मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

2480. रिक्त मरण? की कृतार्थ मरण !

 वाटा हो, वाटा हो, आनंद वाटा...
जीवन खरं तर खूप सुंदर आहे.
आणि विचित्र असं की जे काही खऱ्या अर्थाने सुंदर आहे, 
फुलांचा सुवास, उन्हाची कोवळी ऊब, ढगांमागून डोकावणारा चंद्र,
लहान मुलाचं निष्पाप हसू –
हे सगळं क्षणभंगुर असतं.
मानवी जीवनही तसंच आहे.
काळाच्या प्रचंड महासागराचा विचार केला तर
आपला येणं–जाणं म्हणजे क्षणभर उसळणारी लाट.
म्हणूनच ज्ञानेश्वर माऊली हरिपाठात म्हणतात –
देवाचीया द्वारी बसावे क्षणभरी…
क्षणभर बसावं – पण जागं/ जागरूक बसावं, आनंदात बसावं, सजगतेत बसावं.
म्हणजे प्रत्येक क्षणाला अर्थ द्यावा, हा क्षण माझ्या हातात असताना तो शक्य तितका सुंदर, निरपेक्ष, आनंदमय करावा.
पण आपण मात्र काय करतोय?
क्षणभंगुर, नाजूक, सुंदर आयुष्य, आपण घालवतो –
द्वेष, तिरस्कार, राग, असुरक्षितता, चिंता, काळजी, भविष्यातील भिती, तुलना आणि स्पर्धेच्या न संपणाऱ्या शर्यतीत.
सुंदर घर उभं करून,
त्या घरात जळजळीत विचारांचं वादळ भरण्यासारखं.
कधी कधी मनात प्रश्न उठतो,
“असं जगण्यासाठीच का मिळाला मला हा जन्म?”
स्मशानभूमी – जगातील सर्वात श्रीमंत जमीन?
एकदा एका बिझनेस मीटिंगमध्ये कंपनीचा डायरेक्टर तिथे जमलेल्या लोकांना प्रश्न विचारतो –
जगातील सर्वात श्रीमंत जमीन कुठली ?
कोणीतरी म्हणाला – “तेलानं भरलेले गल्फ देश.”
तर कोणीतरी म्हणाला – “आफ्रिकेतील डायमंड खाणी.”
तो हसून म्हणाला – नाही. जगातील सर्वात श्रीमंत जमीन म्हणजे स्मशानभूमी.
सगळे चकित.
तो पुढे म्हणाला –
“तेल–हिर्‍यांपेक्षा अनमोल अशी संपत्ती तिथं गाडलेली आहे. कोट्यवधी लोक मरून गेले – ज्यांच्याकडे अप्रतिम कल्पना होत्या, सुंदर गाणी–कविता–कथा, समाजासाठी काम करण्याची खूप प्रामाणिक इच्छा, नात्यांसाठी प्रेम आणि क्षमाशीलता…
पण त्यांनी त्या कधी व्यक्तच केल्या नाहीत.
‘वेळ नाही’;
‘लोक काय म्हणतील’;
‘मी कोण?’;
‘उद्या बघू’…
असं म्हणत म्हणत जीवनच संपलं.
त्यांच्या बरोबर त्यांच्या आतली
सगळी संपत्तीही मातीखाली गेली.”
ही गोष्टच टॉड हेनरी या लेखकाच्या मनाला भिडली,
आणि त्यातून जन्माला आलं पुस्तक –
Die Empty – रिकामं होऊन मरा.
इथं “रिकामं” म्हणजे –
चांगुलपणा, प्रेम, ज्ञान, सेवा, कल्पना,  काहीही आत दडवून न ठेवताजगाला देत देत निघून जाणं.
”रिक्त मरण” हा शब्द आणि आपला प्रश्न
“Die Empty” – “रिक्त मरण” हा शब्द पहिल्यांदा ऐकला की धक्का बसतो.
रिकामं मरण म्हणजे काय? सगळं रिकामं करून जावं?
आपल्या मनात लगेच प्रश्न उभा राहतो –
रिक्त मरण? की कृतार्थ मरण? 
रिक्त म्हणजे ओसाड, पोकळ असा अर्थ डोळ्यांसमोर येतो.
पण इथे वेगळाच अर्थ आहे.
जर आपल्यातलं सगळं चांगलं,
देण्याजोगं, वाटण्याजोगं
आपण दाबून ठेवत गेलो,
आणि शेवटी त्याचं ओझं मनात घेऊन गेलो –
तर ते मरण रिक्त असतं की ओझं झालेलं असतं?
खरं तर कृतार्थ मरण तेच –
ज्यात आत काही उरलेलं नसतं देण्याजोगं काही राहिलं, देऊ शकलो असतो, पण देऊ शकलो नाही” अशी खंत न उरणे म्हणजे रिक्त मरण. 
सद्गुरूं श्री वामनराव पै यांची दिशा-“आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी” इथेच सद्गुरू श्री वामनराव पैंचं तत्त्वज्ञान स्पष्ट दिशा दाखवतं.
ते म्हणतात –
माणसाचा जन्म कशासाठी तर, आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी.
आपण या जगात फक्त तगण्यासाठी नाही आलो,
फक्त कर्तव्याच्या जोखडात अडकलो म्हणून नाही आलो.
आपला खरा धर्म –
स्वतः आनंदात राहणं,
आणि तेवढ्याच मनापासून
इतरांनाही आनंद देत राहणं.
“आनंद देणं” म्हणजे मोठमोठ्या दानकार्याची गरज नाही.
* कधी एखाद्याचं मन ऐकून 
       घेणं,
* कधी योग्य शब्दात 
       प्रोत्साहन देणं, 
* कधी छोटंसं ज्ञान, छोटंसं 
       कौशल्य शेअर करणं,
* कधी “तू आहेस म्हणून 
       माझं जीवन सुंदर आहे”
       असं सरळ सांगून टाकणं. 
हा सगळा आनंद वाटण्याचाच भाग.
आनंदाचे डोही आनंद तरंग…
इथून अजून आत पाहिलं तर
संत तुकाराम महाराजांची ओवी आपल्याला स्वतःकडे वळवून धरते –
आनंदाचे डोही आनंद तरंग,
आनंदची अंग आनंदाचे.
आपण आनंद “निर्माण” करणारे नाही. आपला मूळ स्वभावच आनंदमय आहे.
आपणच आनंदाचा डोह आहोत.
मग काय झालं,
आपल्याला या आनंदाचा विसर का पडतो ?
कारण-
द्वेष, तिरस्कार, भीती,
मत्सर, अहंकार, हिशेब–तिशोब,  स्वतःची सतत तुलना, 
या सगळ्यांचे थर आपल्यावर जमा होत गेले
आणि आतला आनंदाचा डोह
जणू धुक्यात हरवला.
तरी तो संपला नाही;
फक्त झाकला गेला.
आयुष्याचा खरा प्रवास
आनंद शोधण्याचा नसून
आतल्या या आनंदाला
हळूहळू पुन्हा जागं करण्याचा आहे.
जे जे आपणशी ठावे…
ते ते इतरांशी द्यावे-
टाकी रिकामी करण्याची किमया
आपल्या संतांनी सूत्र अगदी सोप्या शब्दात दिलं –
जे जे आपणाशी ठावे,
ते ते इतरांसी द्यावे…
आपल्याकडे जे काही आहे –
ज्ञान, कौशल्य, अनुभव, वेळ, प्रेम, सहानुभूती – हे सगळं साठवण्यासाठी नाही,
वाटण्यासाठी आहे.
तुमच्याकडे पैसा असो वा नसो, तुमच्याकडे देण्यासारखं काहीतरी नक्की असतंच –
* एखाद्या जूनियरला       
       व्यवसायाची सूत्रे 
       शिकविणे,
* एखाद्या मुलीला 
       शिकवलेलं शिवणकाम,
* एखाद्या शेजारीणील 
       दिलेला आत्मविश्वास,
* एखाद्या मित्राला शांतपणे 
       दिलेला आधार,
* एखाद्या आजी आजोबांशी 
       केलेलं मनापासून बोलणं.
या सगळ्या गोष्टींची किंमत
बँक बॅलन्समध्ये मोजली जात नाही, ती मानगुटीवरून हलकं झालेल्या मनात मोजली जाते.
*टाकी रिकामी असेल तरच टाकी नव्याने भरण्याची व्यवस्था होते.*मी
आपण जर टाकी फक्त भरतच राहिलो,
– स्वतःकडेच सगळं ओढत राहिलो,
तर आतलं पाणी जुने, कोंदट होतं.
जेव्हा आपण प्रेम, ज्ञान, सेवा, वेळ, थोडा–थोडा करून इतरांना देतो, तेव्हा आपण टाकी रिकामी करत नाही,
तिच्यात नव्या, निर्मळ पाण्याला जागा बनवतो.
रिकामी करणं म्हणजे गमावणं नाही,
ते म्हणजे नवा प्रवाह सुरू होऊ देणं.
सर्वसामान्य माणसासाठी-प्रत्यक्षात काय करायचं?
हे सगळं ऐकायला छान वाटते, आदर्श वाटते. पण आपण प्रश्न विचारतो –
“मी करू तरी काय?
मी तर साधा माणूस – नोकरी, घर, जबाबदाऱ्या, धावपळ…”
साधेपणातच सौंदर्य आहे.
कृतार्थ मरणासाठी
बाह्यदृष्ट्या फार मोठी कामं हवीतच असं नाही.
* जे आपल्याला माहित 
        आहे ते कोणाला तरी 
        शिकवणं,
* कोणाची तरी उपयोगी   
       पडणं. 
* ज्याला सहानुभूतीची 
       खरोखर गरज आहे त्याचं 
       मन मनापासून ऐकणं,
* आपली चूक झाली असेल 
       तर चूक कबूल करून 
       मनापासून माफी मागणं.
* आणि दुसऱ्याची चूक 
       असली तरी मनापासून 
       माफ करणं,
* जवळच्या माणसांना 
       वेळोवेळी “तू माझ्यासाठी 
        खूप महत्त्वाचा आहेस” 
        असं सांगून टाकणं,
* थोडं जास्त समजणारा, 
       थोडं जास्त देणारा, थोडा 
       कमी हिशेब करणारा 
       बनणं –
हे सगळं म्हणजेच आनंद वाटणे.
आणि आश्चर्य असं की –
हा आनंद वाटताना
आपण स्वतःही तो जास्त खोलवर लुटत असतो.
सद्गुरूंचं वाक्य
तेव्हा मनाला कळायला लागतं. 
आनंद वाटता वाटता,
आपणही आणखी मोठ्या आनंदाचा अनुभव घेतो.
रिक्त मरण की कृतार्थ मरण – उत्तर कुठे आहे?
आपण सगळे जाणारच आहोत.!कोण आधी, कोण नंतर –फरक फक्त इतकाच.
त्या क्षणी अंतर्मनात एकच प्रश्न असेल –
मी कसं जगलो?
आत साठवलेलं अपूर्ण प्रेम,
न व्यक्त केलेली कृतज्ञता,
न शेअर केलेलं ज्ञान,
न केलेली क्षमा,
न जगलेली स्वप्नं –
हे सगळं आत दाबून जायचं असेल
तर ते रिक्त मरण.
पण जर आपण हळूहळू –
रोज थोडा–थोडा आनंद वाटत गेलो, आपल्याकडचं चांगलं रोखून न ठेवता देत गेलो,
जगण्याला अर्थपूर्ण बनवत गेलो –
तर शेवटी
हात रिकामे असतील,
पण मन कृतार्थतेने गच्च भरलेलं असेल.
ते मग “रिक्त मरण” नसून
खरं तर “कृतार्थ मरण” ठरतं.
वाटा हो, वाटा हो, आनंद वाटा…
जीवन खूप सुंदर आहे. आणि नक्कीच क्षणभंगुर आहे.
याची जाणीव घाबरवण्यासाठी नाही, तर जागं करण्यासाठी आहे.
आज एक साधा, छोटा संकल्प करूया –
* जे जे मला ठाऊक आहे,जे 
       जे माझ्यात प्रेमाने भरलं. 
       आहे,
       जे जे मी देऊ शकतो –
       ते मी फक्त माझ्यासाठी 
       ठेवता
       थोडं थोडं करत रोज 
       वाटत राहीन.
टाकी रिकामी करत जाईन,
जेणेकरून नवं, निर्मळ,
अधिक व्यापक आनंद माझ्यात भरत जाईल.”*
त्या दिवशी,
आपण शांतपणे, निर्विकारपणे, आतून स्मित करून म्हणू शकू –
”रिक्त मरण? नाही…
हे तर कृतार्थ मरण आहे.
कृतार्थ जीवनाच्या वाटचालीकडच एक चिंतन-

जयंत जोशी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...