मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

1423. थट्टा

 खेळता-खेळता मध्येच पवनला आठवण झाली आणि धावत स्वयंपाक घरात येऊन त्यानं  गायत्रीला विचारलं, 
"आई, कामत आजी कुठे गेल्या गं?" गायत्री एकदम दचकली. आज ना उद्या तो हा प्रश्न विचारणार हे माहित असूनही ती दचकली. मृत्यू  अटळ जरी असला तरी आत्ताच त्याविषयी पवनशी काही बोलण्याची तिची अजिबात इच्छा नव्हती. या पाच वर्षांच्या चिमुरड्या ला काय उत्तर द्यावं बरं? त्याच्या कोवळ्या मनाला फार धक्का बसणार नाही अशा शब्दात तिने त्याला उत्तर द्यायचं ठरवलं.
"अरे,  कामत आजी ना देवाघरी गेल्या. " 
"देवाघरी?  म्हणजे कुठे गं? "
" म्हणजे खूप लांब!"
" का गेल्या? " 
"अरे त्या म्हाताऱ्या झाल्या होत्या ना ! "    
 "म्हाताऱ्या म्हणजे? "
आता म्हाताऱ्या म्हणजे काय सांगायचं? गायत्रीला प्रश्न पडला तेवढ्यात तिच्या लक्षात आलं, 
"अरे त्यांचे केस पाहिलेस का, कसे सगळे पांढरे झाले होते. "
 " केस पांढरे झाले की म्हातारं होतं? "
 "हो"
 "मग त्या परत कधी येणार? "
 "जे देवाघरी जातात ना, ते परत येत नाहीत बरं. "
 " का? "
 "देवाचं घर खूप लांब असतं ना म्हणून. "
     पवनच्या चिमुकल्या मनात अनेक प्रश्नांनी गर्दी केली असावी. त्या प्रश्नांच्या गर्दीचा गोंधळ त्याच्या काहीशा भेदरलेल्या चेहऱ्यावर   स्पष्ट दिसत होता. त्याच्या  मनाची घालमेल त्याच्या टपोऱ्या डोळ्यात उमटली होती. एवढ्यात शेजारचा श्रेयस पवनला खेळायला बोलवायला आला आणि आभाळातले काळे ढग पांगून,  आभाळ स्वच्छ, मोकळं व्हावं तसे पवनच्या मनातले प्रश्न बहुधा पांगले, आणि उड्या मारत तो खेळायला निघूनही गेला. गायत्रीला एकदम हुश्श वाटलं.          
      बालवाडी मोठ्या गटाच्या वर्गाची तोंडी परीक्षा सुरु होती. चार / पाच वर्षे वयाच्या त्या चळवळ्या मुलांना गप्प बसवणं, नि त्याच वेळी एकेका मुलाला पुढे बोलावून त्याची परीक्षा घेणं, दोन्ही कामं एकाच वेळी.  खेर बाई अगदी मेटाकुटीला आल्या होत्या. आता पवनचा नंबर होता.  बाईंनी  त्याला पुढे बोलावलं.  तो बाईंच्या समोर येऊन उभा राहिला. 'सजीव म्हणजे काय निर्जीव म्हणजे काय' हे आधीच्या मुलाला विचारून झालं होतं. त्यामुळे खेर बाईंनी पवनला पुढचा प्रश्न विचारला. 
 "सजीवांची उदाहरणं सांग!"
 खेर  बाई मध्यम वयाच्या,  रंगाने  काळसर, काहीशा  स्थूल होत्या. आवाज मोठा. त्यामुळे रागावून बोलल्यासारखं वाटे. बाईंचा एक डोळा तिरळा होता पण बाई स्वभावानं मात्र मनमोकळ्या होत्या. पवन बाईंच्या  समोर उभा राहिला खरा, पण एवढ्या जवळून तो बाईंना प्रथमच बघत होता. त्याचं सगळं लक्ष बाईंच्या तिरळ्या डोळ्याकडे केंद्रित झालं होतं.  त्यामुळे बाईंचा प्रश्न त्याच्या कानात  मुळी  शिरलाच नाही. बाईंनी मोठ्या आवाजात पुन्हा तोच प्रश्न त्याला विचारला. आता मात्र तो प्रश्न पवन च्या कानात शिरला. गडबडून जाऊन त्याने इकडेतिकडे पाहिलं  आणि उत्तर दिलं, " पंखा "
बाईंच्या भुवया उंचावल्या. बाईंनी पंख्याकडे पाहिले. पंखा फिरत होता. 
" आणखी एखादं उदाहरण सांग  !"
" अं ?  पडदा" पवनने वाऱ्याने हलणाऱ्या पडद्याकडे बोट केले. बाईंनी विचारले, "पंखा, पडदा सजीव आहेत? " पवन ने होकारार्थी मान डोलावली. 
"का बरं? "
"बाई, ते हलताहेत ना !"
" बरं,  मग  निर्जीवांची  उदाहरणं सांग." पवनने  पुन्हा वर्ग भर नजर फिरवली.  त्याला निर्जीव काही दिसेना.  
"अरे, सांग लवकर !"  पवन ने क्षणभर विचार केला नि  उत्तरला, 
" तुम्हीच की  बाई!"
     खेर बाई केवढ्या तरी दचकल्या. नाकावरून घसरून पडणारा चष्मा बाईंनी कसाबसा पकडला आणि आश्चर्यानं त्यांनी विचारलं, " मी निर्जीव ?  का बरं? पंखा, पडदा सजीव आणि मी निर्जीव?  का सांग?  "
 "तुम्हीच सांगितलं ना बाई,  हलणारे ते सजीव आणि  न हलणारे ते निर्जीव.  पंखा, पडदा,  ही मुलं, सगळे हलताहेत ना बाई.  तुम्हीच तेवढ्या हलत नाही आहात.  केव्हाच्या खुर्चीवरच बसला आहात.  म्हणून तुम्ही निर्जीव. "
  पवनच्या सहज स्पष्टीकरणाने  खेर  बाई चाटच पडल्या.  स्पष्टीकरणात काहीच चूक नव्हती. सजीव-निर्जीव मधील फरकाचे बाईंनी आणखीही मुद्दे सांगितले होते शिकवताना. पण  पवनने  सोपा एकच मुद्दा लक्षात ठेवला होता. बाईंना पवनच्या  विचार करण्याची मोठी गंमत वाटली. साडेअकरा वाजले. शाळा सुटली.  गायत्री पवन ला घेऊन निघणार तोच खेर  बाईंनी  हाक मारून तिला थांबवले आणि परीक्षेचा किस्सा तिला ऐकवला. हसतच त्या उद्गारल्या, "अहो तो मला माझ्यासमोर निर्जीव म्हणतोय आणि  मी ऐकतेय !  अगदी शब्दशः अर्थ घेतात ही मुलं आपल्या बोलण्याचा."    
गायत्रीने हसता हसता डोळे  वटारून पवनकडे पाहिले. खेर बाईंबरोबर   इकडचे  तिकडचे चार शब्द   बोलून गायत्रीने गाडी सुरू केली. 
"काय रे, बाईंना असं बोलतात? अरे, नुसते हलणारे म्हणजे सजीव नाही.  श्वास घेतात,  सोडतात,  ते सजीव. ज्यांची वाढ होते ते सजीव. आपण सगळी  माणसं,  हे पक्षी,  प्राणी, झाडं,  हे सजीव.  आपल्या शेजारचं बाळ आधी किती छोटं होतं, आता चालायला लागलं,  आणखी मोठं झालं की,  तुझ्यासारखं शाळेत जाईल.  तू सुद्धा आणखी मोठा झालास की निखील दादा सारखा कॉलेजला जाशील. "
 "आणखी मोठा झाल्यावर? "
 "आणखी मोठा झाल्यावर नोकरी करशील,  नाही तर एखादा व्यवसाय करशील. "
 "सगळी माणसं मोठी होतात? "
 "हो "
 "आणि मग  आणखी  आणखी मोठी झाल्यावर? "       . 
 "मग म्हातारी होतात."
 "मग? "
 गायत्री आता वैतागली. संभाषण भलतीकडे जाऊ लागलं. 
 "मग काही नाही.  नंतर सांगेन. चल उतर. घर  आलं बघ आपलं. "
        हात-पाय धुऊन,  कपडे बदलून  पवन डायनिंग टेबल जवळच्या  खुर्चीत येऊन बसला. गायत्रीने दोघांची  ताटं वाढून  घेतली.
" आई,  सांग ना,  म्हातारं झालं की काय होतं? "    गायत्री गप्पच राहिली. तसा पवनच पुढे म्हणाला, 
" मग मरून जातात ना,  त्या कामत आजींसारखं ?  सांग ना !"   गायत्री त्राग्याने म्हणाली,  
"हो"
" तू पण  मरणार ? "
" हो "
" पप्पा पण? "
" हो "
" दीदी पण ? "  शेजारची तन्वी दीदी  फार आवडती होती त्याची. 
" हो रे "
    आता मात्र छोट्याशा पवनची  चांगलीच घाबरगुंडी उडाली.  त्यानं  विचारलं, " मग मी एकटाच राहणार?  माझ्याबरोबर कोण मग?"        
"अरेच्चा !  खरंच की! " गायत्रीला त्याच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून हसू आलं.
"अं, आपण  असं करू,  तुझं लग्न करू,  एक बायको आणू  तुझ्यासाठी." 
" हो , चालेल."   पवन एकदम खुष झाला. दिवा लावताच अंधार नाहीसा होतो तशी त्याची भीती नाहीशी झाली. श्रावणातल्या ऊन पावसासारखा पवनच्या चेहऱ्यावरील भीती आनंदाचा तो खेळ  पाहून  गायत्रीलाही एकदम मोकळं मोकळं वाटलं. संभाषणातून आलेला ताण एकदम कमी झाला. तिनं त्याला गमतीने विचारलं,       .     
" कशी बायको हवी रे तुला? "    .   
पवनचे  नुसते ओठच नाही तर आता त्याचे डोळेही बोलके झाले. हसू लागले. म्हणाला,  "तुझ्यासारखी !"
" माझ्यासारखी? " गायत्रीने काहीच न कळून विचारले, " म्हणजे रे? " 
       तसा पवन खुर्चीतून उठला,  आईच्या दोन्ही गालावर हात ठेवून तिच्याकडे पहात म्हणाला, " तू कशी माझी काळजी घेतेस,  माझ्याशी गोड बोलतेस,  तशी तुझ्यासारखी !" गायत्रीने हसतच त्याला जवळ घेतले. श्रावण संपला. गणेशोत्सवही थाटात पार पडला.  ऑक्टोबर हीट सुरू झाली. गायत्रीची तब्येत बिघडली.  सर्दीने चांगलंच बस्तान बसवलं. गोळ्या घेऊन काम करणं सुरू होतं. सकाळची तिची कामं आवरली.  पवनला शाळेतून  घेऊन आली,  त्याला जेवू घातलं. पेपर जरा वेळ चाळून, तास दोन तास झोप काढायची, असा विचार करून ती सोफ्यावर बसली पेपर वाचत. पवनने आज उड्या मारायचा खेळ सुरू केला.  बाईंनी वर्गात हनुमानाची  लंकादहनाची गोष्ट सांगितली होती. खुर्चीवर चढ, मध्येच टेबलावर चढ,. मग सोफ्यावर चढून उड्या मारणं चालू झालं. उड्या मारता मारता, सोफ्यावर चढल्यावर, मध्येच त्याचं लक्ष गेलं आईच्या केसांकडे.  गायत्री च्या केसात बोटं घालून तो म्हणाला, 
"आई तुझे केस पांढरे झाले? "
          गायत्रीचे केस फार लवकर पांढरे झाले होते. माथ्यावरचे तर  जवळजवळ  सगळेच. कलर लावावा लागे. पण तब्येत बरी नसल्याने तिने बरेच दिवस केसांना कलर लावला नव्हता. त्यामुळे नवीन वाढलेले केस पांढरे दिसत होते. गायत्रीला पवनची थट्टा करायची लहर आली.
ती गमतीनं  त्याला म्हणाली, " हो रे, आता मी म्हातारी झाले ना!"
तसा तिच्या गळ्यात पडत पवन म्हणाला, " खोटं बोलतेस !"
"अरे खरंच ! बघ की माझे केस !" गोंधळून गेलेला पवन चा चेहरा पाहून गायत्रीला चांगलंच हसू आलं. 
जेवणं झाली. गायत्री टेबल आवरु  लागली. इतक्यात पवननं  गोळ्या आणि पाण्याचा पेला तिच्यासमोर धरला,
"आई, हे घे."
      शशांक  हात धुवून  बाहेर हॉलमध्ये जाणार,  तोच पवन त्याला म्हणाला, 
"बाबा आता हे टेबल आवरायचं काम तू कर बघू. आईला झोपू दे,  केवढी सर्दी झालीय बघ तिला."
आईकडे वळून म्हणाला, " आई, तू झोप.  मी बाबाला सांगितलंय आवरायला "
शशांक बघतच राहिला आपल्या लेकाकडे. तो काय बोलतोय हे जरा वेळ त्याला कळलंच नाही. पवनचं बाबाला दमात घेणं  आणि शशांकचं  बुचकळ्यात पडणं ! गायत्रीला आता चांगलं हसू लोटलं.
 "हा काय प्रकार आहे गायत्री?  काय बोलतोय हा?  "काय चाललंय हे  काहीच न कळल्याने शशांकने  अखेर  गायत्रीला विचारलं. गायत्री आपलं हसू आवरत म्हणाली, 
 " अहो, आपला पोरगा आता मोठा झालाय  बरं का ! आई आजारी पडलीय, तर तेवढी काळजी घेतोय पहा !  हे तर काहीच नाही.  काल पायात काही न घालता स्वयंपाक घरात काम करत होते तर स्लीपर आणून दिली. रात्री मध्येच उठतो आणि माझ्या अंगावरचं पांघरूण सारखं करतो. डोकं दाबून देतो. काल भाजी आणायला सुद्धा माझ्याबरोबर आला होता. एकटी नको जाऊ म्हणे." "           
" आई,  तू जा, झोप. "
      पवनने आईला बेडरूम मध्ये जायला लावलं आणि तो शशांकला म्हणाला, "बाबा तुला माहीत नसेल ना आवरायचं?  मी सांगतो चल. आधी ही टेबलावरची खरकटी ताटं  उचल आणि बेसिन मध्ये ठेव. ती लोटी, पेले  पण उचल....."
      पवनच्या देखरेखीखाली शशांकने मुकाट्याने टेबल आवरलं. झाकपाक केली. आठ दहा दिवस उलटले. गायत्रीची सर्दी जरा कमी झाली. रविवारचा दिवस होता. पवन ला सुट्टी होती. गायत्रीने  सकाळी लवकर उठून केसाला कलर लावला. पवन उठेपर्यंत तिचे केस धुवूनही  झाले. आरशात ते काळे केस पाहताना  चेहरा जरा बरा वाटत होता. सुट्टी असल्यानं पवनला आवराआवरी ची काहीच गडबड नव्हती.  उठून, तोंड धुऊन,  दूध घेतल्यावर त्यानं  चित्रकलेची वही काढली नि  बसला रंगवत. चित्र रंगवून झालं आणि गायत्रीला ते दाखवायला तो स्वयंपाक घरात  आला. गायत्री स्वयंपाक घराच्या बाल्कनीमध्ये भाजी निवडत फरशीवरच बसली होती. चित्र दाखवता दाखवता पवनचं लक्ष गेलं तिच्या केसांकडे. तिचे काळे केस पाहून  आश्चर्यानं तो म्हणाला,  
"अगं आई, तुझे केस काळे झाले !"  
 त्यावर गायत्री सहज गमतीनं म्हणाली,  "अरे बघ ना, जादू झाली  ! "
 हे  तिचे उदगार ऐकताच पवनचे डोळे विस्फारले,  आनंदाने तो ओरडला,  " अगं  म्हणजे तू मरणार नाहीस?  "
 त्यानं हातातली वही, खडू तिथंच खाली टाकले आणि आनंदानं तो नाचतच सुटला सगळ्या घरभर ! 
 त्याच्या या उद्गारांनी गाढ झोपेतून दचकून जाग व्हावं तशी गायत्रीची अवस्था झाली.  तिला काही काम सुचेना. पुढचं काही दिसेना, डोळे भरून आले. त्याचं ते आनंदानं ओरडणं,  घरभर नाचणं पाहून लखकन वीज चमकावी तशी तिला आपली चूक लक्षात आली.  त्याची केलेली थट्टा आठवली.  .    
     आपल्या थट्टामस्करी करण्यानं,  सहज बोलण्यानं  तो मात्र  केवढा प्रचंड तणावाखाली असणार ! तेही आठ-दहा दिवस ! काय बरं विचार करत राहिलं असेल  एवढंसं हे पोर ! आईचे केस पांढरे झाले म्हणजे ती मरणार.  कामत  आजींसारखी देवाघरी जाणार म्हणजे परत येणार नाही ! या विचारासरशी सरसरून काटा आला गायत्रीच्या अंगावर. सकाळ -संध्याकाळ औषध घेतलंस का विचारणं,  भाजी आणायला,  सामान आणायला बाहेर जाताना बरोबर येणं या  त्याच्या वागण्यामागे काळजी पेक्षा भीती अधिक होती तर ! रात्री मधेच उठून पांघरूण  नीट करताना आई शेजारी आहे ना, याची तो जणू खात्री करून घेत होता की काय? गायत्रीचं डोकं बधिर होऊ लागलं. झाले प्रसंग ती पूर्ण विसरली होती.  पण पवन मात्र एकही प्रसंग विसरला नव्हता. उलट त्याच्या चिमुकल्या डोक्यानं सर्व  प्रसंग एकमेकांना जोडले होते आणि त्यातून त्याने काढलेला अर्थ त्याच्यासाठी केवढा क्लेशकारक होता ! तिने सहज केलेली थट्टा त्यानं खरी मानली होती. एखाद्या गुन्हेगारासारखी तिची अवस्था झाली.  तिच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नव्हतं. पवनचं घरभर आनंदानं  नाचणं चालूच  होतं. 
 
~नेहा पुजारी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...