सोमवार, २७ मे, २०२४

1172. प्रश्न

      अर्चनाला सकाळी जाग आली तेव्हा सात वाजले होते. रविवारच्या दिवशी आठ वाजता उठायचं ठरवूनही आपल्याला सात वाजताच जाग यावी हे पाहून ती मनातच चरफडली. तेवढ्यात तिला आठवण झाली. आज तिला पोहे करायचे होते आणि मनःसोक्त दोन प्लेट भरुन खायचे होते.गे ल्या दोन महिन्यापासून घरात काही ना काही कारणास्तव पोहेच झाले नव्हते म्हणून तिने रात्रीच ठरवून घेतलं होतं आणि सगळ्यांना सांगूनही टाकलं होतं की उद्या नाश्त्याला पोहेच होणार आहेत. स्वतःचं सगळं आवरुन आणि नवरा, मुलांना उठवून ती पोहे करण्याच्या तयारीला लागली. आज तिने जरा जास्तच पोहे भिजवले होते. पोहे तयार झाल्यावर त्यांचा रंग आणि येणाऱ्या खमंग वासामुळे ती स्वतःच खुश होऊन गेली. टेबलभोवती बसलेल्या नवरा आणि मुलांमध्ये कढई ठेवल्यावर त्या कढईकडे पहात हर्षल उद्गारला
" बापरे इतके पोहे ! कुणी येणार बिणार आहे की काय?"
" कुणी येणार नाहिये. मलाच आज चांगले दोन डिश भरुन पोहे खायचेत "
" मग काय आई आम्ही एकच डिश पोहे खायचे ?"छोट्या तपस्वीने निरागसतेने विचारलं.
" नाही गं बेटा.आपल्या सगळ्यांचं पोट भरुनही उरतील इतके पोहे केलेत मी. मनसोक्त खा "
मुलांची आणि नवऱ्याची डिश भरुन त्यांना देऊन तिने स्वतःची डिश भरायला घेतली तेवढ्यात दारावरची बेल वाजली.नेहमीप्रमाणे झाडूवाली आली असेल या अंदाजाने तिने पुढे येऊन दरवाजा उघडला तर समोर तिची मावसबहिण दिप्ती,नवरा आणि दोन मुलांसोबत उभी होती.
"अरे ! दिप्ती आज अचानक कशी काय? ये आत ये." अर्चनाने तिला घरात घेतलं.
दिप्ती तिचा नवरा आणि मुलांसोबत आत येऊन बसली.
"अगं अचानक या करीता की आम्ही चाललोय एका फार्म हाऊसवर. ह्यांच्या कंपनीतल्या चारपाच फॅमिलीज पण येताहेत. पण आमच्या केतन आणि सिमरनच्या वयाचं तिथं कुणी नाही म्हणून दोघं मागे लागलेत की आपण ऋषी आणि तपस्वीलाही सोबत खेळायला घेऊन जाऊ म्हणून. म्हणून तुझ्याकडे विचारायला आले होते. तुझी तयारी असेल तर घेऊन जाते त्यांनाही "
" अग पण त्यांच्या आंघोळी अजून बाकी आहेत.आणि मला तरी काही प्राॅब्लेम नाही. पण त्यांना विचारायला हवं.काय रे पोरांनो जाणार का मावशीसोबत फार्म हाऊसवर?"
" हो आई आम्ही जातो."ऋषी आणि तपस्वी एकसाथ ओरडले.
" ठिक आहे मग. तुमचं खाणं लवकर आवरा आणि पटापट अंघोळीला जा. "
" वा ! पोह्यांचा तर फार छान वास येतोय."दिप्तीचा नवरा म्हणाला. ती स्तुती ऐकून अर्चना विरघळली नसती तर नवल.
"तुमचा नाश्ता झाला नसेल ना? नसेल तर करा थोडाथोडा." तिने दिप्तीला हसत विचारलं.
" तिथे फार्म हाऊसवर होणार आहे नाश्ता. पण म्हणतेच आहेस तर दे थोडे थोडे पोहे. पण अगदी थोडेच हं" दिप्ती म्हणाली. थोडे कसले चांगले डिश भरुन पोहे अर्चनाने चौघांना दिले. मग ती मुलांची तयारी करण्यासाठी आत गेली. त्यांना तयार करुन ती बाहेर आली तशी दिप्तीची मुलं ओरडली.
" मावशी पोहे खुप छान झालेत अजून दे ना !"
मग अर्चनाने त्यांच्या सोबत दिप्ती आणि तिच्या नवऱ्यालाही वाढले. दिप्तीने नाही म्हणावं असं अर्चनाला वाटत होतं. पण दिप्तीने न लाजता पोहे घेतले. कढईत आता फक्त एक डिश भरेल इतकेच पोहे उरले होते. ते पाहून अर्चना मनोमन हिरमुसली." हरकत नाही. दिप्ती आणि तिची मुलं पोहे खाऊन खुश झालीत ना ! त्यातच सगळं आलं." ती मनाशीच म्हणाली आणि पोह्यांची कढई डायनिंग टेबलवर ठेऊन आत गेली. दोन्ही मुलांना तयार करुन तिनं बाहेर आणलं.
"चहा घ्याल ना थोडा थोडा? " तिनं दिप्तीला औपचारिकपणे विचारलं.
" हो. घेऊ ना !  पोहे इतके छान होते तर चहाही मस्तच असणार."दिप्तीचा नवरा म्हणाला.
अर्चनाने मनातून इच्छा नसतांनाही त्यांच्यासाठी चहा ठेवला. खरं तर हे सगळे केव्हा जातात आणि मी पोहे खाते असं तिला होऊन गेलं होतं.
दिप्ती आणि तिचा नवरा जायला निघाले तसा त्यांच्या पाठोपाठ हर्षलही निघाला.
"अर्चू मी एक पाच मिनिटात आलोच." तिच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पहात हर्षल म्हणाला.तो गेला तशी अर्चना घाईघाईत आत आली." चला आता आरामात बसून पोहे खाऊ "असं मनाशी बडबडत मोठ्या उत्सुकतेने तिने कढईचं वरचं झाकण काढलं आणि ती हतबुद्ध होऊन पहातच राहिली. कढईत फक्त नावाला एक-दोन चमचे पोहे चवीपुरते उरले होते. 
"गेले कुठे एवढे पोहे?आपण पाहिले तेव्हा तर एक डिश भरेल इतके नक्कीच होते. नक्की हे हर्षलचंच काम असणार. त्यानेच संपवले असतील पोहे. एखादा पदार्थ आवडला की तो कुणाचाही विचार न करता अधाशासारखा खात सुटतो. कधी त्याने बायकोच्या मनाचा विचार केलाय तर आज करेल? आता विचारलं की म्हणेल 'मला वाटलं तू तुझ्यासाठी काढून ठेवले असशील म्हणून मी खाल्ले." तिला नवऱ्याच्या स्वार्थीपणाचा संताप आला. अपेक्षाभंगाने तिचे डोळे भरुन आले. आता पुढच्या रविवारपर्यंत तिला स्वतःलाच पोहे करायला वेळ मिळणार नव्हता आणि पुढच्या रविवारीही अशीच काही अडचण आली तर? या विचारानं ती अधिकच दु:की झाली. ती उठली आणि बेडवर जाऊन झोपली. नवऱ्याच्या स्वार्थीपणाबद्दलचे विचार तिच्या मनात घोळू लागले.
"अर्चू काय झालं? का झोपली आहेस?"तिने चमकून वळून पाहिलं. हर्षल तिच्या जवळ उभा होता.
"त्या कढईत उरलेले पोहे तुम्हीच खाल्ले ना?"तिने जरा कठोर स्वरातच विचारलं
" नाही. तू मुलांची तयारी करायला आत गेलीस तेव्हा दिप्तीच्या नवऱ्याने मला परत पोहे मागितले."खुपच छान झालेत पोहे. कितीही खाल्ले तरी समाधान होत नाही "असं म्हणत होता. मग काय मला द्यावे लागले. त्याला देतांना दिप्तीची मुलंही मागू लागली. मग त्यांनाही द्यावे लागले. दिप्ती मुलांवर ओरडली म्हणून तरी ते थोडे वाचले नाहीतर अख्खी कढई त्या पोरांनी रिकामी केली असती."
" माझं मेलीचं नशीबच वाईट.किती दिवसांनी मनसोक्त पोहे खाऊ म्हंटलं तर हे असं झालं. दिप्तीलाही नेमकं आजच यायचं होतं."डोळ्यातून येणारे अश्रू कसेबसे थोपवत अर्चना म्हणाली.
"जाऊ दे. तू चल पोहे खाऊन घे "
" हो? आता त्या दोन चमचे पोह्यांवर मी समाधान मानायचं का? तुम्हां पुरुषाचं हे चांगलं असतं. स्वतः मस्त ताव मारायचा पण बायकोला काही उरेल की नाही याचा विचार कधी तुम्ही केलाय?"
हर्षलचा चेहरा पडला.
"अर्चू आता ते एवढा अधाशीपणा करतील हे मला तरी कुठं ठाऊक होतं ! बरं ते जाऊ दे. तू उठ. पोहे गरम आहेत तोपर्यंत खाऊन घे."
अर्चना हसली.
" ते कढईतले पोहे आतापर्यंत गरम राहिले असतील का? काहिही काय बोलता "
" अग ते नाही. मी बाहेरुन पोहे आणलेत.तो चौकातला फेमस मिसळवाला नाही का ज्याच्याकडचे पोहे तुला खुप आवडतात, ते पोहे आणलेत. सोबत तुला आवडणारी मुगभजीही आणली आहेत "
अर्चनाचा चेहरा खुलला.ती उठून बाहेर आली.
" मी पाहिलं की त्या लोकांनी जवळजवळ सगळे पोहे संपवलेत पण तुला तर पोहे खायचे होतेच. म्हणून बाहेरुन घेऊन आलो.अर्थात तुझ्या हातच्या पोह्यांची सर या पोह्यांना नाही येणार पण आता ईलाज नाही."
आपण नवऱ्यालाच शिव्या देत होतो हे आठवून अर्चना ओशाळली. आपला नवरा कधीकधी अशी चांगली कामंही करतो हेही तिला आठवू लागलं. ती समाधानाने पोहे आणि भजी खात असतांना हर्षल म्हणाला
" बरं आता आपण दोघंच आहोत तर स्वयंपाकाची दगदग करु नकोस. मी बाहेरुनच काहीतरी भाजी चपाती आणि जिरा राईस घेऊन येतो."
" अहो आता बाहेरचे पोहे आणि भजी खाल्ल्यानंतर परत बाहेरचं जेवण कशाला? आणि दोघांचा स्वयंपाक करायला असा कितीसा त्रास होतो ?काही नका आणू बाहेरचं."
ही उपरोधाने बोलतेय की खरंच मनापासून बोलतेय हे काही हर्षलच्या लक्षात आलं नाही. तरीही तो रेटून म्हणाला
"आज माझीच बाहेरची भाजी खायची इच्छा आहे असं समज आणि रोज रोज तर तुझ्यामागे सकाळ-संध्याकाळ ही स्वयंपाकाची कटकट असतेच.आज तरी आराम कर "
" बरं मग फक्त भाजीच आणा. पोळ्या आणि भात मी करुन घेईन. "
"तू म्हणशील तसं. पण संध्याकाळी स्वयंपाकाची झंझट ठेवू नकोस. आपण बाहेरुन काहीतरी मागवू किंवा आपण सगळेच बाहेर जेवायला जाऊ या. आठवड्यातून एक दिवस सुटी मिळते तुला आणि ती पुर्ण सुटी तू किचनमध्ये घालवावी हे काही मला पटत नाही." हर्षल आपला आग्रह सोडत म्हणाला.
"बरं बरं"
अर्चना किचनमध्ये आवराआवर करु लागली तसा हर्षल बैठकीत येऊन पेपर वाचत बसला. थोड्या वेळाने त्यानं न मागताही तिनं त्याच्यासाठी काॅफी केली. तेवढ्यात फोन वाजला. मोबाईल कानाला लावून ती काॅफीचा कप बाहेर घेऊन आली.
"बरं बरं या मग मी वाट पहातेय "शेवटचं वाक्य बोलून तिनं मोबाईल बंद केला आणि काॅफीचा कप हर्षलच्या हातात दिला.
" काय झालं? कोण येतंय?" हर्षलने विचारलं
" अहो,माझे मामामामी येताहेत. त्यांच्यासोबत मामीची बहीण आणि तिचा नवराही आहे "
" कधी?"
" आता एकदिड तासात. जेवायलाच येताहेत "
" मग भाजी जास्त आणू का? एखादं स्वीटही घेऊन येतो."
" नाही नाही. उलट काहिच आणू नका. मामामामींना बाहेरचं काही आवडत नाही " 
" त्यांना कुठं समजणार आहे भाजी बाहेरची आहे की घरची ! आपण सांगायचं घरीच केलीये म्हणून "
" असं समजू नका. दोघंही फार हुशार आहेत. त्यांना लगेच कळेल आणि मग ते त्या भाजीला हातही लावणार नाहीत आणि व्यवस्थित जेवणारही नाहीत. नकोच ते "
" बरं.तू म्हणशील तसं " हर्षल नेहमीप्रमाणे माघार घेत म्हणाला.
अर्चनाने मग मामामामी येणार म्हणून वरणभाताचा कुकर लावला. पुऱ्या,बटाट्याची भाजी, शिरा, चटणी, कोशिंबीर, तळलेले पापड असा साग्रसंगीत स्वयंपाक केला. तिला असं सुटीच्या दिवशी किचनमध्ये गुरफटलेली पाहून हर्षलला वाईट वाटलं पण त्याचाही नाईलाज होता.
मामामामी आले. पण " सकाळी हेवी नाश्ता झाला आणि आता जास्त जेवण प्रक्रुतीला मानवत नाही " असं कारण सांगत फारच कमी जेवून गेले. शिरा आणि तळलेल्या पापडांना तर त्यांनी हातही लावला नाही. अर्चनाने केलेली एवढी मेहनत वाया गेली हे पाहून हर्षलला वाईट वाटलं पण "आपण काही बोललो तर माहेरच्या माणसांना टोमणे मारले म्हणून अर्चनाला राग येईल."म्हणून तो चुप बसला.
संध्याकाळ झाली तशी मुलं घरी परतली.
" काय रे मुलांनो,मजा केली ना फार्म हाऊसवर " अर्चनाने विचारलं
"हो आई. आम्ही खुप खेळलो. पण तिथलं जेवण आम्हांला काही आवडलं नाही."ऋषी म्हणाला
" का रे ! काय होतं जेवणात?"
" वांग्याचं भरीत, पुऱ्या,पापड आणि वरण भात .पण ते भरीत खुप तिखट होतं आणि तू बनवते तसं टेस्टीही नव्हतं. मग आम्ही फक्त वरणभात खाल्ला.काहीच मजा आली नाही. आई आज काही चांगलं बनव ना आज स्वयंपाकात"
"हो आई खरंच कर ना काहीतरी छान."तपस्वी आईला बिलगत म्हणाली.
" अगं सकाळचं खुप उरलंय. वरण भात आहे, भाजी आहे. फक्त पोळ्याच कराव्या लागतील आणि बाबा म्हणताहेत काहीतरी बाहेरुन मागवायचं म्हणून."
" बाहेरचं काही नको आम्हांला. तूच काहितरी कर "
अर्चनाने हर्षलकडे पाहिलं. मुलांनीच असं म्हंटल्यावर तो हिरमुसला. तरीही त्यांना समजावण्याच्या सुरात तो म्हणाला
"अगं बेटा तुमची आई रोजच नोकरी करुन तुमचे डबे,माझा डबा,संध्याकाळचा स्वयंपाक करत असते. रविवारीच तिला बिचारीला सुटी मिळते तर आज तिला आजोबा आजी आल्यामुळे खुप सारा स्वयंपाक करावा लागला. आता संध्याकाळी तरी तिला आराम द्यायला नको का ?" दोघं मुलं क्षणभर चुप बसली.मग ऋषी म्हणाला
" आई जाऊ दे. जास्त काही करु नकोस.फक्त तू नेहमी ती कोबी,गाजर,टमाटे घालून मॅगी करतेस ना तशी आम्हांला करुन दे. खुप दिवस झाले खाल्लीच नाहिये "
" हो आई, मॅगी,मॅगी,मॅगी "तपस्वी ओरडली.
अर्चनाने हर्षलकडे पाहिलं. तो तिच्याचकडे पहात होता.
" मग? आता काय करायचं? ही पोरं तर ऐकतच नाहियेत "
हर्षल खांदे उडवत म्हणाला
" बघ तू,ठरव "
" जाऊ द्या.या पोरांची इच्छा पुर्ण करते आज. बाहेर जेवायचं पुढच्या रविवारी पाहू.आणि ही मुलं मॅगी खाणार म्हंटल्यावर आपल्या दोघांसाठीच काय बाहेरचं मागवायचं? सकाळचंही खुप उरलंय. मी आपल्या दोघांसाठी पोळ्या करते. आपण तेच खाऊन घेऊ या "
"चालेल. तू म्हणशील तसं "हर्षल नाराज होत म्हणाला.
अर्चना उठली.तिला किचनमध्ये जातांना पाहून हर्षलच्या मनाला प्रश्न पडला.
" सगळ्याच बायका अशा स्वतःच्या इच्छांचा,पडणाऱ्या कष्टांचा विचार न करता दुसऱ्यांच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी धडपडतात की फक्त माझी बायको अशी आहे ?"
अर्चनाला कदाचित त्याला पडलेला प्रश्न कळला असावा. तिने मागे वळून त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहिलं.
" मला काही म्हंटलात?" तिने विचारलं
" नाही तर "
ती परत वळून किचनमध्ये शिरली. कांदा चिरचिरता तिच्या मनात एक प्रश्न उभा राहिला
"आज ह्यांची बाहेरचं काही खाण्याची इच्छा पुर्ण झाली नाही. याला जबाबदार आपले नातेवाईक आहेत असा तर विचार ह्यांच्या मनात येत नाही ना?"

©️ दीपक तांबोळी
      9503011250
(ही कथा माझ्या "वाटणी " या कथासंग्रहातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...