सीमाचं नेल शॅाप "नेल परफेक्शन"अगदी मोक्याच्या ठिकाणी होतं. तिच्याकडे नेहमी गिऱ्हाईकाची रांग लागलेली असे. मॅनिक्युअर व पेडिक्युअर म्हणजे केवळ नखे रंगवणे नव्हे. लॅटीन भाषेतून आलेल्या या शब्दाचा अर्थ आहे हात,पाय, नखं निरोगी ठेवणं, हे सीमा सर्वांना सांगत असे. बायकांचे हात पाय चोळून त्यांची नखे सजवताना त्या खूप रिलॅक्स होतात.. मनं मोकळी करतात हा तिचा अनुभव होता. सीमा महिन्यातून एकदा वृध्दाश्रमात, अनाथाश्रमात जाऊन तिथे मोफत मॅनिक्युअर/पेडिक्युअर करून समाजाचं ऋण तिच्या परीने फेडत असे. अशीच ती “सदासुखी” या वृध्दाश्रमात जाऊन पोचली होती. सर्वच बायका अगदी खुषीत हात, पाय,पाठ चोळून घेऊन जेल, अॅक्रीलिक नेलं पॅालीश लावून घेत होत्या. सीमाचं लक्ष एका आजीकडे गेलं. ती जबरदस्ती केल्यासारखी तिथे येऊन बसली होती. ती हळूच तिथून उठून तिच्या खोलीकडे जायला निघाली म्हणून सीमाने तिला थांबवले. ती म्हणाली, “आजी या ना! तुम्हाला छान हात, पाय, पाठ चोळून देते. या ना!”
आजी खाली मान घालून हात मागे पकडून म्हणाली,” नको नको. मला असलं काही करून घ्यायचं नाही. कशाला नसते चोजले करायचे जीवाचे?”
“आजी चोळून घ्या. बघा किती बरं वाटतं.” सीमा म्हणाली. बाकीच्या दोघी तिघी “जा ग. घे की करून. म्हणाल्या म्हणून आजी नाईलाजानं सीमा समोर जाऊन बसली. आजीने नाराजीने तिचे हात पुढे केले. आजीचे हात ती का लपवत होती सीमाला कळले. ते हात रापले होते. त्यावर अनेक काळे, तपकिरी डाग होते. त्या खडबडीत हातांवर अनेक घट्टे होते. नखं काळी पडली होती.ते रापलेले हात दाखवण्याची आजीला लाज वाटत होती.
"माझे हात चांगले नाहीत ग ताई. त्याला काही केले तरी ते असेच दिसणार. इतर बायकांचे पाटल्या, बांगड्या घातलेले गोरे, मऊ हात आहेत त्यांना लाव रंग. मला नको हे" आजी म्हणाली.
सीमाने आजीच्या हाताला भरपूर क्रिम लावत विचारले,“आजी शेतात काम करायचीस का ग?”
“होय की.“ आजी म्हणाली,” घरची शेती होती. नवरा माझा फार चांगला होता. मला दहावी परेंत त्यानच शिकवलं. मी वकील होऊन शेतकऱ्यांना मदत करावी असं त्यांना वाटे.अगदी न्यायमूर्ती रानड्यांसारखंच!”
चार मुलं होती आणि छान चाललं होत. मात्र एका वर्षी देवाचा कोप झाला. त्या वर्षी पाऊस पडला नाही. सगळं पीक करपले. आम्ही कर्जबाजारी झालो. नवऱ्याने जीव दिला. मोठे दिर काही दिवस मदत करत होते पण ते ही आजाराने गेले. जाऊबाई व त्यांची तीन मुलं पण वाऱ्यावर पडली. मग मी व जाऊबाईंनी मिळून ही सात मुलं वाढवली. शेती करून कर्ज फेडलं जाईना. म्हणून घर विकून कर्ज भागवले. अगदी लहानशा खोलीत राहिलो. ताई, मी व जाऊबाईनी नांगर ओढला आहे आणि भाकरी पण बडवल्या आहेत. वाईट नजरांपासून बचाव व्हावा म्हणून केस कापून पुरुषांचे कपडे पण काही वेळा घातले आहेत आणि नऊवार नेसून सण पण केले आहेत पण मुलांचं उत्तम केलं. ती सुखाने संसार करत आहेत.” ती समाधानाने म्हणाली.
सीमा तिचे हात चेपत तिच्याकडे बघत होती. “तू का नाहीस रहात मुलांकडे? सात मुलांपैकी कोणी नाही ठेवून घेतलं?” सीमाने न राहवून विचारलं.
“ताई, माणसाचा उपयोग संपला की ते माणूस नकोसं होतं हा जगाचा नियम आहे. सुनांना मी नको होते. जावयाकडे मलाच रहायचं नाही. या वृध्दाश्रम चालवणाऱ्या कुलकर्णी म्याडम आपल्याकडून धान्य विकत घ्यायच्या. कर्जासाठी शेत व घर विकलं तेव्हा त्या म्हणाल्या, “आजी, आपल्या वृध्दाश्रमातील बाग बघायला सदू आहे त्याला मदत कर आणि इथंच रहा. ती बाग बघ ताई. मी व सदूनी लावलेली !
बाग खरोखरच सुंदर होती. मोगरा, जाई, गुलाब, झेंडू, मधुमालतीने फुललेल्या बागेकडे सीमाने कौतुकाने बघितलं.
“माणसाचे हात मातीला लागले की मन शांत रहातं बघ. मी, ही काळी माती आणि माझी रोपं. हे नातं कुणीही तोडू शकत नाही. आपली पोरं लांब जातात पण ही रोपटी रोज माझी वाट बघत असतात. मातीची माया काही वेगळीच. हिरवं स्वप्न सत्यात आणणारी ही माय माझी ! या मातीत एक दिवस मिसळून जाणे किती छान असेल, नाही?" आजीच्या तोंडून आयुष्याचे तत्वज्ञान पाण्याच्या संतत धारेसारखे वहात होते.
“असल्या नखांना तू कसला रंग लावणार. हे हात रंग लाऊन घेण्यासाठी नाहीत. ते माती उपसण्यासाठी आहेत. " आजी म्हणाली. सीमाने आयुष्यभर कष्ट केलेले ते खडबडीत, रापलेले हात हातात घेतले. सात मुलांना कष्ट करून वाढवताना, शेती करताना झिजलेले ते हात तेल लावून परत चोळले. तिच्या आयुष्यातील सारे कठीण प्रसंग घट्टयांच्या, व्रणांच्या रूपाने हातावर दिसत होते. ते हात तिने गरम पाण्याने शेकले. कष्टाने सुंदर झालेल्या या हाताची किंमत नखाला कृत्रिम रंग लावून कमी होईल. तो रंग तिथे शोभणारही नाही म्हणून नखं स्वच्छ करून ती बळकट करणारा एक पारदर्शक पेंट तिच्या नखाला लावला. मेंदीच्या औषधी गुणांनी हाताला गारवा तरी येईल म्हणून तिने आजीच्या हातावर सुंदर मेंदी काढली.
ती आजीचे हात हातात घेऊन म्हणाली, "आजी,यापुढे कधीही लाज मानू नको या हातांची. ह्या हातांनी किती आयुष्यं फुलवली आहेत. तुझ्या हातावरच्या रेषात तुझ्या लेकरांचं भाग्य दडलय. “देखणे ते हात ग आजी…ज्यांना निर्मितीचे डोहाळे” लागले. ह्या हातांनी फुलं फुलवलीं. रोपं लावली. शेती केली. असे हात लपवायचे नसतात ! हे चंदनाचे हात अभिमानाने जगाला दाखवायचे असतात. मी ह्या हातांसाठी थोडं काही करू शकले याचा मला आनंद आहे.”
आजी सुखावून तिचं बोलणं ऐकत होती. तिने पेडीक्युअरसाठी आजीचे रापलेले पाय बघितले. बोरकरांच्या ओळी तिनं आजीला सांगितल्या..
“देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनी सुध्दा स्वस्तिपद्मे रेखिती॥
ते नांगर ओढलेले पाय गरम पाण्यात बुडवले व चोळले. तळपायाला झालेल्या गुदगुल्याने आजीला हसू आले. “पाय मात्र मजबूत आहेत ग माझे ! बरेचदा लटपटले पण मातीनच तिच्यात घट्ट रोवून उभे रहाण्याची शक्ती दिली बघ !”
सीमा गाणं गुणगुणत ते पाय चोळत राहिली.
चंदनाचे हात पायही चंदन
परीसा नाही हीन कोणी अंग.
वृक्षवल्लीशी सोयरीक वाटणाऱ्या तुकाराम महारांजांचा अभंग आजी जगली होती. कष्ट करायला माणसाची हरकत नसते. पण ते समजून घेणारं भेटलं की त्याचं चीज होतं. आजी खुर्चीवर डोके मागे ठेऊन तो क्षण जगत सुखावली होती !
©® ज्योती रानडे ✍️
2024 JyotiRanade. All rights reserved.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा