नेहमीप्रमाणेच सुमतीबाईंना, सहा वाजता बरोब्बर जाग आली. गजराची गरज त्यांना, उभ्या आयुष्यात पडली नव्हती. "तू उठलीस की मला ही उठव हो" असं सांगायला, सुधाकरराव मात्र नव्हते आता. गेल्याचवर्षी कार्डिअॅक अरेस्टमुळे, ते झोपेतच गेले होते. अगदी कोणाच्याही उठवण्याने, कधीच न उठण्यासाठी.
"कराग्रे वसते लक्ष्मी..." म्हणत, सुमतीबाई पलंगावरुन खाली उतरल्या. फ्रेश होत त्यांनी, चहाचं आधण चढवलं. तीन कप चहा... त्या, त्यांचा लेक आनंद आणि सून अमिता साठी. तेवढ्यात दुसर्या बेडरुमच्या बंद दाराआडून, साडेसहाचा अलार्म झालाच. पाचेक मिनिटांतच अमिता मोकळे केस गोळा करत, त्यांचं वेटोळं बांधतच बाहेर आली. ब्रश करुन किचनमध्ये येत, छानसं गुडमाॅर्निंग केलं तिने आईंना. ती डायनिंग टेबलवर बसतेय तोच, आनंदही जांभया देत बाहेर आला. दोन्ही बायकांना गुडमाॅर्निंग म्हणत, फ्रेश व्हायला गेला तो. आणि तेवढ्यात दाराची बेल वाजली.
"अगंबाई... इतक्या सकाळी सकाळी कोण?" असा प्रश्न सुमतीबाईंच्या तोंडून निघाला, तर तोच प्रश्न अमिताच्या तोंडावर उमटला. अमिताने पटकन उठत दार उघडलं. तोपर्यंत आनंद येऊन बसला खुर्चीवर. सुमतीबाईंनी चहाचे तीन कप डायनिंग टेबलवर ठेवले, आणि दाराकडे मान वाकडी करुन बघत त्याही बसल्या. "कोण म्हणायचं इतक्या सकाळी?". "अगं शेजारच्या आठवले काकू असतील.. अमिता बघतीये ना.. तू कर सुरु चहा". माय - लेकातला संवाद आटपतोय तोच, दरवाजा लागल्याचा आवाज आला... नी पाठोपाठ अमिताचा. "आनंद.. तुझं पार्सल आलंय काहीतरी.. काय मागवलेलंस?". हे बोलतच अमिता ते पार्सल हातात घेऊन, टेबलापाशी आली. आनंद चहा पित होता शांतपणे. सुमतीबाई वयानुरुप अस्वस्थ होत म्हणाल्या... "अरे.. तुला विचारतीये ती.. तू काही मागवलंयस का?". शेवटचा घोट घेत, कप खाली ठेवत आनंद म्हणाला... "अमिता.. आईसमोर ठेव ते.. तिच्यासाठी मागवलंय".
अमिता आणि सुमतीबाईंमध्ये परम आश्चर्याच्या सेम एक्स्प्रेशन्सनेच, पार्सलची देवाण - घेवाण झाली. आनंद पाठी टेकून बसलेला, मस्त एक हात खुर्चीच्या पाठीवर ठेऊन... दुसर्या हाताने टेबलवर बोटाची टोकं वाजवत, किंचितसं हसत. सुमतीबाईंनी उभं रहात पार्सल फोडलं... आणि एक जोराचा हुंदका फुटला त्यांच्या गळ्यातून. ते पार्सल उचलत छातीशी कवटाळून, पुन्हा खाली खुर्चीवर बसल्या त्या. अमिताही दोन्ही हातांनी नाक, अन् 'आ' वासलेलं तोंड झाकत... भरल्या डोळ्यांनीच मटकन खुर्चीत पडली.
आनंदने दोघींकडे बघितलं. सरसावत तो पुढे आला नी आपल्या दोन्ही हातात, सुमतीबाईंनी टेबलावर ठेवलेला त्यांचा हात धरत बोलला तो... "माझी मेलीची कसली आलीये हो नवरात्र.. माझी आपली रोजचीच न सरणारी रात्र.. दोनच रंगाची.. अंगावर पांढरा नी अंतरी काळा. हे तू काल सकाळी, त्या आठवले काकूंशी बोलतांना मी ऐकलं. आणि मला जाणवलं की.. अरे.. गेले वर्षभर माझ्या आईचा संग सुटलाचेय, पांढरा सोडून इतर रंगांशी. माझी आई.. सुमती शारंगपाणी.. जे जे स्कूल आॅफ आर्ट्सची माजी विद्यार्थीनी.. एक प्रख्यात चित्रकार.. जिचं आयुष्य विविध रंगांशी खेळण्यात गेलं.. जिच्या आडनावातही दैवाने, रंग आणि पाणि दिलंय.. तिच्या आयुष्यात आता फक्त रिकामा, पांढरा कॅनव्हास रहावा? ये ना चोलबे. म्हणूनच मग कालच्याकाल आॅर्डर देऊन हे मागवलं मी. फक्त तुझ्यासाठी. नऊ दिवसांच्या रंगांच्या, नऊ प्लेन साड्या. साॅरी कालचा दिवस हुकला खरा.. पण तू ती राखाडी साडी घाल, नी काढ लगेच हवं तर. आणि मग ही केशरी साडी नेस.. आजच्या रंगाची. आणि आपण तिघं, देवळात जाऊन येऊ. रोज त्या त्या रंगाची साडी घालून, बाहेर पडायचंच.. ओके? अमिता ही तुझी जबाबदारी. आणि हो.. ब्लाऊज बिऊजचंही बघ हा जरा. नाहीतर मग आहेच आपला काळा. अख्खा सेटच होता हा, त्यामुळे पांढरी साडी ही आहे. नवी आहे तर उद्या हीच नेस. आणि यापुढे.. बेरंग झालंय आयुष्य वगैरे कोणालाही सांगायचं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, अगदी स्वतःच्या मनालाही".
सुमतीबाईंनी लेकाच्या हाताचा पापा घेतला. आणि तोपर्यंत त्यांच्या शेजारी येऊन. त्यांच्या खांद्यावर डोकं टेकून बसलेल्या, सूनेच्या डोक्यावरुन हात फिरवू लागल्या त्या. डोळ्यांतून वाहणार्या विनारंगाच्या अश्रूंनी, विचार करु लागल्या सुमतीबाई "ह्या इतक्या गडद मायेचा रंग कोणता बरं असावा?".
--- सचिन देशपांडे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा