"अनिता ऐक माझं आता आपण निनादला एखाद्या आश्रमात ठेवूया. जसजसं तो मोठा होईल तसतसं त्याला सांभाळणं खूपच कठीण होणार आहे. माझ्या व्यवसायामुळे मी तुम्हाला दोघांना जास्त वेळ देऊ शकणार नाही. तुला तुझं आयुष्य त्याच्या सेवेसाठी वाहून घ्यावं लागेल. तुझ्यासाठी ती एक तपस्याच असेल."
"अजित मी निनादला माझ्यापासून वेगळं करणार नाही. तो कसाही असला तरी माझ्या पोटचा गोळा आहे. मी त्याला जीवाचं रान करून सांभाळेन. मला माझं पूर्ण आयुष्य वेचावं लागलं तरी बेहत्तर."
अनिता आणि अजितचा मुलगा निनाद हा एक 'स्पेशल चाइल्ड' होता. निनाद सहा वर्षाचा झाला तरी त्याची बुद्धी मात्र एक वर्षाच्या बाळा एवढीच होती. त्याच्यामुळे अजित आणि अनिताला कुठे एकत्र बाहेर जाता येत नव्हतं म्हणून अजित नाराज होता. भरपूर श्रीमंती असून मनासारखं जगता येत नव्हतं. अनिता निनादची डोळ्यात तेल घालून काळजी घेत होती. त्याला जरा सुद्धा एकटं सोडत नव्हती. सोसायटीत त्याला खाली खेळायला तिच्याबरोबर घेऊन जायची. बाकीची मुलं त्याला चिडवत असत, कधी कोणी मारत असत तेव्हा अनिताला खूपच वाईट वाटत असे. ती कधी त्याला जवळच्या गार्डनमध्ये खेळायला नेई तिथे इतर मुलं त्याची उपेक्षा करत असत. इतकंच नाही तर काही पालकही त्याच्याकडे विचित्र नजरेने पाहत असत तेव्हा अनिताला वाटायचं की मूल कसं जन्माला यावं हे कोणाच्याच हातात नसतं. लहान मुलांना काही कळत नाही पण ही मोठी माणसे सुद्धा अविचाराने वागतात.
निनाद नऊ वर्षांचा झाल्यावर अनिताने त्याला तिच्या घरापासून दहा मिनिटे अंतरावर असलेल्या विशेष मुलांच्या शाळेत दाखल केले. त्याला सांभाळायला एक मावशी होत्या पण त्यांना इतर कामं सांगून अनिता निनादच्या मागे असायची. शाळेत नेणं, त्याचं सर्व करणे त्यातच तिचा सर्व वेळ जात असे. त्यामुळे अजित चिडचिड करायचा. शाळेतून घरी आल्यावर ती त्याचा अभ्यास घेई. निनाद कधीकधी खूपच विचित्र वागायचा,आक्रमक व्हायचा.
आज अनिताला निनादच्या शाळेत सन्मानाने बोलावलं होतं. कारणच खूप विशेष होतं. दहावीच्या परीक्षेत 'विशेष' मुलांमध्ये निनादचा पहिला नंबर आला होता. शाळेतल्या प्रिन्सिपल मॅडमने अनिताला आमंत्रण दिलं होतं. त्या तिला म्हणाल्या,
" आज तुमचा निनाद सर्व मुलांमध्ये पहिला आला याचे सारे श्रेय तुम्हालाच जाते." अनिताला खूप आनंद झाला आणि तिच्या मनात आलं आत्ताशी आपल्या तपस्येचा एक टप्पा पूर्ण झालाय. अजून निनादला खूप मोठं करायचं आहे. एका आईने ठरवलं की ती काहीही करू शकते हेच खरं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा