मंगळवार, ३ सप्टेंबर, २०२४

1442. रिकामी

     ऑफिसच्या प्रोजेक्टसाठी लंडनला चार वर्षं राहून, सौरभ भारतात परतत होता. सौरभ साठे... मुंबईतल्या एका प्रथितयश इंजिनीरिंग कॉलेजमधून काॅम्प्युटर्समध्ये M.E. करून, अगदी लगेचच एका लंडन बेस्ड साॅफ्टवेअर कंपनीत प्रोग्रॅमिंग हेड म्हणून कामालाही लागलेला. सहा महिन्यांतच सौरभची हुशारी आणि त्याच्यामध्ये असलेला स्पार्क कळून येत, त्याच्या इमिजिएट बाॅसनं केलेल्या शिफारशीवरून कंपनीच्या CEO नं सौरभला, लंडनला प्रोजेक्टवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या लेकाचं हे यश पाहून, श्री व सौ साठेंना अगदी आनंदाचं उधाण आलं होतं. बरेच कष्ट उपसून, बर्‍याच तडजोडी करून सौरभला शिकवलं होतं त्यांनी आणि सौरभनंही आपल्या आई-बाबांच्या निथळलेल्या घामाची योग्य जाण ठेवली होती. चार वर्षांतून फक्त चार वेळा आई-बाबांना भेटलेला सौरभ, आता कायमचं त्यांच्याबरोबरच राहायला मिळणार या विचारानं तर खुष होताच. पण आणिक एका कारणानं प्रचंड एक्साईटेड होता तो  आणि त्या कारणाचं नाव होतं ‘सिया पटवर्धन’. त्याच्या काॅलेजमधल्या खासमखास दोस्ताची, सागरची लहान बहिण. त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेली दिसण्यात प्रचंड आकर्षक, अन् वागण्या-बोलण्यात कमालीची स्मार्ट. पण तरीही आगाऊ नाही. अतिशय हसतमुख आणि सदैव उत्साहानं सळसळणारी अशी सिया. अगदी प्रथम दर्शनीच, सियाच्या प्रेमात पडला होता सौरभ ! 
B.E. पूर्ण केल्याची एक छोटेखानी पार्टी सागरच्या घरी आयोजित केलेली. पाव-भाजी, तवा पुलाव, गुलाबजाम वुईथ व्हॅनिला आईस्क्रीम असा रामसूम बेत होता. वर्गातली पंधरा मुलं तृप्त झाली होती अगदी, या पटवर्धनांच्या पाहुणचारानं. आणि सौरभ… सौरभ चे डोळे मात्र, अक्षरशः खिळा ठोकल्यागत खिळले होते सियावर. सिया वाढत होती म्हणून, चक्क बारा पाव खाल्ले होते सौरभने त्या दिवशी ! दुसर्‍याच दिवशी सौरभनं सागरला, अगदी प्रामाणिकपणे मनातलं सांगून टाकलं होतं. आणि प्राॅमिसही घेतलं होतं त्याच्याकडून, सियाला काहीही कळू न देण्याचं. ठोस असं काही करून दाखवल्याशिवाय सियाला मनातलं सांगायचं नाही, हे पक्कं ठरवलं होतं सौरभनं आणि आता तो दिवस आला होता ! 
मध्यंतरीच्या काळात सागरकडून त्याला हेही कळलं होतं की, सियानंही तिचं MBA पूर्ण केलं होतं. पण कुठंही लठ्ठ पगाराची नोकरी न पत्करता तिनं अनाथ मुलांची देखभाल करणार्‍या एका NGO सोबत पुर्णपणे स्वतःला बांधून टाकलं होतं. तिची सेवाभावी संस्था खेड्या-पाड्यात जाऊनही धडाडीने काम करत होती. सौरभला लहान मुलांची तशीही प्रचंड आवड होती आणि सियाबद्दल हे ऐकून तर सौरभ आणिकच प्रेमात पडला होता तिच्या. पण सियाबद्दल हे कळूनही आता दीडेक वर्ष उलटून गेलं होतं. कारण सागर कामानिमीत्त ऑस्ट्रेलियाला गेल्यावर, दोघांचा काॅन्टॅक्टच तुटला होता. पण आता मात्र अजिबात वेळ दवडणार नव्हता सौरभ. घरी येऊन, आई-बाबांसोबत वेळ काढून, इतरही बर्‍याच नातेवाईकांना भेटून, स्थिरस्थावर झाल्यावर सौरभनं आई-बाबांजवळ सियाचा विषय काढला. पण आई-बाबांचा चेहरा त्याला एकदम पडल्यासारखा वाटला. आई - बाबांच्या चेहर्‍यावर सौरभला कुठलीही उत्सुकता जाणवली नव्हती. अगदी कोरडे, भावनाशुन्य डोळे होते दोघांचेही. ज्यांत ना होकार होता ना नकार ! आई खाली जमिनीकडे बघत, तिच्या अंगठ्यानं लादी खरवडू लागली, तर बाबांनी वाचून झालेला पेपर पुन्हा उघडत, त्यात डोकं खुपसलं. सौरभला त्याच्या आई-बाबांकडून ही अशी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. त्याच्या अगदी लहानपणापासूनच साठ्यांच्या घरचं वातावरण रोखठोक नी मोकळं होतं. श्री व सौ साठे दोघांनीही यथोचित अंतर राखत, मुलाला अगदी खेळीमेळीत मोठं केलेलं होतं. त्यामुळे आई-बाबांच्या अवाक्षरही न काढता अशा विषयच तोडून टाकण्यानं सौरभ बर्‍यापैकी व्यथित झाला. आजपर्यंत कधीच त्याच्यावर आई-बाबांना असं गळपटलेलं बघायची वेळ नव्हती आली. दोनेक मिनिटं शांततेत गेल्यावर एकमेकांना डोळ्यांनी खुणावत, आई-बाबा त्याच्याजवळ येऊन बसले. बाबा नुसताच घसा खाकरत बसलेले बघून आईनं  बोलायला सुरुवात केली.
“सौरभ बाळा, तू मुलगा आहेस आमचा जीव आहेस ! तुझ्या मनातलं कळलं नसेल आम्हाला, असं वाटलं का तुला? अरे पाच-सहा वर्षांपुर्वीच कल्पना आली होती आम्हाला, की तू गुंतलायस कुणात तरी. पण तुला M.E. करायचं होतं, म्हणून आम्ही काही विचारलं नाही तुला. 
“नंतर तू जाॅबला लागलास, नी सहा महिन्यांतच फाॅरेनलाही गेलास. तुझ्या गुंतलेपणाबद्दल चकारही काढला नव्हतास तू. पण आम्हाला राहवेना. आणि ‘आता सगळं छान चाललंय, तर वेळ का काढा?’ या विचारानं आम्ही तुझ्या खास मित्राला– सागरला बोलावलं घरी, तुझ्याबद्दल विचारायला.
“आणि जेव्हा कळलं की तुला सागरचीच लहान बहिण सिया आवडलीये, तेव्हा तर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. मग दोन दिवसांनी आम्ही दोघं, पटवर्धनांकडे गेलो. खरंच गोड अन् लाघवी आहे रे सिया ! क्षणार्धात जिंकलं तिनं आम्हाला. वस्तुस्थिती कळल्यावर पटवर्धनांकडचेही सगळे जामच खुष झाले. अगदी तुझ्या सियासहीत !
“पण तिचं MBA चालू होतं, म्हणून मग इतक्यात विषय न काढण्याचं आणि तुझ्यापाठी हे सगळं झालंय, हे तुला कळू न देण्याचंही ठरलं आम्हा सगळ्यांचं. सिया अधेमधे आम्हाला भेटायला यायची. मी कधीतरी चक्कर टाकायचे पटवर्धनांकडे. एकंदरीतच खूप मस्त चाललेलं सगळं. अगदी... अगदी दोन वर्षांपुर्वीपर्यंत. पण...
“…पण दोन वर्षांपुर्वी एक अघटीत घडलं, सौरभ... कुठल्याशा खेडेगावी NGO च्या कामासाठी सिया गेली असतांना, बाल मजुरांना सोडवण्याकरता केलेल्या चळवळीत सिया आणि इतर कार्यकर्त्यांवर तिथल्याच दांडग्या गावकर्‍यांनी प्रचंड निष्ठुर अशी मारझोड केली. पोलिसांनी येऊन हस्तक्षेप करेपर्यंत, बरेच कार्यकर्ते जखमी झाले होते. आणि… 
“आणि सिया तर अत्यंत गंभीररीत्या न जाणो किती लाथा-बुक्क्या, लाठ्या तिच्या पोटावर बसल्या होत्या ! सिव्हिअर ब्लिडिंग सुरू झालं तिला. खेडेगावात कुठलीच अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्यानं, सियाला तालुक्याला नेण्यात आलं. तिथं तिच्यावर बेसिक उपचार केले गेले.
“पण तोपर्यंत फारच उशीर झाला होता... तुझ्या बाबांच्याच ओळखीमुळं गायनॅक सर्जन डाॅ. क्षेत्रमाडे, आमच्याबरोबर तिथं यायला तयार झाले. त्यांनी सियाला तपासलं… आणि… आणि he finally decided to go for ‘Hysterectomy’, since there was no option left behind to keep her alive! 
“तिचं गर्भाशय काढलं बाळा…! वयाच्या अवघ्या बाविसाव्या वर्षी एखाद्या बाईपासून तिचं आई होणं हिरावलं जाणं, यासारखं आभाळभर दुःख दुसरं कुठलंही नाही ! तिला मुंबईला आणल्यावर, मी आणि तुझे बाबा भेटायला गेलो सियाला. तेव्हा तिनं आम्हाला हात जोडत, ओक्साबोक्शी रडत असमर्थता दर्शवली तुझ्याशी लग्न करण्याबाबत. आणि विनंती केली पुन्हा कधीही तिला न भेटण्याची, तिच्यासमोर न येण्याची.
“तुला आम्ही सांगणारच होतो, तू नाताळच्या सुट्टीत इथं आल्यावर. पण मागल्या वर्षी तू येऊच शकला नाहीस. तू तिथं एकटा असतांना फोनवर तुला हे सगळं सांगणं, ना आम्हाला योग्य वाटलं ना सागरला आणि आता तू जो येतोयस ते कायमचाच ! 
“तुला लहान मुलांप्रती असलेली ओढ, माहितीये आम्हाला सौरभ... त्यामुळं तुला कधीच मूल न देऊ शकणार्‍या मुलीशी, कळतेपणी तुझं लग्न लावून देणं खरंच कठीण आहे रे बाळा…!”
एवढं बोलून सौरभची आई थांबली आणि स्वतःच्या पायाच्या अंगठ्याकडे बघू लागली. सौरभचे बाबा त्याच्याकडे बघणं टाळत उगीच पंख्याकडे, भिंतीवरच्या घड्याळाकडे, गॅलरीतून बाहेर असं आलटून पालटून बघू लागले. आणि सौरभ त्या दोघांकडे पाहत नजरानजर होण्याची वाट बघत होता. एका पाॅईंटला तिघांचेही डोळे एकमेकांच्या डोळ्यांना भिडले आणि सौरभ बोलू लागला.
“आयुष्यातली ही पहिली गोष्ट असेल, जी तुम्ही माझ्यापासून लपवलीत. मला कायम बरोबरीची, रादर मित्रत्वाचीच वागणूक मिळालीये तुम्हा दोघांकडूनही. त्यामुळंच मला खरंच आश्चर्य वाटतंय, की तुम्ही ही अशी गोष्ट मला सांगितली का नाहीत? 
“मला क्लिअर आठवतंय की मी आठ वर्षांचा झाल्यावर माझ्या वाढदिवशीच, तुम्ही मला सांगितलं होतं की मी… मी… दत्तक घेण्यात आलेला मुलगा आहे ! ॲक्सिडंटमध्ये गेलेल्या, बाबांच्या खूप जवळच्या मित्राचा मुलगा. नवरा-बायको आठ महिन्याच्या लहान बाळाला सोडून, अपघातात गेले आणि त्या बाळाच्या थकलेल्या आजी-आजोबांकडून, तुम्ही घेऊन आलात त्याला या घरी... अगदी रितसर ! 
“एक दत्तक घेतलेलं मूल मग स्वतःबरोबरच घेऊन आलं होतं, एक छाती दडपवून टाकणारी जबाबदारीही आणि म्हणूनच तुम्ही दोघांनीही परस्पर संमतीनं एक निर्णय घेतलात, स्वतःचं मूल होऊ न देण्याचा ! 
“आता बघा... म्हणजे एक मुलगी आहे, गर्भाशय काढून टाकल्यामुळं मूल होऊ न शकणारी आणि एक मुलगी होती; गर्भाशय असूनही, मूल होऊ न देणारी पण मग एक मात्र प्रचंड दुःखी आणि एक कमालीची सुखी…! असं का…? 
“नाही आई... माझ्यासाठी ह्या दोघीही एकाच लेव्हलवर आहेत. ह्या दोघींचंही दुखणं समान पातळीवर आहे माझ्यासाठी ! रादर पहिलीच्या बाबतीत घडला तो अपघात होता, जो टाळणं तिच्या हातात कदाचित नव्हतं पण दुसरीनं स्वखुशीनं, स्वतःच्या सख्ख्या मुलाची आई होणं टाळलं आणि काय वाईट झालं तिचं? काय त्रास झाला तिच्या नवर्‍याला ह्याचा…? absolutely nothing! 
“मग सियाला आणि तिच्याशी लग्न करू पाहणाऱ्या मला त्रास होईल, असं वाटलंच कसं तुम्हाला? त्यातून सिया तर शेकडो अनाथ मुलांसाठी काम करतेय, जी तिचीच तर मुलं आहेत आणि तुम्ही फक्त एका मुलाचं घेऊन बसलायत? मी आत्ताच्या आत्ता पटवर्धनांकडे जातोय, सियाला मागणी घालायला. नाही ऐकलं तिनं, तर पळवून आणेन तिला. पण लग्न करेन तर सियाशीच !”
एवढं बोलून सौरभ जागेवरून उठला. आपल्या खोलीत आवरायला जात असतांनाच, त्याचं लक्ष गेलं शोकेसमध्ये ठेवलेल्या एका अत्तराच्या कुपीवर. सौरभ वळला नी आई-बाबांकडे बघत म्हणाला,
“आई-बाबा, ही अत्तराची बाटली तुम्ही मला माझं काॅलेज सुरू व्हायच्या आदल्या दिवशी आणलेलीत. चारेक महिन्यांत ती रिकामी झाली. पण मी ती जपून ठेवलीये आजही ! माझ्या ड्राॅवरमध्ये एका कंपास बाॅक्समध्ये, शंभरच्या वर शाई संपलेल्या रिफिल्स असतील, मी आजही सांभाळून ठेवलेल्या. कधी कुठली गोष्ट ‘रिकामी’ झाली की त्याची किंमत कमी करत, ती फेकून देणार्‍यातला मी अजिबातच नाही आणि इथं तर हाडा-मासांची मुलगी आहे !” 
हे इतकं बोलून, आई-बाबांकडे बघून आश्वासक हसत सौरभ त्याच्या खोलीत आवरायला गेला. सौरभच्या आई-बाबांचे डोळे, आता आनंदाने भरून वहात होते. काहीतरी सुचून आई लगबगीनं उठली नी किचनमध्ये जात जातच बेडरुमच्या बंद दारावर थाप मारत म्हणाली.
“शेवयांची खीर करते पटकन...घेऊन जा ती. माझ्या सुनेला प्रचंड आवडते. आपल्या तिघांचे तीन चमचे, तू तुझ्या हाताने भरव तिला आधी. मग खा म्हणावं पाहिजे तेवढी !”
आई-बाबांसमोर मघापासून अडवून ठेवलेल्या अश्रुंना वाट मोकळी करुन देत सौरभ आरशासमोर उभं राहून, तयार होत होता.

- सचिन श. देशपांडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...