गुरुवार, ११ डिसेंबर, २०२५

2448. पूर्वग्रह

 आपटे पती पत्नी अमेरिकेत मुलाकडे कायमचे रहायला जाणार ही बातमी कॅालनीत वाऱ्यासारखी पसरली आणि लोकं त्यांना भेटायला येऊ लागले. व्यक्ती तितक्या प्रकृती हे माधवराव आपट्यांना हल्ली रोज जाणवत असे. मालतीबाई आपटे मात्र लोक काय म्हणतात याकडे फारसं लक्ष देत नसत. मुलगा-नातवंड भेटणार यात त्या खूष होत्या!
“माधवराव, कसं व्हायचं आता? परदेश तो परदेशच शेवटी! तिथं थोडेच मित्र भेटणार आहेत!”
“आता तिकडे जाऊन आम्हाला विसरू नका.. हो आणि भारतात याल तेव्हा ती हर्षीज ची चॅाकोलेटस नक्की घेऊन या हं!”
“मालतीबाई, तुमचे जास्त हाल होणार बघा..आता सुनेच्या कलानं सारं घ्यायला हवं बरका.”
“माधवराव, माझा मुलगा बेंगलोर मध्ये आहे. इथे येऊन रहा असं मुलगा-सून कायम म्हणत असतात पण मी अजिबात माझं घर सोडून त्याच्याकडे जाणार नाही. तुम्हीही विचार करायला हवा होता.”खरंतर जिगरी दोस्त कामतांकडे कुणीच सल्ला मागितला नव्हता व तो सल्ला देण्याची ती वेळही नव्हती.
अक्षय पाठारे गेली वीस वर्षे आपट्यांकडे काम करत लहानाचा मोठा झाला होता. कॅाम्पेक्सच्या वॅाचमनचा मुलगा पण आपट्यांच्या मुलांबरोबर खेळायला घरी आला व घरचाच होऊन गेला..उंचापुरा तगडा अक्षय उत्तम खेळाडू होता. त्यानं सुरू केलेलं जिम शहरातील लोकांना आवडत होतं. पुणे महानगरपालिकेत त्याला चांगली नोकरी होती.
“काका, अमेरिकेला जाताना काही पूर्वग्रह न ठेवता जा. प्रत्येक ठिकाणचे फायदे- तोटे असतात. पर्फेक्ट काहीच नसतं.” अक्षयचं वाक्य माधवरावांच्या मनात घर करून बसलं होतं.
खरंतर माधवरावही अमेरिकेला जाण्यास अजिबात तयार नव्हते. दोन ट्रीप झाल्या होत्या अन् तिकडचं ते स्वावलंबी आयुष्य आपल्यासाठी नाही. एवढं काम या वयात तर अजिबात  झेपणार नाही..त्यामुळे आपण कायमचं इकडे यायचं नाही हे ठरवून ते भारतात आले होते..पण मध्यंतरी दमा बळावला आणि वयाच्या पंचाहत्तरीला अडीअडचणीला काय कामत धावून येणार आहेत.. या विचाराने माधवराव मुलाकडे जाण्यास तयार झाले व पती पत्नी अमेरिकेला निघून गेले.
अधून मधून मित्र मंडळींशी व्हाटस्ॲप कॅाल होई तेव्हा माधवरावांचे वजन कमी झाल्याचे जाणवले होते.
“मुलानं कामाला जुंपलं असणार!” शंकररावांनी बोलून घेतले.
“बिचारा.. म्हातारपणी काय वेळ आली बघा.. मुलगा अमेरिकेला गेला तेव्हा काय मिरवत होते.. आता बघा!” गोडबोलेंचा आडनावाच्या अर्थाशी काही मतलब कधीच नव्हता.
“अहो मी चाललोय अमेरिकेला पुढल्या महिन्यात.. मी समक्ष भेटणारच आहे माधवरावांना! तेव्हा मी त्यांचं सांत्वन करेन.” कामतांना मित्राचे हाल प्रत्यक्ष बघायचे होते.
कामत अमेरिकेस गेले व ठरल्याप्रमाणे माधवरावांकडे गेले. माधवराव बारीक झाले होते पण चेहरा तजेलदार झाला होता. पोट सपाट झाले होते. सुरेख दोन बेडरूम ची जागा मालतीबाईंनी सुरेख सजवली होती..
“याला म्हणतात “in-law” अपार्टमेंट! म्हणजे आई वडिलांसाठी किंवा सासु सासऱ्यांना राहण्यासाठी हे अपार्टमेंट जरी मूळ घराचा भाग असला तरी सगळं सेपरेट आहे. जाणं येणं सुध्दा या दारानं करतो. रोज मुलगा सून वेळ मिळेल तेव्हा येऊन बसतात. नातवंडं येतात..छान चाललंय. लुसी नावाची मेड आठवड्यातून एकदा येते व साफसफाई करून जाते“ माधवरावांच्या स्वरात उत्साह होता.
मालतीबाईंनी साग्रसंगीत जेवणं बनवलेलं बघून कामत थक्क झाले. “वैनी, अहो एवढं काम कशाला केलंत?”
“काही नाही हो! घरचं माणूस येणार म्हटलं की उत्साह वाढतो.. त्यात बघा ही सोलकढी सुनबाईच्या मैत्रीणीनं आणून दिली पाहुणे येणार म्हणताच! श्रीखंड सुनबाईंनी केलं! आणि विश्वास बसणार नाही पण सुरळीच्या वड्या ही आमच्या लेकाची खासियत आहे!” मालतीबाईंनी उलगडा केला. 
“छान आहेत हो सुनबाईंच्या मैत्रीणी.. कधीमधी गरज पडली तर शाळेनंतर त्यांची मुलं माझ्याकडे येतात.. आम्ही दोघं त्यांना आजी आजोबांसारखं सांभाळतो त्यांचे आई बाबा येईपर्यंत! रोज नाही पण अडीअडचणीला!” 
जेवणं झाल्यावर छोट्या टब मधलं बनारसी पान खाऊन कामत तृप्त झाले.
“माधवराव, एवढे बारीक कशानं झालात? आम्हाला फार काळजी वाटली बघा.” कामत काही ना काही तक्रार कानावर पडते का बघत होते..
“कामत, एक फार मोठं शल्य आहे बघा.” कामतांनी कान टवकारले..
“मी पहाटे पाचला उठतो. साडेपाचला बाहेर चालायला जातो. फ्लॅारिडामधे राहण्याचा एक फायदा आहे की भारतासारखीच गरम हवा आहे. शुध्द मोकळी हवा, प्रदूषण नाही, ठिकठिकाणी असलेले चालण्याचे स्पेशल ट्रॅक ज्यानं गुडघे, घोटे दुखत नाहीत..चांगला तासभर चालतो. चालताना किर्तन प्रवचन ऐकतो किंवा निसर्गाशी असलेलं स्वत:चं नातं शोधतो..त्यानं वजन कमी झालंय. संध्याकाळी भारतातून..मिरजेतून आपले गुरूबंधू, श्री मकरंद खाडिलकर, योग शिकवतात त्यांचा वर्ग करतो..बीपी, शुगर, दमा सगळं नॅार्मलला आलंय! पुण्यात बाहेर चालून आलो की दमा बळावत असे..
एकदा श्वास अडकतो आहे की काय वाटतं होतं तेव्हा मुलानं सांगितल्याप्रमाणे 9-1-1 नंबर दाबला आणि दोन मिनिटात ॲम्ब्युलन्स दारात येऊन उभी राहिली व मला हॅास्पिटलला नेलं. मुलगा सून कामाला गेले होते त्यांना कळवलं. सर्व चेकप करून मी दोन तासांत घरी आलो. 
हे शल्य आहे बघा.. भारतातील प्रदूषण कमी कसं होईल? 
भारतातील गर्दीमधे पाच मिनिटात ॲम्ब्युलन्स आजारी माणसाकडे कशी पोचेल? माझ्या देशात अशी सुव्यवस्था राबवण्यासाठी शासन आणि नागरिक काय करू शकतात? वाढती लोकसंख्या, वाढतं शहरीकरण, वहानं, जंगलतोड, कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावणं हे आपल्या देशाचे प्रॅाब्लेम आहोत.. प्रगत देशात यासाठी काय करतात याचा अभ्यास करतो आहे..मी पुणे महानगरपालिकेतील काही प्रमुख लोकांशी बोलत आहें. आपला अक्षय आहेच तिथे..” आपटे प्रदूषण कमी झालेला भारत त्यांच्या डोळ्यापुढे बघत होते.. 
तो छोटा सहावीतील कुमार नावाचा शेजारचा मुलगा आपल्याकडे येतो परवा तो केनेडीच्या वाक्यावर निबंध लिहित होता..
“Ask not what your country can do for you—ask what you can do for your country!” डोळ्यात अंजन घालून गेलं ते वाक्य बघा! 
कामत निघण्यासाठी उठले.  मित्र भेटला याचा आता खरचं
आनंद झाला होता आणि त्यांच्या मनांतील प्रदूषणही निवलं होतं.. मित्राचे परदेशात कसे हाल होत आहेत हे परत जाऊन सर्वांना सांगण्याचा हेतू मनात असणं यासारखी लाजिरवाणी गोष्ट कोणती? आणि हा इकडे येऊन आपल्या देशातलं प्रदूषण कसं कमी करता येईल..माझ्या लोकांना शुध्द हवेचा मोकळा श्वास घेत व्यायाम कसा करता येईल हे बघतो आहे..आहेच तो नावाजलेला environmental सायंटिस्ट. त्याचे प्रदूषणावरील पेपर सुध्दा खूप नावाजले गेले आहेत. तो नव्या वातावरणात ॲडजस्ट व्हायला बघतो आहे आणि आपण त्याचे पाय कसे ओढतां येतील या विचारात आहोत.. 
त्यांनी माधवरावांना घट्ट मिठी मारली..”तुम्ही आनंदात आहात यात सगळं आलं! खरं सांगतो.. तुम्ही परदेशाबद्दल तक्रारी कराल त्या ऐकायला आलो होतो.. आम्ही तुम्हाला सपोर्ट करायचं सोडून.. जाऊ दे.. पुण्याला केव्हा येताय? पुर्वीसारखे सगळे चालायला जाऊ! जाताजाता कचरा उचलू. प्रदूषण कमी करण्यासाठी सगळेच प्रयत्न करू. माझेही खूप कॅान्टॅक्टस आहेत. सांगा मला.. कामतांनी बूट घातले..
“अरे शेवटी आपला देश तो आपला देश. काही कारणानं बाहेर राहिलो तरी मन तिथचं असतं..अक्षयचा सल्ला मानला आणि सगळं सोपं झालं! कोणत्याही गोष्टीत पूर्वग्रह ठेवायचा नाही. चार महिन्यात पुण्याला चांगले दोन महिने येऊ.. तेव्हा भेटूच! अक्षय फ्लॅट इतका छान ठेवतो म्हणून लेकानं त्याला घसघशीत पगार द्यायला सुरूवात केली आहे. आधी तयार नव्हता पण आम्हीच बजावून घे म्हणून सांगितलं! तो मुलगाच आहे आमचा!” माधवरावांचे डोळे पाणावले होते.
कामत भारतात परत आले. चालायला मित्रमंडळी जमली तेव्हा कामत म्हणाले, “एका कॅालनीतून आपण चौघं येतो तर आता एका गाडीतून येऊ. चार गाड्या नकोत. प्रदूषण अशानचं वाढतं..अरे माधवरावांनी स्वच्छ पुणे अगदी मनावर घेतलय बघा.. आपणही मदत करूया..हो आणि उत्तम आहेत माधवराव…
त्यांच्या अनुभवातून शिकायचं की आयुष्यात येणाऱ्या कोणत्याही बदलांना काही पूर्वग्रह न ठेवता सामोरं गेलं की त्रास होत नाही. मी पण लेकाकडे बेंगलोर ला महिनाभर जाऊन यावं म्हणतो..उगीचच परदेशाला नावं न ठेवता त्यांच्या चांगल्या गोष्टी आपल्या देशात आणू.. स्वावलंबन वाईट हे कधी म्हणू लागलो आपण?”
भारतात परतलेले कामत अचानक इतके कसे बदलले या विचारात सारे पडले.. 
केल्याने देशाटन.. हेच खरं असा समज त्यांनी करून घेतला.

©® ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...