'रागिणी, पाच ते तारीख झाली. तु पैसे ट्रान्स्फर केले नाहीस?'
'अहो अजून पगार झाला नाही. यावेळी उशीर झाला पण परवा पर्यंत येऊन जाणार. तेव्हा पाठवते.' चहाचा कप घेऊन आलेली रागिणी म्हणाली.
'ठीक आहे.' म्हणत सागरने चहाचा कप घेतला. रागिणी किचनमध्ये गेली आणि स्वयंपाकाला लागली. तासाभरात भाजी पोळी केली. सलाद कापलं, तीन डबे भरले आणि श्रावणीला उठवायला जाणार तर श्रावणीच तिला दारात उभी दिसली.
'श्रावू उठली का बाळा? चला पटपट आपण तयारी करुया.' म्हणत तिला घेऊन ती बाथरुममध्ये गेली. तिची तयारी करून दिली आणि टेबलवर बसवून तिला वाढून दिले.
'श्रावू, सगळं संपवायचे मी येते तयारी करून.'
'हो आई.'
'शहाणी गं माझी छकूली.' तिचा पापा घेऊन ती स्वतःचं आवरायला गेली. पटपट तयारी करुन आली. श्रावणी नाश्ता करून आपली स्कूल बॅग भरत होती. तिने पटपट नाश्ता केला सागरला ही नाश्ता दिला आणि दोघी बाहेर पडल्या तसा सागर अंघोळीला गेला.
रागिणी श्रावणीच्या शाळेत शिक्षिका. दोघी सोबत जायच्या आणि सोबतच घरी यायच्या. सागर सरकारी नोकरीत. लग्नाला दहा वर्षे झालेली. दोघांची नोकरी असल्यामुळे टुबीएचके फ्लॅट घेतला, घरात उत्तम फर्निचर केलं, मोठा फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी,चारचाकी गाडी घेतली. आता दोघं कमावतात म्हटले तर हे सगळं घेणं शक्य आहे पण हे सगळं घेतांना त्याने रागिणीची आवड कधीच लक्षात घेतली नाही. कायम तुला वस्तूंची पारख नाही, तुला यातलं कळत नाही, स्वतःचं डोकं लावू नकोस असे ताशेरे मारून तिचं कधीच ऐकायचा नाही. त्याला जे सामान आवडायचे, जो रंग आवडायचा तेच तो घेत असे. सुरवाती सुरवातीला ती काही सुचवू पहायची पण त्याचं खिजवणारं बोलणे ऐकून तिने बोलणेच सोडून दिले.
पण काय असते ना सुरवातीला जर आपण सुट दिली तर पुढे नेहमीच आपल्याला गृहित धरले जाते. हेच इथेही झाले. सागर नेहमी तिला गृहित धरायला लागला.हळूहळू तिच्या पगारावर ही तो अधिकार गाजवायला लागला. तिने कमावलेला पैसा तिला स्वतःच्या मनाने खर्च करण्याची मुभा नव्हती. तिला कपडे खरेदी करायचे असले तर तो तिच्या सोबत जायचा. त्याच्याच आवडीचे, रंगाचे कपडे घेण्याचा आग्रह करायचा. आपण त्याला विरोध केला तर तो रागा भरतो हे तिला माहीत असल्याने ती आपले मन मारुन सगळे चुपचाप सहन करायची. पण म्हणतात ना सहन करण्याची एक सीमा असते आणि ती सीमा पार झाली की...
तर झाले असे की सागर तिला न विचारता आपले आणि तिचे पैसे खर्च करायचा. घरावर तर करायचा पण आपल्या भाऊ व बहिणीसाठी, आई वडिलांच्या आजारपणावर पण पैसे खर्च करायचा. तिला माहित व्हायचे तरी तिने कधी चकार शब्दाने त्याला विचारले नाही. आपल्या परिवारातील सदस्यांची काळजी घेणे हे मुलाचे कर्तव्य असते असे तिला वाटायचे. एकदा ती शाळेत असताना तिला तिच्या बाबांचा फोन आला. बाबा फारच घाबरलेले होती.
'रागिणी बेटा आईला अचानक चक्कर आली..
'काय झाले तिला?'
'मी तिला दवाखान्यात घेऊन आलो आहे. डॉक्टरांनी लगेच ऑपरेशन करायला सांगितले आहे.'
'काय?'
'हो बेटा..मी राजीवला कळवले आहे तो उद्या सकाळी येणार आहे.'
'मी..मी...पण सायंकाळपर्यंत पोहचते तुम्ही काळजी करू नका.'
'बरोबर ये.'
'खर्च किती सांगितला आहे डॉक्टरांनी?'
'साठ हजार बोलले... तु काळजी करू नकोस मी जमा केलेत.'
'बाबा तुम्ही जेवण केलं का?'
'अगं करतो..'
'बाबा पहिले जेवून घ्या आणि औषधे घ्या बरं.. डायबिटीस आहे तुम्हाला..स्वतःची काळजी घ्या..मी पोहचते सायंकाळपर्यंत.'
फोन ठेवून तिने आपला बॅक बॅलन्स चेक केला. वीस हजार. तिने लगेच सागरला फोन लावला.
'अहो, आईला ऍडमिट केलंय.'
'काय झाले?'
काही असं सांगितलं नाही बाबांनी पण ऑपरेशन करणार आहेत बोलले. मी निघाली आहे घरी यायला.. दुपारच्या बसने निघते मी तर सायंकाळ पर्यंत पोहोचेल.राजीव उद्या सकाळी येतोय .
'श्रावणीला घेऊन जाते आहेस का?'
'नाही तिला मी कुठे ठेवेल. सुलभाला बोलावले आहे तुम्ही येईपर्यंत ती सांभाळेल तिला. तुम्ही लवकर याल घरी.'
'ठीक आहे.'
'अहो, माझ्या बॅंकेत फक्त वीस हजार आहेत.. तुम्ही पन्नास हजार पाठवता का?.. अचानक काही लागले तर असो जवळ.'
'बाबांच्या जवळ असतील ना.. राजीव येईल तर तो करेल तशीही ही त्याची जबाबदारी आहे.'
'अहो.. ' सागरने फोन कट केला. तिच्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली.
'मम्मा, काय झाले? आजीची तब्येत ठीक आहे ना?'श्रावणी ने विचारले.
'हो रे बाळा.' म्हणत तिने आसावरी तिच्या मैत्रिणीला फोन लावला.
'आसावरी अगं आई ऍडमिट आहे...तु मला पैसे देऊ शकतेस का?'
'किती पाहिजेत गं?'
'पन्नास हजार तरी पाहिजेत.. यदाकदाचित लागलेच तर असो जवळ.'
'ठीक आहे.' पाच मिनिटांत पैसे आले. तिने ऑटो केला आणि घरी आली. दारात सुलभा वाट बघत होती.
तिच्याशी बोलत, तिला सुचना देत तीने पटापट आपली बॅग भरली.
'सुलभा, साहेब येतीलच आता तोवर तु घरी रहा. रात्रीसाठी आलूची भाजी, वरण,भात आणि दोन चपात्या टाकून दे. मी येईपर्यंत दोन्ही वेळचा स्वयंपाक करून देशील. तुझ्या आईला पाठवशील घरी. साहेब येईपर्यंत ती श्रावणी सोबत थांबेल घरी. मी या सगळ्यांचे वेगळे पैसे देईल.'
'अहो वहिनी.. तुम्ही इथली काही काळ्जी करू नका.. मी सांभाळून घेईल. तुम्ही आईची काळजी घ्या.' रागिणीचे डोळे भरून आले. सुलभा तिच्याकडे गेल्या दहाबारा वर्षांपासून कामाला आहे. अनेक अडचणीच्या वेळी ती आणि तिची आई धावून आल्या. ती त्या कामाचे त्यांना पैसे वेगळे द्यायची पण फक्त पैशांसाठी त्या काम नाही करायच्या तर त्यांच्याप्रती तिच्या आपुलकीच्या व्यवहारमुळे त्या तिला मदत करीत.
'श्रावणी, बाळा तु बरोबर रहाशील. शाळेतून घरी आल्यावर कुठे बाहेर जायचे नाही, कोणाला दार उघडायचे नाही, बरोबर जेवण करायचं, अभ्यास करायचा. आजीला बरे वाटले तर मग लगेच येईल.'
'मम्मा, मी राहिल बरोबर तु जा आजीकडे.. ती बरी झाली की मला फोन कर,'सहावीतली ती आज अगदी समजदार झाल्यासारखी बोलत होती. सगळं आवरून ती जायला निघाली
कॅब मध्ये बसतांना तिने सागरला सांगितले आणि वडिलांशी बोलत ती बसस्टॉप वर पोहचली. एकदाची बस मिळाली आणि ती बसमध्ये बसली. सहा साडेसहा तासांत म्हणजे रात्रीचे आठ वाजतील पोहचायला. बाबांनी आईचे ऑपरेशन व्यवस्थित झाल्याचे कळवले त्यामुळे टेंशन कमी झाले होते. तिने मान टेकवली.
पाच दिवसांनंतर आईला डिस्चार्ज मिळाला. एक पुर्णवेळ नर्सची व्यवस्था केली आणि राजीव पंधरा दिवस राहणार असल्याने ती परत निघाली. सुलभा आणि तिच्या आईने श्रावणी आणि घराची काळजी छान घेतली होती.
दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता सुलभाची आई स्वयंपाक करायला आली. काय स्वयंपाक बनवायचा आहे तिने त्यांना सांगितले आणि ती स्पोर्ट्स शूज घालून मॉर्निंग वॉकला बाहेर पडली.
'ताई, मी येते अर्ध्यातासात,' म्हणत ती बाहेर पडली. अर्धा तास फिरली. ग्रीन जीम वर व्यायाम केला आणि घरी परतली. सुलभाच्या आईचा स्वयंपाक आटोपला होता. ती आली आणि त्या निघाल्या.
सागर आणि श्रावणी उठले होते. तीने चहा ठेवला.'हे काय तु स्वयंपाकासाठी त्यांना ठेवले का?'
'हो.'
'का?'
'कारण सकाळी माझी खूप धावपळ होते.' तयारी करुन दोघी निघून गेल्या. संध्याकाळी तिने मेसेज केला येताना भाजी घेऊन या. सोबत आणावयाच्या सामानाची यादी पाठवून दिली. त्याने फोन केला, ' अगं घरा जवळूनच तर तु भाजी आणतेस ना.'
'हो पण जड पिशव्या घेऊन याव्या लागतात.'
'आतापर्यंत तर आणल्या ना.'
'आज तुम्ही आणल्या तर बिघडले कुठे.. माझ्यासारख्या उचलून तर आणायच्या नाहीत ना.. कारमध्येच आणायच्या आहेत.' तिच्या बोलण्याचा टोन आज फार वेगळा वाटला. तो भाज्या घेऊन आला. काही दिवस असेच गेलेत.
'अगं या रविवारी विनिताकडे जायचे आहे.'
'मला नाही जमणार.'
'का बरं?'
'मला शाळेचं काम आहे.'
'दोन दिवस आहेत. जे पण काम आहे ते करू शकतेस.,'
'नाही मला जमणार नाही.'
'घरचा कार्यक्रम आहे. गेले नाही तर बरं दिसणार नाही.'
'मला जमणार नाही.' तिचा रूक्ष स्वर.
'हे काय चालवलंय तु? घरच्या कार्यक्रमाला नाही म्हणतेस बरोबर दिसतं का?'
का बरं का बरोबर दिसत नाही? तुम्ही माझ्या आईचं ऑपरेशन झाले तेव्हा आले तर नाहीच पण फोनवर साधी चौकशीही केली नाही..हे कसं बरोबर दिसतं..
म्हणजे यासाठी तु आता घरात भांडण करणार आहेस तर.
'नाही भांडण नाही यापुढे तुम्ही तुमच्या घरचं बघायचे मला काहीही सांगायचे नाही कळलं.'
'डोकं ठिकाण्यावर आहे का तुझं.. लग्न झाल्यावर हे माहेर माहेर करणे बरोबर नाही.'
'आजपर्यंत कधी माहेर माहेर केले नाही फक्त सासरचंच सगळं केलं पण जर माझ्या आईवडिलांच्या आजारपणाच्या वेळेस तुमच्याकडे वेळ नाही आणि पैसा नाही तर मग यापुढे माझ्याकडून काहीही अपेक्षा करायच्या नाहीत कळलं.' ती आत निघुन गेली. कधीतरी असे होणारच होते.
काही गोष्टी वेळेतच बोलायला हव्या असतात. नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा