बघ माझी आठवण येते का?
खिडकीत उभे राहून बघ …
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातावर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण येते का? ।।धृ ।।
वा-याचे उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे,
डोळे मिटून घे, तल्लीन हो.
नाहीच जाणवलं काही तर पाय मोकळे कर,
समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच.
पाण्यात पाय बुडवून उभी राहा,
वाळू सरकेल पायांखालून,
बघ माझी आठवण येते का? ।।१।।
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे.
चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच.
शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये, आता नव-याची वाट बघ.
बघ माझी आठवण येते का? ।।२।।
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल.
त्याच्या हातातील ब्याग घे, रेनकोट तो स्व:ताच काढील,
तो विचारेल तुझ्या भिजण्याचे कारण, तू म्हण घर गळंतय.
मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उधास लावेल,
तू बंद कर,किशोरीचं सहीर अली लाव.
बघ मझी आठवण येते का? ।।३।।
मग रात्र होईल, तो तुला खुशीत घेईल,
म्हणेल, "तू मला आवडतेस.", पण तुही तसचं म्हण.
विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल,
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमो-या शरीराकडे बघ.
बघ माझी आठवण येते का? ।।४।।
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नकोस,
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर.
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर.
येत्या पावसाळ्यात एक दिवस तरी,
बघ माझी आठवण येते का? ।।५।।
लेखक : अज्ञात
लेखक : अज्ञात
संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा