"श्रद्धा देसाई इथेच राहतात ना? "
बाहेरून आवाज आला तसे, "मित्र परिवार " चे मॅनेजर सुशांत देशपांडे समोर आले. दारात अनोळखी दोन पुरूष आणि एक स्त्री उभे होते.
"आत या. इथेच राहतात मॅडम. काही काम होतं का?" देशपांडेंनी विचारलं .
"भेटायचं होतं मॅडमना", असं म्हणून ते तिघंही व्हिजिटर्स हॉलमधे बसले. गोपाळ मदतनीस आत निरोप घेऊन गेला. श्रद्धाताई लिहीत बसल्या होत्या. बाहेर आपल्याला भेटायला कोण आलं असेल हा विचार करतच त्या फ्रेश झाल्या. स्वच्छ पांढरी सलवार आणि आकाशी कुर्ता घातला. पांढरी ओढणी नीट घेतली. कापलेल्या केसावरून हात फिरवून नीट बसवले. वापरातला चष्मा काढून सोनेरी फ्रेमचा चष्मा घातला. मोबाईल घेतला. चप्पल घालून त्या बाहेर आल्या. श्रद्धा ताईंना बघून भेटायला आलेले तिघेही उठून उभे राहिले. नमस्कार झाले. आलेल्या स्त्रीने प्रथम श्रद्धाताईचे हात हातात घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. म्हणाली, " मी वैशाली. वैशाली राजे. "मॅडम तुमचं पाचवा कोपरा हे पुस्तक बेस्ट सेलर ठरलंय. हार्दिक अभिनंदन " .
"प्रकाशनपूर्व पूर्ण आवृत्ती संपली पुस्तकाची. आता दुसरी काढतोय." मी रमाकांत जाधव, मुख्य प्रकाशक. अभिनंदन मॅडम." त्यांनी अभिनंदन करतच स्वतःची ओळख करून दिली. जाधव साहेबांनी श्रध्दाताईंचे पुन्हा अभिनंदन करून त्यांना एक पाकिट दिलं. पाकिटात तीन चेक्स बघून श्रद्धाताईंना आश्चर्याचा धक्का बसला. पाच पाच लाखांचे दोन आणि दहा लाखांचा एक चेक होता.
त्यांचा गोंधळलेला चेहरा बघून जाधव साहेब हसले. म्हणाले , "मॅडम आपलं पुस्तक हिंदी , आणि इंग्लिश भाषेत अनुवादित होणार आहे. प्रत्येकी पाच लाखांचा तो अॅडव्हान्स आहे आणि आधीच्या मूळ मराठी पुस्तकाचे दहा लाख आहेत.
"दुसरी आवृत्ती वीस हजारांची काढावी म्हणतोय. त्यासाठी आपली परवानगी हवी होती. तेच पेपर्स मी आणलेत." एवढं बोलणं करून त्यांनी मॅनेजरकडे बघितलं . ती तिसरी व्यक्ती मॅनेजर देशमुख होते. त्यांनी श्रद्धाताईंना काही बाबी समजावून सांगितल्या. सह्या झाल्या. आणि दुसऱ्या आवृत्तीचा ॲडव्हान्स म्हणून जाधवांनी दहा लाखांचा आणखी एक चेक त्यांना दिला.
"श्रद्धाताई, "पाचवा कोपरा " आणखी किती भाषांमधे येईल ठावूक नाही. मराठीच्या किती आवृत्या निघतील हेही माहीत नाही. फक्त तुमचं पेन शाबूत ठेवा. सही साठी." असं हसत म्हणून, पुन्हा भेटू म्हणत चहापाणी घेऊन मंडळी निघून गेली. संध्याकाळी जेवणापूर्वी सर्व "मित्र परिवाराने" श्रद्धा ताईंचे अभिनंदन केले. जवळच्या मित्रांनी "आता पार्टी हवी" म्हणून आग्रह केला. सारं काही स्वप्नवत् होतं . काही वेळ अगदी जवळची मैत्रीण म्हणून त्या वसुधा पंडीतशी बोलत बसल्या. त्या झोपायला गेल्या तरी, श्रद्धाला झोप नव्हती. दुःखात झोप येत नाही, तशीच अत्यानंदानेही माणसाला झोप येत नाही. ताईंचे हेच झाले होते. त्यांची स्वतंत्र खोली होती. त्या आपल्या लेखनाच्या टेबलवर बसल्या. काही संदर्भ ग्रंथ, कागद आणि पेन एवढंच त्यांचं भांडवल होतं. एक फोटो अल्बम होता . तो जुना फोटो अल्बम ताई चाळू लागल्या. तशा अनेक आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळल्या.
वयाच्या तिशीत पतीचं निधन झालं होतं . नंतर पाच वर्षाच्या बाळाला त्यांनी एकटीनं मोठं केलं होतं . स्वतःचं घर केलं होतं. नोकरी, घर, सासर माहेर सांभाळून बाळाला नुसतंच मोठं केलं नाही तर सक्षम बनवलं होतं. आई आणि बाबा होऊन. यथावकाश शिक्षण, नोकरी करत बाळचं लग्न झालं. सुरवातीचे काही महिने बरे गेले. तेव्हा त्याही नोकरीत होत्या. श्रद्धा ताईंच्या निवृत्तीनंतर सुनेची वाघनखं बाहेर पडली होती. ती दोघंही नोकरीची असल्याने नातू आणि घर ही जबाबदारी ताईंवर आली. बाळाची केअर टेकर, पोळीवाली बाई बंद झाली. वाढत्या वयानंतर नोकरीतून माणूस निवृत्त होतो पण बाईला संसारातून निवृत्त होताच येत नाही. उलट जबबाबदाऱ्या वाढतच जातात. तरीही त्या सांभाळून, श्रध्दाताई वेळात वेळ काढून आपला लेखनाचा छंद जपत होत्या. नेमकं तेच सुनेला खटकत होतं. लॅपटॉप वर, मोबाईलवर ती त्यांना लिहिण्याची कामच करू देत नसे." जागरण करू नका, आराम करा "अशी उसनी काळजी दाखवत त्यांचा छंद तिने जवळ जवळ बंदच केला होता. बाहेरचे सर्व कार्यक्रम बंद झाले होते ते एकटं जायचं नाही या कारणास्तव. वरून, या लेखनातून काय पैसा मिळणार आहे का? वाचतं कोण ही मराठी पुस्तकं आजकाल? हे बोलणं असायचंच. तिला स्वतःची नोकरी म्हणजे भव्य दिव्य काहीतरी वाटत असे. कला ,गुण यांचा तिच्याशी काहीही संबंध नव्हता. स्वतः जवळचा पैसा घालून मुलाला ताईंनी दोन बेडरूमचा फ्लॅट घ्यायला मदत केली होती. बारा तेरा वर्ष कशी बशी निघाली. आता नातू मोठा झाला होता. त्याला स्वतंत्र खोली हवीह होती.
घरी मित्र आलेत, तर त्यांना कुठे बसवायचं यावरून सातवीत असलेल्या नातवाने एक दिवस म्हटलंच , " मला आजीची खोली हवी . स्वतंत्र ."
बाबांनी "नाही" म्हणताच तो चिडला . म्हणाला "तीन बेडरुमचा फ्लॅट का नाही घेतलात? "
"अरे बाळा, आमची ऐपत नव्हती आणि आजीकडेपण पैसा नव्हता. विचार तुझ्या आजीला." असं बोलायला सूनबाई चुकली नाही. सून बोलल्यानंतरही मुलगा गप्पच होता. घर आणि नातवाची स्वतंत्र खोली यावरून घरात वारंवार खटके उडू लागले होते. नातू आजी सोबत खोली शेअर करायला तयारच नव्हता. एक दिवस कहरच झाला. सुनेनी सरळ फर्मान सोडलं की सोहम दुसऱ्या बेडरूममधे झोपेल. आईंनी हॉलमधे सोफ्यावर झोपावं. दोन चार दिवस खूप विचार केला. चौकशा झाल्या. मुलगा ,सून ऑफिसला जात होते .
मित्रांशी गप्पा मारून, नेट वरून श्रद्धा ताईंनी "मित्र परिवार " वृद्धाश्रम निवडला आणि एक दिवस निश्चयाचा उजाडला. रात्रीच त्यांनी बॅग भरून ठेवली. दोन साड्या, दोनतीन मोजके ड्रेसेस आणि काही डायऱ्या, पुस्तकं, पेन बॅगेत टाकलं. बँकेचं पासबुक, चेकबुक, ए.टी.एम. कार्ड, आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट एका पाऊच मधे घातलं. ब्रश, पेस्ट, पावडर, टिकलीचं पाकीट, कंगवा घेतला. बॅग हॉलमधे ठेवली. त्यांना मिळालेल्या एका छोट्या कपाटातील सामान वेगळ्या सुटकेस मधे भरून ठेवले. कपाट रिकामं केलं. सर्वांचा सकाळचा नाश्ता, डबे तयार करून ठेवले. देवाची पूजा केली. तोवर सकाळी तिघंही उठले.
"आई ही बॅग ? कुठे निघालीस ?" असं मुलाने विचारलं. श्रध्दाताईने "मित्र परिवारचा" पत्ता सांगितला . म्हणाल्या,
"अरे वाईट वाटून घेऊ नका. सोहमला खोली हवीय. ती मी रिकामी केलीय. माझे अनेक मित्र मैत्रिणी आहेत परिवारात. स्वतंत्र खोली आहे तिथं. माझं छान निभेल तिथे. आणि याच शहरात आहे की मी. ही सोय आहे रे तात्पुरती."
मुलगा दुखावला , पण सूनबाईला मात्र मनातून आनंद झाला होता. विना औषधीने खोकला गेला होता. सोहम आता मोठा असल्याने तो शाळेतून आल्यावर फ्लॅटचा दरवाजा उघडून आत येऊ शकत होता. सोहम लहान असतानाचे तिचे गरजेचे दिवस संपले होते. लगेच ताईंनी कॅब बुक केली. कुणाचेच चेहरे न वाचता त्या लिफ्टने खाली आल्या. मित्र परिवारात त्यांचं छान स्वागत झालं. दोन तीन दिवसातच त्या तिथे रुळल्या. नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी नोकरीत असतानाच जुळवून घेतलं होतंच. इथे आणखी टेक्नोसॅव्ही मित्र मिळाले. सोशल मिडियावर त्या ॲक्टिव्ह झाल्या. पेन्शन होतीच. तब्येतीची कुरकुर नव्हती. आता त्यांनी खरंखुरं आयुष्य जगायला सुरुवात केली होती. इथे आल्यानंतर काही दिवसांतच एका पूर्वी लिहिलेल्या कादंबरीचं त्यांनी पुनर्लेखन केलं. रीतसर त्याचं पुस्तक झालं." पाचवा कोपरा" . तीनच महिन्यात त्यांना तब्बल तीस लाखांची कमाई त्यांच्या पुस्तकाने करून दिली होती. सकाळी त्यांनी ते चेक्स पेन्शन अकौंटला न टाकता मुलासोबतच्या अकौंटला टाकले. त्यांच्याच बँकेचे चेक्स असल्याने ते लवकरच जमा झाले. लंच ब्रेकमधे अचानक तीस लाखांचा क्रेडिट मॅसेज बघून मुलाचे डोळेच विस्फारले. त्याला कळेना हे कुठले पैसे? कारण एवढी मोठी रक्कम गोंधळात टाकणारी होती. ऑफिसमधे सांगून त्याने सरळ बँक गाठली. तेव्हा त्याला एवढंच कळलं, की कुठल्या तरी प्रकाशन संस्थेचे ते चेक्स आहेत. पण आईकडे कसे? याचं उत्तर त्याला लगेच मिळालं नाही. तो घरी आला, पण पैशाबद्दल तो कुणाशी काहीच बोलला नाही. कविता, कथा, कादंबरी, वैचारिक असं लेखन ताई करीतच राह्यल्या. आजवर मनात साठलेलं आता अक्षर रूप घेत होतं. पुस्तकं प्रकाशित होत होती. काही काळातच ताईंच्या अकौंटने एक कोटीची रक्कम पार केली. मुलाला बँकेचे क्रेडिट मेसेजेस येतच होते. साहित्याच्या बागेतलं असं कोणतंच फूल नव्हतं की ते ताईंजवळ नव्हतं. सर्व साहित्य प्रकारांवर त्यांचं प्रभुत्व होतं. सर्वत्र संचार होता ताईंचा. आताशा रोजच वृत्तपत्र, टी व्ही वर ताई असायच्या. आणि मुलाला सर्व उलगडा होऊ लागला. मात्र आईला भेटायला जाण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. आवडत्या छंदात रमल्याने ताईंची तब्येतही आता छान होती. पैसा, आणि प्रसिद्धी चारही बाजुंनी येत होती. आताशा त्यांना कार्यक्रमांना "हो " म्हणणं कठीण होई इतके कार्यक्रम येऊ लागले. प्रसिद्धीच्या वलयानं ताई आणखीच तेजस्वी झाल्या होत्या. मुलाला सुनेला त्यांची चूक कळली होती. पण ते बोलू शकत नव्हते.
अशातच एक दिवस त्यांचे मुलाला पत्र आले . त्यांनी लिहिले होते ," बाळ, सूनबाई आणि सोहम् ला धन्यवाद द्यायचेत मला. तुझ्या घरातून बाहेर पडल्यावरच मी स्वतः ला ओळखू शकले. तेही या वृद्धाश्रमात. आता मी खरी जगतेय. केवळ अन्न , वस्त्र , निवारा म्हणजे जगणं नव्हे . कला आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या वावराने मला "मी " कळले. माझ्यातली ऊर्जा मला जिवंत ठेवू शकली. तुम्हाला हवा तेवढा पैसा तुम्ही वापरून आता फोर बीएचके असं मोठं घर घेऊ शकता. कारण आपलं अकौंट जॉईन्ट आहे. आयदर ऑर सर्व्हायवर ऑपरेशन आहे. तू कितीही पैसे काढू शकतोस. तसेही शेवटी ते तुझेच आहेत. मला आता घराची गरज नाही . इथे मला ते मिळालंय . आणि महत्वाचं म्हणजे सम वैचारिक मित्र परिवार मिळाला. फक्त एक काम करशील माझं . काही आठवणीतले गरम कपडे आणि दुर्मिळ अशा आवश्यक पुस्तकांची एक बॅग तुझ्या घरीच आहे. शक्य असेल तर इथे आणून दे. तेवढीच भेट होईल आपली बाळा. घराचा थकलेला पाचवा कोपराही कधी कधी खूप उपयोगी ठरतो, हे लक्षात ठेव. सर्वांना आशीर्वाद ! थांबते. "
मराठी शब्दांची आणि वृद्धाश्रमाची ताकद आता बाळला आणि सुनबाईला कळली होती. वृद्धाश्रम या शब्दाकडे कणव म्हणून बघितलं तर दया येते. संधी म्हणून बघितलं तर उत्तम तऱ्हेनं जगता येतं हे श्रद्धाताईंनी सिद्ध करून दाखवलं होतं. सकाळी वृद्धाश्रमाच्या अंगणात ताई मित्रांसोबत चहा घेत बसल्या होत्या. तेवढ्यात दाराशी रिक्षा थांबली. रिक्षातून सुप्रसिद्ध कवयित्री विजया ब्रह्मे उतरत होत्या. आणखी एक पाचवा कोपरा स्वतःला सिद्ध करणार होता.
प्रा. सुनंदा पाटील
८४२२०८९६६६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा