मंगळवार, १० फेब्रुवारी, २०२६

2566. मुलांना समजावून सांगावं लागत

 ते मध्यमवयीन जोडपं माझ्यासमोर गंभीर मुद्रेने बसलं होतं. मी त्यांच्या एकुलत्या एक नऊ वर्षांच्या मुलाची जन्मपत्रिका काळजीपूर्वक तपासत होतो. अत्यंत तल्लख बुध्दीच्या मुलाची ती पत्रिका होती. उच्च शिक्षण तर तो सहजपणे पूर्ण करणारच होता. पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्याचं मोक्षस्थान अतिशय पाॅवरफुल होतं. तो अध्यात्मात रुची असलेला फार मोठा विद्वान बनण्याची शक्यता होती. 
मी हे सगळं त्याच्या आई - वडिलांना  सांगितलं. ते ऐकून त्यांची चिंता आणखीनच वाढली. त्याची आई काकुळतीला येऊन म्हणाली, "तो संन्यास तर घेणार नाही ना  ?? "
मी हसून तिची शंका दूर केली ," अध्यात्मात रुची असलेले अनेक जण अत्यंत यशस्वी संसार करत आहेत. अध्यात्मामुळे मन शांत व स्थिर राहतं. म्हणून संसारातील पेचप्रसंग आणि ताणतणाव हाताळणं सोपं जातं. अध्यात्माचा गाढा अभ्यास असलेले अनेक जण मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत."  त्यावर त्याचे वडील म्हणाले , "तुमचं म्हणणं योग्य आहे. पण तो देव दाखवा म्हणून आमच्या मागे लागला आहे. मला देव दिसला तरच मी प्रार्थना करेन असा हट्ट धरुन बसला आहे. त्याला कसं समजावून सांगायचं ते आम्हाला कळेनासं झालं आहे. "
मी थोडा वेळ विचार केला आणि दीर्घ श्वास घेऊन बोलायला सुरुवात केली.
"सध्याची इंटरनेट जनरेशन चालण्याच्या आधी स्मार्टफोन शिकते आणि त्यांच्यापुढे माहितीचे महादालन खुले होते. असे मूल साधारण नऊ - दहा वर्षाचे झाले की देवाविषयी सत्य सांगणं आवश्यक असतं, 
"देव दिसत नसतो किंबहुना तो दिसूच शकत नाही. तो फक्त जाणवतो. "
मग ते मूल विचारेल, " दिसत नाही तर जाणवेल कसा  ?? "
मग स्पष्टीकरण द्यायचे, " थंडी जशी दिसत नाही पण जाणवते तसंच देवाचं असतं. "
त्यावर मुलाचा प्रश्न येऊ शकतो, "मग मंदिर आणि मूर्ती कशासाठी असतात ?? "
मग मुलाला समजावून सांगायचं, " तू मित्राशी बोलायला मोबाईल वापरतोस ना तसंच मंदिर आणि मूर्ती देव जाणवण्यासाठी असलेलं माध्यम आहे. "
पण सध्याची मुलं फार चौकसबुद्धीची असतात. ते मूल प्रतिप्रश्न विचारेल, " मग मी मंदिरात गेल्यावर मला देव का जाणवत नाही  ?? "
मग नेटाने त्याला कन्व्हिन्स करायचं, " तू फोन लावल्यावर कधीकधी तुझा मित्र रेंजबाहेर असतो ना तसाच देव आपल्या रेंजबाहेर असतो. त्याला रेंजमध्ये आणण्यासाठी मंदिरात जाऊन मूर्तीपुढे हात जोडून प्रार्थना करावी लागते. अशी कित्येक वर्ष प्रार्थना केल्यावरच देव आपल्या रेंजमध्ये येऊन आपल्याला जाणवतो. "
या उत्तराने ते मूल नक्कीच समाधानी होईल आणि त्याच्या उर्वरित आयुष्यात त्याच्या मनात देवाविषयी कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही. " 
माझं बोलणं ऐकल्यावर ते जोडपं रिलॅक्स झालं. त्यांच्या चेहऱ्यावरील तणाव निवळला. त्यांना त्यांच्या समस्येचं उत्तर मिळालं होतं. मग मला नमस्कार करुन ते गेले. 
काही दिवसांतच रोजच्या कामाच्या रहाटगाडग्यात मी हा प्रसंग साफ विसरुन गेलो होतो. 
एके दिवशी मी सोलापूर येथील सुप्रसिद्ध मारुती मंदिरात गेलो होतो. तिथे गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर मला आश्चर्याचा धक्काच बसला. एक गोड छोटा मुलगा खणखणीत आवाजात मारुतीस्तोत्र म्हणत होता. त्याचे शब्दोच्चार स्पष्ट व शुद्ध होते. मी आजूबाजूला पाहिलं पण त्याचे आईबाबा कुठं दिसत नव्हते. कदाचित प्रदक्षिणा करत असावेत. मग मी बाहेर येऊन थोडा विसावलो. 
तेवढ्यात तो मुलगा त्याच्या पालकांसोबत बाहेर आला. ते तेच जोडपं होतं. आमची नजरानजर होताच ते अत्यानंदाने माझ्याकडे आले. मी त्यांच्या मुलाचं खूप कौतुक केलं. त्यांनी आनंदाने सांगितलं की तो आता सर्व श्लोक तोंडपाठ म्हणतो. मग त्यांच्याशी काही वेळ बोलून मी समाधानाने तिथून निघालो. 

--जितेंद्र अभ्यंकर
  8605396156

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...