सिनियर केजीतल्या ऋषिकेशचे अण्णा-आजोबा देवाघरी जावून आज तेरा चौदा दिवस झालेले. अंत्यविधी. अस्थीविसर्जन, पुजापाठ, शांती, गंधमुक्ती वैगरे उत्तरकार्यजे काही म्हणून करावं लागतं ते यथासांग पार पडलेलं. घरातली दुःखाची छाया अजूनही तशी फारशी निवळली नसलं तरी हळूहळू घरातले सदस्य सावरत होते. अश्यातच उदास वाटणारी आजची संध्याकाळ. नातू ऋषिकेश थोडं दूरवर..हॉलमध्ये मोबाईल बघण्यात हरवलेला तर काचेच्या ब्रॅकेटवर विराजमान पुष्पहार घातलेली अण्णा-आजोबांची हसरी फोटोफ्रेम. जवळचं मंद दिव्याची वात. समोर भिंतीला पाठ टेकून एकटक फ्रेमकडे नजर लावून बसलेल्या ऋषिकेशच्या आजी. तिकडे गॅलरीत मोबाईलवर कुणाशीतरी बोलण्यात गुंतलेले ऋषिचे बाबा. वडिलांच्या मृत्यू पश्चात कर्ता म्हणून अंत्यविधीसह उर्वरित सर्व उत्तरकार्यें वैगरे करण्याचा ऋषिकेशच्या बाबांचा पहिलाच प्रसंग. अण्णांच्या जवळच्या मित्राने पाठीशी उभं राहून सर्व करवून घेतलेलं. सगळे सोपस्कार यथासांग आटोपल्याने घराला आज थोडा निवांतपणा आलेला. तसही आजकाल नातेवाईक मंडळी आपापल्या नोकरी व्यवसायात. घरच्या-दारच्या व्यापात व्यस्त. परिणामी वेळे अभावी जवळचं कुणी असलं तरी.सहसा सलग दहा-पंधरा दिवस मृतकाचे घरी मुक्कामी राहायला कुणाला जमेलचं असं नाही. फार-फारतर अंत्यविधीला उपस्थिती लावून मंडळी पांगतात. पुढं अन्य विधींना अधूनमधून ये-जा सुरु राहते. अण्णा-आजोबांच्या इथे साधारण तशीच परिस्थिती. घरातल्या सदस्यांशिवाय दुसरं इतर कुणीचं दिसत नव्हतं.
🌹
ऋषिकेशचे ममा-पप्पा दोघेही जॉबला. त्यांत अण्णा-आजोबा अचानक चालता बोलता गेल्याने. दोघांना दीर्घ सुटी घ्यावी लागलेली. त्यासगळ्या धावपळीत. सुटीचा अखेरचा दिवस कधी उजडाला कळलं नव्हतं. उद्यापासून जॉबला जावं लागणार. विचारचक्र सुरु झालेलं. दरम्यान चहाची वेळ झाल्यानं. ऋषिकेशच्या ममाने किचन मधून बाहेर हॉलमध्ये येत हातातली चहाची कपबशी सासूबाईंसमोर हळुचं ठेवीत..आई चहा घ्या!म्हटलं आणि ममा बाहेर गॅलरीत उभ्या ऋषिच्या बाबांना चहा देण्यासाठी जातंच होत्या. तोचं तंद्रीतून भानावर आलेल्या आजींनी एकवार समोर ठेवलेल्या कपबशीकडे पाहिलं. अन हळुचं कष्टाने उभ्या राहत. एकेक पावलं टाकीत. त्या आजोबांच्या तसबीरी जवळ जावून पोहोचल्या. कंप पावणाऱ्या हाताने. जवळचं ठेवलेल्या छोट्याशा वाटीत. आपल्या कपातील थोडासा चहा हलकेच ओतून. वाटी आजोबांच्या तसबीरी समोर सरकवीत. सोबत एक दीर्घ निश्वास सोडीत. ऋषिकेशचे आजोबा हे घ्या ! एकाएकी साथ सोडलीत माझी ! एकटीच कसा घेवू चहा? पुटपुटत भरून आलेल्या डोळ्यांना पदर लावीत आजीबाई पुन्हा जागेवर जावून बसत. कपातला उरलेला चहा बशीत ओतून घेत होत्या.
🌹
इकडं बऱ्याचं वेळ मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेला ऋषिकेश आता कंटाळला होता. तोचं समोर गॅलरीत उभ्या ममाकडे लक्ष जाताचं. मोबाईल बाजूला ठेवीत धावत जावून ममा ! म्हणत ऋषी ममाच्या पायाशी बिलगला. ममानं लगेचच खाली वाकून त्याला पटकन उचलून घेत. कारे ऋषी ! भूक लागली खायला देऊ? म्हटलं,तोचं. नको ममा भूक नाहीये ! थोड्या वेळ गप्प राहून. काहीतरी आठवल्या सारखं करीत. ऋषी ममाशी बोलत होता. काय गं ममा !तू शांगतेश आपले आजोबा देवबाप्पाच्या घली गेलेत ! आजोबा आता कधीचं पलत येणार नाहीत ! मग मला स्कुलला कोण घेऊन जानाल शांग ना? आजोबा लोज स्कुटीवल मला स्कुलला शोडायचे. पलत घ्यायलापण यायचे. शंध्याकाली बागेत खेलायला फिलायला न्यायचे. तिकलं काय काय खायला द्यायचे ! आता गं ममा? तू मोबाईल लावून बोलावं ना आजोबांना ! मी बोलू आजोबांशी? शांग ना ममा ?मी बोलू? नाहीतल देवबाप्पाला शांगतो मी. आमच्या आजोबांना पलत देऊन टाक ! ऋषिचं बोलणं अर्धवट असतानाचं ममाचे डोळे पाणावले होते. ऋषिकेशचे बाबाही भावुक झालेले.
अरे पराग ! खरंच गेल्या दिवसांत ह्याचा आपण विचारचं केलेला नाही? उद्या ऋषीला शाळेला कोण पोहोचवणार?घेऊन कोण येणार? ऋषीला शाळेत घातल्या दिवसापासून अण्णा करायचे सगळं. आपल्याला काहींचं बघावं लागत नव्हतं. उद्या पासून तुला नी मलाचं बघावं लागेल. मलातर सगळं अशक्य दिसतंय. ऋषीची स्कुल. आपला जॉब. वेळेचं गणित अड्जस्ट होणं शक्य नाही. नाईलाजाने स्कुलबस म्हणा व्हॅन लावावीचं लागेल. खर्चही वाढेल. त्याक्षणी ऋषिचे अण्णा-आजोबा नसल्याची तीव्र जाणीव सुनबाईंना अस्वस्थ करीत होती. अरे ! अण्णा नेहमी म्हणायचे सुनबाई ! हे स्कुलबस. व्हॅनवाले मुलांची फार हेळसांड करतात. मरणाची घाई त्यांना. सगळं पाहिलंय मी. अगं मी आहे ना ! तू काळजी नको करूस. ऋषीला सोडायला घ्यायला जात जाईन मी. नाहीतरी कुठं जायचं असतं मला. तुमच्या जॉबचं बघा तुम्ही. तसंही शक्य नाही तुम्हाला. अरे..उनवारा पाऊस थंडी तब्येत कधी कशाची तमा केली नाही. अखेरच्या दिवसापर्यत काम करीत राहिले. आपला ऋषिपण खुश असायचा त्यांच्यासोबत. नातवाचे सगळे लाड पुरवयाचे. इतकंच नाही मलाही किती मदत होती त्यांची. घरातली छोटीमोठी कामं नकळत करून मोकळे व्हायचे. किती करायचे आपल्यासाठी..हा ! आईंना तब्येतीमुळं कधी मदत करायला जमलं नसेल फारसं पण त्याची कमी उणीव जाणवू दिली नाही कधी. सावरून घेतलं. आज फार गिल्टी वाटतंय. कधी कौतुक झालं नाही त्यांचं आपल्याकडून. नातवासाठीचं तर करताय म्हणत गृहीत धरलं त्यांना!ही फार मोठी खंत कायम टोचत राहील मनाला. खरंच माणूस गेल्यावर त्याचं महत्व पटतं. सुनबाई अण्णा बद्दल आता जे काही बोलत होत्या त्याला एक दुसरी बाजू सुद्धा होती. गरज नसताना अवेळी सल्ले देणं. मध्येमध्ये बोलणं. बाहेरच काही खायला मागवलं. हॉटेलिंग,खरेदी, .मौजमजा यावर तात्काळ टोमणा मारत. तुम्ही काय मोठे लोकं बाबा पैशेवाले. आम्ही काय गरीब होतो. काटकसर करण्यात आयुष्य गेलं. त्यानंतर दोनतीन दिवस त्यावर लेक्चर. अण्णांचा हा स्वभाव सुनबाईंना आवडत नव्हता.घरातल्या साध्या साध्या गोष्टीत. कामात अण्णांचं मत व्यक्त करणं पटत नव्हतं. पण त्याला आज अचानक पूर्णविराम मिळाला होता.
🌹
ऋषिकेशला उद्या स्कुलला पाठवायचं कसं? हा अवघड प्रश्न कसा सोडवावा? विचारात ऋषिच्या बाबांनी इकडून तिकडून व्हॅन स्कुल बसचे नंबर मिळवून फोन करून पाहिले. पण पुरेसे मुलं असल्याने असं अधेमध्ये कुणीचं ऋषीला घेऊन जायला तयार होत नव्हतं. करायचं काय? याआधीचं सुट्टी घेतल्यानं ऋषिची व्यवस्था होईतो दोघांना घरी राहणं अशक्य होतं. काय करावं सुचत नव्हतं. विचाराच्या तंद्रितचं डोअर बेल वाजली. कोण असावं ?म्हणत ऋषिच्या ममानं जावून दरवाजा उघडला. या या काका !अरे पराग ! काका आलेत. बसा काका आलेचं मी. पाणी आणते. काका आणि अण्णांची घट्ट मैत्री.मित्र गेल्यावर पहिल्या दिवसापासून काका परागच्या पाठीशी उभे होते..अधूनमधून येऊन विचारपूस..दिलासा देऊन जायचे.
कारे पराग काय म्हणतोस ! काहो सुनबाई..कसलं टेन्शन अडचण वैगरे नाही ना? आल्यापासून दोघंही काळजीत दिसताय? सांगाना मला माझ्या परीनं सोडवायचा नक्की प्रयत्न करेन. सांगूनतर बघा.
काहीनाही ओ काका. उद्या दोघांना जॉब जॉईन करणं मस्ट आहे. सुटी संपली ना आमची. ऋषीला पण स्कुलला पाठवणं गरजेचं आहे. तुम्हाला तर माहितीय ऋषिला शाळेत सोडणं.घेऊन येणं सगळं अण्णा बघायचे आम्हाला काहींचं काळजी नसायची. उद्या ऋषीला स्कुलला पाठवायचं झाल्यास कसं करणार? बस. व्हॅनवाले ऐनवेळी नाही म्हणताय.
इतकंच ना? अरे मी आहे ना ! मी सोडवत आणत जाईन त्याला. एरव्हीही आमच्या नातीची शाळासुद्धा त्याचं रस्त्यावर थोडं दूरवरतर आहे. आधी ऋषीला नंतर नातीला सोडेन. नाहीतरी सकाळी फिरायला जावून आल्यावर अण्णा नी मी आम्ही दोघं एकाचवेळी निघायचो ना? पराग.. सुनबाई तुम्ही अजिबात संकोच करू नका. बस्स ऋषिची तयारी झाली की फोन करा.मी बरोब्बर येऊन घेऊन जाईन त्याला!आणि आणून सुद्धा सोडेन. डोन्टवरी!
अहोपण काका तुम्हाला कसा त्रास द्यायचा? स्पेशल रिक्षा म्हणा. इतर काही सोय होते का बघतो आम्ही.अण्णा गेल्यावर तुम्ही एव्हढं केलंत.हक्कानं उभे राहिलेत पाठीशी हेचं फार आहे आमच्यासाठी.
अरे नाही रे नाही ! तुम्ही निश्चिन्त राहा. समजा अण्णाचीचं इच्छा असेल.नातवाची अबाळ होवू द्यायची नाही म्हणून!उद्या आठवणीनं फोन करा ! रिक्षा वैगरेच्या भानगडीत पडू नका!चला निघतो मी आता.
🌹
ऋषिकेशच्या आई बाबांना अश्वस्त करून काका निघून गेले तरी ते दोघं बऱ्याचं वेळ हॉलमध्ये बसून होते.ऋषिच्या शाळेचा प्रश्न इतक्या चुटकीसरशी सुटेल वाटलं नव्हतं त्यांना.
🌹
पराग आज फार अपराध्यासारखं वाटतंय रे ! खरंतर घरात अण्णांची सारखी लुडबुड आपल्या कुठल्याही चर्चेत गरज नसताना भाग घेणं सल्ले देणं हे चुकीचं आहे. ते बरोबर नाही. अश्या बोलण्याचा कायम राग यायचा मला. ते काय सांगताय बोलताय तिकडे दुर्लक्ष रागराग करायचे मी. अरे ! तूझ्या अपरोक्ष बऱ्याचं वेळा अण्णा ! तुम्ही आमच्यात बोलत जावू नका बरं ! तुम्हाला ह्यातलं काय कळतं? सुनावलं देखील. अण्णा फक्त शांतपणे ऐकून घ्यायचे. इतकं असूनही तुझ्याकडे कधी बोलले. .तक्रार नाही केली त्यांनी. कधीकधी तर आपला ऋषी वयस्कर अण्णासोबत सुरक्षित राहील ना? अशीही शंका वाटायची. आज वाटतं. थोडं समजून घेतलं असतं त्यांना. बरं अण्णा तुम्ही म्हणताय ते बरोबर. समाधानासाठी तरी म्हटलं असतं, दुजोरा दिला असता. किती बरं वाटलं असतं. पण कोणाला काही कळायच्या आंत अण्णा आपल्यातून निघून गेले. माफी मागायला वेळही दिला नाही. अण्णा माझं चुकलं कबूल केलं असतं. ह्या दहा बारा दिवसांत खूप विचार केला. आता कळतंय. जाणीव होतेय. तू असो मी. आपल्या सारखे अनेक असतील. त्यांचे कडूनही घरातल्या वृद्ध वडिलधाऱ्याना अशीच वागणूक मिळत असेल? अरे!आपले अण्णा काय वा मघाशी येऊन गेलेले त्यांचे मित्र काय ! वय झालेली. निष्पर्ण असहाय खोडं ! कधीकाळी त्यांच्या सारख्यांच्या सावलीखाली वाढलो मोठे झालेलो आपण. अरे ! उतरत्या वयात आपल्या कडून थोडीशी सावली प्रेम मायेचा थोडा ओलावा मिळेल म्हणून आपल्या मागेपुढं करीत. लक्ष वेधण्यासाठी नजरेसमोर राहून काहीनाकाही कृतीतून. स्वतःच्या अस्तित्वाची आठवण देतं. दोन शब्द कुणीतरी बोलावं दिवसभरातून एकदातरी विचारपूस करावी एव्हढीचं छोटीशी अपेक्षा त्यांची. वयानुसार स्वभावात होणारे बदल. एकाकीपणा ! अरे..आपण मात्र रोजच्या धावपळीत कामाच्या टेन्शनमध्ये..रुटीनमध्ये इतके हरवून जातो की त्यांना समजून घेण्यासाठी ऐवजी..त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत जातो? का सहन होत नाही त्यांचं सल्ले देणं. मध्ये बोलणं? समजुतीच्या दोन गोष्टी सांगणं. आपल्यात हस्तक्षेप नको म्हणून? कोपरा धरून घरात पडून राहावं ही आपली अपेक्षा?
सुनबाई थोड्या भावनाविवश होऊन बोलत होत्या. जणू भूतकाळातले ते घडून गेलेले कटू प्रसंग डोळ्यासमोर येत असावेत.. पराग ! तुलाही कधी सांगावसं वाटलं नाही का रे मला. मी कितीही लपवलं तरी तुला घरात काय चालतं समजत असेलचं ना? तु सुद्धा मुक संमती असल्यासारखा गप्प राहिलास? जावू दे..आता पश्चाताप..वाईट वाटून काय उपयोग? लहानपणी साधं मैदानावर खेळायला चारवेळा विचारून सांगून जाणारी तीचं त्यांचीचं मुलं मोठेपणी..आई बापाला इतकं इग्नोर करायला लागतात..ह्याचा त्रास होत असेल ना रे त्यांना. मलाही हे सगळं आता कळून उमगून जाणीव होऊन काय उपयोग? आयुष्यभरासाठी चुटपुट लावून निघून गेले अण्णा...
🌹
संध्याकाळ टळून गेल्यानं बाहेर सर्वत्र दिव्यांचा लख्ख प्रकाशात परिसर उजळून निघाला असला तरी अण्णा आजोबांच्या घरात अजूनही दिवे लागले नव्हते. ते दोघे भान नसल्यागत हॉलमध्ये बसून होते. अण्णांच्या फोटोफ्रेम जवळ तेवणाऱ्या दिव्याच्या मंद उजेडात अण्णांच्या हसऱ्या मुद्रेवर उमटलेले विलक्षण बदलते भाव जणू..जावू दे सुनबाई ! मी गेल्यावर का होईना..आमच्या सारख्यांची व्यथा तुला समजली..ह्यातच आलं सगळं!वाईट वाटून घेवू नकोस ! फक्त तुला जी जाणीव झाली. ती इतरांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न कर. बस्स इतकीचं अपेक्षा. बेटा] व्यवहारातील चलनी नोटा कितीही जीर्ण विदीर्ण झाल्या तरीही त्यांचं मूल्य मात्र कमी होतं नसतं.
शेखर वैद्य.. नाशिक
26 मे 2024
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा