मी पांचगणीच्या कॉनव्हेन्ट शाळेत हेडमिसट्रेस होते तेंव्हाची गोष्ट. सेकंड यीअरला एका मुलाच्या ऍडमिशनसाठी त्याचे आईवडील मुलासह आले होते. मी विचारलं
'बाळा.. तुझे नाव काय?
'स्वामी..
'ओके.. तुला कुठचा विषय आवडतो?
त्याने बॅग उघडली आणि पेटिंगची वही बाहेर काढली..मला दाखवली.
त्याने छान छान चित्रे काढली होती. वयाच्या मनाने त्याला चित्रकलेत खूपच समज होती.
'मग तुला मोठेपणी मोठ्ठा चित्रकार व्हायचंय का?
तो मानेने 'हो हो ' म्हणत असताना त्याचे वडील मध्येच बोलले..
'मॅडम.. मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये अधिकारी आहे.. सर्व परीक्षा पास होऊन, स्वामी पण तेच करेल.. बारावीनंतर तो दिल्लीला जाईल.. पुढील शिक्षणासाठी...
'पण त्याची आवड..
'ते फक्त हॉबी हो..पेंटिंग विल बी ओन्ली हॉबी.. नो करिअर...
स्वामी काहीतरी सांगू पहात होता पण त्याच्या आईने त्याला दटावले..
स्वामी गालफुगवून गप्प राहिला.
स्वामी आमच्या शाळेत येऊ लागला. शाळेत येताना रोज माझ्यासाठी एखादे फुल आणू लागला.. माझ्या हातात फुल देताना 'गुड मॉर्निंग मॅडम.. म्हणू लागला. एखादा दिवस तो गैरहजर असला तर मला चुकल्यासारखे वाटू लागले. त्याचा वर्गातील प्रगती मी पहात होते. तशी सर्वच विषयात त्याला गती होती पण तो चिकितस्क होता.. त्याला नेहेमी अनेक प्रश्न पडे. रंगीबेरंगी फुलपाखरे पाहून तो वेडा होई... त्यान्च्या मागे फिरे. निसर्गात होणारे बदल त्याला आश्रयचकित करत.
आमच्या शाळेजवळ जांभळीचे झाड होते. वसंतात त्याला हिरवी पालवी आली.. मग पाने जून झाली.. त्यातील एक पान तो मला दाखवी आणि पानाच्या रांगात असा बदल कसा होतो, हे विचारी. हे वनस्पती ज्ञान मला नसल्याने मी त्याला बोयॉलॉजि च्या शिक्षकांकडे पाठवी.. ते शिक्षक त्याला समजावत.. पण त्याचे समाधान होत नसे.
तो एक एक वर्ग पास करत चालला होता. त्याच्यवर्गासाठी शाळेत नवीन चित्रकला शिक्षक आले.ते चित्रकलेचा कोर्स करून आमच्या शाळेत आले. एक दिवस मी माझ्या रूममध्ये काही काम करत असताना अचानक स्वामी माझ्याकडे आला.. तो रागाने मला म्हणाला..
'मॅडम..मी हे निसर्ग चित्र खूप मेहेनतीने काढले, तर टीचरनी त्याला झीरो मार्क्स दिले?
मी त्याने काढलेले चित्र हातात घेतले.. खरोखर पांचगणीला रोज संध्याकाळी दिसणारे आभाळ त्याने काढले होते. मलुल झालेला... मावळतीला झुकलेला सूर्य दिसत होता.. त्याची प्रभा आजूबाजूला पसरली होती. या चित्राला टीचरनी का शून्य मार्क्स दिले मला समजेना. मी टीचरना बोलावून घेतले. टीचर माझ्या रूम मध्ये आले..
'टीचर.. हा स्वामी म्हणतो.. माझ्या चित्राला झीरो मार्क्स दिले. का?
'मॅडम.. मी या वर्गाला आभाळाचे चित्र काढायला सांगितले होते.. बाकी सर्व मुलांनी आभाळ निळे काढले पण या स्वामीने हे असे पिवळे नारिगी आभाळ काढले.. म्हणून.
'का? आभाळ निळेच का?
'बघाना मॅडम.. झाडांची चित्रे काढायची तर आपण हिरवीच पाने दाखवतो.. पण या स्वामीने त्या दिवशी तांबूस लाल पाने दाखवली.. आज निळे आभाळ काढायचे सोडून पिवळे नारंगी आभाळ दाखवले.. बाकी मुलांनी..
'सर.. बाकी मुले आणि हा स्वामी यात हा फरक आहे.. बाकी मुलांना हिरवी च पाने दिसतात पण स्वामीला पानाची लाल चुटुक पालवी दिसते. बाकी मुलांना निळे आभाळ दिसते.. पण सर.. संध्याकाळी तुम्ही शाळेतून घरी जाताना आभाळ पाहिलंय काय?
ते या चित्रात स्वामीने काढलाय तसे नारिगी पिवळे असते.
'पण मॅडम.. पुस्तकात म्हंटले..
'हा फरक आहे सर, स्वामी आणि इतर मुलात.. त्याचे आभाळ इतरांपेक्षा वेगळे आहे.. एखादा मुलगा वेगळा विचार करणारा असतो.. एखादाच असतो... तो कदाचित आर्किमेडीज होतो, आईस्तानीन होतो.
सर आणि स्वामी गेले. दुसऱ्या दिवशी स्वामी मला पिवळा गुलाब घेऊन 'गुड मॉर्निंग', करून गेला.
माझी मग आमच्याच संस्थेच्या बंगलोरशाखेत बदली झाली. आता माझा पाचजणी शाळेशी फारसा संपर्क राहिला नव्हता. बंगलोरमध्ये दहा वर्षे नोकरी करून मी निवृत्त झाले. आमच्या संस्थेचा हिरकमहोत्सव आला, तो पांचगणीला होणार होता..मला मुख्य पाहुणी म्हणून निमंत्रण आले.. मी खूष झाले, खूप वर्षांनी त्या वास्तूत परत जाणार होते.. माझ्यावेळचे काही शिक्षक अजून त्या शाळेत होते. बरीच माजी विदयार्थी मंडळी या कार्यक्रमला येणार होती.. मला स्वामींची आठवण आली.. आता तो मोठा होऊन कदाचित मोठा चित्रकार झाला असणारं याची खात्री होती.
मी पांचगणीत पोहोचले.. माझे जंगी स्वागत झाले. अनेक माजी शिक्षक, माजी विदयार्थी आले होते. माझ्या वेळचे काही शिक्षक अजून शाळेत होते. मी लावलेली अनेक झाडें आता मोठी झाली होती. मी लावलेले वडाचे झाड आता वृक्ष होत आले होते..
अनेक माजी विदयार्थी मला भेटत होते.. मला प्रत्येक बॅच आठवत होती.. आठवणीने मी नाव घेऊन अनेकांची विचारपूस केली.
स्वामीच्या वर्गातील मुले मुली मला भेटायला आली.. त्यानी आणलेल्या भेटीचा मी स्वीकार करत असताना मी विचारले..
'Whare is swami? तो आला नाही काय?
ती मुलं कावरीबावरी झाली.. त्यातील अनुष्का हळूच म्हणाली.. मॅडम, swami is no more..
'What? काय झाल स्वामीला?
'मॅडम.. त्याच्या पालकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी दिल्लीला पाठवलं.. UPSC साठी.. त्यात तो तीन वेळा फेल झाला.. आणि मग त्याने स्वतः ला संपवलं..
माझ्या डोळयांतून अश्रूधारा वाहू लागल्या.. लाल गुलाबी पाने काढणारा, पिवळे नारिगी आभाळ काढणारा स्वामी कुणालाच कळला नाही.. अगदी त्याच्या जन्मदात्यांना पण नाही.... ओहो स्वामी, तुझे आभाळच वेगळे....
प्रदीप केळुस्कर 9307521152/9422381299.
16/12/ 25.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा