दुर्गा, पार्वती, सरस्वती,लक्ष्मी या देवदेवता आपण फक्त श्रद्धेतून ऐकतो, पाहतो. पण यातील कोणती देवता आपण प्रत्यक्ष पाहिलीय. झाशीच्या राणीची गोष्ट इतिहासात ऐकलीय. पण मी आज सांगतो, मी देवता साक्षात पाहिली ती राजस्थानची 'रुमादेवी.'
मी टीव्हीवर केव्हातरी अध्ये मध्ये केबीसी पाहतो याचे समाधान वाटतेय मला. अरे देशातले जितेजागते आयडॉल्स देशासमोर आणतायत ते. सोनी टीव्ही फार पुण्याचं, प्रेरणेचं काम करते आहे. रुमादेवी. राजस्थान मधलं हजारो गरीब महिलांचं प्रेरणास्थान ! स्वतःमध्ये असलेल्या हुनर-कलेचं रूपांतर राजस्थानमधील बारमेर येथील 22000 महिलांचं प्रशिक्षण करून त्यांना 'पोटापाण्याला' लावण्याचे पुण्याचे काम रुमादेवींनी केले आहे. रुमादेवी देशातल्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या कोणत्याही सीईओपेक्षा तसभुरही कमी नाहीत. तरुण, देखण्या, हसमुख आत्मविश्वास ओतप्रेत भरलेल्या रुमादेवी. गरिबीचे चटके स्वतः सोसलेले. वयाच्या सतराव्या वर्षी लग्न झालेले, गरिबीमुळे आणि मागास भागात राहण्यामुळे 46 दिवसांचा आजारी मूल उपचाराअभावी दगावलेलं. आजही त्या डोक्यावर रितिरिवाजने घुंगट घेतात. पण कधीही घुंगटमधून, घरांमधून बाहेर न येऊ शकलेल्या, निराश झालेल्या राजस्थानमधील 22000 महिलांना विश्वासाचा आधार देऊन स्वतःच्या पायावर उभे करणारी तरुण तडफदार रुमादेवी त्या महिलांसाठी परमेश्वरापेक्षा मोठी असेल तर नवल नसावं. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, पारंपरिक राजस्थानी वेशभूषा, डोईवर घुंगट, नजरेत आत्मविश्वास ओतप्रोत भरलेला. पण थोडाही अहंकार चेहऱ्यावर नाही. मी तरी प्रेमात पडलो बाईच्या. प्रचंड आदर वाटला. त्या अर्थानं ते 'आदरयुक्त प्रेम' म्हणता येऊ शकेल. आज्जीकडून कशीदा काम शिकलेल्या रुमादेवींनी कल्पनाही नसेल की, पुढे कशीद्यातली प्रतिभा त्या समाजाच्या भल्यासाठी वापरतील. राजस्थानमधील अजूनही सुरू असलेले रीतिरिवाज पाहता, महाराष्ट्रातील स्त्री अधिक सुखी, स्वतंत्र आहे. तिला गरुडभरारी घेता येते हे अधोरेखित होते. तेथील स्त्रीला घुंगटमधून बाहेर येता आलेले नाही. अन्न म्हणून तेथील स्त्रियांना फक्त दालरोटी खाता येते. गूळ, शेंगदाणे, गोडधोड, उंची पदार्थ फक्त पुरुषांना खाता येते..रुमादेवी हे सांगत असतांना सारे ऐकून सर्दच झाले.
अरे, एकविसाव्या शतकाच्या बाता मारतो आपण. अजूनही देशातील बहुतांश भागातील स्रीरूपी माता, लक्ष्मी मागासलेली. असो. रुमादेवींनी तेथील मागास राजस्थानी अशिक्षित महिलांमध्ये काय प्रकारची क्रांती घडवलेय याची झलक पाहायला मिळाली. एक महिला सांगत होती. तिने या कशिदा कामातून तिच्या अशिक्षित नवऱ्याला शिक्षण दिले.आज तो रेल्वेत नोकरी करतोय. अंगावर रोमांच उभे राहिले. आईवडिलांनी मुलांना खस्ता खाऊन शिक्षण दिल्याची लाखो, कोट्यवधी उदाहरणे आहेत पण एक अशिक्षित स्त्री कष्ट करून आपल्या नवऱ्याला सक्षम करते हे उदाहरण आगळेच. आणि हे केवळ रूमादेवींमुळे घडले हे सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू होते.
आणखी देव वेगळा कुठे पाहायचा माणसानं सांगा ! आपल्या देशात अनेक उच्चशिक्षित महिलांनी कॉर्पोरेट क्षेत्रात आपल्या हुशारीचा झेंडा रोवलाय ! उदा. चंदा कोचर, इंद्रा नुयी, किरण मुझुमदार, उर्वी पिरामल, शिखा शर्मा, रूपा कुंदा वगैरे अनेक उदाहरणे आहेत. पण मला आपली रुमादेवी मला या लोकांपेक्षा किंचितशी 'वर' उठलेली दिसते. वरच्या स्त्रियांनी नक्कीच प्रगती केली. पण स्वतःची. आणि स्वतःची प्रगती करणे हा देशातल्या प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहेच. पण रुमादेवींनी स्वतःपेक्षा समाजातील वंचित ( प्रकाश आंबेडकरांचा वंचित पक्ष वेगळा ) महिलांना वर आणण्याचे आणि त्यांच्या 'जगण्याला' प्रतिष्ठा देण्याचे जे काम केले आहे त्याला तोड नाही. आपण नेहमी म्हणतो की, देशात आदर्श व्यक्तिमत्व निर्माण होण्याचे थांबलेय की काय ! पण तसं नाही.. फक्त आपल्याला माहिती नाही. पण कित्येक जण कोणतीही प्रसिद्धी न करता 'डिंडीम' न वाजवता काम करतायत.
रुमादेवी दुसऱ्या प्रकारात मोडतात. रुमादेवी. फॅशन क्षेत्रातील उभरते मोठे नाव. 'नारीशक्ती' हा मोठा पुरस्कार त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते नुकताच देण्यात आला. 'फॅशन डिझायनर ऑफ इंडिया' हा सन्मान देखील त्यांनी मिळवलाय. अमिताभ बच्चन यांनी रुमादेवीला तुम्ही स्वतःचा ब्रँड सुरू करत का नाही असे विचारले. तेव्हा त्यांच्यासोबत असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यानं रुमादेवी याच एक ब्रँड झाल्या आहेत हे आवर्जून सांगितले. बच्चनसाहेब खूपच प्रभावित झाले होते रुमादेवींचा प्रवास पाहून.. हसून रुमादेवींनी सर, तुम्हीही आमची प्रेरणा आहात असं त्यांना सांगिल्यावतर बाई कसलेली 'मार्केटिंग हेड' आहे हे जाणवलं. अमिताभ बाच्चन मात्र त्यांच्या उत्तराने 'सुखावले' असणार !
म्हणूनच केवळ दीड हजार रुपयांत 500 मुलांसाठी आनंदाने 'खिचडी' बनविणाऱ्या, आयुष्यभर कष्ट केलेल्या पतीचे 'अच्छे दिन' यावेत यासाठी 'झटणाऱ्या' वैदर्भीय बबिताताई ताडे स्व-बुद्धीचातुर्याने 'करोडपती' होतात तेव्हा देशाला आपल्याच कुटुंबातील कुणाला तरी 'मिळाल्याचा' आनंद होतो. सध्या समाजातल्या 'कर्मयोग्यांना' पुढे आणण्याचे काम सोनीच्या सहकार्याने अमिताभ सध्या 'सळसळत्या' उत्साहानं करतायत. त्याचे स्वागत करायला हवे. बिनकामाच्या फुटकळ भावनातिरेकी घिस्यापिट्या एपिसोडिक टीव्ही मालिका पाहण्यापेक्षा समाजातील चांगले काम करणाऱ्या 'केबीसी या उत्तम कार्यक्रमाचे' अभिनंदन करायला हवं. उत्तेजन द्यायला हवे.
यत्र नार्यस्तु पूज्यनते
रमंते तत्र देवत:
यत्रेतांस्तु न पूज्यनते
सरवास्तयापल: क्रिया:
असं म्हणतात की, ज्या घरात, कुळात स्त्रीची पूजा तिचा आदर होतो. ते घर ते कुळ भाग्यवंत होते सुखी होते.
स्त्रीची उन्नती ही घराची, देशाची उन्नती असते. आणि कर्तृत्ववान स्त्रीला 'नावाजायलाच' पाहिजे कारण..ती हजारो वर्षे वंचित होती.
रुमादेवी आगे बढो.. .सारा देश 'आप जैसो' के साथ है !
आमचाही बोधकट्टा.. 😊
श्रीनिवास खांगटे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा