मी सकाळी लवकर दुकान उघडले आणि देवाला निरंजन लावत असताना संजय दुकानाच्या पायऱ्या चढतांना दिसला..
'अरे.. आज सकाळीच.. नेहेमी फोन करतस.. आज स्वतः..?
'होय बाबा.. नायतर डोंबिवली सुन गिरगांवात मुद्दाम कोण येतलो? आता सत्तरी पार झाली माझी, पाय दुखतात आणि गाडीक गर्दी किती?
'होय बाबा.. गाडीची गर्दी.. दिवसेंदिवस वाढताच बाबा.. खय गेल्ल?
'अरे मेहता वकील आसा ना.. तुज्या शेजारचो, तेची अपॉइंटमेंट घेतलंय..
माझ्या दुकानाच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये मेहता वकीलाचे ऑफिस होते.
'मेहता वकील? तेका भेटाक ईल.. काय काम?
'आमच्या कांदेवाडीतल्या खोलीचो विषय रे..
'हा.. तुमची कांदेवाडीतली खोली.. पण तुजो भाऊ थय रवता ना?
'तीच गोष्ट.. माझ्या वडिलांची ती खोली.. तेनीच घेतलेली.. तेंचाच नाव त्या खोलीवर.. वडील बारा वर्षांपूर्वी गेले, मग आई गेली.
'मग?
'मी तीस वर्षांपासून वेगळो झालाय.. म्हणजे त्या खोलीत जागा कमी म्हणून डोंबिवलीत ब्लॉक घेतलंय..
'बरा मग..
'माजो धाकतो भाऊ विजय थय रवता.. तो, तेची बायको आणि मुलगी. बाबा गेल्यानंतर त्याना आपला नाव खोलीवर लाऊन घेतल्यानं..
'माका न सांगता खोलीवर आपला नाव लावल्यानं.. म्हणून मी आता त्याच्यावर केस दाखल करतलंय..
'अच्छा.. म्हणून तू वकिलाक भेटाक इलास?
'ह्या वकिलाचा कोणी तरी माका नाव सांगलाला.. तेचो फोन नंबर मिळालो.. मी तेका सर्व हकीगद सांगितलंय.. तेना ग्यारंटी दिलिया..
'कसली ग्यारंटी?
'माजा नाव पण खोलीवर लागतला.. तेची ग्यारंटी..
'म्हणजे तू वकील करतलं.. कोर्टात जातलं.. भावाक कोर्टात खेचतलं.. बरोबर?
'होय बरोबर..
'म्हणजे संजय कोनकर विरुद्ध विजय कोनकर.. बरोबर?
'म्हणजे सक्खे भाऊ पक्के वैरी..
'काय करतले? माजी बायको एकसारखी माज्या मागे लागलीय.. आपणाक पण खोलीचो हिस्सो होयो म्हणून.
तेव्हड्यात माझी दुकानातील माणसे कामावर आली, तसा मी संजयला घेऊन माझ्या दुकानातील आतल्या खोलीत घेऊन आलो. संजय हा माझ्या गावातील. त्याचे वडील आणि माझे वडील मित्र. खूप वर्षांपूर्वी संजयचे वडील मुंबईत आले आणि गव्हार्मेंट प्रेसमध्ये चिकटले. मग त्त्यांचे लग्न झाले. त्यांनीच गिरगांवात कांदेवाडीत खोली घेतली. त्याना दोन मुलगे.. संजय आणि विजय. लग्न झाल्यानंतर संजय डोंबिवलीस राहायला गेला. त्याला एक मुलगा.. तो इंजिनिअर होऊन परदेशी गेल्याचे मला माहित होते.संजय म्युनि्सिपलटीतुन निवृत्त झालेला.. त्याची बायको शिक्षिका.. दोघांनाही पेन्शन होती.
त्याचा भाऊ विजय फारसा शिकला नव्हता, त्यामुळे तो एका सहकारी बँकेत प्यून होता. त्याची बायको छोटेमोठे क्लास घयायची. त्याना एक मुलगी. ती बहुतेक शिकत होती.
'त्या साठी तू मेहता वकीलाक भेटुक इलंस..
'होय..
'तू वकीलाक केस दाखल करूंक सांगलंस.. म्हणजे वकीलाचो मीटर सुरु होतलो..
'म्हणजे?
'म्हणजे वकील सुरवातीक अंदाजे पन्नास हजार घेतलो आणि मग दर तारखेक अंदाजे दहा हजार.. म्हणजे पुढची पंधरा वीस वर्षा वकिलाचा तुझ्याकडून कमाई सुरु..
'पुढची पंधरा वर्षा?
'मग तुका काय वाटला.. तू केस दाखल केलंस काय ताबडतोब जज्ज निकाल देतलो?
'मग?
'पुढची दहा.. पंधरा वर्षा तुका कोर्टात फेरये मारुचे लागतले.. तुका डोंबिवलीहुन मुंबईच्या कोर्टात येऊक झेपतला?
'नाय रे बाबा.. आजच मी इलंय तो थकलाय..
'तुझो झील अमेरिकेक.. तूझ्यानंतर तो केससाठी हजर रवात?
'नाय रे बाबा.. तो आताच सांगता.. एका जुन्या खोलीसाठी कसली केस लढवता?
'मग?
'माझी बायको मागे लागलीया.. आमका खोलीचो हिस्सो गावाक होयो म्हणून..
'मग असा कर.. वहिनीला एकदा क्रॉफड मार्केट मध्ये काही तरी खरेदीच्या निमित्ताने हाड.. त्याच्या बाजूक सिव्हिल कोर्ट आसा.. त्या कोर्टात तिका घेऊन जा.. थय तुझ्यासारखीच कोर्टात केस लढवणारे भेटतले.. तेंका कोर्टाचो अनुभव विचार.. किती दिवसांनी निकाल लागता.. वकील किती पैसे घेतत, या सगळा बायकोसमोर विचार. मग बायकोक सांग.. माका कोर्टात दरवेळी येऊक झेपचा नाय.. तेंव्हा तुका म्हणजे तूझ्या बायकोक केस लढवण्याचो अधिकार देतंय.. तेंव्हा तू कोर्टात दर महिन्याक ये.. मग तुझी बायको काय म्हणता ता माका सांग.. आज तू मेहता वकिलाक भेटू नको.. थोडे दिवस थांब..
'बरा.. मी सोमवारी बायकोक कोर्ट दाखवतंय..
"आणि एक लक्षात ठेव.. सख्या भावाविरुद्ध कोर्टात गेलास की तुमचा नाता संपला.. विजयची मुलगी तूझ्या मुलाक राखी बांधी किंवा भाऊबीजक ओवाळी.. ता सगळा संपला..
संजयने आवंडा गिळला.. कदाचित कुटुंबात पुढे काय परिस्थिती होईल याचे चित्र त्याच्या डोळ्यसमोर आले असेल.
'बर. मग मी जातंय..
'मग परत माका भेट..
संजय गेला.. आता मला तो परत आठ पंधरा दिवसात भेटणार होता.. एका कुटुंबाला कोर्टकचेरी पासून मला लांब ठेवायचं होत.
अंदाजे पंधरा दिवसांनी एका भर दुपारी घामाघूम झालेला संजय आणि त्याची बायको दुकानात आली. मी त्याना पहाताच दुकानातल्या मुलाला तीन सरबताची ऑर्डर सांगायला सांगितली आणि त्या दोघांना आतल्या खोलीत घेऊन आलो...
'अरे विश्वास.. आमी आज क्रॉफड मार्केट मध्ये गेलेलो.. स्मिताक त्याच्या बाजूचा सिव्हिल कोर्ट दाखवलंय.. म्हंटलं या कोर्टात आपली केस चलतली..
मग स्मितावाहिनी बोलू लागली..', अहो.. काय ते कोर्ट, किती गर्दी.. काळेकोटवाले इकडून तिकडे फिरत होते.. लोक बिचारी आपले नाव कधी पुकारतात, त्याची वाट पहात होती. M
'अहो, ते काळेकोट वाले वकील, मेहता वकिलासारखे..
'अहो.. मी तेथे बसलेल्या लोकांना विचारले.. ती म्हणाली गेली आठ दहा वर्षे आम्ही प्रत्येक तारिखला येतच असतो.. पण केसची फारशी प्रगती नाही, केंव्हा निकाल लागेल कोण जाणे,? आणि पैसे पण खूपच जातात म्हणे.
'हो, म्हणूनच मी तुमच्या नवऱ्याला त्या दिवशी सांगितलं, भावाविरुद्ध कोर्टात जायच्या आधी दहा वेळा विचार करा.. त्यात तुमचा नवरा म्हणतो, मला दर महिन्याला कोर्टात हजर रहायला झेपणार नाही.. मग मी त्याला म्हंटले..तू स्मिता वहिनींना अधिकार दे, म्हणजे त्या येतील कोर्टात दरवेळी..
'छे छे.. मला नाही जमायचे, मला शुगर आहे, छातीत धडधडतय..
'मग प्रत्येक तारिखला कोर्टात कोण येणार? पुढील किमान पाच वर्षे, जास्तीत जास्त कितीही..
दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पहात राहिली.
'मग काय करायचे? शेवटी माझ्या नवऱ्याचा हक्क आहे त्या खोलीत...
'आहेच.. कोण नाय म्हणत? म्हणून सख्ख्या भावाला कोर्टात खेचायचं?
'पण त्याने आपल्या मोठया भावाला फसवलंय ना, त्याला असाच सोडायचा?
'काय आहे संजय, तू मोठा भाऊ बरोबर.. तू वेगळा राहतोस, मग तूझ्या वडिलांच्या शेवटच्या आजारपणात त्त्यांची तू आणि वहिनीनी कितीशी देखभाल केली? की केलीच नाही?
दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पहात राहिली.
'काय आहे विश्वासभावोजी, त्याकाळात आम्ही दोघेही जॉब करत होतो ना, शिवाय माझा रोज डोंबिवली ते माहीम प्रवास आणि यांचा डोंबिवली ते दादर.. त्यामुळे...
'म्हणजे तुमच्या आईवडिलांना त्यान्च्या अखेरच्या काळात तुमच्या धाकट्या भावाने आणि वाहिनीने पाहिले. त्यामुळे तुमच्या आईवडिलांची इच्छा असणारं की ही खोली विजयला मिळावी.
'अस कस.. पण खोलीला आपलं नाव लावून घेताना त्याने आम्हाला विचारायला नको?
'ही त्याची चूक होती.. पण त्यांच्याबाजूने विचार करताना.. त्याला वाटले असणारं.. आपल्या भावाचा चार खोल्याचा फ्लॅट आहे, शिवाय एकच मुलगा.. तो पण परदेशीं, दोघांना पेन्शन आहे, आर्थिक सुबत्ता आहे.. गरज आहे ती स्वतःला, कारण मुंबईत घर घेण्याची त्या नवराबायकोची परिस्थिती नाही..
'मग करायचे काय भावोजी? त्याला खोली अशीच दयायची?
'तडजोड करायची.. दोन पावले आपण मागे यायचे.. दोन पावले त्याने पुढे यायचे.. कोर्टकचेरी करून भावाभावात क्लेश करण्यापेक्षा थोडी तडजोड करायची.
'मी विजयला बोलावतो.. तुम्ही दोघे शनिवारी चार वाजता येथेच या. दोघांना जमेल झेपेल अशी तडजोड.
ती दोघे शनिवारी पुन्हा येण्याचा शब्द देऊन घरी गेली.
माझ्या लक्षात आले, लहान भाऊ मोठया भावाकडे पाहून हसला पण मोठया भावाने आणि वाहिनीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले.. मग मी बोलू लागलो..
"संजय आणि विजय.. तुम्ही दोघे माझ्या गाववाले.. तुमचे वडील माझ्या वडिलांचे मित्र.. म्हणून मला वाटते.. तुम्ही भाऊ एका खोलीसाठी कोर्टात जाऊ नये. सख्या भावांनी एकमेकांविरुद्ध कोर्टात गेल्याने.. एका आईच्या पोटी जन्म घेतलेल्या भावामध्ये कायमची दुष्मनी येते, ते वैर पुढील पिढीत पण येते. वकिलांची कमाई होते, ते झुंजवतात.. त्या ऐवजी समोरासमोर बसुन चर्चा करावी, दोघांनीही तडजोड करावी..
दोघांनीही मान हलवली.
'आता मला सांगा.. तुमच्या वडिलांच्या आणि नंतर आईच्या अखेरच्या आजारपणात त्याना कोणी पाहिले?
मोठा संजय आणि त्याची बायको स्मिता गप्प राहिली. पण विजय बोलू लागला..
'विश्वासभाऊ, आम्ही त्याच खोलीत होतो ना.. आम्ही दोघांनीच पाहिले त्त्यांचे आजारपण..
'खरं म्हणजे आपल्या आईवडिलांची त्यांच्या अखेरच्या दिवसात देखभाल न करता फक्त त्यान्च्या इष्टेटीवर हक्क सांगणे हे चूक आहे. ज्याने आपल्या आईवडिलांची काळजी घेतली, त्त्यांचे आजारपण काढले त्यांना त्त्यांची प्रॉपर्टी मिळावी असा नियम हवा. पण आपला कायदा.. त्यान्च्या मुलांना, मुलींना.. फक्त त्यानी त्यांच्या आईच्या पोटी जन्म घेतला की त्याना वारसहक्क मिळतो.
'हो.. आमचा हक्क आहेच त्या खोलीवर..
'होय.. हक्क आहेच तुमचा.. पण तुमची जबाबदारी पण असते, ती तुम्ही विसरलात.. आता विजयने आपल्या नावे खोली केली, हे पण तसे चूक आहे कारण वारसहक्काने संजय पण हक्कदार आहेच.. पण आता कोर्टात न जाता दोघांनी तडजोड करावी.. असे मी सुचवतो.
'कसली तडजोड विश्वासदादा?
'विजय.. तू या खोलीच्या बदल्यात संजयला तुला शक्य होईल तेव्हडी रक्कम द्यावी.. आणि संजयने ती मान्य करावी.. तू जास्तीत जास्त किती रक्कम देऊ शकतोस विजय?
विजय आणि त्याची बायको बाजूला गेली आणि आपसात बोलू लागली.
थोडया वेळाने परत खुर्चीत बसली आणि मला म्हणाला
'दादा, माझी फारशी बरी परिस्थिती नाही पण मी इकडचे तिकडचे जमवून आठ लाख देऊ शकतो..
मी विजय आणि स्मिताकडे पाहिले. एव्हाना त्याना पण समजले होते.. कोर्टात जाऊन आणि वकिलांना पैसे देऊन.. किती वर्षांनी निकाल लागेल कोण जाणे, त्यापेक्षा..
'हो, आम्हाला मान्य आहे...
दोघेही एका आवाजात म्हणाली.
'पण पैसे तुमच्या याच खोलीत दयायचे..
विजयने मान हलवली..
मी पाच सरबताची ऑर्डर दिली.
दोन्ही जोडया समाधानाने सरबत पिऊन घरी गेल्या.
मी काय मिळविले या मध्यस्थीत?
एक कुटुंब वाचवले.. दोन भावांना एकमेकांचे शत्रू होताना वाचवले.
शेवटी तडजोड महत्वाची.
प्रदीप केळुस्कर...
9307521152 / 9422381299
29/01/ 26.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा