सोमवार, १० एप्रिल, २०२३

278. मी असे पर्यत येत रहा...

 मी असे पर्यत येत रहा... अगदी काळजात धस्स करणार वाक्य.....
       ऊभ्या आयुष्यात  कधीही न झुकलेला, न थकलेला,  हार जीत,  उन पाऊस सगळ धिरानं पचवलेले माझे बाबा आज बेडवरुन ऊठु शकत नाहीत.  सुन मुलगा करतात सगळं पण, त्याला नाईलाजाची किनार आहे की, कर्तव्य की, प्रेम माहीत नाही...  आणि सासरी गेलेल्या लेकी, त्यांच्या जगात व्यस्त आहेत. नाही म्हणायला पाच सहा दिवसांतुन व्हिडीओकॉल करतात.  आणि बाबा म्हणतात, "मी असेपर्यत येत रहा..." डोळ्यातुन गंगा यमुना वहातात. 
      अगदी जन्म झाल्यापासुन, दवाखान्यातुन घरी आणणारा, रात्री बेरात्री जागुन खांद्यावर जोजवणारा बाप, शाळेच्या पहिल्या दिवशी अलगद हात सोडणारे बाबा, सायकल शिकवताना  "हो जमतय... जमतय, बँलेन्स कर हँन्डल, समोर बघ" . म्हणुन अचानक हात सोडुन आत्मविश्वास दुणावणारा बाबा, कॉलेजात पहिल्या दिवशी काळजीत दिसणारा, परिक्षेच्या रात्री डोक्यावरुन हात फिरवणारे बाबा, स्वतःसाठी फाटके बुट, बटनाचा फोन वापरुन कॉलेजची भरमसाठ फी भरणारा बाबा, बाहेरची घोंघावणारी वादळे थोपवुन धरतोय दरवाजातच बाजीप्रभु सारखा. आपल्याला नेहमी हसताना दिसतात जखमा, वार, अपमान, कढ, हुंदके, कुठल्यातरी फाटक्या शेल्यात गुंडाळतात. नोकरी, छोकरी आपल्याला मिळते पण, आभाळाएवढं कौतुक त्याना असत.  आपल्या पहिल्या पगारातुन आपण घेतलेला शर्ट, घड्याळ साऱ्या जगाला भाबडेपणाने दाखवत बोलतच राहतात.
      आई रागावली की, बाबा बुलेटप्रुफ जँकेट सारखा बचाव करायला उभा असतो. 
"करु दे ग तिला तिच्या मनासारखं" अस म्हणतो खर पण, आतुन साफ घाबरलेला, काळजीत असतो. पण त्यात लेकीची काळजीच असते.. मुलीच, मुलाचं लग्न ठरल की, तो मनाची बांधाबांध करायला सुरुवात करतो. जणु तिसऱ्या अंकाची नांदी.. "काही चुकल तर पोरीला संभाळुन घ्या..." अस हात जोडुन सांगणारा बाबा सगळ्यांनाच माहीती आहे. पण, त्याच वेळी मुलाच्या लग्नात सुनेच्या आई-वडिलांना, "काळजी करु नका, आता ती माझी मुलगी आहे.." अस भरभरुन आश्वासन देणारा आणि तंतोतंत पाळणारा बाबा असतो.  तो सुनेत आपल्या चिमण्यापरीला शोधत असतो. म्हणुनच, "बाबांच काही नाही गं, उलट खुप आधार वाटतो त्यांचा.." अस गॉसिपींग करणाऱ्या सुना घरोघरी दिसतात. पण, सुन आणि सासऱ्यात ठिणगी, स्पर्धा, अस्तित्व आणि स्थान ह्यासाठीचा संघर्ष कधीच नसतो...!  असो आणि समजा पत्नी अगोदर गेली, तर आतुन तुटलेला पण बाहेरुन अजुन अँडजेस्टेबल झालेला बाबा बघायला मिळतो. मग नातवांना पाढे, कविता, श्लोक, गीता शिकवण्यात रमतो. आणि त्यांच्याकडुन स्मार्ट फोनची फीचर्स शिकत असतो. कधी तर सुनेला प्रेमाने स्वतःला राखी बांधायला सांगतो.  मागे सुटलेले, विस्कटलेले नाते सोडुन नव्याने नाती बांधतो.  कधी कधी सकाळी आठ साडेआठलाच पिक अवर ला फोन करतो, "काही नाही बर आहे ना सगळं, सहजच फोन केला गं..." म्हणुन खुप काही सांगायच राहु देतो.   मुलगी असो की मुलगा, सुन असो की जावई, मनात आणि मानात कुठेही वर खाली, पार्शलिटी न करणारा बाबा.  आजार बळावला, अंथरुण धरले तरी बाबांच विठुरायाचे भजन, रामरक्षा, अथर्वशीर्ष जप सुरुच असत.घर कस सुरक्षित आधाराखाली आहे वाटत रहात.  त्यांच केवळ असण खुप बळ देणारं असत.. आणि माहेरचा हक्काचा शेवटचा दुवा असतो बाबा.  बाबा गेला की माहेर संपल्याची काळीज चिरणारी यातना होते.  भाऊ-वहिनी भाच्या-भाचे सगळ मनापासुन करतात नणंदेच माहेरपण.  ती ही दुःख विसरुन सगळ्यांवर बाबाचं पांघरुण घालते.  पण ती सल, ती उणीव, ते खालीपण कुठेतरी आत जाणवत रहाते.
 
मित्र मैत्रिणिंनो, तुम्हालाही तुमचा बाबा म्हणाला की,
"मी असे पर्यत येत रहा..." 
   तर अगदी सर्व काम, लायबिलीटीज, कमिटमेंट, मिटींग्ज, सेमिनार, सेशन्स, टुर आणि अजुन काय जे असेल, ते बाजुला टाकुन बाबाला भेटा... सुरकुतलेल्या हातांवरुन,  परतीच्या चाहुलीने सैरभैर झालेल्या, एकटेपणाने कोलमडलेल्या बाबाला धीर द्या...सांगा, "हो बाबा, मी तुम्ही असे पर्यत आणि नसल्यावरही सगळं संभाळेन." 
तुम्हाला त्यांच्या डोळ्यात भरुन पावल्याचं समाधान दिसेल.. "मी असे पर्यत येत रहा . . ."
काळजात धस्स करणार वाक्य.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...