुद्धा प्रत्येक गोष्ट विजयसोबत share करत असायचा. चहा घेऊन झालेनंतर दोघेही आपापल्या कामाला लागले.
सायंकाळी ६ नंतर विजय नितीनला 'चल, मी घरी जातो' म्हणून सांगून ऑफिसमधून बाहेर पडत होता. इतक्यात सुप्रियाचा फोन विजयला आला,
"अहो, कुठे आहेत तुम्ही?... जरा घरी लवकर येत येईल का?"
"ऑफिसमधून बाहेर पडत आहे. घरीच येत आहे. काय झालं?"
"तुम्ही आधी घरी या... मग सांगते."
"ठीक आहे. मी लवकर येण्याचा प्रयत्न करतो." असे म्हणून विजयने फोन ठेवला व घाईघाईने निघाला.
"का रे... काय झालं?" नितीनने लगेच प्रश्न केला.
"काही नाही... सुप्रियाचा फोन होता. घरी लवकर या म्हणाली म्हणून गडबडीने निघालो होतो."
"काही अडचण तर नाही ना..."
"नाही... आणि समज असेल तर तुला नक्की सांगेन."
"ठीक आहे. माझे पण थोडे काम राहिले आहे. तू जा. मी थोड्यावेळाने येतो."
वाटेतून घरी जात असताना त्याच्या मनात अनेक विचार येत होते. का बरं सुप्रियाने फोन केला असेल? घरी सर्व ठीक तर असेल ना? काही अडचण तर निर्माण झाली नसेल ना? मी कामावर असताना सुप्रियाचा असा यापूर्वी कधीही फोन केला नव्हता. परंतु आज अचानक काय झालं असेल? विचार करत-करत विजय घरी पोहोचला. सुप्रियाने दरवाजा उघडताच त्याने विचारले,
"काय झालं?"
"अहो, सोनल घरी नाही आली."
"म्हणजे?"
"सकाळी ती कॉलेजला गेली होती परंतु सायंकाळपर्यंत ती घरी आलीच नाही. तिला call केला पण मोबईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर लागत होता. सुरवातीला मला वाटले कि तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असेल. तिच्या मैत्रिणींजवळ चौकशी केली असता तेथे सुद्धा नव्हती. म्हणून मी तुम्हाला फोन केला." सुप्रिया घाबरत-घाबरत सांगत असताना तिच्या डोळ्यांतून पाणी आले. विजय लगेच बोलला,
"घाबरू नकोस आणि रडू नकोस... आधी शांत हो... बस खाली. मी प्रयत्न करतो. मी परत फोन लावतो."
विजयनेसुद्धा फोन लावला पण आता फोन स्वीच ऑफ आहे असे ऐकू येत होते. मग स्वप्नीलकडे पाहत विजय म्हणाला,
"स्वप्नील, सोनलने तुझ्याजवळ काही सांगितले होते का? सकाळी काही बोलली होती का तुला..."
"नाही पप्पा..." म्हणत स्वप्नीलने नकारार्थी मान हालवली. मग विजयने शेजारी व इतर मित्रांना फोन लावून थोडी चौकशी केली परंतु सोनलचा काही सापडली नाही. त्यानंतर विजय म्हणाला,
"बर... ठीक आहे. आज रात्रीपर्यंत आपण सोनलची वाट पाहूया. जर ती आली नाही तर उद्या सकाळी पोलीस स्टेशनला ती हरवल्याची तक्रार करूया. ठीक आहे." दोघांनी होकारार्थी मान हलवली.
रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर तिघेही आपापल्या खोलीत गेले. विजयला तर जास्तच काळजी लागली होती परंतु त्याने तसे काही दोघांना दर्शविले नाही. रात्रीचे २ वाजले होते. विजय तर अजून जागाच होता. अचानक सुप्रियाला जाग आली. तिने लाईट लावली व बोलली,
"तुम्ही झोपला नाहीत अजून?"
"नाही. सोनलचा विचार डोक्यात घर करून राहिला आहे. ती ठीक तर असेल ना? आजपर्यंत ती कधी घरी उशिरा आली नाही. ती जे काही करायची त्याची कल्पना आपल्याला अगोदर द्यायची. पण अचानक अशी कुठे गेली असेल ..."
"मला पण खूप काळजी वाटते. आतापर्यंत आपण तिला कोणत्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. तीसुद्धा आपल्या आज्ञेच्या कधीच बाहेर गेली नाही. जर ती उशिरा येणार असेल किंवा मैत्रिणीच्या घरी राहणार असेल तर फोन करून नक्की सांगायची. बरं, तुम्ही झोपा आता. असेच जागे राहिलात तर झोप अपुरी होऊन सकाळी जागे होताना त्रास होईल."
"ठीक आहे." म्हणत विजयने डोळे मिटले.
विजयला जाग आली ती सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशाच्या किरणांनी जी खिडकीच्या काचेतून आत त्याचा चेह-यावर पडली होती. विजय जांभई देत उठला. घड्याळात पाहतो तर काय, सकाळचे ८ वाजले होते. "बाप रे! उठायला उशीर झाला." विजय स्वतःशीच पुटपुटला. स्वप्नील आणि सुप्रिया दोघेही सकाळी लवकर उठले व उपहार करण्यासाठी टेबलाजवळ विजयाची वाट पाहत होते. विजय थोड्या वेळात फ्रेश होऊन तेथे आला. नाष्टा करत असताना स्वप्नीलने प्रश्न केला,
"पप्पा मी पण तुमच्याबरोबर येऊ शकतो का?"
"नाही... नको. तू कॉलेजला जा. आम्ही दोघे जातो पोलीस स्टेशनला." विजयने सांगितले. मग थोड्या वेळाने स्वप्नील कॉलेजला गेला. विजयने सुप्रियाला बरोबर घेऊन पोलीस स्टेशनला निघाला. दोघेही पोलीस स्टेशनला पोहचले. इन्स्पेक्टर देसाई तेथील प्रमुख होते. त्यांच्याशी विजयने बोलायला सुरवात केली,
"साहेब... आमची मुलगी काल घरी परत आली नाही. तिला फोन केला आम्ही परंतु फोन स्विच ऑफ लागला. रात्रभर वाट पहिली परंतु ती काही घरी परतली नाही."
"बरं... म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का कि... तुमची मुलगी हरवली आहे." देसाई म्हणाले.
"होय साहेब..."
"तुमचा कोणावर संशय... म्हणजे तुमचे कोणी वैरी वगैरे..."
"नाही.."
"ठीक आहे. तुमच्याकडे तिचा फोटो असेल ना?"
"हो. आहे." म्हणत विजयने सोनलचा फोटो देसाईंच्याकडे दिला.
"ठीक आहे. आम्ही आमचा तपास चालू ठेवतो. जर काही माहिती मिळाली तर आम्ही तुम्हाला लगेच कळवतो. यांदरम्यान जर चौकशीसाठी तुम्हाला बोलावले तर पोलीस स्टेशनला यावे लागेल.
"बरं साहेब..." म्हणत दोघांनीही इन्स्पेक्टर देसाईंचा निरोप घेतला. बघता-बघता तो दिवस असाच निघून गेला.
त्यानंतर काही दिवस असेच गेले. विजयने थोड्या दिवसांची रजा घेतली होती. पोलिसांचा शोध चालूच होता. विजय प्रत्येक आठवड्याला चौकशी करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये येत होता. पण सोनलचा काही पत्ता लागला नव्हता. पोलिसांनी शक्य होईल त्या ठिकाणी सुप्रियाचे फोटो दाखवले. काही ठिकाणी 'हरवली आहे' असे पोस्टरसुद्धा चिकटवले. त्या पोस्टरवर आपण ह्या व्यक्तीस पाहिल्यास किंवा सापडल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. माहिती देणा-यास योग्य बक्षीस दिले जाईल असे लिहले होते. पण तरीसुद्धा सुप्रियाबद्दल काही कळू शकले नाही. बघता बघता एक महिना होऊन गेला. विजयची रजाही संपत आली होती. साहेबांना सांगून त्याने आपली रजा वाढवून मिळण्यासाठी परत अर्ज केला पण 'तुम्ही थोडा उशिरा आलात तर चालेल पण यापेक्षा अधिक रजा मिळू शकणार नाही' असे साहेबानी सांगितले.
विजय नाईलाजास्तव एक महिन्यांनी पुन्हा कामावर निघाला. जेवणाचा डबा सुप्रियाकडून घेत असताना सुप्रियाच्या मनातील सोनल विषयीची काळजी त्याने घेरली व तिला म्हणाला,
"काय झालं? तू ठीक तर आहेस ना?"
"काही नाही."
"मग तू उदास का दिसते आहेस? सोनलची काळजी वाटते का?"
"हो..."
"हे बघ.... काळजी करू नकोस. तुला तिची काळजी वाटणं साहजिकच आहे. पण जास्त काळजी करू नकोस. येईल ती परत घरी. चल मी निघतो."
सुप्रियाला विजयने थोडा आधार दिला तर खरा, पण तोसुद्धा मनाने खचला होता. त्यालासुद्धा सोनलची काळजी वाटत होती. पण आपणच घराचा आधार असल्याने त्याला असे खचून चालणार नव्हते. थोड्या वेळातच तो ऑफिसमध्ये पोहचला. आपल्या टेबलपाशी जाऊन बसतो तोवर नितीनने त्याला हाक मारली.
"चल, चहा घेऊ..."
"चल." म्हणत दोघेही चहाच्या टपरीवर आले. चहा घेत असताना नितीनचे लक्ष विजयकडे गेले. तो कसल्यातरी विचारात मग्न असल्याची त्याला जाणीव झाली. त्याने त्याला विचारले,
"काय झालं?"
"काही नाही..."
"मग एवढा कसल्या विचारात मग्न आहेस...आणि इतके दिवस रजा कशासाठी काढली होतीस?."
"काही नाही रे..."
"हे बघ...मी तुला १० वर्षांपासून ओळखतो. तुला आपल्या मैत्रीची शपथ. काय झालंय सांगशील का?"
"सोनल..."
"सोनल काय?"
"सोनल एक महिना झाला, तरी घरी आली नाही. तिची काळजी वाटते आहे. कुठे असेल? कशी असेल? डोके तिच्या विचाराने भणभणायला लागले आहे."
"तू पोलीस स्टेशनला ती हरवल्याची तक्रार नोंदवली आहेस ना?"
"हो.. गेलो होतो. त्यांनी त्यांचा तपास चालू ठेवला आहे. काही कळले तर सांगतो म्हणाले."
"बर...हे बघ, जास्त काळजी करू नकोस. मी जर तुझ्या जागी असतो तर माझीसुद्धा अवस्था अशीच झाली असती. ठीक आहे आता. जास्त विचार करत राहिलास तर ऑफिसवरील कामावर परिणाम होईल. चल ऑफिसमध्ये जाऊ." असे म्हणत नितीन व विजय चहा संपवून ऑफिसमध्ये कामाला गेले. सायंकाळी ऑफिस सुटल्यावर नितीनचा निरोप घेऊन विजय घरी निघाला. घरी पोहचल्यानंतर त्याने पहिले की सुप्रिया दरवाज्यासमोर आपली वाट पाहत उभी आहे. तिला पाहताच विजयने विचारले.
"काय गं ... इथे का थांबली आहेस?"
"तुमची वाट पाहत उभी होते. काळजी वाटत होती म्हणून बाहेर थांबले."
"बर चल.. आत चल.. थोड्या वेळात जेवायला बसूया. स्वप्नील आला आहे ना?"
"हो.. तो कधीच आला आहे."
"ठीक आहे."
जेवण करून तिघेही आपापल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दिवसामागून दिवस भराभरा निघून जात होते. एके दिवशी रात्रीचा जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण आपापल्या खोलीत होते. सुप्रिया व विजय जागेच होते. मग थोड्या वेळाने सुप्रियाने बोलायला सुरवात केली,
"आपली सोनल ठीक तर असेल ना?"
"असेल." विजय उत्तरला.
"पण ती नेमकी कुठे असेल?"
"माहित नाही. पोलीस शोधून काढतीलच."
"पण कधी?... ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी होऊन गेला. तरीही सोनलचा काही पत्ता सापडला नाही."
"हे बघ, पोलीस तिला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. थोड्या दिवसात काहीतरी मार्ग नक्की सापडेल. तू फक्त धीर धर." विजयच्या ह्या वाक्यावर ती काही बोलली नाही. ५ मिनिटांनी फक्त एवढेच म्हणाली,
"चला, झोपूया. उद्या परत तुम्हाला कामावर जायचे आहे."
"ठीक आहे. गुड नाईट..."
"गुड नाईट..."
बघता-बघता १० महिन्यांपेक्षा जास्त अवधी गेला. सोनलचा काही पत्ता नव्हता. पोलिसांचा तपास चालू होताच पण त्यांना काही धागेदोरे सापडले नाहीत. मग एके दिवशी सकाळी ९ वाजता इन्स्पेक्टर देसाईंचा विजयला फोन आला व ते म्हणाले,
"विजय तुम्ही आत्ता पोलीस स्टेशनला येऊ शकता का?"
विजय नुकताच ऑफिस कामावर जाण्यासाठी बाहेर पडला होता. तो म्हणाला,
"हो येतो साहेब... सोनलची काही बातमी मिळाली का?"
"हो... पण मी तुम्हाला फोनवर जास्त काही सांगू शकणार नाही. तुम्ही अगोदर पोलीस स्टेशनमध्ये या. मग तुम्हाला सविस्तर सांगतो.
"ठीक आहे." म्हणत विजयने फोन कट केला व ऑफिसला जाण्यापूर्वी पोलीस स्टेशनला निघाला. तत्पूर्वी याबाबतची कल्पना त्याने सुप्रियाला दिली होती. थोड्या वेळात विजय पोलीस स्टेशनला पोहोचला. इन्सेप्क्टर देसाईंना पाहून विजय म्हणाला,
"साहेब... सोनलची काही बातमी? ती ठीक तर आहे ना?"
"माफ करा विजय... पण एक वाईट बातमी आहे तुमच्यासाठी."
"काय झालं इन्स्पेक्टर?"
"तुमच्या सोनलचा मृतदेह सापडला आहे. इथून ३० किमी अंतरावर एक छोटस खेडेगाव आहे. तेथील एका शेतात सापडला. सोनलचा इथून जवळपास काही पत्ता मिळत नव्हता म्हणून आम्ही बाहेर चौकशी केली. त्या गावाच्या जवळ राहत असलेल्या एका गावक-याने सोनलला तिथे एक-दोन वेळा पाहिल्याची बातमी दिली. मग आम्ही गावाच्या आसपास शोध चालू ठेवला. तपास चालू असताना एका हवालदाराला सोनलचा मृतदेह सापडला. ती बॉडी ज्या ठिकाणी होती त्या शेतातील भागाजवळ जास्त वस्ती नव्हती व जवळपास कोणी वास्तव करत नव्हते. त्यामुळे लोकांच्या निदर्शनास हे आले नाही. आम्ही बॉडी पोस्टमार्टमसाठी पाठवली आहे. येईलच थोड्यावेळात. तुम्हाला बॉडी नंतर घरी पोहचवली जाईल.
विजय हे ऐकून धक्काच बसला पण स्व:ताला सावरत त्याने देसाईंना प्रश्न केला,
"म्हणजे तुम्हाला सोनलने आत्महत्या केली आहे असे म्हणायचे आहे का?"
"सुरवातीस आम्हास सोनलला कोणीतरी मारून टाकले असावे असे वाटले पण सखोल चौकशी नंतर असे निदर्शनास आले सोनल जेथे राहत होती त्या भाड्याच्या खोलीमध्ये आम्ही गेलो. तेथे आम्हाला एक डायरी सापडली." असे सांगत देसाईंनी ती सापडलेली डायरी विजयच्या हातात दिली. विजयने ती उघडून वाचायला सुरवात केली.
"पप्पा, मी तुमच्या माफीच्या लायकीची नाही. आत्तापर्यंत मी जे काही वागले त्याचा पश्चाताप मला होत आला आहे. माझे अजय नावाच्या मुलावर प्रेम होते. सुरवातीला अभ्यासाच्या निमित्ताने फक्त मित्र म्हणून आमची ओळख होती. पण थोड्या दिवसानंतर हळूहळू आमचा संपर्क कोणत्या ना कोणत्या कारणाने होत होता. त्याचे बोलणे, चालणे, त्याचा स्वभाव सुरवातीला चांगला होता म्हणून तो मला आवडत होता. पण आमच्या प्रेमाला दोघांच्या घरातून विरोध होईल म्हणून आम्ही पळून जाऊन लग्न करायचे ठरवले.
घरातून पळून आल्यानंतर अजयकडे थोडेफार पैसे होते. आम्ही रजिस्टर लग्न केले. मग उरलेल्या पैशात कसातरी एक महिना निघून गेला. तो नियमितपणे कामावर जात नव्हता. एक-दोन दिवस जायचा आणि थोडे दिवस घरी बसून असायचा. कसेतरी दिवस पुढे ढकलत नेत होते. नंतर जसजशी आर्थिक अडचण जाणवू लागली तसतसा त्याच्या स्वभावात बदल होत गेला. तो दररोज मला शाब्दिक टोमणे मारून मानसिक त्रास देत होता. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी खाजगी काम करून थोडे पैसे मिळवून राहूया. तुझ्यासारखे मी पण कुठेतरी खाजगी काम करते असे सांगितले. पण तो ऐकायला तयारच नव्हता. मी बरेच दिवस त्याची समजून काढत होते पण तो काही मनावर घेत नव्हता.
एके दिवशी सकाळी सकाळी त्याने कहरच केला. आदल्या रात्री आमच्यातील भांडणाने मला लवकर झोप लागली नव्हती. रात्री बराच प्रयत्न केल्यानंतर मी जेंव्हा घड्याळाकडे नजर टाकली तेंव्हा २ वाजले होते. त्या दरम्यान माझा डोळा लागला होता. या कारणास्तव मला सकाळी लवकर उठता आले नाही. मी झोपेत असताना त्याने मला जोरजोरात हलवून उठविले व म्हणाला, "मला आज काही कामानिमित्त शहरात जावे लागणार आहे. मी एका ठिकाणी नवीन काम बघितले आहे. तेथील काम निश्चित करून मी रात्रीपर्यंत घरी येईन." असे सांगून निघून गेला. मी त्याला त्याच्या जेवणाचे विचारणार होते तोपर्यंत तो दार आदळून घराबाहेर पडलासुद्धा होता.
त्या दिवशी रात्रीचे १० वाजून गेले होते. तरी अजय परत आला नाही. मी मोबाइल लावण्याचा प्रयत्न केला पण तो संपर्क क्षेत्राच्या बाहेर येत होता. वाट बघता-बघता रात्रीचे २ वाजले होते. तरीसुद्धा अजय आला नाही. शेवटी कंटाळून मी न जेवता झोपी गेले. दुस-या दिवशी अजयचा काही पत्ता नव्हता. एके दिवशी मी जेंव्हा घरात एकटी होते त्यावेळी कॉलेजमधील ४ मुले आमच्या खोलीच्या समोर आली व दरवाजा ठोठावला. त्यातील एक मुलगा म्हणाला, "ताई, थोडे पाणी मिळेल का? खुप तहान लागली आहे." 'घेऊन येते' एवढे बोलून मी आत पाणी आणण्यासाठी गेले असता चौघांनी घरात दुसरे कोणी नाही याचा अंदाज घेऊन लगेच आत प्रवेश केला व दाराला काडी लावली. मी पाणी घेऊन बाहेर येत होते त्यावेळी ते चौघे एकमेकांकडे बघून हसत होते. मी लगेच त्यांना मोठ्या आवाजात बोलायला सुरवात केली,
"तुम्ही दरवाजा का बंद केला? आणि हसता कशाला? तुमची घरात यायची हिम्मत कशी झाली. चालते व्हा." ते काही बोलले नाहीत. हळूहळू माझ्या जवळ येऊ लागले. मग मी पुन्हा त्यांना ओरडले,
"मी आरडाओरड करेन. माझ्यापासून लांब राहा." पण तरीही कोणी ऐकायला तयार नव्हते. मी ओरडणार इतक्यात त्यातील एकाने माझ्या तोंडावर हात धरला व दुस-याने माझ्या तोंडाला रुमाल बांधला. मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. त्या चौघांसमोर मी एकटी हातबल झाले. थोड्याच वेळात माझी अब्रू लुटून ते तेथून पळून गेले. मला ज्यावेळी शुद्ध आली त्यावेळी सायंकाळचे ४ वाजले होते. मी कशीबशी उठले. खूप रडले. ह्या बाबतीत सांगायचे तर कोणाला? कोणीच ओळखीचे नव्हते. त्या नराधमांना याचे काहीच नव्हते. तसेच अजयचाही पत्ता नव्हता.
ह्या घटनेनंतर १५ दिवस होऊन गेले. मग माझ्या लक्षात आले कि अजयने मला फसवले आहे व मला एकटी सोडून कायमचा निघून गेला आहे. त्यावेळी खूप पश्चाताप होत होता मला. मी असा तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होता. निदान एकदातरी तुम्हाला विचारायला हवे होते. तुमच्या मनाला व आईला किती वाईट वाटले असेल या विचाराने सतत रडायला येत होते. वाटत होते की, परत घरी तुमच्याकडे यावे व माफी मागावी. पण कोणत्या तोंडाने येणार? मी आई होणार आहे याची अजयला चांगली कल्पना होती. पण तरीसुद्धा तो मला सोडून गेला. मी आत एकटी पडले आहे. काय करावे काही सुचत नव्हते. माझी तसेच तुमचीही अब्रू मी घालवली होती.
मग ठरवलं आणि निश्चितच केलं, माझ्यासारख्या मुलीला जगण्याचा अधिकार अजिबात नाही. जिने कधी, ज्या आई-वडिलांनी आपल्यासाठी भरपूर काही केले, कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही, त्यांच्या मनाच्या विरुद्ध असे घराबाहेर पळून जाताना जरासुद्धा विचार केला नाही तिला जगण्याचा काहीच अधिकार नाही. मी हे जग सोडून जात आहे. शक्य असल्यास मला माफ करा. - तुमची सोनल."
विजयचा सर्व मजकूर वाचून संपला. त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. काय करावे? काय बोलावे? काही सुचत नव्हते. त्याचा तोल जाऊन तो खाली पडत होताच इतक्यात इ. देसाईंनी त्याला सावरले व म्हणाले,
"सांभाळा विजय... स्वतःला सांभाळा. आम्हालासुद्धा खूप वाईट वाटले. पण आम्ही शेवटी काय करणार? तुम्हाला असे खचून चालणार नाही. घरातील इतर लोक तुमच्यावर अवलंबून आहेत. तुम्ही घरी जा. पोस्टमार्टम झालेनंतर मी स्वतः बॉडी घरी आणून देतो.
देसाईंच्या सांगण्यावर विजयने काहीच प्रत्त्युत्तर केले नाही. तो थेट घरच्या मार्गाला लागला. डोक्यात अनेक विचार येत होते. गाडी चालवताना त्याचे आजूबाजूला लक्ष नव्हते. विजय ह्या धक्क्यातून अजून सावरलाच नव्हता. तो समोर एका वाहनाला धडकणार होताच इतक्यात हॉर्नच्या आवाजाने तो भानावर आला. पाहतो तर समोर नितीन होता.
"अरे, समोर लक्ष देऊन तर गाडी चालवत जा. कुठल्या विचारात मग्न आहेस..."
"काही नाही. मी आज ऑफिसला येऊ शकत नाही. साहेबांना फोनवरून सांगतो. चल मी निघतो." म्हणत विजय गाडी सुरु करून जाणार इतक्यात नितीनने विजयच्या गाडीची चावी काढून घेतली.
"काय झालं? आज अचानक अशी ऑफिसला दांडी कशी? जोपर्यंत नक्की काय झालाय ते सांगत नाहीस तोपर्यंत गाडीची चावी मिळणार नाही." विजयने गाडी बाजूला घेतली. नितीन त्याच्या मागोमाग आला. गाडी बाजूला लावून पुलाच्या एका बाजूला बोलत उभे राहिले. विजयच्या डोळ्यात पाणी आले होते. नितीनला कळलं ते. विजयचे लक्ष नदीतील पाण्याकडे होते. त्याच्या खांद्यावर हात ठेवत नितीन म्हणाला,
"काय झालं मित्रा?"
"माझी सोनल... मला सोडून गेली कायमची. आम्हा सर्वांना पोरकं केलं तिने." म्हणत गालावर ओंघळत असलेले अश्रू पुसत होता.
"काय?.... पण हे सर्व कसे आणि कधी झाले?"
"आज सकाळी, मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो. पोलिसांनी सर्व सांगितले." दोघेही थोडावेळ शांत उभे होते. मग विजयच बोलला,
"चल, निघतो मी. मला घरी जायचे आहे."
"सावकाश जा. मी ऑफिसमधून रजा टाकून लगेच तुझ्या घरी येतो." म्हणत नितीन ऑफिसला गेला.
सुप्रिया विजयची दारातच वाट पाहत उभी होती. विजय गाडीवरून उतरताच तिने प्रश्नाचा भडीमार सुरु केला.
"अहो, काय झालं? सुप्रियाचा काही पत्ता लागला का? पोलीस काय म्हणाले?"
"सांगतो... अगोदर आत चल." विजय गाडीवरून उतरत असताना म्हणाला. घरात आल्यावर दाराची कडी लावली. त्यानंतर लगेच सुप्रिया बोलली,
"अहो, काय झालं? सांगा ना..."
"सुप्रिया आपणाला कायमची सोडून गेली." असे म्हणत विजयने पोलीस स्टेशनमधील सर्व घटना सुप्रियाला ऐकवली. विजयचे बोलणे ऐकल्यानंतर तिला जागेवरच फिट आली. त्याने सुप्रियाला उठवण्याचा प्रयत्न केला पण ती काही शुद्धीवर आली नाही. तो सुप्रियाला बेशुद्ध अवस्थेतच बेडरूममध्ये घेऊन गेला. सुप्रियाला बेडवर ठेऊन लगेच त्याने डॉक्टर साबळे यांना फोन केला व आपल्या घरी बोलवून घेतले जे त्यांचे फॅमिली डॉक्टर होते. थोड्या वेळात ते विजयच्या घरी पोहचले. सुप्रियाची तपासणी करून त्यांनी तिला इंजेकशन दिले व काही गोळ्या लिहून विजयाकडे चिट्ठी दिली. ते म्हणाले,
"घाबरण्यासारखे काही कारण नाही. अचानक ब्लड प्रेशर वाढल्याने त्यांना चक्कर आली. त्या शुद्धीवर येतील. तोपर्यंत तुम्ही ह्या गोळ्या घेऊन या व जेवणानंतर सकाळी एक व रात्री एक द्या." असे सांगून डॉक्टर साबळे निघून गेले.
मग काही वेळानंतर नितीन घरी आला. काही क्षणापुर्वी सुप्रियाबाबत घडलेली घटना त्याने नितीनला सांगितली. सुप्रिया थोड्या वेळाने शुद्धीवर आली. नितीन व विजय शेजारीच बसले होते. सुप्रियाने विजयला हाक मारली. ती बेडवरुन उठण्याचा प्रयत्न करत होती.
"अहो, ऐकलंत का?"
"हा... बोल." विजय लगबगीने सुप्रियाजवळ गेला.
"माझा उजवा पाय व हात मला उचलता येत नाही. जरा थोडी मदत करता का मला वर उठण्यासाठी."
"जड झाला असेल किंवा अवघडला असेल. थांब.. मी मदत करतो." म्हणत विजयने सुप्रियाला धरून उठविले व पाठ मागे उशीला टेकवून बसविले. सुप्रियाला काय बोलावे? काय करावे सुचत नव्हते. तिच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहत होते. मग थोडावेळ ती शांत बसली. इतक्यात स्वप्नील कॉलेजवरून आला. त्यालाही याबाबतीत सर्वकाही नितीनने सांगितले. तोंडातून एक शब्द बाहेर न पडता फक्त डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याच्या. सायंकाळी ४ वाजता पोलीस सोनलची पोस्टमार्टम बॉडी घेऊन आले व विजयच्या हवाली करून निघून गेले. बाकीचा सर्व कार्यक्रम रात्री १० पर्यंत आटोपला. १२ दिवसांचा कार्यक्रमही व्यवस्तित पार पडून सर्वजण आपापल्या कामात मग्न झाले.
बघता-बघता चार वर्षे निघून गेली. स्वप्नीलचे बी. ई. (सिव्हील) चे शिक्षण पूर्ण झाले. तो नोकरीच्या शोधात होता. त्याला सरकारी नोकरी हवी होती. म्हणून त्याने त्यासाठी आवश्यक असणा-या परिक्षा दिल्या होत्या. बराच प्रयत्न केल्यानंतर त्याची १ डिसेंबर रोजी मुंबईत एका ठिकाणी मुलाखत होती. त्याची मुलाखतीचीसुद्धा संपूर्ण तयारी झाली होती. पण अचानक २६ नोव्हेंबर रोजी मुंबईतील एका हॉटेलवर अतिरेक्यांनी हल्ला केला. याबाबत मंत्रिमंडळातील एका नेत्याने एक वाक्य भाष्य केले, "मोठमोठ्या शहरात अशा छोट्या गोष्टी घडत असतात." या एका वाक्यामुळे तेथील सर्व मंत्रिमंडळ बरखास्त झाले व १ डिसेंबर रोजी होणारी मुलाखत रद्द करण्यात आली.
पोटाची भाकरी असणारा हातातील घास तोंडाजवळ आला होता खरा पण पोटात जाणार इतक्यात कोणीतरी त्याला हिसकावून घेतला अशी अवस्था स्वप्नीलची झाली. नैराश्याने त्याच्याभोवती कुंपण घातले. तो गप्प-गप्पा राहू लागला. जास्त काही बोलणे नाही. आई-वडिलांनी त्याला धीर दिला. त्यामुळे आता आपण न खचता पुन्हा एकदा काहीतरी करून दाखवायचे, निराश न होता काहीतरी मार्ग काढत राहायचा असा निश्चय मनाशी बाळगून त्याने पुन्हा नोकरीसाठी प्रयत्न चालू ठेवले. काही दिवसांनी तो कंत्राटी स्वरूपात एका शासकीय ऑफिसमध्ये कामाला लागला होता.
एके दिवशी ३१ डिसेंबरच्या रात्री स्वप्निलच्या मित्रांनी डोंगरी भागात पार्टी ठेवली होती. स्वप्नीलचे सर्व वर्गमित्र येणार होते. त्यामुळे रात्री आई-वडिलांना मला यायला उशीर होईल, तुम्ही जेवण करून घ्या असे सांगितले. रात्री १० वाजता पार्टीला सुरवात झाली. पार्टीचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सर्वजण आपापल्या घरी निघाले. मित्रांचे आभार मानून स्वप्नीलसुद्धा दुचाकीवरून घरी येत होता. स्वप्नीलच्या मागून एक ट्रक येत होता. ट्रक ड्रायव्हर जोर-जोराने हॉर्न करीत होता. स्वप्नीलने त्याला ओव्हरटेक करण्यासाठी गाडी बाजूला घेतली. परंतु ट्रक ड्राइव्हर ओव्हरटेक न करता नुकताच हॉर्न वाजवत होता. 'बहुतेक याने भरपूर देशी ठोसली असेल' असा विचार त्याच्या मनात तरळत होता इतक्यात त्या ट्रकने स्वप्निलच्या गाडीला वेगाने धडक दिली. त्याचा गाडीवरून तोल जाऊन तो खाली पडला . ट्रकचा धक्का इतका जोराचा होता की, तो रस्त्यावरून फरफटत गेला. त्याने हेल्मेट परिधान केलेले नव्हते. त्याचे डोके किलोमीटरच्या दगडावर आदळले. डोक्याला जोरात मर बसल्याने त्याची कवटी फुटली व तो जागीच ठार झाला. ट्रक ड्राइव्हरच्या लक्षात येताच त्याने ट्रक न थांबवता हायस्पीडने ट्रकसोबत पलायन केले. थोड्या अंतरावर त्याने ट्रक लावला व शेतातून मिळेल त्या वाटेने पलायन केले. लोकांनी त्या ड्रायव्हरला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो काही हाती लागला नाही. थोड्या वेळात काही लोक तेथे जमा झाले. स्वप्निलच्या कुटुंबाला फोन करण्यासाठी एका व्यक्तीने त्याच्या खिशातून मोबाइल काढला. परंतु ती व्यक्ती कॉल करू शकली नाही. कारण मोबाईलवर स्क्रीनलॉक पॅटर्न होता.
इतक्यात दुस-या दोन लोकांनी तेथून जवळच असलेल्या पोलीस स्टेशनला कळविले. पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली व पोस्टमार्टमला नेली. रात्रीचे १ वाजले होते. स्वप्नील अजून कसा आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला कॉल केला. फोन उचलताच विजयने बोलायला सुरवात केली,
"अरे बाळा, कुठे आहेस? रात्रीचे १ वाजून गेले आहेत. घरी कधी येणार?"
"हॅलो... मी इन्स्पेक्टर यादव बोलत आहे."
"माफ करा सर. मला वाटले मी माझ्या मुलाला फोन लावला आहे. तुम्हाला चुकून लागला असेल. माफ करा." म्हणत विजय फोन कट करणार इतक्यात पलीकडून आवाज आला,
"हॅलो... तुम्ही बरोबर नंबर डायल केला आहे. हा फोन तुमच्या मुलग्याचा आहे. आपण कोण बोलत आहेत? मोबाईलवर 'पप्पा' असे नाव सेव्ह केले आहे म्हणून विचारले."
"मी विजय पाटील बोलत आहे. हा मोबाईल माझ्या मुलाचा आहे. इन्स्पेक्टर साहेब, हा मोबाईल तुमच्याकडे कसा? आणि स्वप्नील कुठे आहे?"
"माफ करा विजय. एक वाईट बातमी आहे तुमच्यासाठी. तुमच्या मुलाचा अपघात झाला आहे. आम्ही त्याला वाचवू शकलो नाही. बॉडी पोस्टमार्टमसाठी हॉस्पिटलमध्ये आणली आहे. तुम्ही येथे या. मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो. मोबाईलवर जास्त वेळ बोलू शकत नाही."
"ठीक आहे. मी येतो लगेच." म्हणत विजयने मोबाईल कट करून एकटाच घराच्या बाहेर पडत होता. इतक्यात सुप्रियाला जाग आली.
"अहो, काय झालं?... तुम्ही एव्हढ्या गडबडीने कुठे निघालात?"
"स्वप्नीलचा अपघात झाला आहे. पोलिसांनी मला हॉस्पिटलमध्ये बोलवले आहे." विजयचे हे वाक्य ऐकून सुप्रियाची झोपच उडाली. ती सुद्धा खाडकन उठली.
"मी पण तुमच्यासोबत येते." म्हणत सुप्रिया विजयसोबत निघाली. घरात कुलूप लावून दाराबाहेर आली. विजय चारचाकी घेऊन दारात तयारच होता. थोड्याच वेळात ते दोघे सी.पी.आर. मध्ये पोहचले. दोघेही चौकशी विभागामध्ये विचारपूस करत होते. इतक्यात इन्स्पेक्टर यादव यांनी त्यांना आपली ओळख करून दिली. विजय म्हणाला,
"साहेब, स्वप्नील कुठे आहे?"
"बॉडी पोस्टमार्टम विभागामध्ये आहे." यादव यांनी उत्तर दिले.
"पण हे सर्व कसे झाले?" सुप्रिया लगेच बोलली.
"दोन व्यक्ती आमच्या पोलीस स्टेशनमध्ये रात्री १२ वाजता आल्या होत्या. त्यांनी आम्हाला ह्या अपघाताबद्दल कल्पना दिली. आम्ही तातडीने अपघाताच्या ठिकाणी पोहचलो. थोडी लोक जमा झालेले. तिथली प्रक्रिया आटोपून आम्ही लगेच सी.पी.आर. ला आलो. मग तासाभराने तुमचा मोबाईल आला व मी तुम्हास येथे येण्यास सांगितले.
सुप्रिया व विजयला काहीच सुचत नव्हते. दहा मिनिटांनी परत सुप्रियाला चक्कर आली. त्याच हॉस्पिटलमध्ये तिला admit करण्यात आले. विजयने नितीनला कॉल केला व याबाबत कल्पना दिली. नितीन थोड्या वेळात तातडीने हजर झाला. विजय म्हणाला,
"मी स्वप्नीलचा कार्यक्रम आटोपून येतो. तोपर्यंत तू सुप्रियाकडे लक्ष ठेव." असे सांगून विजय घरी आला. शक्य होईल तेवढ्या नातेवाईकांना कॉल केला. स्वप्नीलचा सर्व कार्यक्रम आटोपण्यास पहाटेचे ४ वाजले होते. विजय लगेच हॉस्पिटलमध्ये परत आला. त्याने नितीनला प्रश्न केला,
"सुप्रिया शुद्धीवर आली होती का?"
"अजून नाही." नितीन बोलला.
"बरं... मी आता घरी जातो. थोडीशी विश्रांती घेऊन थोडेफार साहित्य इथे घेऊन येतो. कदाचित सुप्रियासाठी थोडे दिवस येथे थांबावे लागेल. तू थोडावेळ येथे थांबू शकतोस का?"
"हे काय विचारणे झाले मित्रा... तू घरी जा व सकाळी ये. तोपर्यंत मी वहिनींजवळ थांबतो. जा तू घरी."
"बर..." म्हणून विजय गाडीतून घरी आला. आला तसाच लगेच झोपी गेला. खूप कंटाळला होता तो. त्यामुळे त्याला लगेच झोप लागली.
पहाटेची मंद सूर्यप्रकाशाची किरणे त्याच्या तोंडावर पडताच त्याला जग आली. घड्याळावर नजर टाकली असता सकाळचे ८ वाजले होते. तो लगेच उठून फ्रेश झाला. घरातील थोडेसे साहित्य घेतले व हॉस्पिटलकडे निघाला. हॉस्पिटलमध्ये पोहचल्यावर सुप्रियाच्या खोलीमध्ये जाऊन पहिले असता नितीन तेथे नव्हता. बाहेर चौकशी केली असता नितीन औषधे आणण्यासाठी बाहेर गेला आहे, असे समजले. विजय पुन्हा सुप्रियाच्या खोलीमध्ये आला. इतक्यात नितीन आला. विजयने बोलायला सुरवात केली.
"मी काही दिवस ऑफिसला येऊ शकणार नाही. साहेबांना फोनवरून सांगतो. हि माझी रजा घे."
"बर .. मी दररोज संद्याकाळी ऑफिस सुटल्यावर येथे येईन. पण त्या अगोदर काही लागले किंवा कसलीही अडचण आली तर मला कॉल कर. मी येईन." नितीनने सांगितले.
"ठीक आहे. तू आता ऑफिसला जा. मी थांबतो इथे." नितीनने विजयचा निरोप घेतला व तो तेथून बाहेर पडला. ऑफिसला जाण्यापूर्वी घरी जाऊन फ्रेश झाला. जेवणाचा डबा घेतला, त्यानंतर कामावर गेला.
सकाळी १० च्या दरम्यान डॉक्टर चेकिंगसाठी आले. चेकिंग करून परत निघाले तेंव्हा विजयने त्यांना हाक मारली,
"डॉक्टर, सुप्रिया कधी शुद्धीवर येईल?"
"तसे काही सांगता येणार नाही. आमच्याकडे अजून ४८ तास आहेत. ४८ तासात त्या शुद्धीवर आल्या पाहिजेत नाहीतर...."
"तर काय डॉक्टर...."
"तर कदाचित त्या कोमामध्ये जाऊ शकतात. विजय त्यांना तुमच्या मुलाच्या घटनेचा जोराचा धक्का बसलेला आहे. त्या धक्क्यातून त्या अजून सावरलेल्या नाहीत. तुम्हाला यांची जरा जास्तच काळजी घ्यावी लागेल." असे सांगून डॉक्टर निघून गेले.
विजय डॉक्टरांच्या पाठमो-या आकृतीकडे काही क्षण पाहत राहिला. मग सुप्रियाच्या शेजारी ठेवलेल्या स्टूलवर तो बसला. रात्रीचे १० वाजून गेले तरीही सुप्रिया शुद्धीवर आली नव्हती. यांदरम्यान नितीन भेटून गेला होता. विजयची भूक मेली होती. थोड्याच वेळात त्याचा डोळा लागला.
"अहो, अहो... जरा ऐकता का?" सुप्रियाला पहाटे-पहाटे ६ वाजता जाग आली. तिने विजयला हाक मारायला सुरवात केली. विजयलासुद्धा तिच्या आवाजाने जाग आली. लगेच तो उठून तिच्याजवळ गेला.
"हा... बोल..."
"मला माझे पाय उचलता येत नाहीत."
"अवघडले असतील... जरा प्रयत्न कर." विजयने सुद्धा तिला उठवण्याचा प्रयत्न केला पण तिला तिचे पाय हलवता येत नव्हते.
"नाही... मी सकाळी उठले. तुमच्याकडे पहिले तेंव्हा तुम्ही खाली झोपला होता. तुमची झोप मोड होऊ नये म्हणून मी उठण्याचा प्रयत्न करत होते पण मला ते जमलं नाही. म्हणून मी तुम्हाला हाक मारली." सुप्रिया उठण्याचा प्रयत्न करत असतानाच म्हणाली.
"एक मिनिट थांब. मी डॉक्टरांना बोलवून येतो." म्हणत विजय डॉक्टरांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांना बोलवून आला. डॉक्टर सकाळी लवकर आले होते. त्यांना दुस-या रुग्णाचे ऑपरेशन करायचे होते. ऑपरेशनला १ तास वेळ होता. तत्पूर्वी त्यांनी सुप्रियाची तपासणी केली. सुप्रियाला पाय उचलण्याचा प्रयत्न करायला सांगितला पण तिला ते शक्य झालं नाही. आणखी थोडे चेकअप करून विजयला डॉक्टरांनी आपल्या केबिनमध्ये बोलावले व ते तिथून निघून गेले. त्यावर सुप्रिया विजयला म्हणाली,
"अहो, काय झालंय मला?"
"काही नाही. तू जास्त वेळ झोपली होतीस ना, म्हणून पाय अवघडले असतील. तू लवकर ठीक होशील. मी डॉक्टर काय म्हणतात ते पाहून येतो. तोपर्यंत तो आराम कर." असे सांगून विजय डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेला.
" सर,आत येऊ का?"
"हो... हो... या विजय, बसा." तसा विजयने समोरच्या खुर्चीवर बसताक्षणी प्रश्न केला,
"डॉक्टर, सुप्रियाला काय झाले आहे?"
"हे पहा विजय, सुप्रियाला अर्धांगवायूचा झटका बसलेला आहे. त्यामुळे त्यांच्या कमरेपासून खाली पायापर्यंतच्या भागात संवेदना नाहीत. माफ करा विजय. त्यांची काळजी घेत रहा."
डॉक्टरांचे बोलणे ऐकल्यानंतर विजयला तर वेडच लागायचे राहिले होते. तो त्यांना म्हणाला,
"सुप्रिया ठीक कधी होईल?"
"अशा केसेसमध्ये मी काही निश्चित सांगू शकत नाही. कदाचित त्यांना ठीक व्हायला एक महिना किंवा एक वर्ष किंवा बराच कालावधी लागेल. तोपर्यंत तुम्हाला तिला व्हीलचेअरवर ठेवावे लागेल. दोन आठ्वड्यानी तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता." यावर विजय काही बोलला नाही. फक्त 'ठीक आहे' म्हणून तेथून बाहेर पडला. सुप्रियाच्या खोलीमध्ये लगेच गेला नाही. थोडा वेळा बाहेर सुप्रियाला आता काय सांगायचे? याचा विचार करत होता. अर्ध्या तासाने तो सुप्रियाचया खोलीत गेला. विजयला पाहताच तिने बोलायला सुरवात केली.
"काय झालं?... डॉक्टर काय म्हणाले?"
"दोन आठवड्यात तुला डिसचार्ज मिळणार आहे."
"ते ठीक आहे. पण मला काय झालंय? डॉक्टरांनी सांगितले नाही का तुम्हाला?" सुप्रियाने असे विचारल्यावर ह्या प्रसंगी विजयला काय बोलावे? काय सांगावे हेच समजत नव्हते. विजयने दुस-या बाजूला चेहरा केला व म्हणाला,
"काही नाही... तुला थोडेदिवस व्हाईलचेअरवर बसावे लागेल. नंतर सर्वकाही ठीक होईल."
"मग तुम्ही दुसरीकडे तोंड करून का बोलत आहात. इकडे माझ्याकडे पहा. मला काय झालय ते खरं-खरं सांगा. तुम्हाला तुमच्या मुलांची शपथ..."
विजयसमोर आता काही पर्याय उरला नव्हता. त्याने तिला डॉक्टरांनी सांगितलेले सर्व काही सांगितले. दोघेही थोडावेळ शांत राहिले. मग विजय म्हणाला,
"तू आराम कर. नितीनला अर्ध्या तासापूर्वी फोन करून मी बोलावून घेतले आहे. तो आल्यावर स्वप्नीलचा रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आटोपून मी लगेच परत येतो." सुप्रिया मानेनेच 'हो' म्हणाली पण डोळ्यांत अजूनही अश्रू वाहत होते. विजयने तिला समजवण्याचा प्रयत्न केला.
"हे बघ... रडू नकोस. तू जर असे करायला लागलीस तर मला कसे वाटेल? मी लवकरात लवकर तुझ्याकडे येण्याचा प्रयत्न करीन. काळजी घे." इतक्यात नितीन तेथे हजर झाला. तो आल्या आल्या विजय घरी आला.
नितीनने दोन दिवसांसाठी किरकोळ रजा दिली होती. विजयला भरपूर मदत केली त्याने. स्वप्नीलचा १२ दिवसांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर सुप्रियाला व्हाईलचेअरवर बसवून घरी आणण्यात आले. आता त्या घरात फक्त दोघेच... विजय आणि सुप्रिया. विजय सुप्रियाची पुरेपूर काळजी घेत होता. सर्वकाही व्यवस्थित चालू होते. यांदरम्यान घरघुती कामासाठी एक बाई त्यांनी ठेवली होती. कल्पना नाव होते तिचे.
आता सुप्रियाच्या या घटनेला ६ महिने होऊन गेले होते. एक दिवस सकाळी-सकाळी कल्पना धावत विजयच्या खोलीजवळ आली दरवाज्या ठोठावला व विजयला हाक मारू लागली.
"साहेब.. साहेब... उठा लवकर."
विजय आदल्या रात्री उशिरा घरी आला होता. त्यामुळे तो अजून झोपेतच होता. दोन मिनिटांनी कल्पनाच्या व दरवाज्याच्या आवाजामुळे त्याला जाग आली. जांभई देत त्याने दरवाजा उघडला व कल्पनाला म्हणाला,
"काय झालं?"
"साहेब... वाहिनीसाहेब काही बोलत नाहीत."
"म्हणजे?"
"मी सकाळी ७ वाजता त्यांना हाक मारली परंतु त्या काही बोलल्या नाहीत. तुम्ही जरा खाली येऊन पाहता का?" विजय तातडीने जिन्यावरून खाली आला. सुप्रियाला उठविण्याचा प्रयत्न केला परंतु काही उपयोग झाला नाही. त्याने लगेच डॉक्टर साबळेंना फोन केला व म्हणाला,
"डॉक्टर, सकाळी एवढ्या लवकर तुम्हाला त्रास दिल्याबद्दल माफी मागतो. तुम्ही आता लगेच माझ्या घरी येऊ शकता का?"
"काय झालं?" डॉक्टर म्हणाले.
"सुप्रिया काही बोलत नाही. तिचे शरीर थंड पडले आहे. कृपया लवकर या."
"बरं..." म्हणत डॉक्टर साबळे १ तासांत त्याच्या घरी पोहचले. त्यांनी सुप्रियाचा चेकअप केला व म्हणाले,
"माफ करा विजय. सुप्रिया आता ह्या जगात राहिली नाही."
"काय? पण कसे? कालपर्यंत तर ती ठीक होती आणि अचानक असे कसे झाले?"
"त्यांना रात्री ३ च्या दरम्यान हार्ट अटॅक आला. काळजी घ्या." असे सांगून डॉक्टर निघून गेले.
विजयला खूप वाईट वाटले. त्याचा एकमेव शेवटचा आधारसुद्धा आता त्याला सोडून कायमचा दूर गेला होता. खूप रडला तो. त्याने नितीनला फोन लावला. घडलेली सर्व हकीकत सांगितली. नितीन लगेच विजयच्या घरी आला. त्याने त्याला आधार दिला. बघता-बघता सुप्रियाचासुद्धा कार्यक्रम आटोपून १२ दिवस होऊन गेले. असाच एक महिना गेला.
कल्पनाला पगार देऊन 'मी काही कामानिमित्त शहरात जात आहे. मला परत यायला वेळ होईल. ज्यावेळी मी येईन त्यावेळी तुला सांगेन' असे म्हणत विजयने घराला कुलूप लावले व तो घरातून गावाच्या बाहेर पडला. काहीतरी करण्यासाठी... काहीतरी शोधण्यासाठी... डोक्यात वेगळेच विचार चालू होते.
क्रमशः ...
-----------------------------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा