'क्षण जगून झालेले, जुन्या पानांत जपावे.
डोळ्यातील आसवांनी नवे पान उलटावे'
आज २० मे, माझ्या आईला जावून आज दहा महीने झाले. गेल्यावर्षी याच महिन्यात ती माझेकडे आली होती. त्याअगोदर बरेच दिवस ती माझेकडे नव्हती त्यामुळे मनसोक्त राहील असे वाटत होते पण महिनाभराच्या आतच गावाच्या ओढीने ती मला आता गावी सोड बाबा असे सारखी म्हणायची पण मी तीच्या विनवणीकडे कानाडोळा करायचो. तसं कवठे अन मसूर दहाच मिनीटाचे अंतर पण म्हातारपण अन बालपण सारखंच म्हणतात ना तसाच प्रत्यय तीच्या हट्टातून मी अनुभवत होतो. दाराजवळच बसलेली असायची व बाहेरून मी येताच बापू कधी सोडतोयस मला अशी म्हणायची. मी हो म्हणून तीची समजूत काढून वेळ मारून न्यायचो. तीने फारच लकडा लावला तर मी तीला म्हणायचो की अगं तु येवून अजून महिना झाला नाही तोवर घाई का करायला लागलीयस इतकी ! रहा की जरा नित्रासवाणी. बोलंव मग नातवाला गाडी घेवून अन जा असे मी कधीमधी थट्टेने बोलून दिवस ढकलत होतो. शेवटी ती तरी बिचारी काय करणार?
आणि एके रात्री तीच्या खोलीत मध्यरात्री जोरात आवाज आला. बहुदा ती पडली असावी असे मला जाणवले आणि पळत मी तीच्या खोलीत गेलो तर माझा अंदाज खराच ठरला होता. बेड तर खूप रूंद व जेमतेम दिडफूट उंचीचा असूनही ती कशी पडली असेल याचेच कोडे पडले. अलिकडे लघुशंकेसाठी रात्री अनेकदा उठायची आणि खूप उशीरा नंतर मग तीची गाढ झोप लागायची. त्यामुळे आम्हीही थोडे जागसूदच असायचो. कदाचित त्यादिवशी ती अर्धवट झोपेत असावी व आपण कवठ्यात आहोत असे समजून तिथे ती जमिनीवर झोपत असल्याने तशीच उठून चालू लागली असावी व त्यामुळेच पडली असावी. ती काळरात्र अक्षरशः तीला मांडीवर घेवून कशीबशी काढली. माझी पत्नी मुलगी व मी रात्रभर तीला अगदी अलवार घेवून बसलो. तीच्या एका पायाला मोठी इजा होवून फ्रॅक्चर झाल्याचे मला जाणवत होते. त्यामुळे एका कुशीवरही करता येत नव्हते. क्षणाक्षणाला तीला कोरड पडत होती व मी तीला चमच्याने पाणी सोडत सोडत सकाळ होण्याची वाट बघत होतो . सकाळ होताच तीला दवाखान्यात न्यायची तयारी केली. दवाखान्यात नेल्यावर डाॅक्टरांनी तपासणी केली असता मांडीचे हाड मोडले असल्याचे व आॕपरेशन करावे लागेल असे सांगितले. वय ९३ म्हणून शंका म्हणून मी डाॅक्टरना विचारले. त्यांनी शस्त्रक्रिया यशस्वी होईल म्हणून खात्री दिल्यावर मग त्याच दिवशी शस्त्रक्रिया केली. रात्री मीच तीच्या सोबत होतो. पहाटे पहाटे भूल हळूहळू उतरू लागताच ती बडबडू लागली मला उठव व बाहेर ने असे सतत म्हणू लागली हालचाल करू नये म्हणून तीचा पायाला पट्टा लावलेला होता पण तीची मात्र उठवून मला बाहेर ने म्हणून घाई सुरू होती. माझा विलाज खुंटला होता. कधी उजाडतंय व वाॅर्डबाॅय नर्सेस येतायत असे मला झाले होते. अर्धवट भूलीत तीचा तो लकडा सुरूच होता. तीला अवघडल्यासारखे झाले असावे. सकाळ झाल्यावर त्यासोबतच तीचा दुसरा लकडा सुरू झाला. ही कपडे माझे अंगावर नको. माझी साडी कुठाय? ही बुणबुण आता सुरू झाली. मी गप्प बसायचो व फार तर काहीतरी सांगून समजूत काढायचो.
तोपर्यंत वाॅर्डबाॅय व नर्स आल्यावर मी त्यांना बोलवायचो. तीला वाटू लागले की आपली कोणच दखल घेईना आता मात्र तीचा संयम सुटत चालला. भूलही अजून पूर्ण उतरलेली नव्हतीच. त्यामुळे ती मला कसेही बडबडू लागली. भूलीच्या प्रभावात कदाचित तीलाही ते कळत नसावं. कारण एवढ्या मोठ्या आयुष्यात आम्हा पाची भावंडावर कधीच ती रागावलेली , बडबडलेली अथवा साधी रूसलेलीही कधी आठवत नाही एवढी ती अदबीची होती. थोड्यावेळाने माझा थोरला भाऊ डबा घेवून आला. पण भूल व्यवस्थित उतरल्या शिवाय काही खायला द्यायचे नसते त्यामुळे डाॅक्टरांच्या प्रतिक्षेत आम्ही थांबलो होतो तेवढ्यात डाॅक्टरही आले व प्रथम आमच्याकडेच आले. खायला काय आणलंय ते आता दिलं तरी चालेल म्हटल्यावर मग बेड वर घेतला व डबा उघडून मी ते कुसकरायला लागलो. भाऊ म्हणायचा चार आणि मी म्हणायचो बारीक तरी करू दे.! या गोंधळात तीची दातकवाळीही घरीच राहीलीय.! माझे बोलणे तीने कानोसा घेवून ऐकले होते. तीला माझी दया आली व संकोच वाटून गेला. आपण रात्रभर आपल्या पोराला उगाच किती बडबडलो याची तीला खंत वाटून गेली . खाता खाता मला ती बोलली की, "बापू मला माफ करशील का? मी तुला खूप बडबडले.!"
ती असे बोलताच मला गलबलून आलं . अश्रूचे दोन थेंब त्या डिश मध्येही पडले. मुलांची माफी मागणारी एक वेगळी आई देवाने आपल्याला दिलीय हा विचार काळजाला फुंकर मारून गेला.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. काही दिवसांनी डिस्चार्ज मिळाल्यावर गावी नेले. तीची सुश्रूषा करणं खूप जोखमीचे व कष्टदायक काम होतं पण २४ तास आम्ही ते केलं. सतत लोकं भेटायला यायची. त्यांच्याबरोबर ती भरभरून बोलायची. मात्र ती मनाने खचली होती. आपल्यामुळे सर्वांनाच त्रास होतोय हा विचार तीच्या मनात सतत घोळत असावा. ती रोज दोन घास कमी होत गेले. डिस्चार्ज नंतर जेमतेम महिनाभर तीने कड काढला. अखेर तीचा ध्यास आणि श्वास थांबला. ती गेली. त्यास आज दहा महिने झाले. ती फक्त आम्हा भावंडांचीच आई नव्हती तर येणाजाण्याऱ्या सर्वांचीच माऊली होती. फार कनवाळू व संयमी होती. या वयात देखील तीचा पदर कधी पडला नाही. घरंदाजाची लेक होती. एवढ्या दीर्घ आयुष्यात तीच्या बद्दल कसली तक्रार असणारा एक माणूस सापडणार नाही एवढे ती निरामय निर्विकार जीवन जगली. माझे वडील तसेच निस्पृह निरपेक्ष व निर्व्यसनी पण विनोदी वृत्तीचे. विनोदानेच ते कधी कधी जेव्हा बोलायचे की मला एकदा तरी दारू प्यावीशी वाटतेय. तेवढ्यापुरती ती हलकेच स्मित करायची एवढी संयमी. सामाजिक व नैतिक ऐश्वर्य तीला उदंड लाभले होते. सर्वगुण व अनेक कलाही तीला लाभल्या होत्या. ती पट्टीची सुग्रहिणी होती. अनेक वेगळेच पदार्थ तीने आम्हाला खावू घातले. विविध प्रकारच्या चटण्या , लोणची ती बनवत असे. कोंड्यांचा मांड्यापासून ते तहान लाडू भूक लाडू पासून ते शाही पदार्थापर्यंत तीचा हातखंडा होता. ती स्वतः लहानपणापासून वारकरी असूनही मटणाचेही विविध प्रकार बनवत असे. मटणाचे लोणचे , खिमा लाडू , वडे असे बरेच काही. महाराष्ट्राचे दोन मुख्यमंत्री ( यशवंतराव व वसंतदादा) यांसह सातारा सांगली सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी तीच्या हातच्या भोजनाचा अनेकदा आस्वाद घेतला होता. तीचे माहेर माढा तालुक्यातील , तीचे आजोळ बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई व पणजोळ संत एकनाथांचे पैठण. तीचे बालपण बरेच तिकडे गेले. तो सारा भाग निजाम संस्थानच्या अखत्यारीतला. त्यामुळे स्वातंत्र्य पूर्व काळातील रझाकारांची चळवळ, स्वातंत्र्याचे उठाव अशा अनेक ऐतिहासिक घटनांची ती साक्षीदार होती. तत्कालिन बरेच नेतेही तीने जवळून अनुभवले होते. त्या सर्व गोष्टी प्रसंगाने ती मला सांगत असे. तीला वाचनाचेही भारी वेड होते. लग्नानंतर तीचे वडिलांनी तीच्यासाठी तीनचार वर्षे सोलापूर केसरी पेपर पोस्टाने सुरू केला होता. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी वाड्याच्या मजल्यावर आम्हाला साफ करताना काही रद्दीची पोती सापडली. त्यात सारे तेच पेपर होते. अलिकडे माणसाला घरातील रद्दी हटवण्याची घाई असते. चार पैसेही येतील व घरातील अडचणही दूर होईल हा मानस असतो. तीने ते पेपर पोत्यात भरून ठेवले होते. कदाचित बापाची आठवण म्हणा पण शिक्षणाची वाणवा असणाऱ्या जुन्या काळातही माझा बाप किती दूरदर्शी होता याचा तो पुरावा तीने जपून ठेवला होता. अशीच अनेक पत्रेही जपून ठेवली होती. देवा धर्माची पुस्तके व ग्रंथ संकलनही भरपूर केले होते.
आज माझे पत्नीने घर झाडायला काढल्यावर त्या साऱ्या पोतड्या समोर आल्या. किती दिवसांचे ते साहित्य भांडवल तीने व्यवस्थित बांधून जपून ठेवले होते. ते ठेवण्यातलं एक वेगळंच असं क्रमबद्ध शिस्त व कौशल्य दिसून आलं. त्यामुळं ते पाहताच उचंबळून आलं. आम्हा सर्वांनाच आतून भरून आलं. काय योगायोग असतो बघा, तीला जावून आजच दहा महीने झाले. असे या दहा महिन्यांत अनेकदा झाले. आठवणींचे क्षणही गजर लावलेल्या घड्याळासारखे तंतोतंत योगायोग कसे साधतात काय माहीत? कवठ्याहून माझेकडे येताना तीने सारे आणले होते. सहसा ती असे करत नव्हती तरी ती यावेळी मात्र घेवून आली होती. कदाचित तीला माझेकडे तेव्हा जास्त दिवस रहायचे होते म्हणून तीने आणले असावे. मग तरीही तीने महिन्यातच गावी सोड असा का सूर लावला हे कोडे पडणे स्वाभाविक आहे. म्हातारपणी माणसाला एका जाग्यावर दम निघत नाही पण शेवटी आपलं गावच जास्त प्यारं असतं हेही खरं. मला आणखी एक चुटपुट लागून गेली की ती सतत म्हणत होती तेव्हाच सोडली असती तर ही घटना टळली असती का? आई आज असती का? अशा अनेक आठवणींनी मन खायला उठतं.
आई तुझं लेकरू... 😢😰😓
प्रेमस्वरूप आई
वात्सल्य सिंधू आई
बोलावू तुज आता
मी कोणत्या उपायी 🙏🏻
✍🏻 तुझाच बापू
✍🏻 सज्जन यादव (बापू) - कवठे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा