--हॅलो... कोण समर बोलतोय का? मी धनंजय गोगटे बोलतोय.
---अरे, नमस्कार काका... बोला, बोला... समरच बोलतोय.
---काही नाही अरे... उद्या संध्याकाळी सात वाजता मोकळा असशील का? नाही ते रविवारचं संध्याकाळचं तुम्हा लोकांचं माॅल्स नी मल्टिप्लेक्स असतं ना... म्हणून विचारलं.
---नाही हो काका... अजुनतरी as such काही ठरलेलं नाहिये... बोला ना, काही काम होतं?
---उद्या एक छोटीशी पार्टी आहे... आपल्याच बिल्डिंगमधली लोकं आहेत... तुमची पिढी सगळी बाहेर पडली बिल्डिंगमधून, म्हातार्या आई - बापाला मागे ठेऊन... म्हणून तुम्हां सगळ्यांना फोन करतोय.
---तसं नाही हो काका... 1bhk मध्ये खरंच कठिण होतं हो सगळ्यां...
---ठीकेय रे बाळा... तो विषयच नाहिये आत्ता... तु आणि तुझी बायको - मुलं उद्या संध्याकाळी सात वाजता या... इथे आपल्या चित्पावन सभागृहातच आहे, छोटीशी पार्टी... मजा करुयात... मुलांना मात्र नक्की घेऊन ये.
---नक्की काका... पण प्रसंग काय आहे ते तर सांगा.
---वर्षश्राद्ध आहे तुझ्या काकूचं.
---(...........)
----------------------------------------
---नित्या... समर बोलतोय.
---चिंगमकाकांचा फोन आला का तुलाही?
---हो यार, भरसटलाय वाटतं म्हातारा... आदल्या दिवाळीचा मोती साबण पुढच्या दिवाळीत वापरणारा... पार्टी देतोय, तीही काकूंच्या श्राद्धाची.
---थांब मी अव्या ला काॅन्फरन्सवर घेतो.
---अव्या... नित्या बोलतोय... सम्यापण आहे काॅलवर... चिंगम का...
---अरे सुटलाय बुढौ... या पार्टीला, मजा करु म्हणतोय... सम्या, नित्या... तुम्हाला काय बोलला?
---अरे सेम... आणि हाईट म्हणजे ओकेजन काय? तर काकूंचं वर्षश्राद्ध.
---अरे हा आंबेडाळ नी पन्ह देणार रे... गोगट्याकडून यापेक्षा जास्त काही सुटणार नाही.
---That is not the concern रे भुकड्या... च्यायला नित्या तू कायम उपाशीच असतो... m more worried abt शुभ्या... त्याला तिथे अमेरिकेत chest pain सुरु होतील कळलं तर... की आपला बाप, आपल्या आईचं वर्षश्राद्ध सेलिब्रेट करतोय.
---सम्या... तुझ्यातल्या त्या संवेदनशील लेखकाला कायम मोकाट ठेऊ नको... खुंटाला बांध त्याला... तू का एव्हढं श्राद्ध-श्राद्ध करतोय रे... आणि काय वाटणार त्या xxxxx शुभ्याला?... काकूंना खांदे द्यायला तर आपण.
---ए नित्या, सम्या... xxxxनो तुम्ही xx वर करुन झोपाल दिवसभर... मला Saturday working असतो... पटकन्न बोला जाऊया की नको जाऊया.
---जाऊया...
---Let's go...
----------------------------------------
चित्पावन सभागृह 'सरोवर' अपार्टमेन्टच्या दुसर्या पिढीतील मुलं - सूना, लेकी - जावयांनी भरलं होतं.... काकांच्या पिढीतले कोणीच नव्हते पार्टीला. निरनिराळ्या प्रकारचे व्हेज, नाॅन-व्हेजचे स्टाॅल्स लावले होते... ब्लेन्डर्स प्राईड, स्मिर्नऑफ, ओल्डमाॅन्क च्या बाटल्या लावल्या होत्या एका बाजुला. समर, नितेश आणि अविनाश आपापल्या बायका - मुलांबरोबर आले होते... आणि हा तामझाम बघून पडायचेच शिल्लक होते. गोगटे काका सगळ्यांचं जातीने स्वागत करत होते... प्रत्येकाला बसायला सांगत होते. नित्याचं लक्ष कधिचं बाटल्यांवर होतं, अव्याचं लक्ष होतं खालच्या मजल्यावरचं त्याचं असफल प्रेम... जे नवरा - मुलांबरोबर आलं होतं त्यावर, तर सम्या आपले आई - बाबा कुठे दिसतात का पहात होता. एव्हाना गोगटे काकांनी बोलावलेली सगळी एक्स्पेक्टेड मंडळी आली होती... काका बोलायला उभे राहीले..
"Good evening my young friends... u all r looking gorgeous I must say... तुमच्या चिंगम काकांचा हा अवतार तुम्ही पहिल्यांदाच पहात असाल नई?... हा हा हा... चिंगम काका... what a pet name u have given to me... simply great... चिंगमसारखा चिकट, चिवट... बेचव, बेरंग होऊनही कधिच न संपणारा आणि शेवटी टाकून, थुंकून द्यावा लागणारा... हा हा हा... पण तुम्हीतर बाहेरची पोरं रे... तुम्हाला जे वाटेल, ते तुम्ही बोलणारच... वाईट याचं वाटतं की आमच्या सख्ख्या एकुलत्या मुलालाही... शुभमलाही तेच वाटलं... मला नी माझ्या बायकोलाही गेला थुंकून तो, आम्ही जेव्हा नुसते रबर राहिलो बिनकामाचे... माझी बायको चार वर्ष सलग अंथरुणावर होती... किमान चाळीसवेळा त्याला बोलावलं असेन मी... पण तो एकदाही नाही आला... शेवटच्या काॅलवर तर मला म्हणला "मी इथे शेअर्सचे अपडेट घेऊ की तुमचे?... तुमचं bp वर जातय की खाली उतरतंय यावर लक्ष ठेऊ की market किती चढतंय नी कोसळतंय यावर??... अगदीच पर्याय नसेल समोर, तरच फोन करा"... व्हर्चुअल कानाखाली लगावली अगदी त्याने माझ्या... आणि मीही त्याला फोन केला नाही मग... गेल्या वर्षी याच दिवशी, साधारण याच वेळी मी त्याला फोन केला... सांगायला की माझी बायको गेली... & I cut the phone... he was trying my no. for next couple of days but I didn't pick-up... लवकरच सोडला त्यानेही नाद... नी आजतागायत ना तो आलाय की त्याचा एकही काॅल... माझ्या बायकोचं डेथ सर्टिफिकेट देणारा माझा डाॅक्टर मित्र, चार दिवसांपुर्वी कार एक्सिडेंटमध्ये गेला... & I decided to disclose the secret that only two of us knew... माझ्या बायकोला मी 'इच्छा मरण' दीलं... ती असह्य वेदनेतून जात होती... तब्बल एक वर्ष फक्त नी फक्त कण्हण्यापासून सुरु होऊन, किंचाळण्यापर्यंत पोहोचलेले आवाजच ऐकलेत मी तीचे... अख्खा आठवडा ती माझी याचना करत होती... मला हात जोडत होती... हमसून हमसून रडत होती... तीच्या विझल्या डोळ्यांतून, मला फक्त तीची 'सोडवा मला' ही इच्छाच दिसत होती... आणि मग एके दिवशी काही पर्यायच उरला नाही माझ्यासमोर... अशीच ती माझी विव्हळत, किंचाळत दयायाचना करत असतांनाच... मी तीच्या तोंडावर ऊशी दाबली... दाबत नेली... दोन्ही बाजुंनी चिंब भिजला होता त्या ऊशीचा अभ्रा, ती निपचीत होईतो... आज मी इथे फक्त तुमच्याच पीढीला बोलावलय, तुम्हाला हे सांगायला की कृपा करुन आपापल्या आई - बाबांकडे बघा... त्यांच्याही घरी अधुनमधून डोकावा... आपल्या व्यस्त चोवीस तासांच्या ताटातील, किमान दहा मिनिटांची दोन शीतं... रोज त्यांच्या नावाने ताटाबाहेर ठेवा... दोन्ही बाजुंनी भिजलेल्या अभ्र्याची ऊशी, घरोघरी मिळेल नाहीतर... I insisted u all to come with ur children to make them understand the importance of at least some amt of time to b given to parents... ऊपकार म्हणून नाही तर कर्तव्य म्हणून... आता मस्त खा, प्या नी एन्जाॅय करा पार्टी... उद्या सकाळीच मी पोलिसांना फोन करणारेय... so whole night is ours... cheers".
.
.
.
समर, नितेश आणि अविनाश ओक्साबोक्शी रडत होते, इतर बर्याचजणांच्या जोडीने आणि गोगटे काका एक 'अभ्रा' अंथरुन मांडीवर, ताट हातात धरुन शांतपणे जेवत होते.
- सचिन श देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा