बेल वाजली तसे काकांनी दार उघडले. समोर एक 27-28 वर्षाचा तरुण अनोळखी चेहरा काकांकडे बघून awkward सा हसला. काकांनी भुवया उंचावल्या तर समोरून लगेच "Sorry काका, तुम्हाला disturb केलं. मी रचना, वरच्या मजल्यावर रहायला आले कालच. कोणी दूधवाला येतो का आपल्याला building मध्ये?" "अरे वा, welcome to the building, तरी मी काल म्हणत होतोच की वर कोणीतरी रहायला आलेलं दिसतंय. सामान न्हे-आण चालू होती आणि वरून बरेच आवाज पण येत होते. हो, दूधवाला येतो ना रोज सकाळी अगदी 6:30 च्या ठोक्याला हजर असतो." "मला त्याचा फोन नंबर असेल तर देता का?" "हो हो, आहे त्याचा नंबर. थांब शोधतो, बहुतेक मोबाईल वर असेल save केलेला तुझ्या काकूंनी. ये ना. आत ये." "आता नको काका, छोटी झोपलेय, पटकन उठली तर रडून गोंधळ घालेल. एक तर जागा नवीन आणि मी दिसले नाही तर काही खरं नाही." "किती वर्षाची आहे? नाव काय?" "दिया नाव आहे, 2 वर्षाची झाली गेल्या महिन्यात," "छान... छान" असं म्हणत काका नंबर शोधायला गेले. रचना तिथेच दारात थांबली. तिला अस्पष्ट असे काकांचे आवाज येत होते. काकूंशी बोलत असावेत. काका 2 मिनटात परत आले. एक कागदाच्या चिटोर्यावर त्यांनी नंबर लिहून आणला होता. तो कागद रचनाने घेतला आणि आली तशी पटकन निघून गेली.
2 दिवसांनी परत एकदा बेल वाजली. पुन्हा दारात रचना उभी. "काका, तुमचं काही सामान आहे का बाल्कनी मध्ये? मी जरा balcony धुऊन काढतेय, थोडं पाणी येईल खाली." "अगं हो, तुझ्या काकूंनी कुंड्या ठेवल्यात तिथे. त्या सरकवतो थोड्या. 10 मिनटं दे मला." "OK काका, मी थांबते 15 मिनिटे," असं म्हणत रचना परत आली तशी निघून गेली. दुसर्या दिवशी संध्याकाळी, गार्डन मध्ये walk करताना काकांना ती परत भेटली. या वेळी तिच्यासोबत बाबा गाडीतून एक गोड बाहुली होती. काहीतरी बोबड्या बोलात बडबड करत होती. रचनाने काकांना बघीतले आणि बाबा गाडीचा मोर्चा तिकडे वळला. "Hi काका, ही बघा माझी दिया," तिनी ओळख करून दिली. "Hello दिया, फिलायला आलीच का? आमचं गालडन आवल्लं का या छोटीला?" काकांनी बोबडं बोलत दिया la विचारलं. "Evening walk का काका? रोज येता?" रचनाने चौकशी केली. "एकटेच येता, काकू नाही येत सोबत?" "छे छे, एकटा कुठे, मित्र असतात सोबत. आज मी लवकर आलो, येतील सगळे थोड्या वेळात. रिटायर्ड मंडळी आम्ही, जरा सकाळ संध्याकाळ बागेत फिरले की थोडं fresh वाटतं. "काकू नाही येत?" "तिनी तिला घराच्या चौकटीत अडकवून घेतलंय" तेवढ्यात काकांना कोणीतरी हाक मारली. "ते बघ, आलेच आमचे Prof. सिन्हा, "म्हणत काकांनी त्यांच्या मित्राकडे बोट दाखवलं. "OK मग काका, you enjoy with your friends. दिया, आबांना बाय बाय करा." लगेच छोटेसे दोन हात बाय बाय मध्ये हल्ले. "उद्या पण ये हा पलत, बाय बाय." काकांनी दिया la सांगितले आणि मित्र बसला होता त्या बेंच जवळ निघून गेले.
काका आणि रचनाच्या अश्या भेटी होत रहायच्या. कधी संध्याकाळी बागेत, कधी लिफ्ट मध्ये. रचनाला रहायला येऊन 20 दिवस झाले असतील. एकदा दुपारी 4 च्या सुमारास पुन्हा एकदा काकांची बेल वाजली. या वेळी कोण आता, असे पुटपुटत काकांनी दार उघडलं. समोर रचना उभी, कडेवर दिया. रचना चा चेहरा वैतागलेला आणि दिया चा रडून रडून सुकलेला. "काय गं, काय झालं? अशी का वैतागलेस." "अहो काका, काय सांगु? सगळी साखर सांडली माझ्या हातून आणि ही बिना साखरेचं दूध अजिबात पीत नाही. बघा ना रडून रडून कसा चेहरा सुकवून घेतलाय पोरीने." "अगं, एवढंच ना? आधीच यायचं ना? इतका वेळ कशाला रडवायचं एवढ्याशा जीवाला. ये आत ये." "नको काका, आता नको, नवीन घर बघून ही परत रडायची." "बरं, थांब, मी देतो साखर," म्हणत काका आता गेले. पुन्हा काकांचे अस्पष्ट कुणाशीतरी बोलण्याचे आवाज रचनाने ऐकले. काका परत आले तर हातात एक छोटी पिशवी होती. रचना च्या हातात ती पिशवी देत काका म्हणाले, "ही छाकल आमच्या बाहुली साठी, आणि यात अजून एक छोटा dabba आहे तो बाहुलीच्या mummy साठी. लोणचं आहे, काकूची special recipe." "Thank you काका, आणि सॉरी मी आणि दिया तुम्हाला फार त्रास देतो. काकूंना पण सांगा." काका नुसतं हसले आणि रचना निघून गेली.
एक दिवस काका संध्याकाळी निवांत balcony मधे बसले होते. तर जोरजोरात भांडणाचा आवाज ऐकू आला. बहुदा रचना आणि तिचा नवरा अवी असावेत. अर्धा तास दोघांचे आवाज येत होते, त्यातच मध्ये दिया रडायला लागली. दोघांचे आवाज ऐकून घाबरली असेल पोर. "तुझ्याशी लग्न करून चूक केली," या वाक्या वर येऊन आवाजा थांबले. काकांना बाल्कनी मधून अवी तावातावाने गाडी घेऊन जाताना दिसला. काका आत आले, फार disturb होते. मग त्यांनी काकूंना भांडण ऐकल्याचं सांगितलं. काकूंशी बोलताना त्यांना एक आयडिया सुचली. दुसर्या दिवशी काका सकाळीच वर गेले. अवी रात्री परत आला का नाही हे तर त्यांना बघायचे होतेच. पण तो ऑफिस ला जायच्या आधी त्याला गाठायचे होते, तरच त्यांचा प्लॅन successful होणार होता. त्यांनी बेल वाजवली, तसं अवीनेच दार उघडलं. त्याच्या चेहर्यावर रात्रीचा ताण अजूनही दिसत होता. त्यांची कधीही भेट झालेली नसल्यामुळे, त्याने प्रश्नार्थक मुद्रेने काकांकडे बघितले. तेवढ्यात मागून रचना "कोण आहे अवी?" असं विचारत आलीच. "Oh काका, या ना. अरे अवी, हे काका आपल्या खालच्या घरात राहतात. मी सांगितलं ना तुला, ह्यांची मला बरीच मदत होते. काका या ना," म्हणत रचना पुढे आली. "आता नाही येत रचना, आज काकूचा हॅप्पी बर्थडे आहे. संध्याकाळी पार्टी ठेवली आहे, तिघांनी यायचं. 7 पर्यन्त आलात तरी चालेल." "आम्ही नक्की येऊ काका, तसेही काकूंना मी अजून भेटले नाहीच. त्या निमित्ताने ओळख सुद्धा होईल, नाही का रे अवी?" अवीने नुसतीच मान डोलावली. Ok...मग भेटू संध्याकाळी, मी जातो, बरीच तयारी करायची आहे," म्हणुन काका निघून गेले.
संध्याकाळी 7:10 च्या सुमारास बेल वाजली. काकांनी दार उघडलं, रचना, अवी आणि छोटी दिया छान तयार होऊन आले होते. काकांनी त्यांचं स्वागत केलं. "आम्हीच पहिले आलो वाटतं," इतर कोणीही न दिसल्यामुळे अवी बोलला. "अरे, फार कोणाला बोलवलं नाहिये. छोटसं आपलं celebration. बसा तुम्ही, मी काकूला घेऊन येतो." रचना आज पहिल्यांदा घरात आली होती. इकडे तिकडे बघत होती. फार सुंदर सजावट होती हॉल मध्ये. अगदी साधी आणि तरीही डोळ्यांना सुखावणारी. समोर भिंतीवर एक मोठा फोटो होता. काकांचं कुटुंब होतं. मध्ये काका, त्यांच्या शेजारी एक गोड चेहऱ्याची स्त्री, काकूच असणार यात शंका नाही. मागे दोन 35-40 च्या आत बाहेरील पुरुष, काकांचे मुलगे असावेत, आणि त्यांचा बाजूला त्यांच्या पत्नी. पुढे खाली बसलेली काकांची नातवंड. "इतका परिवार आहे काकांचा आणि आपल्याला माहीतच नाही. मी कधी अशी चौकशीच केली नाही काकांची, "चुटपुट लागल्या सारखी रचना अवीला म्हणाली. तेवढ्यात काका आतून हातात एक मोठी फ्रेम घेऊन आले. आणि त्यांनी ती समोर एका table वर नीट set केली. काका मध्ये असल्याने आधी ती कसली फ्रेम आहे हे रचना आणि अवीला दिसत नव्हते. पण 2 मिनिटांनी काका बाजूला झाले आणि रचनाला धक्काच बसला. त्या फॅमिली portrait मध्ये असलेला तो गोड चेहरा या फ्रेम मधून पण प्रेमळ हसत होता. फरक एवढाच की या फोटोला हार घातला होता. "रचना, ही बघ, तुझी काकू. या चौकटीत अडकली आहे, माझ्या सोबत कुठेच येऊ शकत नाही. दोन वर्ष झाली माझ्यावर अशी रुसून मला सोडून गेली." रचना आणि अवी निशब्द त्या फोटो कडे पाहत रहायले. काका बोलत होते, "ही माझी सविता. मला एकटा सोडून कायमची निघून गेली. दोन्ही मुलं परदेशात. तिच्या जाण्याने मी असा एकटा पडेन हे माहीत असतं तर कदाचित ती असताना मी तिच्यासोबत थोडा आणखीन वेळ घालवला असता. थोड्या अजून आठवणी साठवून घेतल्या असत्या. पण नोकरी, घर, संसार, मुलांचं संगोपन यात तिला वेळ देताच आला नाही. रिटायर झालो की दोघं मस्त फिरू, आवडीचं खाऊ पिऊ, नाटक सिनेमा बघु, भरपूर गप्पा मारू, रोज फिरायला जाऊ असं मी तिला नेहमी म्हणायचो. पण आता. आता हे सगळं राहून गेलं कायमचं. म्हणून आता सगळ्या खोल्यां मध्ये तिचे फोटो ठेवलेत. आणि दिवसभर त्या फोटो कडे बघून ती आहे असं समजून तिच्याशी काही काही बोलत राहतो. एकटाच." हे बोलत असताना, काकांना एक हुंदका काही थांबवता आला नाही. रचनाच्या डोळ्यातले पाणी कधी तिच्या गालावर ओघळायला लागलं तीचं तिला ही कळलं नाही. अवीचे डोळे ही पाणावले होते. काका पुन्हा बोलायला लागले. "काल तुम्हा मुलांचं भांडण ऐकलं आणि वाटलं की सविता असती तर तिला ऐकवलं नसतंच. माणसं जोडण्याची कला अवगत होती. मी खडूस, कोणाशी जास्ती बोलायला मला आवडायचं नाही. पण सविताने मला माणसं जोडायला शिकवलं. ती गेली तरी तिने जोडलेली माणसं मला आजही फोन करतात, भेटायला येतात. तिच्या मागे मी एकटा पडू नये, म्हणुन ही तजवीज ती असतानाच तिने करून ठेवली. पण तिच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली, ती कोण भरून काढू शकणार आहे?" हताश स्वरात काका बोलत होते, अश्रू संततधार वाहत होते. "खूप मौल्यवान काही गमावल्यानंतर त्याची खरी किम्मत कळते, माझी सविता गेली आणि मला माझ्या आयुष्याची खरी किम्मत कळली. मी तुम्हाला आज इथे बोलावलंय, ते फक्त एवढंच समजवायला की आयुष्य फार छोटं असतं रे मुलांनो. भांडणं, रुसवे फुगवे सगळं होईल. पण ते पराकोटीला जाऊ नये याचा प्रयत्न करत रहा. नाहीतर तुमच्या भांडणात हे फुल उमलण्या आधीच कोमेजून जाईल." काकांना दिया कडे बघत म्हटलं. रचना उठली, आधी काकूंच्या फोटोला आणि मग काकांच्या पाया पडली. अवीने सुद्धा काकां समोर हात जोडले. तिचं पाहून छोटी दिया पण सोफ्यावरून उठली आणि दुडूदुडू धावत आली आणि काकांच्या पाया पडली. काकांनी तिला उचलले आणि स्वतःचे डोळे पुसत दियाचा एक पापा घेतला. तेवढ्यात बेल वाजली. "चला, आता रडणं पुरे. मस्त पंजाबी जेवण ऑर्डर केलंय आपल्यासाठी. आता गरम गरम जेऊन घेऊ. पंजाबी म्हणजे आमच्या सविताचं favorite," असं म्हणत काका दार उघडायला गेले आणि अवीने रचनाला जवळ घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा