'इचलकरंजी ' म्हटलं तर शहर. म्हटलं तर गाव. लोकसंख्या मध्यम, पण एक प्रमुख उलाढालींची बाजारपेठ. महाराष्ट्राचे मँचेस्टर अशी ओळख असलेल्या या शहराला सूत आणि कापड उद्योगाची शतक- भराची स्वर्णिम परंपरा आहे .एके काळी गल्लो गल्ली असणारे सूत उद्योग आणि घरो घरी ' कीटिर किट' आवाज करणारे हातमाग यामुळे प्रत्येकाला काम मिळायचं, बाजारात भरभराट होती आणि हजारो कुटुंब सुखाने नांदत होती .परंतु औद्योगिक क्रांती आणि आधुनिकीकरणाच्या झपाट्यात सूत गिरण्यातील कामगारांची जागा आधुनिक अश्या यंत्रांनी घेतली आणि हातमागा चे काम पॉवर लूम्स नी लाटले. पैश्या चा प्रवाह मोठ्या उद्योगांकडे वाहू लागला आणि अनेक कुटुंबांचा रोजगार नाहीसा झाला . इचलकरंजी हे सीमा भागातील शहर. त्यामुळे या भरभराटी मध्ये ज्यांचा हातभार होता अशी अनेक कुटुंब शेजारच्या कर्नाटक आणि आंध्र या राज्यातून इथे येऊन वसली होती .पण हातचे काम जाताच उदरनिर्वाहासाठी सर्वांनी आपापल्या मूळ गावाचा रस्ता धरला. अश्याच कुटुंबां पैकी एक कुटुंब ' सिद्राम ' चे होते .बायको ' सुनीता ' हिच्या सह इचलकरंजी ला आपली कर्म भूमी मानून कष्ट करून तो इथे जगत होता. पण तो जिथे काम करायचा तो ' मंगलदास सूत उद्योग ' बंद पडल्यावर इतर कुटुंबां प्रमाणे स्वगृही परतण्याचे त्याचे दोर मात्र केव्हाच कापले गेले होते. गावाकडील त्याच्या वाटणी ची जमीन मोठ्या भावांनी हडपली आणि सिद्राम अक्षरशः रस्त्यावर आला. हातचं काम आणि राहतं घर हातून गेलं आणि या ओढाताणीत मुलाला जन्म देऊन त्या प्रसूती वेदनांसोबतच सुनीता ने हे जग सोडलं आणि नवजात ' मल्लेश' ची जबाबदारी सिद्राम वर येऊन पडली.
ह्या धक्क्यातून सावरत सावरत सिद्राम या ' इचलकरंजीत 'पुन्हा स्वतः चा जम बसवण्या चा प्रयत्न करू लागला. जीवापाड मेहनत करून छोट्या मल्लेश ची काळजी घेऊ लागला, त्याला मोठं करू लागला. ह्या सर्व स्थित्यंतरात सिद्राम तग धरून होता. तरला होता याचं कारण त्याच्या मध्ये असणारी अतिशय सुंदर अशी बांधणी चे काम करण्याची कला आणि एकमेकात मिसळू न देता अतिशय पक्क्या आणि आकर्षक रंग संगतीत बांधणीचे वेगवेगळे नक्षीदार नमुने निर्माण करण्याचे कौशल्य ! सूत उद्योग बंद पडल्यावर त्याने स्वतः च घराच्या अंगणात ही बांधणी ची कला कुसर करण्याचा उद्योग सुरू केला होता. आकर्षक आणि पक्के रंग आणि नाजूक अश्या सुंदर सुंदर नक्षी कामामुळे लवकरच त्याच्या कामाची ख्याती सर्वदूर पसरली, शहरातील अनेक घरगुती आणि छोट्या छोट्या दुकानांच्या कामाच्या ऑर्डर त्याला मिळू लागल्या पण सिद्राम चा मूळ स्वभाव अत्यंत गरीब , सोशिक आणि भिडस्त असल्याने मिळेल तो भाव स्वीकारून तो स्वतः ची कला विकत होता. पारखी आणि चोखंदळ गिऱ्हाईकं , इतरांपेक्षा कमी मोल देऊन त्याचा माल घेऊन जायची पण आहे त्यात समाधान मानणारा सिद्राम मात्र त्यामुळे तश्याच आर्थिक परिस्थितीत जगत होता . अर्थात परिस्थिती कशी ही असली तरी सिद्राम ने मल्लेश ला काही कमी पडू दिले नव्हते. घराजवळ असलेल्या एका नगरपालिका शाळेत त्याला घातले होते स्वतः दोघांसाठी रोज स्वयंपाक करायचा .वेळेवर डबा बनवून त्याला शाळेत सोडून यायचा ,दुपारी शाळा सुटल्यावर मात्र त्याचा मित्र सीताराम स्वतः च्या मुलासोबत मल्लेश ला घरी घेऊन यायचा. आपण स्वतः अशिक्षित असलो तरी आपल्या मुलाने मात्र शिकून सवरून फाड फाड इंग्लिश बोलणारा साहेब बनावं हेच सिद्राम चे स्वप्न होते. चौथीत शिकणाऱ्या मल्लेश ला सिद्राम चे म्हणजे त्याच्या ' अप्पाचे ' हे रंगाचे काम बघायला खूप आवडत असे , तासन् तास तो हे पांढऱ्या कापडावर इंद्रधनू प्रमाणे पसरणाऱ्या त्या निळ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगाची जादू आणि मेणाच्या गाठी मुळे होणारी बांधणीची नक्षी पहात बसायचा. कधी तरी लहर आली की एखादा कापडाचा तुकडा घेऊन त्यावर ' डाय ' चे रंग घेऊन काहीतरी रंगकाम करीत बसायचा.
एके दिवशी मल्लेश नेहमी पेक्षा जरा लवकरच घरी आला ,चेहऱ्यावर काही तरी बिनासल्याचे भाव होते .रोज प्रमाणे आल्या आल्या शाळेतील गमती जमती सांगत 'अप्पा' ला खेटून न बसता आज स्वारी तडक आतल्या खोलीत गेली तसं सिद्राम ला जरा नवल वाटलं पण नेमकं त्याच वेळी नेहमीच्या गिऱ्हाईकां पैकी असलेल्या ठाकूर बाई बांधणी च्या ओढणीची ऑर्डर द्यायला आल्या होत्या त्यामुळे त्याला काही बोलता आलं नाही. थोड्या वेळाने सिद्राम हातातलं काम ठेऊन आत गेला आणि तोंड फुगवून खुर्चीत शांत पणे बसलेल्या मल्लेश जवळ गेला आणि काही विचारण्या आधीच
"आप्पा मी शाळेत जाणार न्हाय" अशी रडक्या आवाजात घोषणा झाली.
" का रे मन्या ? काय झालं ? कोणी रागावलं का ? "
त्याचे डोळे पुसत सिद्राम विचारत होता आणि एकी कडे त्याचा गणवेश ही बदलत होता.
" न्हाय" एव्हढंच उत्तर मिळालं त्याला.
" मंग ?? का न्हाय जायचं ?" सिद्राम चा पुढील प्रश्न.
"आप्पा शाळतील मुलं खूप त्रास देतात, शिव्या देतात. ह्ये बघा. शर्ट पण खराब केला आज शाई ओतून "
असं म्हणत रडत रडत मल्लेश ने पुराव्या दाखल शर्ट वर पडलेला भला मोठा शाई चा डाग दाखवला.
" अरे...त्यात काय झालं. आण तो शर्ट दोन मिनिटात ब्लिच करून डाग घालवू आपण " हसत हसत सिद्राम म्हणाला.
" तरी पण मी न्हाय जाणार." मल्लेश चा हट्ट कायम होता.
" बरं बरं ...आधी हात पाय धुवून जेवून घे.
बाळा. मग बघू आणि आता उद्या अन् परवा सुट्टीच आहे ना. आता शाळेत जायचंय नाहीय. " वेळ मारून नेत सिद्राम म्हणाला आणि त्याचा शर्ट, दप्तर हे उचलू लागला.
"तसं नाही आप्पा " मल्लेशचा आग्रह सुरूच होता. " मला आता दुसऱ्या शाळेत जायचय. त्या कॉन्व्हेन्ट शाळेत सेंट पीटर्स मध्ये. गंगावेशी जवळ."
हे ऐकुन सिद्राम एकदम थबकला. आता हे खूळ ह्याच्या डोक्यात कुठून आलं? गल्लीत रोज पीटर्स शाळेची बस येते आणि त्यातून छान छान कोट टाय घातलेली एकदम टापटीप मुलं जाताना दिसतात त्याचं मल्लेश ला आकर्षण होतं हे त्याला ठाऊक होतं. पण एव्हढा हट्ट त्याला अपेक्षित नव्हता. मल्लेश मात्र ऐकायला तयार नव्हता. तो आता हट्टालाच पेटला होता. त्या हट्टा पायी त्याने चक्क स्वतःच्या 'अप्पा' शी अबोला धरला .सकाळी आणि रात्री झोपताना त्याच्या साठी भरलेला दुधाचा ग्लास तसाच राहू लागला. तो एकटा एकटा बसून राहू लागला. जेवायला ही तयार होईना. सिद्राम ची मात्र पंचायत झाली. पोराची समजूत कशी काढावी हे त्याला समजेना. अखेर सिद्राम ने त्याला पुढील वर्षासाठी म्हणजे जून पासून सेंट पीटर्स शाळेत घालायचं वचन दिलं आणि मग कुठं मल्लेश ची गाडी रुळावर आली. सिद्रामच्या गळ्यात पडून त्याने त्याचा आनंद व्यक्त केला आणि मग सोमवारी शाळेत जायला तयार झाला.
पोराला वचन तर दिलं पण आता हे निभवायाचं कसं? हा मोठा प्रश्न होता. कारण सेंट पीटर्स ही शहरातील एकमेव अशी प्रतिष्ठित मोठी इंग्रजी शाळा होती. श्रीमंत आणि मोठ्या घरातली मुलं तिथे जायची. कारण तिथली फी , डोनेशन हे सामान्य लोकांच्या आवाक्या बाहेरच होतं पण मल्लेशच्या चेहऱ्यावरील आनंदा पुढे ही समस्या त्याला दुय्यम वाटू लागली. पण जेव्हा उन्हाळी सुट्ट्या संपल्या आणि पाचवी च्या वर्षासाठी प्रवेश घ्यायची वेळ आली तसं सिद्राम च्या पोटात गोळा उठला. तो स्वतः अशिक्षित असल्याने आता एव्हढ्या मोठ्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी काय सव्यापसव्य करावी लागतात हे त्याला कुठलं ठाऊक? बरं स्वभाव ही पडला भिडस्त आणि शांत त्यामुळे याबाबत कोणाशी बोलावं, काय करावं हे समजत नव्हतं. अखेर काही न सुचून त्याने याबाबत खास मित्र सीताराम शी सल्ला मसलत केली. अर्थात तो ही काही त्यातला मोठा तज्ञ नव्हता पण चर्चेतून मार्ग निघतात या न्यायाने त्याने एक उपाय सुचवला.
"अरे तुझ्याकडं त्या पाटील मॅडम येतात नव्हं जवाहरनगर मधल्या. नाही का लाल रंगाच्या मोटारीतून." सीताराम ने आठवण करून दिली.
" कोण ...? हां हां ..त्या होय ? साडी ची ऑर्डर वाल्या ..." पाटील मॅडम कोण हे लक्षात येऊन सिद्राम म्हणाला.
" होय...त्या मॅडम त्याच पीटर्स शाळेत आहेत .त्यांनला बोलून बग काय मदत होतीय काय ! " सीताराम ने माहिती अधिक सल्ला देऊन टाकलं. हा आशेचा किरण दिसताच सिद्राम ने प्रयत्न करायचं ठरवलं. कारण पाटील मॅडम त्याच्याकडून नियमित काम करून न्यायच्या. घरगुती कार्यक्रम असो वा भेट देण्यासाठी असो, बांधणी सिद्राम चीच असायची. दोन तीन दिवसांनी त्याला संधी मिळाली आणि चाचपडत घाबरत त्याने त्यांच्याकडे प्रवेशा साठी शब्द टाकला .
" हे बघ सिद्राम, मी सेंट पीटर्स मध्ये आहे हे बरोबर पण मी केवळ एक शिक्षिका आहे. स्कूल अॅडमिशन वगैरे सगळं मॅनेजमेंट ठरवतात. सो...." पाटील मॅडम नी उत्तर दिलं
"बघा ना मॅडम काही तरी प्रयत्न करून. काही काम होतंय का ! पोरानं लै मनावर घेतलाय हो !! " सिद्राम विनवण्या करू लागला.
"बघू या ! मी प्रयत्न करून बघते आणि सांगते दोन चार दिवसांत ही साडी न्यायला आल्यावर." असं मोघम आश्वासन देऊन पाटील मॅडम गेल्या. बहुदा सिद्राम च दैव बलवत्तर असावं .कारण पाटील मॅडम नी त्याला सांगितलं की" हे पहा पाचवीच्या वर्गासाठी तसं तर सर्व अॅडमिशन फुल आहेत पण एका रद्द झालेल्या जागेवर तुझ्या मुलाला प्रवेश मिळू शकेल. अर्थात त्यासाठी फी आणि डोनेशन मात्र भरावं लागेल. आहे का तयारी ?? "
डोनेशन चा उल्लेख होताच सिद्रामच्या आनंदाचा फुगा फाडकन फुटला. फी भरणं हे थोडीफार ओढाताण आणि काटकसर करून शक्य होतं पण हे डोनेशन च काय तरी नवीनच उपटलं होतं जे भरण शक्य नव्हतं . पण पाटील मॅडमला काही तरी निर्णय कळवणं आवश्यक होतं. नाही तर ते अॅडमिशन दुसऱ्या कोणाला तरी दिलं जाणार होतं. खूप विचार करून अखेर त्याने पाटील मॅडम ला अॅडमिशन साठी हो म्हणून सांगितलं पण डोनेशनसाठी मात्र काही सवलत किंवा ते भरण्यासाठी वाढीव मुदत मिळवण्याची विनंती केली. आणि सिद्रामचा प्रामाणिकपणा मेहनती आणि चांगला स्वभाव या भांडवलावर पाटील मॅडमनी शाळेच्या व्यवस्थापकांशी बोलून डोनेशन एक वर्षानंतर भरण्याची मुभा मिळवली आणि अखेर मल्लेश च्या इच्छेनुसार त्याला सेंट पीटर्स शाळेत प्रवेश मिळाला. हे समजल्यावर त्याच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद आणि डोळ्यात आलेली चमक आणि खुश होत त्याच्या "अप्पा " ला त्याने मारलेली मिठी हे सर्व सिद्राम साठी अनमोल होतं. सिद्राम आता मोठ्या शाळेत जाऊ लागला. स्वारी भलतीच खुश होती. नवीन युनिफॉर्म, नवे नवे आणि मोठ्या घरातले मित्र, ती बस आणि शाळेचं भलं मोठं प्रांगण, ती शिस्त, अँग्लो इंडियन शिक्षक ह्या सर्वांनी तो भारावून गेला होता. सगळं कसं छान सुरू होतं आणि सीतारामने " पुढील वर्षी तरी तू डोनेशन कुठून भरणार सिद्राम?" हा प्रश्न विचारून सिद्राम ला भानावर आणलं.
" बघू ...करू काही तरी कुठं कर्ज मिळतय का बघू ..नाही तर...." सिद्राम बोलताना जरा थबकला
" नाही तर काय ?" तोच धागा पकडून सीताराम ने विचारले
" काय नाय..ह्यो हातमाग विकून टाकू. नाही तरी पडूनच हाय की" जड पणाने त्या हातमागावर हात ठेवत तो उद्गारला.
" अरं खुळा हायस की काय ? हित इचलकरंजीत संसाराला सुरुवात केलीस. तेव्हा "मंगलदास कंपनी" बंद पडताना तुझ्या मेहनती वर अन् कले वर खूश होऊन स्वतः मंगलदास शेठ नी एव्हढ्या सगळ्या कामगारांमध्ये फक्त तुला ह्यो माग भेट दिला व्हता. की कधी काळी तुला यातून रोजगार मिळेल... अन् तू
तेच विकायला निघालास? " सीताराम पोट तिडकीने बोलत होता
" अरं मंग काय करू ? कुठून आणू चाळीस हजार? डोनेशन तर भरायला नको ? " सिद्राम ची उद्विग्नता.
" बघू काही तरी मार्ग निघल. चल झोप आता जाऊन." असं सीताराम म्हणाला आणि सिद्राम च्या घराबाहेरील ओट्यावरची बैठक संपवली. मल्लेश आता नव्या शाळेत रुळला होता. पण पूर्वी सारखं तो रोज शाळेतून आल्यावर आप्पाला बिलगून बसून शाळेतील गमती जमती सांगत नव्हता. त्याचा त्याचा एकटं बसून काही बाही लिहीत बसायचा. पण मोठी शाळा म्हटल्यावर अभ्यास पण जास्त असावा ही सिद्राम ची समजूत होती.
"अप्पा. तुम्ही पण बाकीच्या मुलांच्या अप्पा सारखं पँट शर्ट आणि बूट का नाही घालत ओ?" इतक्या वर्षांत मल्लेशने पहिल्यांदाच विचारलेल्या या प्रश्नांनी सिद्राम ला आश्चर्य वाटले.
" का रे मन्या... काय झालं ? काय वाईट हाय माझ्या लुंगी आणि सदर्यात?" सिद्राम ने हसत हसत उत्तर दिलं
" न्हाय.. तसं न्हाय पण शाळेत मीटिंग ला सगळ्या मुलांचे अप्पा मस्त पँट शर्ट आणि बूट घालून येतात टीचर संग इंग्लिश बोलतात पण तुम्ही ..." मल्लेश थोडा खिन्न झाला होता.
" अरे...शाळेत मीटिंग झाली? कधी? तू बोलला का न्हाई? " सिद्रामने चकित होत विचारलं. पण खाली मान घालून बसलेल्या मल्लेश कडून उत्तर नाही आलं.
" बरं मी येईन आता शाळेत हं. तुझ्या टीचरला भेटायला." सिद्राम समजावणी च्या सुरात म्हणाला तसं एकदम चमकून मल्लेशनी उत्तर दिलं " नको नको. तुम्ही नाही यायचं शाळेत. मी सगळ्या मित्रांना सांगितलंय की तुमची पॉवर लूम हाय मोठी आणि बिझनेस हाय कापडाचा. तुम्ही नका येऊ मला सगळी मुलं हसतील." रडवेला होत मल्लेश म्हणाला आणि त्याला जवळ घेत पाठीवर हात फिरवून समजूत घालताना सिद्राम मात्र मनातून रडवेला झाला होता.
" बरं बरं...न्हाई येणार बरं पोरा. जा झोप आता उशीर झाला. सकाळी लवकर उठायचं हाय न्हवं?" त्याला समजावत त्याने झोपवलं. पुढे दोन तीन दिवसांनी पाटील मॅडम आणि स्कूल च्या एक दोन सहकारी टीचर संध्याकाळी सिद्राम च्या घरी आल्या. त्या सगळ्यांना पाहताच एखाद्या उंदराने बिळात शिरावं तसं अंगणात खेळणारा मल्लेश घरात पळाला. मग पाटील मॅडम आणि त्या टीचर्स अंगणात सिद्राम सोबत काही तरी चर्चा करताना त्याला दिसल्या तसा तो विचारात पडला. पण दुसरे दिवशी मात्र शाळेत मधल्या सुट्टीत मित्रांसोबत ग्राउंड वर खेळताना मल्लेशला शाळेच्या गेट मधून एका हाताने लुंगी सावरत, वर नवीन शर्ट घालून आणि पायात नव्या कोल्हापुरी वहाणा घालून सिद्राम येताना दिसला आणि त्याला मोठा धक्का बसला. आता काय झालं असावं, काल पाटील मॅडम घरी आल्या होत्या. त्यांनी काही सांगितलं असेल का? या विचाराने तो कावरा बावरा झाला आणि सिद्राम ने पाहू नये म्हणून एका झाडामागे लपून तो पाहू लागला. सिद्राम ची नजर मात्र त्याच्या ' मन्या ' ला शोधत होती. त्याला मल्लेश ला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता पण एव्हढ्या सगळ्या एकसारख्या युनिफॉर्म वाल्या मुलांमधून मल्लेश ला शोधणं जरा अवघड होतं. गेट वरचा वॉचमन जेव्हां सिद्राम ला घेऊन तडक प्रिन्सिपॉल च्या ऑफिस मध्ये घेऊन गेला तसं मात्र मल्लेश च्या पोटात गोळा उठला. दुपारी शाळा सुटल्यावर मल्लेश घरी आला आणि सिद्राम च्या चेहऱ्याकडे पाहून आज काय झालं असावं याचा अंदाज घेऊ लागला. पण सिद्राम एका मोठ्या कॉटन ताग्यासाठी रंग तयार करण्यात गुंतला होता. पण मल्लेश ला पाहताच सिद्राम ची काळी खुलली आणि हातातलं काम टाकून तो त्याच्या कडे धावला " मन्या अरे आज मी शाळेत आलो होतो तुझ्या. पण तू कुठं दिसला न्हाय कसा? " मल्लेश च्या चेहऱ्यावरील भाव न्याहाळत सिद्राम म्हणाला पण आश्चर्य आणि आनंद या पेक्षा सावध पवित्रा घेत मल्लेशने विचारले "कशाला आला होता?
"अरे मस्त गंमत आहे सांगतो थांब. काल पाटील मॅडम आल्या होत्या. त्यांच्या सोबत तुमच्या कोणी तर अजून एक मोठ्या मॅडम पण होत्या. तुमच्या शाळेत आता पंधरा ऑगस्टला मोठा कार्यक्रम आहे. भरपूर पाहुणे येणार आहेत. आणि त्या कार्यक्रमात सगळ्या मुलांसाठी आणि शिक्षकांसाठी केशरी, हिरवे आणि पांढरे असे तिरंगी बांधणीचे फेटे मी बनवून देऊ शकेन का विचारत होते." अतिशय आनंदाने आणि उत्साहाने सिद्राम मल्लेशला सांगत होता.पण मल्लेश च्या चेहऱ्यावर वेगळीच चिंता प्रकट झाली होती.
" मग ? तुम्ही काय सांगितलं अप्पा ?"त्याने विचारलं
" अरे हे काम लै मोठं हाय. जर सगळं नीट झालं तर आपल्याला तुझं डोनेशन भराया लागणार न्हाय. पण तयारी आणि मेहनत पण तेव्हढीच करावी लागणार. म्हणून मग उद्या सांगतो असं त्यांना सांगून आलोय. एकदा सीताराम काकाशी पण मला बोलावं लागंल." सिद्राम ने उत्तर दिलं
मल्लेश जरा वेळ शांत बसला आणि मग म्हणाला " अप्पा तुम्ही हे काम घेऊ नका "
" का रं बाळा ? काय झालं ?" धक्का बसून सिद्रामने विचारले
"अप्पा आमची शाळा खूप कडक आहे. त्यांना जरा पण काम इकडचं तिकडं झालेलं खपत न्हाय आणि एव्हढ मोठं काम जर तुम्हाला न्हाय जमलं वेळेवर करून द्यायला तर फजिती होईल आपली." मल्लेश विचार करून बोलू लागला.
" काम मोठ आहे ह्यें बरोबर आहे. खूप कमी वेळात जास्त मेहनत करावी लागणार हे पण बरोबर आहे. लेकरा... पण काम केलं तर खूप पैसा मिळल बघ." आशावादी सुरात सिद्राम म्हणाला. त्यावर मात्र मल्लेश थोडासा चिडून तिथून उठला आणि आत जाऊन झोपला. जेवायला पण आला नाही, भूक नाही म्हणून कारण पुढे करीत तसाच पडून राहिला. त्यानंतर मात्र तो थोडासा नाराज, अबोल राहू लागला. आपल्या अप्पा चा मोठा सूत उद्योग नसून तो फक्त बांधणी रंगवणारा कलाकार आहे हे सर्वांना समजणार होतं. इकडे सिद्राम ची पण द्विधा मनःस्थिती झाली होती. काम स्वीकारावं तर मुलगा नाराज होत होता आणि न स्वीकारावं तर एव्हढी मोठी रक्कम हातची जाणार होती .अखेर पुन्हा एकदा सीताराम ला बोलावून त्यानं ही समस्या त्याच्या समोर मांडली.
"अरं पोराचं काय ऐकु नको. त्याला काय अक्कल हाय ! अशी कामं रोज रोज येत न्हाईत. बिनधास्त हो म्हणून सांग आणि थोडे पैसे आगाऊ म्हणून घे आणि काम सुरू कर. मी हाय तुझ्या मदतीला, निभावू आपण." सीताराम कडून मिळालेला हा आधार सिद्राम साठी खूप दिलासा दायक आणि हुरूप वाढवणारा होता. त्याने त्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जाऊन काम स्वीकारायला होकार दिला आणि बाराशे मुलं आणि टीचर यांच्या साठी फेटे बनवण्याच काम स्वीकारलं. काम मात्र वेळेच्या आधी आणि चांगलं करावं लागेल ही ताकीद देखील त्याला शाळेने दिली होती. अर्धा मोबदला त्याला आगाऊ मिळाला होता त्यामुळे त्याने कापड, रंग आदी सामान जातीने विकत घेऊन काम सुरू केलं, रात्र दिवस राबून त्याने या स्वतः ला या कामाला जुंपून घेतलं होतं. दिवस कमी आणि कामाचा डोंगर मोठा होता. त्यामुळे त्याची ओढाताण होऊ लागली. त्यात मुलाची नाराजी वेगळीच. अर्थात सीताराम ची मदत होत होती पण शेवटी रंगाचं आणि गाठी बांधण्याचं अवघड काम त्यालाच करावं लागणार होतं. आता मालाची डिलिव्हरी देण्यासाठी आठ दिवस जेमतेम उरले होते आणि निसर्गाने आपला रंग दाखवला. संपूर्ण कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात ढगफुटी झाली आणि जणू आभाळच फाटलं. दोन दिवस अश्या धारा बरसल्या की जणू संपूर्ण शहर पाण्यातच बुडालं. सिद्राम ने आत्ता पर्यंत केलेल्या बांधणीचे रंग त्या पावसाने धुवून टाकले. वाळवणासाठी टाकलेले कापड पुन्हा एव्हढे भिजले की त्यावर नक्षीकाम होणे शक्य नव्हते. आता उरलेल्या दिवसात हे कापड वाळून पुन्हा रंगकाम करणे हे जवळ जवळ अशक्य काम होतं. शाळेकडून घेतलेली आगाऊ रक्कम परत करणं आवाक्याबाहेरच होतं आणि त्याहून ही अवघड होतं ते शाळेला स्वतः च्या मुलाला आणि बाहेर समाजात तोंड दाखवणं. पूर्ण पणें हतबल झाला होता सिद्राम आता.
अखेर दोन दिवसांनी पावसाने उघडीप दिली आणि उगवतीच्या सूर्य किरणात त्याला ही आशेचा किरण दिसला. आणि एक नवीन सुरुवात करत त्याने पुन्हा कापडाचे तागे वाळवणं. मेणाच्या गाठी बांधणं आणि रंग काम सुरू केलं. रंग काम झालेले तागे वाळवणासाठी सीताराम च्या घरी ठेवण्यात आलें आणि अखेर हे कामाचं शिव धनुष्य सिद्रामने यशस्वी पणाने पेललं आणि चौदा तारखेलाच म्हणजे मुख्य कार्यक्रमाच्या रंगीत तालमीला सर्व फेटे शाळेत पोहचवले आणि सुटकेचा निःश्वास सोडला. पंधरा ऑगस्ट निमित्त झेंडा वंदन, परेड आणि इतर देश भक्तिपर कार्यक्रमांचे भव्य आयोजन शाळेच्या प्रांगणात करण्यात आले होते. अनेक नामांकित आणि मान्यवर व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सिद्रामला देखील या खास कार्यक्रमाचे आमंत्रण होते. त्याची जायची खूप इच्छा होती पण इतके दिवस अंगतोड मेहनत केल्यामुळे तब्येतीने ऐन वेळी साथ सोडली आणि सिद्राम तापाने फणफणला. अंग दुखू लागले आणि त्याला बिछान्यावर वर झोपून आराम करणं भाग पडलं. औषधां मुळे त्याला ग्लानी आली होती आणि दुपार कधी उलटुन गेली ते त्याला समजले ही नाही. चार वाजण्याच्या सुमारास खोलीचे दार उघडले आणि मल्लेश आत आला. डोक्यावर त्याच्या अप्पानेच रंगवलेला केशरी बांधणीचा फेटा शोभत होता. सोबत सीताराम आणि पाटील मॅडम ही होत्या. त्यांना पाहून सिद्राम उठून बसायचा प्रयत्न करू लागला आणि तेव्हढ्यात मल्लेश पळत आला आणि सिद्राम च्या गळ्यात पडून हमसून हमसून रडू लागला. सिद्राम ला काही समजेना. रडणाऱ्या पोराची समजूत काढावी की घरात आलेल्या पाटील मॅडम ची विचारपूस करावी या विचारात तो पडला. पाटील मॅडम नीच मग मल्लेश च्या पाठीवरून हात फिरवत बोलायला सुरुवात केली.
" मल्लेशचे अप्पा.आज तुम्ही कार्यक्रमाला यायला हवं होतं आणि तुमच्या कामाची जादू बघायला हवी होती. तुमच्या बांधणीच्या पक्क्या रंगाच्या फेट्यांचा तिरंगा मैदानात खूप खुलून दिसत होता. आमचे स्कूल मिशन चे ट्रस्टी , प्रिन्सिपल सर आणि सर्व प्रमुख पाहुणे खूप खुश होते. तुमचं काम खूप आवडलं त्यांना आणि त्यामुळे माझं ही थोडंसं कौतुक झालं." शेवटचं वाक्य हसत हसत त्यांनी पूर्ण केलं. सिद्राम साठी हे सगळं अनपेक्षित होतं. काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नव्हतं त्याला. मुळातच मितभाषी असलेला सिद्राम जणू मुका झाला होता. हात जोडून त्याने केवळ कृतज्ञता व्यक्त केली.
"आणि...तुमचं बाकीचं पेमेंट सोमवारी शाळेत मिळेल तुम्हाला आणि हो आमच्या स्कूल च्या मिशन अंतर्गत असलेल्या कोल्हापूर आणि पन्हाळ्याच्या शाळांनी आता त्यांच्या साठी सव्वीस जानेवारी च्या कार्यक्रमाची ऑर्डर तुम्हालाच द्यायला सांगितली आहे. तुम्हाला तयारी करावी लागेल हं " एव्हढ बोलून पाटील मॅडम नी निरोप घेतला. तोपर्यंत रडून रडून दमलेला मल्लेश आता बोलू लागला
"अप्पा मला माफ कर. माझं चुकलं. तुझ्या कपड्याची, कामाची मला लाज वाटायची म्हणून मी तुला कधी शाळेत घेऊन गेलो नाही. मला वाटायचं सगळे हसतील मला."
"अरे त्यात काय एवढं. त्यासाठी कशाला उगीच रडायचं मन्या? काही होत नाही. बघ फेटा कसा मस्त दिसतोय तुला." त्याचे डोळे पुसत पुसत सिद्राम म्हणाला
"अप्पा माझ्या सगळ्या मित्रांना तुला भेटायचं आहे. आपलं हे बांधणीच काम कसं करतात ते बघायचं आहे ! " मल्लेशचा मूड आता जरा रुळावर आला होता.
सोमवारी ही बाप - लेकाची जोडी मोठ्या अभिमानाने शाळेत गेली होती .आणि सर्व मित्र मंडळीं कडून कौतुक आणि अभिनंदन स्वीकारत मल्लेश त्याच्या ' अप्पा ' चा हात धरून त्याला ऑफिसकडे घेऊन चालला होता
आज दोघांच्या नात्याच्या " बांधणीचा " रंग आणि बंध अजूनच पक्के झाले होते.
सागर जोशी , पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा