शनिवार, १८ मे, २०२४

1149. आठवणीतल्या गाठीभेटी

  म्हातारीचा चौदावा झाला आणि पोरांनी घराला मोठा टाळा लावून म्हाताऱ्या तुकाराम मास्तरांना एस.टीत घालून कायमचं शहराकडे आणलं. पण सारी ह्यात वाड्या-वस्त्यांवर तालुका मास्तर म्हणून घालवलेल्या तुकाराम मास्तरांचा जीव काही शहरात रमत नाही. ते खुर्चीत बसून गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे नुसते एकटक बघत राहतात. हॉलमध्ये टांगलेल्या घड्याळाकडे बघत जगून झालेल्या आयुष्यावर विचार करीत राहतात. ते वयाने आता खूपच थकलेत. शहरात येऊन मनाने थकलेत. “पण माज्या माघारी हातानं करून खाऊ नका. तुमचं सगळं आयुष्य उपासमारीतच गेलंय. आपल्या पोरांच्याकडं जाऊन खुशाल राहा!” असं अखेरचा श्वास घेताना मास्तरीनबाईनी सांगिल्यामुळे तुकाराम मास्तरांनी शहरात लॉगीन केलय. 
       मास्तरांची दोन्ही मुलं जवळ जवळच राहतात. थोरला ईस्टला तर धाकटा वेस्टला. पण रेल्वेलाईनवरचा तो लोखंडी ब्रिज ओलांडताना काळानुसार मास्तरांचे गुडघे भरून येतात. चढताना त्यांना धाप लागते. भर गर्दीत एखाद्या पायरीवर ते बसून राहतात. गर्दीतला एखादा माणूस त्यांच्यापुढं हळूच रुपायाचं नाणं टाकून निघून जातो. मास्तर नुसतेच पहात राहतात. शहरात आल्यावर तुकाराम मास्तर सुरुवातीला धाकट्याकडे आसऱ्याला होते. नंतर-नंतर त्या किचन मधली भांडी वाजल्यावर मास्तर सकाळचे थोरल्याकडे जेवतात तर संध्याकाळी धाकट्याकडे. थोरला मुलगा मास्तरांशी जास्त बोलतच नाही. गावाकडची म्हातारी माणसं म्हणतात, “तो निव्वळ मुक्या माजाचा आहे!” पण त्याची बायको मास्तरांशी चांगलं वागते. 
       धाकटा पोरगा चांगला आहे पण बायको अजिबात नाही. तिला आल्या गेलेली घरी नको असतात. सतत धुसपुस करीत राहते. गावाकडच्या म्हाताऱ्या बायका म्हणतात, “रांड एकटी राहायला सोकावलीय !” पण तुकाराम मास्तरांचा लेका-सुनापेक्षा नातवंडातच जास्त जीव रमतो. आता तीच त्यांच्या जगण्याची आधार केंद्रे बनलीत.
      पहाटे कंपन्यांचे भोंगे वाजले की तुकाराम मास्तरांना जाग येते. ते वाट पहात राहतात बाथरूममधल्या नळाला पाणी टिपकण्याची. नातवंडे शाळेत जाण्यासाठी उठायच्या आत, आणि सगळ्यांना जाग आल्यावर उगीच आपली घरात लुडबुड नको म्हणून तुकाराम मास्तर नळाखाली देहाला नेऊन थंडपाण्याने अंघोळ घालून घेतात. एखाद्या क्षणी जुन्या काळातली मास्तरीनबाई येऊन त्यांची पाठ दगडाने घासतेय असा त्यांना भास होत राहतो. कपडे बदलून धोतर टोपीतले तुकाराम मास्तर हॉलमधील गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे पहात खुर्चीत बसून वाट पहात राहतात कपभर गरम पाण्याची. वाट पहात राहतात आतल्या बेडरुमचा दरवाजा उघडण्याची. कित्येक वेळा ते हलणाऱ्या मानेने आत डोकावूनही बघतात. पण सुनेच्या अगोदर मुलगाच उठतो आणि  किचनमधील गॅसवर कपभर चहा उकळायला टाकतो. मग भल्या पहाटे मास्तरीनबाईनी सोप्यातल्या चुलीवर चहासाठी ठेवलेलं जर्मलचं पातेलं त्यांच्या डोळ्यासमोर फिरू लागतं. लेकानं समोर दिलेलं कपभर गरम पाणी ते थरथरत्या हाताने घशात ओतून दरवाजामागच्या चपला घालतात. जायला निघतात कुठेतरी... “दुपारी तिकडेच जेवणार ना?” पाठीमागून बरोबर अंदाज घेऊन डोळे चोळत उठलेल्या सुनेचा आवाज कानात घालून एक-एक पायरी तुकाराम मास्तर उतरू लागतात. एखाद्या पायरीवर मास्तर क्षणभर थांबतात... “असल्या पायऱ्यावरून पाय घसरतात हळू उतरत जावा!” असा याच पायऱ्यावर कधीतरी मागून आलेला मास्तरीनबाईचा आवाज पुन्हा आल्याचा त्यांना भास होतो. पण क्षणभरच. 
       ते धोतर आणि जाड भिंगाचा चष्मा सावरत जिन्याच्या पायऱ्या उतरत-उतरत खाली येतात. पार्किंगमध्ये शाळकरी मुलांच्या नव्या जमान्याच्या नव्या सायकली नजरेला पडतात. मास्तरांची पाऊले तिथेच अडकतात. भल्या पहाटे उठून पंधरा किलोमीटरपर्यंत चोवीस इंची अटलास सायकल चालवून, सकाळी प्रार्थनेच्या अगोदर गाठलेली माळवाडीची शाळा त्यांच्या समोर येऊन उभी राहते. वस्तीवरच्या गरीब वशा सुताराचं पोरगं दहावीला पहिलं आल्यावर स्वत:च्या पैशाने त्याला तालुक्याच्या कॉलेजात जाण्यासाठी घेतलेली नवी कोरी बावीस इंची हर्क्युलस सायकल त्यांना आठवते. 
       आता दिवस उगवायची वेळ झालेली असते. तुकाराम मास्तर सोसायटीच्या गार्डनमधील हिरव्यागार गवतावर आपल्या थकलेल्या शरीराला नेऊन बसवतात. इतक्यात पलीकडून कानात हेडफोन घातलेली एक हॉफ पॅन्टवाली तरुण बाई तिच्या इंग्लिश कुत्र्याला ‘रिकामं’ करायला घेऊन जाताना त्यांना कोपऱ्यात दिसते... मग वस्तीवरच्या कुलूप लागलेल्या आपल्या बंद घराबाहेर मागे एकटच उरलेल्या ‘राजा कुत्र्याच्या’ काळजीने मास्तर अक्षरश: कासावीस होतात. “वस्तीवरचे शेजारी-पाजारी त्याला भाकरी-तुकडा टाकीत असतील का?” या एकाच विचाराने बराच वेळ ते शून्यात हरवून जातात. पार आतून घुसळून निघतात. काही वेळाने तेथून उठून तुकाराम मास्तर चालत-चालत मुख्य रस्त्यावर येतात. तेथे भल्या सकाळी रस्त्याला एक वृद्ध जोडपं मोगऱ्याच्या फुलांचा गजरा खरेदी करताना त्यांच्या चष्म्याच्या आतील थकलेल्या डोळ्यांना दिसतं. मास्तर पुन्हा क्षणभर थांबतात. त्यांच्याकडे पहात दूर कुठेतरी पोहचतात. मग दुसऱ्याच क्षणी त्या फुलेवाल्याकडून नुसतीच ओंजळभर फुले विकत घेतात. डोळे मिटून फक्त वास घेत राहतात. तालुक्याच्या शिबिराला चार दिवस गेल्यावर कधी नव्हे ते एका सकाळी मास्तरीनबाईंनी मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घ्यायला लावल्याचं त्यांना बरोबर आठवतं. हरवून जातात मास्तर तिकडेच. विचार करीत राहतात मास्तर तिकडचाच. 
        पुन्हा चालत-चालत ते एका इंग्लिश स्कूलजवळ येऊन थांबतात. पिवळ्या धमक छोट्या बसमधून येणाऱ्या आपल्या नातवंडाची वाट पहात. पण सारं आयुष्य मास्तरकीत घालवलेल्या मास्तरांना या नव्या कॉन्व्हेंट शाळांचं गणित काही कळत नाही. एवढे पैसे घेऊन नेमकं पोरांना आतमध्ये काय शिकवत असतील या विचारात ते गेटवर उभे राहून आतल्या हालचाली टिपत राहतात. शहरातल्या नवीन सुटा-बुटातल्या मास्तर आणि मास्तरणींच्या. टाय घातलेली आणि लहानपणीच डोळ्यापुढे चष्मा लावलेली लालभडक पोरं. “बाय बेटाsss बाय!” म्हणत पापे घेऊन त्यांना गाड्यामधून सोडणाऱ्या मॉडर्न मम्मा. 
        इतक्यात एका बसच्या बाजूने आलेल्या “बाबाsss” या आवाजाने त्यांची तंद्री भंग पावते. क्षणभर नातवंडात मिसळल्यावर रस्त्यात घेतलेल्या लेमनच्या गोळ्या घरी न सांगण्याच्या बोलीवर मास्तर हळूच त्यांच्या चिमुकल्या हातावर सोडून देतात आणि पहात राहतात. गेटमधून “बाबा बाय बायsss” म्हणत आत निघालेले चिमुकले हात. ऊर भरून येतो मास्तरांचा. जाड भिंगाचा चष्मा सावरत हरवून जातात तुकाराम मास्तर. आपल्या दोन्ही पोरांना अशीच पांढरे शर्ट आणि खाक्या चड्ड्या स्वतः रात्रभर, घरातल्या शिलाई मशीनवर शिवत बसलेली मास्तरीनबाई त्यांच्या नजरेपुढे येऊन फिरू लागते. प्रार्थनेच्या वेळी लाऊड स्पिकरवर लावलेली इंग्लिश प्रार्थना मास्तर ऐकत राहतात. कान एकवटून. पण वाड्या वस्त्यावरच्या शाळात आपण शिकवलेली प्रार्थना काळाच्या पडद्याआड गेल्याचं दुःख पचवणं मास्तरांना जड जातं. तुकाराम मास्तर माघारी वळतात. पण कानात पुन्हा तेच वाडीच्या शाळेत शिकवल्या गेलेल्या केशवसुतांच्या कवितांचे आवाज, “नव्या मनूंतिल नव्या दमाचा शूर शिपाई आहे...”   
      दुपार झाल्यावर तुकाराम मास्तर थोरल्या लेकाकडे पोहचतात. सुनेची धुणी झालेली असतात. कुकरवर शिट्ट्यांचा खच्चून मारा सुरु असतो. टीव्हीवर सासू सुनांचा धिंगाणा सुरु असतो. आता तुकाराम मास्तरांचा घामाने भिजलेला देह काहीसा भिंतीला टेकून विसावतो. थोरली सून तिकडच्या घरातला अंदाज काढण्यासाठी विचारत राहते, “मामंजी जेवायला वाढती का हो ती पोटभर! तिला अजून वाढू का म्हणून विचारायची सवय नाही!” उभ्या आयुष्यात कोणत्याच माणसाला नावे ठेवण्याची सवय नसलेले तुकाराम मास्तर फक्त ‘हो’ ला ‘हो’ देत राहतात. अवेळी जेवून मास्तर दुपारी तेथेच विश्रांती घेतात. पुन्हा झोपून उठल्यावर मास्तरांच्या पुढे खाऊन शिल्लक राहिलेली मॅगी, स्टीलच्या डिश मधून सून पुढे आणून ठेवते. मग खाता-खाता मास्तरांना, वस्तीवरच्या लिबांच्या झाडाखाली उन्हाळ्यात मास्तरीनबाईनी वाऱ्यावर शेवाळ्याचा साज मांडल्याचं त्यांना आठवत राहतं. सायंकाळ झाली की पुन्हा मास्तरांची पावले चालू लागतात. ईस्टवरून वेस्टच्या प्रवासाला. पुन्हा आडवा रेल्वेचा उंच लोखंडी ब्रिज. क्षणभर पावले ब्रिजवर थांबतात. खाली रुळाच्या बाजूला रिकाम्या जागेत लावलेले भाजीपाल्यांचे वाफे बघून, तालीतल्या ऊसाला खंडकऱ्यानं लागवडीची पोती विस्कटली असतील का? या विचारात ते बिहारी भैय्याचे पाच बाय पाच स्क्वेअर फुटांचे शेतीचे छोटे प्लॉट पहात राहतात. 
       शेवटी नको असलेली रात्र पुन्हा होतेच. पुन्हा मास्तरीनबाईच्या आठवणी नेहमीसारख्या मास्तरांना छळू लागतात. तसं मास्तरीनबाई गेल्यापासून प्रत्येक गोष्टीत मास्तर तिला शोधू पाहताहेत. सगळ्या लाईटा गेल्यानंतरही रात्री उशिरा पर्यंत हॉलच्या सिलिंगला अंधारात चमकणाऱ्या चंद्र आणि चांदण्यात ते मास्तरीनबाईंना शोधत राहतात. क्षणभर गावाकडं लेकीच्या घरी जाऊन राहता येईल का? असा विचार मनात येवून जातोही. पण जावयाच्या दारात जाऊन राहिलो तर गाव शेण घालील की आपल्या तोंडात. या विचाराने ते परत अस्वस्थ होऊन जातात. पण पुन्हा गावाकडच्या घरातील मास्तरीनबाईंच्या फोटोवर आपण येताना घातलेला झेंडूच्या फुलांचा हार आता वाळून गेला असेल का? आपल्याच सारखा या विचाराने आणि मास्तरीनबाईंच्या जीवघेण्या आठवणीने तुकाराम मास्तरांचा शहरात लॉगीन केलेला सांगाडा, रात्रीच्या अंधारात या कुशीवरून त्या कुशीवर काळासोबत शहरात कूस बदलत तळमळत राहतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...