गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

2444. कृत्रिम मैत्री

      आबासाहेब माझे जिवलग स्नेही. आमच्या छान गप्पा रंगल्या होत्या. नेहा कुठे दिसत नाही? मी मध्येच विचारले. नेहा क्लास घ्यायला गेली आहे, एका डॉक्टरचा आबासाहेबांनी सांगितले. क्लास? आणि तोही डॉक्टरचा, काय नेहा त्यांना डान्स वगैरे शिकवणार की काय? मी मोठ्या कुतूहलाने विचारले.
काका काय विचारतात ऐकलेस ना? घरात शिरणाऱ्या नेहाला आबासाहेब म्हणालेत.
नेहाने जे काही सांगितले ते ऐकून मला आश्चर्याचा धक्काच बसला.
डॉक्टर अजय, एक निष्णात सर्जन, पुण्याच्या बी जे मेडिकलचा गोल्ड मेडॅलिस्ट. दांडगी प्रॅक्टिस, प्रचंड पैसा पण अविवाहित. दिवसातील अठरा तास काम, अमाप कमाई आणि त्यामुळे आलेला अहंकार. मुळातच एकलकोंडा स्वभाव, गर्विष्ठ आणि उद्धट. यामुळे नातेवाईक दुरावलेत आणि मित्र गमावलेत. 
प्रगतीपथावर घोडदौड करणाऱ्या अजयला याची अजिबात तमा नव्हती पण नियतीला हे मान्य नव्हते. अचानक अजयला पार्किन्सनचा विकार जडला. सहकाऱ्यांचे न ऐकता अजयने सर्जरी चालूच ठेवली. दुर्दैवाने दोन-तीन पेशंट्स दगावलेत आणि अजयची घोडदौड पूर्णपणे थांबली. 
क्वचितच घरी थांबणाऱ्या अजयला सर्व वेळ घरीच थांबावे लागू लागले. कुटुंब नाही, मित्र नाहीत, जवळचेच काय पण दूरचेही नातेवाईक नाहीत. मात्र, रिकाम्या वेळाची अजिबातच कमतरता नाही. 
नेहा रोज दोन तास अजयच्या घरी जाते, गप्पा मारते आणि या क्लासची फी घेते तासाचे २०००/- रुपये.
हक्काचे मित्र गमावून आज अजय मैत्री विकत घेतोय, ती ही, कृत्रिम मैत्री. 
पैसे जरूर कमवा पण मित्रही मिळवा आणि ते शेवटपर्यंत टिकवा, एकाकीपण कधीच जाणवणार नाही. 

- दिलीप कजगांवकर, पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

3100. तुम्ही फक्त या घराच्या सून नाही

 "वहिनी, प्लीज... आज माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी घरी येणार आहेत. फक्त एकदा माझी अब्रू राखा ना…" 🙏 असं म्हणत सईने हातातली भाजीची ट...