"सर, ओळखलत मला ! मी तुमचा विद्यार्थी. डॉ. विनायक सहस्त्रबुद्धे, तुमचा विन्या."
हॉस्पिटलच्या कॉटवर झोपलेल्या सरांनी किलकिले डोळे करून माझ्या कडे पाहिलं आणि पहिला प्रश्न केला, "मला इथं कोणी आणि का आणलं ?"
"सर आपली तब्बेत खूप खालावल्याचा मित्राचा फोन आला. मी तिथं पोहचे पर्यंत आपण निपचित पडला होता. मी माझ्या गाडीत आणून उपचार सुरू केले. आपण मागील सहा महिने दहा दिवस कोमात होता. आमचे सर्व उपाय थकले होते.
मी क्लासमेट्स च्या वॉटस् अॅप ग्रुपवर आपली बातमी टाकली आणि धडाधड मॅसेज येऊ लागले. सर्वानी देवाकडे करुणा भाकली."
"अरे पण एव्हढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये मला का आणलस. माझ्या जवळ तर याचे बिल भरायला पैसे सुद्धा नाहीत. तू तर म्हणतोस मी सहा महिने इथे आहे. मी कुठून आणणार पैसे भरायला."
"सर त्याची काहीही गरज नाही. हे हॉस्पिटल माझं स्वतःच आहे."
"पण तरीही माझी अजून तेव्हढी ओळख सुद्धा पटलेली नसताना तू हे का केलंस. माझा डिस्चार्ज झाला का ? माझ्या बॅंक मध्ये काही पैसे शिल्लक होते. मी तुम्हाला आणून देतो."
"सर, लाजवता तुम्ही आम्हाला, तुम्ही दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर आम्ही इथवर आलो. नशिबाने तुमची सेवा करण्याची संधी मिळाली. ती काय कमी आहे?"
"मला घरी जायचं आहे, माझी पत्नी वाट बघत असेल. शाळा संपल्या नंतर तिनेही खूप कष्ट घेतले, संस्कृत चे क्लास घ्यायची. पण आज तिलाही बरोबर दिसत नाही. तिची उपासमारी झाली असेल."
"सर तुम्ही काहीच काळजी करू नका. आम्ही मूलं आहोत तुमची, आपण लवकर घरी जाऊया. बाई वाट बघत असतील."
"सरांच्या घरी पोहोचलो. वाटेवर रांगोळी आणि फुलांचे सडे घातले होते. सरांना सर्व अचंबित करून सोडत होतं. घराला रंग रंगोटी केली होती. वॉटसाप ग्रुप वरच्या सरांच्या सर्व विद्यार्थ्यांनी घडवून आणलं होतं.
सरांच्या डोळ्यात पाणी आलं. सरांना स्वतःच घर स्वर्गाहुनी सुंदर भासलं. बाई स्वागता साठी नवी साडी नेसून सुंदर सजल्या होत्या.
घराच्या दारातलं स्वागत बघून सर भारावून गेले होते . त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे झाले. बाईंनी सरांना ओवाळले. तोंडात पेढा भरवला.
'एव्हडे अनोळखी चेहरे कोण आहेत.' असं सरांच्या मनात काहूर माजलं. जिथे सरांची बसायची खुर्ची असायची तिथे सिटिंग कोच होता. सरांना त्यावर बसवले. सर काही विचारणार तोच त्याच्या समोर एका टेबलवर केक ठेवला गेला. सरांच्या बाजूला बाईंना बसवलं.
सर बोलले, "अरे माझा आज वाढदिवस नाही, आणि आपण सर्व कोण आहात?"
"सर, केक कापा, सर्व निवांतपणे उलगडत जाईल."
सरांनी आनंदाश्रूनी भरल्या केक कापला, बाईंना भरवला. सर्व जणांनी एकच जल्लोष केला
"हॅपी टीचर डे"
दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. सर्वांनी फोटो काढले, आणि आपली ओळख सरांना देऊ लागले. तसे सर भूतकाळात विसावत गेले. एक एक आठवण डोळ्या समोर तरळू लागली. वन भोजन, सरस्वती पूजन,
सांस्कृतिक कार्यक्रम, सरांच्या डोळयांसमोर उभे झाले. सरांनी सर्वाना कवटाळलं.
"आज मी खूप कमवलं, 'पैसा' पेक्षा हि मोठं धन मला शिक्षकी पेशातून मिळालं. माझ्या जीवनाचं सार्थक झालं. आम्हाला मुल बाळ नव्हतं, पण आज लक्षात आलं, शिक्षकाची कूस कधीच ओस नाय पडत. विद्यार्थी हिच त्यांची लेकरं असतात.
पण मला हे कसं घडलं, आजचा दिवस तुम्ही साजरा करण्याचं कसं ठरवलं, मी तर कोमात होतो ना?"
"त्याचं असं झालं सर, मला मित्राचा फोन आला. त्याने सरांची चोकशी केली आणि म्हणाला पुढच्या आठवड्यात शिक्षक दिन आहे. सरांना बरं वाटलं असतं तर 'शिक्षकदिन' साजरा केला असता. पण आता तेही शक्य नाही."
संध्याकाळी घरी निघालो. वाटेत आपली शाळा लागली. शाळा सुटली होती. शाळेची घंटा वाजत होती. मी दोन मिनिटे तिथे थांबलो. तो घंटेचा आवाज माझ्या कानात घर करून गेला.
सकाळी हॉस्पिटलमध्ये जाण्या अगोदर मी बाजारात गेलो. शाळेच्या घंटे एव्हडी घंटा विकत घेतली, आणि एक प्रयोग करून पाहिला.
सरांच्या काना कडे शाळेसारखीच जोरात बेल वाजवली. मला काही हालचाल जाणवली. मग दुपारी पुन्हा हा प्रयोग केला. मला सरांच्या हातात चेतना आलेली दिसली. मला खूप आनंद झाला. मग संध्याकाळी पुन्हा जोरात घंटा वाजवली आणि काय आश्चर्य, सरांनी हळू हळू डोळे उघडले.
मी त्या घंटेवर डोकं टेकले. सरांच्या तब्बेतीत फरक पडत गेला. मी मित्राला ही गोड बातमी कळवली आणि हे घडून आलं.
'शिक्षकदिन' गोड झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा