मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

1420. अपयश गाथा

      सक्सेस स्टोरिज महणजे यशोगाथा सगळ्यांनाच आवडत असतात. पण या उलट ‘फेल्युअर स्टोरीज’ म्हणजेच अपयश गाथा केणालाच आवडत नसतात. एखादा माणूस, संस्था किंवा कंपनी फेल झाली तर त्यांच्या कपाळावर ‘फेल्युअर’ चा शिक्का त्वरीत मारला जातो. त्यांच्या फेल्युअर बद्दल सर्वस्वी त्यांनाच जबाबदार धरण्यात येते. त्यांना मग नाही नाही ती दुषणे आणि दोष लावतण्यात येतात. त्यांना ‘कन्डेम’ ठरवण्यात येते. आपल्या मराठी साहित्यात फेल्युअर स्टोरिजना फारसे स्थान नाही. आपल्याकडची लोक त्यांचे फेल्युअर किंवा त्यांना आलेले अपयश बदनामीच्या भितीने लपवून ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतात. पण इंग्रजी आणि ईतर काही भाषांमधील साहित्यात फेल्युअर स्टोरिजना पण सक्सेस स्टोरीज इतकेच महत्वाचे स्थान आहे. एखादा माणूस, संस्था किंवा कंपनी का फेल होते? त्यांचे कुठे चुकले? ते कुठे कमी पडले? याचे ऍनॅलिसिस करायच्या भागगडीत सहसा कोणी पडत नाही. जे फेल झाले त्यांनीच ‘आत्मपरिक्षण’ करून स्वतःच्या चुका स्वतःच शोधून काढाव्यात अशा प्रकारचा उपदेश द्यायला सगळेच पुढे सरसावत असतात. पण आपणही त्यांच्या चुकांमधून बरेच काही शिकू शकतो. उलट सक्सेस स्टोरीज पेक्षा फेल्युअर स्टोरीज मधून बरेच काही शिकायला मिळते. ज्याप्रमाणे बिझनेस मध्ये  नफा आणि तोटा हातात हात घालून वावरत असतात, त्याच प्रमाणे आयुष्यात पण यश आणि अपयश, सक्सेस आणि फेल्युअर हातात हात घालून वावरत असतात. एक वेळ यश पचवणे सोपे असते पण अपयश पचवणे अवघड असते. यशाचा मार्ग हा नेहमी अपयशातून जात असतो असे म्हणतात. ज्याप्रमाणे प्रत्येक यशामागे अपयश लपलेले असते त्याचप्रमाणे प्रयत्न केल्यास प्रत्येक अपयशाचे रुपांतर यशांध्ये करणे शक्य असते. असे पण अनेक महाभाग आहेत, जे यशाच्या शिखरावरून अपयशाच्या खोल गर्तेत भिरकावले गेले. पण हिंमत न हारता प्रयत्न करत राहिले आणि या अपयशाच्या गर्तेतून परत यशाच्या शिखरावर पोचले. अशाच काही महाभागांच्या कथा सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे 
     ही सत्य कथा आहे ली आयकोका नावाच्या एक अमेरिकन एक्झीक्युटिव्हची. 15 ऑक्टोबर 1924 रोजी ली आयकोका यांचा जन्म एका अमेरिकेत स्थलांतरीत झालेल्या इटालियन कुटुंबात झाला. त्यांना लहान पणापासूनच गणित आणि शास्त्र या विषयांची आवड होती. त्यामूळे त्यांनी अमेरिकेतील एका नामांकीत शिक्षण संस्थेतून मेकॅनिकल इंजिनिअरींगची पदवी मिळवली आणि अमेरिकेतील त्या काळच्या सर्वात मोठ्या मोटारी म्हणजे कार उतपादन करणार्‍या कंपन्यांपैकी एक असलेल्या फोर्ड मोटर कंपनीत ट्रेनी इंजिनिअर म्हणुन नोकरी मिळवली. आपल्या 32 वर्षांच्या नोकरीच्या काळात ते स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर फोर्ड मोटार कंपनीच्या सर्वोच्च पदी पोचले. ते फोर्ड मोटर कंनीचे अध्यक्ष म्हणजे प्रेसिडेन्ट झाले. ते जेव्हा प्रेसिडेन्ट झाले तेव्हा त्यांना स्वर्ग दोन बोटे उरला होता. पण त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर दैव विकट हास्य करून त्यांना म्हणाले कि थांब गड्या थांब! आता तुला माऊंट एव्हरेस्ट वरून लाथ मारून खाली पाडल्यावर गडगडत खाली येताना काय वाटते याचा अनुभव घ्यायचा आहे. 
       ली आयकोका यांची अगदी अचानक, ध्यानी मनी स्वप्नी नसताना, फोर्ड मोटर कंपनीच्या अध्यक्षपदानरून हकाल पट्टी करण्यात आली. ती सुद्धा अगदी वाईट आणि अपमानकारक पद्धतीने. त्यांनी आपल्या 32 वर्षांच्या कारकिर्दीत जो काही मान, सन्मान, प्रतिष्ठा, प्रसिद्दी मिळवली होती ती पार रसातळाला गेली. त्याचे अनेक बरे वाईट परिणाम होऊ लागले. जेव्हा त्यांची हकालपट्टी झाली तेव्हा त्यांचे वय केवळ 54 वर्षांचे होते. त्यांना मोटारी बनवणे आणि विकणे यापेक्षा दुसरा कोणताही अनुभव नव्हता. त्यामूळे पुढे काय करायचे हा प्रश्णच होता. त्यांचे बरेच सहकारी, मित्र, नातेवाईक त्यांना सोडुन जाऊ लागले. रस्त्यावर सुद्धा त्यांना ओळखणारे लोक त्यांना पाहिल्यावर रस्ता ओलांडून पलिकडच्या फुटपाथवरून जाऊ लागले, त्यांना ओळख दाखवणे टाळू लागले. याचा त्यांना खूप मानसिक त्रास होऊ लागला. ते डिप्रेशन मध्ये जाऊ लागले. मनात आत्महत्येचे विचार पण येऊ लागले. पण या वेळी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले ते त्यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली. या वेळी त्यांना कुटुंब व्यवस्थेचे महत्व कळले. माणसाच्या संकट काळात त्याची कुटुंबीयच फक्त त्याच्या मागे उभी रहातात हा अनुभव त्यांनी घेतला. त्यामूळे ते नेहमी सांगायचे की कुटुंबाला महत्व द्या, त्यांच्यासाठी वेळ काढा, त्यांना डावलू नका किंवा विसरू नका. पण ली आयकोका यांना याहीपेक्षा मोठ्या संकटाला तोंड द्यायचे होते !
      अमेरिकेमध्ये मोटारी बनवणारी अजुन एक कंपनी होती. त्या कंपनीचे नाव होते क्रायस्लर. अमेरिकेतील जनरल मोटर्स आणि फोर्ड या राक्षसी कंपन्यांपुढे ही तशी एक छोटी आणि नगण्य कंपनी होती. या कंपनीच्या प्रमुखपदाची माळ लि आयकोका यांच्या गळ्यात साळसुदपणे घालण्यात आली. या वेळी त्यांना सांगण्यात आले की कंपनी थोडाश्या आर्थेक संकटात आहे. पण जेव्हा ली आयकोका या कंपनीत जॉईन झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांची शुद्ध फसवणूक करण्यात आली आहे. त्यांना मूर्ख बनवण्यात आले आहे. कारण कंपनी नुसतीच आर्थिक संकटात नव्हती तर डबघाईला आलेली बुडीत कंपनी हती. खरी सत्य परिस्थिती त्यांच्यापासून लपवून ठेवण्यात आली होती. कंपनी आज बुडते की उद्या बुडते अशी परिस्थिती होती. थोडक्यात त्यांच्या गळ्यात एका बुडणार्‍या जहाजाची कप्तानशीप मारण्यात आली होती. क्रायस्लर कंपनी जॉइन करणे हा ली आयकोका यांचा  आयुष्यातला सर्वात मूर्खपणाचा, येडपट पणाचा आणि अत्यंत चुकीचा निर्णय होता. आयकोका यांच्या शब्दात सांगायचे झाले तर त्यांनी फ्राइंग पॅनमधून फायरमधे उडी मारली होती. चुलिवरच्या  भांड्यातून सरळ चुलिच्या विस्तवातच उडी मारली होती. 
      आता चुकीचा का होइना पण निर्णय झाला होता. आता ली आयकोका यांच्यापूढे दोन पर्याय होते. एकतर सरळ माघार घ्यायची आणि गप्प बसायचे. किंवा यशाच्या उंच एव्हरेस्ट शिखरावरून गडगडत खाली येऊन पडताना, हाडांचा चक्काचूर झालेला असताना, शरीराला आणि मनाला असंख्य जखमा झालेल्या असताना, डोके फुटलेले असताना, ताकद जवळ जवळ खच्ची झालेली असताना जी काही हाडे, डोके, ताकद, बुद्धी शिल्लक ती वापरून उभारी घेण्याचा प्रयत्न करायचा. युद्धामध्ये पराजय होणार हे जवळ जवळ नक्की होते. पण न लढता हार मानण्याऐवजी लढून हार पत्करणे चांगले असे त्यांना वाटले. ली आयकोका यांनी कामाला सुरवात केली आणि त्यांना एक एक धक्कादायक अनुभव येऊ लागले. त्यांच्या लक्षात आले की कंपनीचे प्रॉडक्शन, डिझाईन आणि मार्केटिंग डिपार्टमेन्टस तीन निरनिराळ्या दिशांना तोंड करून काम करतात. त्यांच्यात आजीबात मेळ नाही. डिझाइन डिपार्टमेन्ट त्यांना हव्या तश्या मोटारी डिझाईन करत होते. प्रॉकक्शनवाले त्यांना जमतील तशा मोटारी बनवत होते आणि मार्केटिंगच्या गळ्यात मोटारी विकण्यासाठी मारत होते. ग्राहकाला काय पाहिजे या पेक्षा आपण काय बनवू शकतो यावर कंपनीचा जास्त भर होता. ग्राहकाला कंपनीत काही स्थानच नव्हते. त्यामूळे कंपनिची बहुतेक प्रॉडक्ट्स ही आउट डेटेड टेक्नॉलॅजीवर आधारीत होती. यात सुधारणा करणे आवश्यक होते. त्यांच्या मते प्रॉडक्सन आणि मार्केटिंग यांनी नवरा बायकोसारखे हातात हात घालून काम करायला हवे. डिझाईन डिपार्टमेन्टचे काम या जोडप्याला आशिर्वाद देणार्‍या बुजुर्गासारखे असायला हवे. पण हे बदल करताना त्यांना रक्त आटवावे लागले. मॅनेजमेन्टची अनेक नवीन नवीन टेक्निक्स वापरावी लागली जी कुठल्याही मॅनेजमेन्टच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत. रिटायर झालेल्या लोकांची कंपनितील महत्वाच्या आणि जबाबदार जागांवर नेमणूक करण्याचा प्रयोग करून झाला. आधी यावर प्रचंड टीका झाली. पण याच लोकांनी उत्तम काम करून आपली निवड सार्थ ठरवली. थोडक्यात रिटायरमेन्ट नंतरही माणसे उत्तम काम करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. स्वतः मार्केटमध्ये फिरून मार्केटचा अभ्यास करायला सुरवात केली. काही नवीन मॉडेल्स बाजारात आणली. यातील मुस्तांग हे मॉडेल चांगलेच लोकप्रिय झाले. कंपनीच्या जाहिरातींमध्ये स्वतःचा चेहेरा दाखवायला सुरवात करुन आपल्या कंपनीला एक चेहेरा दिला. तो पर्यंत कुठल्याच कंपनीचा प्रमुख आपला चेहेरा जाहिरातीतून दाखवत नव्हता.
      क्रायस्लर कंपनीला जर खड्यातून बाहेर काढायचे असेल तर त्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदतिची गरज भासणार आहे हे ते पहिल्यापासूनच जाणुन होते. पण बुडीत कंपनीला अर्थ सहाय्य किंवा कर्ज कोण देणार? कोणी त्यांना दारात पण उभे करायला तयार नव्हते. कंपनिची अवस्था भिकार्‍यापेक्षाही वाईट होती. मग यासाठी ली आयकोका यांनी सरळ अमेरिकन सरकारला गळ घालायचे ठरवले. त्यांनी अमेरिकन सरकारची दारे ठोठवायला सुरवात केली. पण हे काम वाटते तेवढे सोपे नाही हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. कारण तोपर्यंत अमेरिकन सरकारने कोणत्याही खाजगी कंपनिला किंवा संस्थेला लोन दिले नव्हते की गॅरंटर म्हणून राहीले नव्हते. सरकारी कर्ज फक्त सरकारी कंपन्या आणि संस्थांसाठीच होती. खाजगी कंपन्या त्यांच्या धोरणात म्हणजे पॉलिसिमध्ये बसत नव्हत्या. मग यासाठी ली आयकोका यांच्या अथक परिश्रमाला सुरवात झाली. यासाठी त्यांना अमेरिकन सरकारला टनावारी नव्हे तर ट्रक भरभरून कागद पत्रे सादर करावी लागली. अमेरिकन सरकारचे मुख्यालय असलेल्या कॅपिटॉल हिलला, एक नव्हे दोन नव्हे, तर शेकडो चकरा माराव्या लागल्या. या मुळे त्यांची तब्येत बिघडली. त्यांना व्हर्टिगोचा त्रास सुरु झाला. ते कॅपिटॉल हिलवरच्या ईमारतीच्या खांबांना धडका मारू लागले. पण ते आपल्या कामात यशस्वी झाले. त्यांना अमेरिकन सरकारने 1.5 बिलियन डॉलर्स (150 कोटी डॉलर्स) चे लोन मंजुर केले. हे त्या काळातील अमेरिकन सरकारचे सर्वात मोठे फेडरल लोन होते. सरकारी कर्ज म्हटले की कधी फेडायचे नसते. किंवा ते सावकाश फेडायचे असते. वेळेवर फेडले नाही तरी चालते असा एक प्रघात त्या वेळी अमेरिकेत होता. पण ली आयकोका यांनी अमेरिकन सरकारचे लोन वेळेच्या कितीतरी आधी फेडून, अगदी शेवटचा डॉलर देऊन, एक नवीन ईतिहास रचला. या सगळ्या प्रयत्नातून ली आयकोका यांनी क्रायस्लर ही अमेरिकेतील जनरल मोटर्स आणि फोर्ड नंतरची तिसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी ऍटोमोबाईल कंपनी बनवली. 
     ली आयकोका हे यांनी फोर्ड मोटर कंपनीत 1946 ते 1978 (32 वर्षे) पर्यंत काम केले. त्यानंतर 1978 ते 1992     ( 14 वर्षे) पर्यंत क्रायस्लर कंपनीचे चेअरमन आणि सिईओ होते. निवृत्तीनंतर त्यांनी समाज कार्यात भाग घेतला.      2 जुलै 2019 साली वयाच्या 94 व्या वर्षी अमेरिकेत लॉस एंजलीस येथे त्यांचे निधन झाले. त्यांनी ‘माय नेम इज ली आयकोका’ आणि ‘टॉकिंग स्ट्रेट’ अशी दोन पुस्तके लिहीली असुन ही दोन्ही पुत्सके जगभर गाजली आहेत.  
       थोडक्यात अपयश म्हणजे शेवट नव्हे. यातुनही उभारी घेऊन यशाचे शिखर गाठता येते हे ली आयकोका यांनी दाखवून दिले आहे. ली आयकोका यांचेकडून काय शिकायचे, काय स्पुर्ती घ्यायची किंवा घ्यायची नाही हे ज्याचे त्याने ठरवायचे.

उल्हास हरी जोशी, मोः- 9226846631

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...