तो एक साधा सरळ मार्गी तरुण होता. एका व्यवसायात त्याचे नुकसान झाले आणि तो कर्जबाजारी होऊन गेला. जेव्हा माणूस आर्थिकदृष्ट्या स्थिर असतो तेव्हा त्याच्या सभोवताली नातेवाइकांचा गराडा असतो मित्रमंडळींची मांदियाळी असते. पण जेव्हा परिस्थिती बदलून जाते तेव्हा सर्वात अगोदर रस्ता बदलून जाणारे लोक हे कधीच परके नसतात तर ते तेच असतात ज्यांना एकेकाळी आपण आपलेच समजत असतो. आज तो कर्जाच्या खाईत लोटला होता. कुणाकडे मदतीची याचना न करता तो ईश्र्वरावर श्रद्धा ठेवून वाटचाल करत होता. त्याच्या जिवाभावाच्या माणसांनी त्याची साथ फक्त सोडून दिली असे नाही तर जितके शक्य आहे तितकी त्याची बदनामी देखील करून टाकली. सगळे समजत असून पण आपल्या संयमी स्वभावाचा आदर करणारा तो शांत होता फक्त ईश्र्वरावर श्रध्दा ठेवून तो वाटचाल करत होता.एके दिवशी त्याच्या घरावर जप्ती आली आणि त्याला पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. आपल्या वडिलांनी आजपर्यंत जपलेल्या प्रतिष्ठेला आपल्यामुळे तडा जाईल की काय याची त्याला भीती वाटू लागली. उघड्या डोळ्यांनी निघणारे अब्रूचे धिंडवडे त्याला स्वप्नात दिसू लागले. आत्महत्येचे विचार पदोपदी मनात घोळू लागले. त्याचे वडील काही वर्षापूर्वी मरून गेले होते आणि आईचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. त्याचा एक छोटा शेत जमिनीचा तुकडा होता. पण हल्लीचे कायदे त्याला माहीत होते तसेच आजूबाजूला घडणारी उदाहरणे त्याने पाहिली होती. आजकाल मुलींना वडिलोपार्जित संपत्ती मध्ये समान हक्क असतो.त्याच्या बहिणीच्या घरी देखील फार चांगली परिस्थिती नव्हती. पण घरावरील जप्ती वाचवायची तर त्याला काहीतर करावे लागणार होते. एक तर घर किंवा शेती यापैकी काहीतरी निर्णय त्याला घ्यावा लागणार होता.
त्याने त्याच्या मित्राबरोबर चर्चा केली. ह्या जगात त्याचं एकमेव नातं अजून शिल्लक होते ते म्हणजे त्याच्या बहिणीचे. तिचे लग्न लावून दिलेनंतर तिच्याशी तो कधी प्रेमाने आपुलकीने बोललाच नव्हता. स्वतः च्या संसारात तो गुर फुटून गेला होता. आज मात्र तो एकटा होता आता त्याला बहिणीची सही लागणार होती. सही कोणत्या तोंडाने मागावी हेच त्याला समजत नव्हते. तरी देखील तो मित्राला घेऊन बहिणीच्या घरी गेला. जाताना सोबत साडी आणि काही खाऊ घेऊन गेला. बहिणीच्या घरी गेल्यावर बहिणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण भावाच्या चेहऱ्यावरील चिंता ती समजून गेली. मित्राने तिला सगळे काही सांगितले. बहीण त्याच्यावर फार चिडली व्यवसाय करताना चार हुशार लोकांचा सल्ला न घेतल्याबद्दल त्याला फार बोलली. काही वेळाने ती भानावर आली आता तिने त्याला धीर दिला. तुझ्यापेक्षा पैसा इतका महत्वाचा नाही आहे. पैसा आयुष्यात पुन्हा उभा राहील पण अगोदर तू खंबीर पने उभा राहिले पाहिजेस असे त्याला बोलली. भूतकाळातील चुका विसरून जा पण त्यातून काहीतरी बोध घे असा सल्ला देऊन खचलेल्या भावाला तिने शांत केले. तिची स्वतः ची परिस्थीती गरीबीची असलेची आज पहिल्यांदा आयुष्यात तिला खंत वाटली. भाऊ इतका अडचणीत असताना ती त्याला फक्त शब्दाच्या आधाराशिवाय काहीही देऊ शकत नव्हती याची तिला फार टोचणी लागून राहिली. तिला जेव्हा घरावरील जप्ती चे समजले तेव्हा साधी भोळी ती बहीण एका क्षणात म्हणाली एक काम कर अर्धे घर विकून टाक म्हणजे जप्ती टळेल आणि शेत आहे असे राहील. शेत तुला उत्पन्न देत राहील आणि घर तुला निवारा देईल. आपल्या अडाणी बहिणीचे शहाणपणाचे बोलणे ऐकून तो भारावून गेला. आता त्याच्या डोळ्यात पाणी होते. मित्राने तिला सही बाबत विचारले आणि पिशवीतून तिच्यासाठी आणलेली साडी बाहेर काढली. ती म्हणाली, सही कुठे करायची तेव्हढे सांग आणि ही साडी अशीच पिशवीत घाल आणि दुकानदाराला परत कर. ही साडी ज्या ज्या वेळी मी नेसेन त्या त्यावेळी मला दुःख होईल. तू ह्या सगळ्यातून बाहेर पड आणि जेव्हा परत आनंदी दिवस येतील तेव्हा मी हक्काने मागून घेईन. बहिणीच्या हक्कसोडपत्रावर सह्या आणि तिचा निरोप घेऊन तो परतीच्या वाटेला लागला पण आज त्याच्या मनात बहिणीची उंची आभाळापेक्षा जास्त मोठी झाली होती. आता तो जगातील आई वडिलांनंतरचे सर्वात जवळचे नाते आणि प्रेम समजून गेला होता आणि तो बहिणीला कधीही अंतर देणार नव्हता.
✍️ गिरीश मिठारी 9561404599
टिपः आजकाल मात्र ह्या नात्याला नजर लागली आहे आणि हिस्सा ,पैसा,वाटणी मागण्याचे प्रमाण वाढले आहे.कोर्टात केसेस खूप सुरू आहेत आणि ह्या नात्यातील गोडवा कमी होत आहे. आपलाही अभिप्राय कॉमेंट करा विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा