▪️ आई मी तो नवा गेम घेऊ का ?
▪️ बाबा, मला ती डॉल खूप आवडलीये. मला ती पाहिजेच आहे.
▪️ तुम्ही रोज ऑफिसला का जाता ? माझ्यासोबत दिवसभर खेळत का नाहीत?
▪️ आपण गरीब आहोत की श्रीमंत ?
▪️ आपल्याला नवीन घर का घेता येणार नाही ?
▪️ आपण बँकेतून पैसे आणतो तर मग एकदाच खूप सारे पैसे का आणत नाही ?
लहान मुलं आपल्या पालकांना असे अनेक प्रश्न सतत विचारत असतात. आणि पालक बिचारे शक्य तितका प्रयत्न करतात किंवा मोठा झालास की तुला समजेल असे म्हणून मोकळे होतात. खरंच, पैशांबद्दल मुलांसोबत बोलणे सोपे नाही. पालक म्हणून आपला फोकस मूलांना चांगली मूल्य, आचार विचार, वागणूक शिकविण्याकडे असतो. त्यामुळेच बहुतांश पालक मुलांसोबत पैशांबाबत बोलत नाहीत. आपण पैसे कसे कमावतो, कसे सांभाळतो, कसे गुंतवतो हे मुलं आपल्याकडे बघून शिकत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पैशांबाबत कसा विचार करतो हे मुलं आपल्या पालकांकडूनच शिकतात. काही लोक पैशांना सर्वस्व मानतात, काही लोक पैसा आनंदी आयुष्यासाठी महत्वाचा आहे असे मानतात तर काही चक्क पैसा ही वाईट गोष्ट आहे असे मानतात. मग मुलांनाही तसंच वाटतं आणि पुढील काही पिढयांनाही !
प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफेट एकदा म्हणाले होते की पालकांनी आपल्या मुलांना आर्थिक गोष्टी शिकविताना केलेली सर्वात मोठी चूक म्हणजे उशिरा सुरुवात करणे. मुलांना साधारण सातव्या वर्षांपासून पैशांशी संबंधित गोष्टी समजायला लागतात. कायमस्वरूपी स्वभावाचा भाग होतील अशा सवयी अंगी लागण्याचे देखील हेच वय आहे. त्यामुळे पालकांसाठी या वयात किंवा या वयानंतर कधीही मुलांसोबत पैशाबाबत संवाद साधणे योग्य. स्वतःकडेच बघा ना. आपण अनेक आर्थिक चुका केल्या असतील. उशिरा गुंतवणूक सुरु करणे, कमी बचत करणे, अनाठायी खर्च करणे किंवा भरमसाठ कर्ज घेणे अशा आपण केलेल्या चुका आपल्या मुलांकडून व्हायला नको. मुलांना योग्य वेळी योग्य आर्थिक धडे मिळाले तर त्यांच्याकडून गंभीर चुका होणार नाहीतच. सोबत त्यांना आनंदी आणि आर्थर्कदृष्ट्या स्वतंत्र आयुष्य जगता येईल.
मुलांसोबत पैशांबाबत संवाद साधण्यासाठी महत्वाचे मुद्दे
🔴 उत्पन्नाचे स्रोत आणि गरजा ( Income and needs)
पैसे झाडावरून येतात असं उगाच लडिवाळपणे मुलांना सांगितलं जातं. ते न सांगता घरातील उत्पन्नाचे नेमके स्रोत कोणते आहेत ते सांगा. आपले खर्च भागविण्यासाठी त्या पैशांचा कसा उपयोग होतो ते सांगा. मुख्य म्हणजे आपल्या एकूण खर्चापैकी गरजा आणि ईच्छा (needs and wants) ओळखायला शिकवा.
🔴 खर्च आणि बचत (Spending and saving)
खर्च आणि बचत दोन्ही कसे महत्वाचे आहेत ते सांगा. खर्च आजच्या आनंदासाठी आणि बचत उद्याच्या आनंदासाठी महत्वाची आहे.
🔴पैसे हे आनंदाचे एकमेव कारण नाही (Money doesn't equal happiness)
पैसे वापरून अशा गोष्टी घेता येतात ज्या आनंद देतात. पण तो आनंद तात्पुरता असतो. पैसा आपली किंमत ठरवू शकत नाही. चांगल्या ब्रॅण्डचा मोबाईल किंवा महागडी कार आपली किंवा समोरील व्यक्तीचे मूल्य ठरवू शकत नाही. आजच्या सोशल मिडीया च्या युगात प्रत्येकजण श्रीमंत दिसण्यासाठी किंवा श्रीमंती दाखविण्यासाठी प्रयत्न करत असतो. मुलांवर या सगळ्याचा दुष्परिणाम होत असतो. (आणि मोठ्यांवरही होतो !)
🔴 संपत्ती निर्माण करणे (Creating wealth)
बचत करणे पुरेसे नव्हे तर गुंतवणूक करणे आर्थिक उन्नत्ती साठी महत्वाचे आहे. महागाईचा दर, त्याचा आपल्या जीवनावर होणारा परिणाम, निष्क्रिय उत्पन्न या गोष्टी प्रात्यक्षिकातून शिकविता येतील.
🔴 भविष्यासाठीचे नियोजन (Planning for the future)
आपण मुलांना नेहमी विचारतो की मोठं झाल्यावर तू कोण होणार आहेस? पण कोणी होण्यासाठी त्याचे योग्य नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. आयुष्याचे आणि सोबत आर्थिक बाबींचे नियोजन करण्यासाठी मुलांना तयार करणे हे पालकांचे कर्तव्य आहे.
लक्षात ठेवा, लेक्चर देऊन किंवा जाडीजुडी पुस्तकं घेऊन या गोष्टी शिकविता येत नाही. फक्त आपल्या वागणुकीतूनच मुलांना शिकविता येईल. एक योग्य रोल मॉडेल बनण्यासाठी पालक म्हणून आप्ल्यालाच प्रयत्न करायचे आहेत. आणखी महत्वाची गोष्ट. मुलाना आर्थिक गणितं शिकवताना कळत नकळत आपल्याकडून मुलगा-मुलगी भेद होत होत तर नाही याबद्दल दक्ष रहा. जर तुमच्या घरात आई बाबांपैकी एकच व्यक्ती मोठे आर्थिक निर्णय घेत असेल तर मुलं तेच शिकणार. बऱ्याच घरांमध्ये मुलींना बचत करायला शिकवलं जातं आणि मुलांना खर्चाचे निर्णय घ्यायला प्रोत्साहन दिलं जातं. हा भेदाभेद टाळून आपल्या मुलांना योग्य मार्गदर्शन द्या. या लेखाद्वारे मुलांना आर्थिकदृष्ट्या सुशिक्षित बनविणे याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. लेख आवडला तर इतर पालक मित्रांसोबत जरूर शेअर करा.
एक सशक्त, समृद्ध आणि आनंदी पिढी घडविणे ही आपली जबाबदारीही आहे आणि कर्तव्यही !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा