प्रत्येक व्यक्तीनुरुप आवडनिवड ही बदलत जाते.कुणाला कुठले रंग आवडतात तर कुणाला कुठले.तसे सगळेच रंग चांगले असतातच पण प्रत्येकाची स्वतःची एक वेगळी आवड असते. तसचं महिना हा येतांना अख्खे उणेपुरे तीस दिवस घेऊन येतो,पण आपल्याला त्यातील अमूक काही दिवसच आवडतात.त्याला कारणही वेगवेगळी असतात. कुणाचे वाढदिवस असतात तर कुणाच्या नोकरीची, व्यवसायाची सुरवात,कोणाच्या आयुष्यात नव्या व्यक्तींचे पदार्पण तर कोणाच्या घरी नवनवीन वस्तूंचे, वाहनांचे पदार्पण.
तुमच्यातीलच मी एक. मला प्रत्येक महिन्यातील एक ते पाच तारीख हे येणारे दिवस खूप आवडतात. अर्थात ही आवड काही कुणाचे खास वाढदिवस म्हणून नसते तर त्या दिवसांना मला एक उत्साहाची वेगळीच झालर दिसते.अर्थात कुठलीही गोष्ट दिसायला,दृष्टीस पडायला तुमची नजर मात्र पारखी हवी हे खरे.
खरतरं प्रत्येक महिन्यातील एक तारीख ते पाच तारीख ही वरवर पाह्यली तर इतर उरलेल्या पंचवीस दिवसांसारखीच.पण ह्या पाच दिवसांमध्ये उरलेल्या पंचवीस दिवसांहूनही जास्त कामं,जास्त उत्साह दडलेला असतो.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोकरदार मंडळींचा पगार झालेला असल्या कारणाने त्यांचे खिसे जरा गरम असतात.आणि ह्या पगारामुळे व्यवसायिक मंडळींकडे पगारदारांकडची येणी येतात त्यामुळे व्यवसायिक मंडळींकडे पण पैशाची आवक ही असतेच.काही म्हणा बा पण ह्या मनी व्हिटँमीनची ऊब पण काही वेगळचं समाधान, सुख देते.हे लक्ष्मीचं सुखं म्हणजेच सर्वस्व नसलं तरी खूप काही असतं हे पण विसरून चालणार नाही. तर अशा ह्या माझ्या आवडत्या पाच दिवसाच्या पोतडीत खूप सारी कामं,खूप सारा उत्साह साठलेला असतो आणि ह्या पहिल्या पाच दिवसांमध्ये त्या पोतडीतून ते सुख,तो उत्साह, ती कामं सरळसोट नियोजील्याप्रमाणे पार पडलीत तर अहाहा ह्या सारखं दुसरं समाधान,सुख नाही. मनाचा संतोष का काय म्हणतात नं तो हाच असावा.
बँकींग सेक्टर मध्ये काम केल्यामुळे असेल किंवा कदाचित स्वभाव वा त्याची जात्याच आवड असेल तर वेळ,दिवस,तारखा,कमीटमेंट पाळणे ही मनापासून ची आवड.शक्यतो आपल्याला झेपतील अशाच कमीटमेंट करायच्या आणि त्या मात्र शेवटपर्यंत निभवायच्या हा मूळ स्वभाव.ह्या नोकरीमुळे अजून त्याच्यात एक नियमितता पण आली.नियमितता ही पण एक व्यसनासारखीच असते बघा. अर्थात एक चांगल व्यसनं.व्यसनं म्हणजे अतिरेक .कदाचित आपल्या ह्या नियमितपणाच्या अट्टाहासाचा हाताखालच्या कर्मचारी वर्गाला जाच, त्रास ही होत असेल पण काय करणार आदतसे मजबूर.
ह्या पाच दिवसांमधलं एक आवडतं काम म्हणजे वाणसामान ह्याने की किराणा आणणं.ह्या कामाची सुरवात मुळी यादी करण्यापासून होते.यादीत काही नाव अगदी नेहमीची असतात तर काही नवीन नाव अँड करायची असतात.काही नाव जुन्या यादीमधून कमी करायची असतात.असं हे मस्त आठवून आठवून करायच काम माझ्या आवडत्या कामापैकी एक. मागच्या महिन्यात जवळपास रिकाम्या होऊ घातलेल्या डब्यांमध्ये परत आणल्या गेलेल्या सामानामुळे परत एकदा हे डबे सामानाने गच्च भरतात.आपल्या मनाचही असचं असतं बघा एखादेवेळी उगाचच औदासिन्य आलं असेल, मन रिकामंरिकामं वाटतं असेल,तर ह्या अशा कामांमुळे, बिझी राहण्याने आपल्या मनातील आनंद परत मिळतो अगदी शिग भरभरुन आनंद परत मिळवीता येतो ह्या अशा सतत कार्यरत रहाण्यामुळे.असो.
दुसरे महत्वाचे काम म्हणजे नियोजन. नियोजन हे माझ्या अत्यंत आवडीच्या कामापैकी एक.माझे अनेक मँनेजमेंट गुरू आहेत.त्या सगळ्यांकडून मला हे शिकायला मिळाले.बँकेत महिन्यातील पहिले पाच दिवस जरा जास्तच महत्वाचे. ह्या दिवसात गेलेल्या महिन्यातील आपल्या कामाचा आढावा घेता येतो.कधी भरभरून यश मिळतं तर कधी खूप प्रयत्न करुन मनासारखं यश मिळतही नाही. यश मिळाले नाही तर नाउमेद न होता आपल्या चुका शोधायच्या प्रयत्नांना लागायचं.
तिसरं महत्वाचं काम म्हणजे नुकताच पगार झाला असल्याने दुस-यांची देणी, पगार काढून ठेवायचे. शक्यतोवर हातावरचे पोट असणा-यांना आपल्या घरच्या कामवाल्या बायकांना एक तारखेलाच पगार मिळायला हवा असा माझा कटाक्ष. आपली बँक जर आपल्याला न चुकता त्याच तारखेला पगार देत असल्याने आपण सुद्धा लगेच घरच्या कामाचा मोबदला कमवल्यांना द्यावा हे माझे मत. आणि भराभर एकदा नेहमीची देणी देऊन दिल्यानंतर उरलेल्या आपल्या स्वतःच्या शिल्लक असलेल्या रकमेला एक वेगळीच ऊब, सुख, समाधान आणि निश्चिंत भासते ही माझी टिपिकल मध्यमवर्गीय समजूत.
आणि मग सगळ्यात शेवटचा टप्पा सगळा हिशोब झाल्यानंतर आपल्या स्वकमाईतून उरलेली रक्कम ,आपल्या भविष्यासाठीची तरतूद ,आपली गंगाजळी म्हणून जपून सुरक्षित स्थळी म्हणजे आपल्या बँकेतच गुंतवून ठेवायची.तर असा हा दर महिन्यातील पहिल्या पाच दिवसांचा भरगच्च कार्यक्रम स्वतःला खूप बिझी तर ठेवतोच पण आनंदाची बेगमीही करून जातो हे पण नक्कीच.
कल्याणी बापट(केळकर)
9604947256
बडनेरा, अमरावती
02/12/2025
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा