माझ्या प्रिय मुलांनो,
ज्या दिवशी तुम्हाला मी म्हातारा झालो आहे असे वाटेल, त्या दिवशी तुम्ही स्वतःत थोडे धैर्य आणायला हवे आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करावा. जेवताना माझ्या हातुन काही सांडले वा मला व्यवस्थित कपडे घालता आले नाही तर माझ्या मुलांनो थोडा धीर धरा व ते दिवस आठवा जेंव्हा मी तुम्हाला हे शिकवण्यासाठी किती वेळ घालवत असे. मी कधी एकच गोष्ट वारंवार सांगु लागलो तर मला अडवू नका. माझे म्हणणे ऐका. जेंव्हा तुम्ही खुप लहान होता तेंव्हा रोज रात्री एकच गोष्ट वारंवार सांगायला सांगत असत व मीही तुम्हाला झोप येईपर्यंत तसेच करीत असे. जर मी कधी स्वतःला नीट स्वच्छ करू शकलो नाही तर मला रागावू नका ही किती शरमेची गोष्ट आहे असे म्हणु नका. तुम्हाला आठवतं तुम्ही जेंव्हा लहान होता तेंव्हा तुम्हाला व्यवस्थित अंघोळ घालण्यासाठी मला किती खटपट करावी लागत असे? क्षणाक्षणाला किती काही बदलत चालले आहे जर मी नवा रिमोट, मोबाइल वा कॉम्प्युटर चालवायला शिकु शकत नसेन तर मला हसु नका. थोडा वेळ द्या कदाचित हे सारे चालवायला मला येईल. मी तुम्हाला आयुष्यभर किती आणि काय-काय शिकवत राहिलो. व्यवस्थित जेवा, नीटनेटके कपडे घाला. उत्तम माणुस व्हा, प्रत्येक संकटाचा हिंमतीने सामना करा. लक्षात आहे ना. उतारवयामुळे जरी माझी स्मरणशक्ती कमी झाली असेल वा बोलताना मी गोंधळुन गेलो असेल तर मला ती गोष्ट आठवण्याची संधी द्या. मी कधी काही विसरलो तर चिडु नका, रागावु नका. कारण त्यावेळी तुम्ही माझ्याजवळ असणे व तुमच्याशी बोलु शकणे हीच माझ्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट असेल हेच तर माझे सर्वांत मोठे भांडवल असेल. जर मी कधी खाण्यास नकार दिला तर मला जबरदस्तीने खाऊ घालु नका. म्हातारपणात सर्वांचा हिशोब बिघडत असतो. मला जेंव्हा भुक लागेल तेंव्हा मी स्वतःच खाईन. एक दिवस असा येईल की मी चार पावलेही चालु शकणार नाही त्या दिवशी मला भक्कमपणे तसाच आधार द्या. जसा मी तुम्हाला चालायला शिकवत असताना देत असे नंतर जेंव्हा मी तुम्हाला म्हणेन मी आता आणखी जगु इच्छित नाही. माझा शेवट जवळ आला आहे हे ऐकून तुम्ही नाराज होऊ नका कारण एक दिवस तुम्हालाही हे कळेल की म्हातारी माणसे असे का म्हणतात? हे समजुन घेण्याचा प्रयत्न करा कि एक वय झाल्यावर लोक जगत नसतात तर आपला वेळ घालवत असतात. एक दिवस तुम्हाला हे कळेल कि आपल्या साऱ्या अपयश व चुकांनंतरही मी नेहमीच तुमच्या भल्यासाठीच देवाकडे प्रार्थना केली आहे. आपल्या प्रेम आणि धैर्याचा आधार देऊन मला जीवनाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत धरून ठेवा. तुमचे प्रेमळ हास्यच माझा आधार असेल. माझ्या लाडक्या मुलांनो, मी तुमच्यावरच सर्वात जास्त प्रेम केले आहे हे कधीही विसरू नका.
- तुमचे बाबा...!!
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा