सोमवार, २२ डिसेंबर, २०२५

2467.  निसटता स्वर्गातल्यागाठी…..

 भारतीय विवाह संस्थेचे जळजळीत वास्तव, आधुनिक स्त्रीची भूमिका, आणि बदलते सामाजिक पैलू, यांची चर्चा करणारा अग्रलेख.. वाचा आज साहित्य उत्सववर.. ...

     ‘मी आयुष्यात क्रिकेटपेक्षा कशावरही जास्त प्रेम करत नाही’, असे म्हणत स्मृती मनधानाने मारणारा, झोडणारा कसाही असला तरी जन्मोजन्मी ‘ह्योच नवरा पाहिजे’ असे मानणाऱ्या तमाम भारतीय स्त्रियांना त्या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठीची एक वाटच काढून दिली आहे. लग्न आणि नवरा यांच्यापेक्षा आयुष्यात इतर कशालाही महत्त्वाचे स्थान असू शकत नाही, अगदी स्वत:लाही बाजूला ठेवून, कमीपणा घेऊन लग्नानंतर जगायचे असते, हे बहुतेक प्रत्येक मुलीच्या मनात लहानपणापासूनच बिंबवले जाते. काही अपवाद वगळता आजही त्यात फार फरक पडला आहे असे नाही. असे असताना अगदी उद्या होऊ घातलेले लग्न आजच त्या नवरीमुलीने स्वत:च मोडायचे म्हणजे केवढे पाप. भारतीय संस्कृतीला बट्टाच जणू. शिवाय मुलीची बदनामी, परत कोण हिच्याशी लग्न करेल अशा सगळ्या चर्चांची, त्यामुळे कुटुंबावर येणाऱ्या संभाव्य दबावाची शक्यता… पण असा कोणताही विचार न करता आपल्या झालेल्या फसवणुकीला तोडीस तोड उत्तर देत जागच्या जागी लग्न मोडणारी स्मृती समाजमाध्यमांवरील चर्चेचा विषय झाली नसती तरच आश्चर्य ठरले असते. या प्रकरणात असलेला या सगळ्या चर्चेच्या पलीकडे जाणारा मुद्दा म्हणजे बदलती लग्नसंस्था. होय, लग्नसंस्था नि:संशयपणे बदलते आहे. त्यामुळे तिच्यातून उभी राहणारी, भारतीय समाजाचा कणा मानली जाणारी कुटुंबव्यवस्थाही बदलते आहे. एका मोडलेल्या लग्नाची इथे दखल घ्यायची ती यासाठी.
     त्या चर्चेत जाण्याआधी आणखी एका विधानाबद्दल. ते केले होते समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी. अलीकडेच एका मुलाखतीत त्या म्हणाल्या की माझी नात नव्यानवेली हिने लग्न करू नये, असे मला वाटते. कारण लग्न ही एक कालबाह्य संस्था आहे. आमच्या पिढीला लग्नाबाबत कोणतेही प्रयोग करणे शक्य नव्हते. आताच्या पिढीला ते शक्य आहे, तर त्यांनी ते का करू नयेत? आताच्या पिढीमधल्या मुलींना त्यांना हवे ते करण्याचे स्वातंत्र्य हवे. त्यांनी ते घ्यावे आणि मुळात आनंदाने जगावे. लग्नसंस्था कालबाह्य झाली आहे, हे जया बच्चन यांचे म्हणणे सगळ्यांनाच पटेल असे नसले तरी ते बेदखल करावे असे अजिबातच नाही. थोडे डोळे आणि कान उघडे ठेवून पाहिले तर लग्नसंस्था पूर्वी होती, तशी राहिलेली नाही, ती बदलते आहे, तिला तडे जात आहेत हे सहज लक्षात येते. ती कालबाह्य झाली आहे, हे अतिशयोक्तीचे असेल, पण एकत्र कुटुंबपद्धतीतून विभक्त पद्धतीत स्थिरावलेल्या या व्यवस्थेला आणखी धक्के बसत आहेत, हे वास्तव मात्र नाकारता येत नाही.
     अगदी रोजच्या जगण्यातही त्याची झलक जाता-येता दिसते. ‘घटस्फोटाचे प्रमाण फार वाढलेय सध्या. मुलींना संसारात अजिबात अॅडजस्ट करायचे नसते’; ‘मुलींच्या अपेक्षा फार वाढल्यात हल्ली, बिचाऱ्या पुरुषांनी काय करायचं अशा वेळी?’; ‘तिला लग्नच करायचे नाही म्हणे, सगळ्या मुली अशाच वागल्या तर उद्या समाज वाढणार कसा?’; ‘लग्न केलेय, पण तिला मूल नकोय म्हणे. मग काय करणार आहे ती आयुष्यात?’; ‘नोकरीसाठी ती गेलीय लंडनला, तो आहे अमेरिकेत. हा कसला संसार यांचा?’; ‘लाखो रुपये कमवते, पण तिला साधा चहा करता येत नाही. मग काय उपयोग त्या शिक्षणाचा?’; ‘लग्न न करताच राहतात ती दोघे. काय तर म्हणे लिव्ह इन. पण राहायचेच आहे एकत्र तर लग्न का नाही करत?’ ही आणि अशी कितीतरी वाक्ये समाजात काय घडते आहे त्याचे प्रतिबिंबच आहेत. शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन यामुळे हळूहळू मुली स्व-तंत्र होत चालल्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृती, तिने केलेली हजारो वर्षांची दडपणूक, पिळवणूक आता त्यांना समजू लागली आहे. त्या त्याबद्दल प्रश्न तर विचारू लागल्या आहेतच, पण आपल्याला आयुष्यात काय हवे, काय नको याबद्दलही ठामपणे मते मांडू लागल्या आहेत. लग्नानंतर नाही पटले दोघांचे, तर कशाला राहायचे एकत्र हे आता त्यांचेही म्हणणे आहे. कारण पती हा त्यांच्यासाठी परमेश्वर नाही, तर सहचर आहे. त्याच्या अक्षम्य गोष्टी सहन करत बसायची गरज त्यांना वाटत नाही. त्यातच अडकून न राहता त्या पुढे जाऊ इच्छितात. मुळात काहीजणींना तर लग्न हीच प्राधान्यक्रमाची गोष्ट वाटत नाही. भेटला कुणी बरा, तर बघू, केले तर केले, नाही तर नाही किंवा मग आधी लिव्ह इनमध्ये राहून बघू. पटले तर करू लग्न असे त्या सहजपणे म्हणू शकतात कारण आर्थिक पातळीवर नवऱ्यावर अवलंबून राहण्याची त्यांना गरज नसते. शारीरिक, भावनिक गरजांचे बघू असे त्यांचे म्हणणे असते. लग्न केलेच, तर मुलासाठी करिअरमधली काही वर्षे देऊन स्पर्धेतून बाजूला होण्यापेक्षा मूलच नको अशी भूमिका घेणाऱ्या मुली शहरांमधून तरी दिसू लागल्या आहेत. एकूण स्त्रियांमध्ये त्यांचे प्रमाण कमी असले तरी ते समाजपुरुषाला धक्का देणारे नक्कीच आहे.
     मिळवत्या स्त्रियांसाठी लग्नव्यवस्थेतून मिळणारी आर्थिक सुरक्षा हा मुद्दाच राहिलेला नाही. भावनिक, शारीरिक गरजांसाठी आपले सगळे आयुष्य वेठीला धरले जाणे त्यांना मान्य नाही. आयव्हीएफ, स्पर्म बँक यांसारख्या तंत्रज्ञानाने त्यांची पुनरुत्पादनाची ऊर्मी भागवणेही शक्य केले आहे. जया बच्चन लग्नसंस्था कालबाह्य झाली आहे, असे म्हणत आहेत, ते याच अर्थाने. आज काही मुली तरी त्यांना हवे तसे आनंदाने जगू शकत आहेत, ते त्यांच्या आयुष्यातून लग्नसंस्थेचे दडपण नाहीसे झाले आहे म्हणूनच. मध्यंतरी एका सर्वेक्षणात एक काहीसा टोकाचा मुद्दा मांडला गेला होता की आयुष्यात ज्यांनी काहीतरी करून दाखवले आहे, जगण्यावर आपला ठसा उमटवला आहे, अशा अनेक स्त्रिया एकल आहेत. म्हणजे लग्नसंस्था त्यांच्या आयुष्यातून वजा झाल्यावरच त्यांना हवे तसे जगता आले, हवे ते करता आले.
        याचा अर्थ लग्नसंस्था पूर्ण टाकाऊच आहे, ती आता नकोच असा आहे का? तर तसे अजिबात नाही. स्त्रीपुरुषांना एकत्र जगता यावे, यासाठी काहीतरी एक सामाजिक व्यवस्था हवी. तशी ती आहे. पण आजतागायत तिने स्त्रीने असेच वागले पाहिजे आणि पुरुषाने असेच केले पाहिजे, असे शिक्के तयार केले आहेत. त्यातून पुरुष काही प्रमाणात तरी त्यांना हवे तसे जगू शकत होते, पण स्त्रीमधली मात्र सगळी ऊर्जा शोषून घेण्याचेच काम केले गेले. लग्नसंस्थेमधल्या हव्याहव्याशा, आनंददायी नात्यांबद्दल बोलण्याची गरजच नाही, पण नकोशा नात्यामधून बाहेर पडण्याची, ते नाकारण्याची मुभा तिला नव्हती. दोन्ही कुटुंबे, इतर नातेवाईक, आसपासचा समाज यांचा दबाव इतका असे की भारतीय स्त्रीचे एका पुरुषाशी नाही, तर त्याच्या सगळ्या कुटुंबाशी लग्न लागते असे एके काळी म्हटले जायचे. पण ‘जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा’ असे परावलंबी जगणे जगायला मुली आता नकार देत आहेत. आपले काम, आपले करिअर यावर नवरा, संसार यापेक्षा जास्त प्रेम करत आहेत. निवडीचा आणि नकाराचा आपला अधिकार राखून ठेवत आहेत. त्या आता कुणीही, कसेही वागावे अशा बाहुल्या नाहीत, हे स्मृती मनधानासारख्या मुली आपल्या कृतीतून दाखवून देत आहेत. शेकडो वर्षांच्या औदासीन्यातून त्या आता कुठे बाहेर येत आहेत. ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’, हे त्यांना माहीत आहे. पण त्या पक्क्या नसतात, निसटत्या असतात, आणि त्यांचा फास बसत असेल तर त्यात अडकून आपला जीव जाऊ द्यायचा नसतो, त्या सोडवून आपण पुढे निघून जायचे असते, हे त्यांना आता कळायला लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...