शुक्रवार, २६ डिसेंबर, २०२५

2499. वाळवंटातील प्रवास

     काही वर्षापूर्वीपर्यंत मला ड्रायव्हर नव्हता आणि मी सगळीकडे स्वतःच गाडी चालवत जात असे. मी नेहमी एका विशिष्ट पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल टाकत असे. या पंपाच्या बाजूलाच एक सर्व्हिस स्टेशनही होतं. कधीकधी शनिवारचा दिवस असला की मी माझी गाडी सव्हिसिंगसाठी तेथे घेऊन जात असे आणि सव्हिसिंगचं काम पूर्ण होईपर्यंत तेथेच थांबत असे. तेथे दोन लहान मुलं कामाला होती. 
तेरा-चौदा वर्षांची असतील! ते दोघं जुळे भाऊ होते, दिसण्यास अगदी सारखे होते. एकाचं नाव होतं राम तर दुसऱ्याचं गोपाल. त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती, त्यामुळे ते शाळेत जात नसत; परंतु त्यांना बऱ्याच भाषा अवगत होत्या.
बंगलोर ही जरी कर्नाटकची राजधानी असली, तरी येथे फक्त कन्नड भाषाच बोलण्यात येते असं नाही. येथे इतर प्रांतातून येऊन स्थायिक झालेले लोकही बरेच आहेत. त्यामुळे बंगलोर हे मिश्र लोकवस्तीचं शहर बनलेलं आहे. या सर्व्हिस स्टेशनमध्ये काम करत असताना त्या दोघा मुलांना इतके वेगवेगळ्या प्रकारचे लोक रोज भेटत की त्या मुलांना आपल्या कन्नड या मातृभाषेखेरीज तामीळ, तेलगू आणि हिंदी एवढ्या भाषा बोलता येत.
माझ्या गाडीचं सर्व्हिसिंग होण्यास साधारण दोन तास तरी लागत. ती मुलं माझ्यासाठी एक खुर्ची आणत. मग मी झाडाच्या सावलीत 
काही काळाने माझी पण त्यांच्याशी चांगली मैत्री झाली आणि त्या दोघांनी मला त्यांच्या आयुष्याविषयी सर्वकाही सांगितलं त्या दोघांना वडील नव्हते. त्यांची आई मोलमजुरी करे. हे दोघे जवळच्या झोपडपट्टीत आपल्या काकांकडे राहत. घरच्या गरिबीमुळे शाळेत जाणं तर शक्यच नव्हतं आणि त्यांना घरी शिकवायला सुद्धा कोणी नव्हतं. याआधी ते दोघं एका दुकानात मदतनिसाचं काम करत होते व त्यानंतर आता त्यांना या सर्व्हिस स्टेशनमध्ये नोकरी लागली होती. 
त्यांना पगार तसा काही जास्त नव्हता. पण इथे सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण फुकट मिळायचं. शिवाय कधीतरी गाडी सर्विसिंगला घेऊन येणारे लोक हातावर किरकोळ बक्षिसी द्यायचे. त्या दोघांच्या कामाचे निश्चीत तास असे काही ठरलेले नव्हते. ते रोज सकाळी आठच्या सुमाराला येत आणि त्यांना घरी परतायला रात्रीचे आठ वाजत. फक्त रविवारी तेवढी त्यांना सुट्टी असे.
खरं तर त्या दोघा मुलांचं आयुष्य इतके कष्टाचं होतं... तरीपण त्यांचे चेहरे कायम हसरे असत. त्यांना कोणीही काही काम सांगितलं तरी ती मुलं कधी नाही म्हणत नसत, की कधी कुरकुर करत नसत. कधी कधी अगदी चांगल्या सधन परिस्थितीतील मुलं सगळं काही असून लांब चेहरा करून दुःखी मुद्रेनं बसलेली दिसतात. त्यांना आपण काही काम सांगायला गेलं, तर हजार सबब पुढे करतात आणि ते काम करायची टाळाटाळ करतात. मला वाटतं आयुष्यातील समाधान जातपात, धर्म किंवा बँकेच्या खात्यातील पैशांवर अवलंबून नसतं.
या मुलांच्या उत्साहाबद्दल मला त्यांचे कौतुक वाटत असे. क्वचित कधीतरी मी त्यांच्यासाठी थोडाफार खाऊ आणि थोडे जुने शर्ट घेऊन जात असे. ते कपडे पाहून त्यांना इतका आनंद होई, जसे काही ते गर्भरेशमी कपडे आहेत! पण मी दिलेले कपडे त्यांनी कधीही घातल्याचं दिसलं नाही. मी त्याबद्दल त्यांना विचारताच ती मुलं म्हणाली, मॅडम, आम्ही इकडे कामावर येताना नेहमी खराब कपडे घालून येतो, कारण इथे काम करताना त्याला वंगणाचे डाग पडतात.
एक दिवस मी त्यांच्यासाठी थोडी गोष्टीची पुस्तकं घेऊन गेले. म्हटलं, रात्री वाचायला होतील त्यांना. एकीकडे या मुलांच्याच वयाची इतर मुलं शाळेत जात होती आणि उरलेल्या वेळात हॉकी नाहीतर बुद्धिबळाच्या सामन्यांमध्ये भाग घेत होती. आणि इकडे ही मुलं मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी राबत होती. पण मी जेव्हा ती पुस्तकं त्यांच्या हातात दिली तेव्हा त्यांचे चेहरे उदास झाले. आज पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर विषाद स्पष्ट दिसत होता. ती मुलं म्हणाली, मॅडम, आम्हाला वाचायला खूप जास्त वेळ लागतो. खूप कष्ट पडतात. एकेक वाक्य वाचायचं म्हणजे.... आम्हाला वाचायची सवय नाही ना. तुम्हीच आम्हाला त्यातली गोष्ट सांगाल का?
अरे... पण मी इथे कशी काय तुम्हाला गोष्ट सांगणार? तुम्ही तर सारखे कामात असता!
आम्हाला चार वाजता थोडावेळ विश्रांतीसाठी सुट्टी मिळते. तुम्ही तुमची गाडी सर्विसिंगला त्या वेळेत जर आणलीत, तर आम्ही इथे तुमच्याजवळ बसू आणि तुम्ही आम्हाला गोष्ट सांगा, आम्ही ऐकू. त्या दोन डोळ्यांच्या जोड्या माझ्याकडे इतक्या अपेक्षेने बघत होत्या, की मला नाही म्हणणं शक्यच झालं नाही. माझी स्वतः ची मुलंसुद्धा लहान असताना अशीच गोष्टीसाठी हट्ट धरून बसायची, त्याची मला आठवण झाली. मग मी तसं करण्यास राजी झाले.
त्यामुळे मग शनिवारी दुपारी तिथे जायचं आणि त्या मुलांना गोष्टी सांगायच्या, असा शिरस्ताच होऊन बसला. जरी माझ्या गाडीचं सर्व्हिसिंग करण्याची गरज नसली, तरीसुद्धा मी नुसती त्या मुलांसाठी तिथे जाऊ लागले. माझ्या गोष्टी ती मुलं अगदी लक्षपूर्वक ऐकत आणि पुढे काय घडतं, यासाठी उत्सुकतेनं जिवाचा कान करून बसत. हे असं कित्येक महिने चालू होतं. 
काही दिवसांनी मी स्वतः गाडी चालवणं बंद केलं आणि ड्रायव्हर ठेवला. त्यानंतर गाडीची सर्व्हिसिंग करायची वेळ आली, की माझा ड्रायव्हरच ती घेऊन जाई. त्यामुळे परत काही माझं त्या सर्व्हिस स्टेशनकडे जाणं झालं नाही व राम आणि गोपाल यांची नंतर भेटच झाली नाही.
काळ तर पाण्यासारखा वाहत असतो. अशी जवळपास दहा वर्ष लोटली. एक दिवस माझी गाडी खराब झाली होती व ड्रायव्हर त्याबद्दल तक्रार करत होता. मी त्याला ती गाडी दुरुस्तीला देण्यास सांगितलं आणि नंतर ते विसरूनसुद्धा गेले. गाडी जुनी झाली होती. तिनं बरीच वर्षे चांगली सेवा केली होती. अजूनही ती चालत होती. माझा ड्रायव्हर ती गाडी दुरुस्त करून परत घेऊन आला. 
तो म्हणाला, या गाडीकडे बघून मेकॅनिकनं तुमची चौकशी केली. 'गुड लक् गॅरेज'चे मालक तुमच्या ओळखीचे आहेत का? मी तर काही ते नाव कधी ऐकलं नव्हतं. 
हे गॅरेज नवीन आहे का?
हो, तसं नवंच आहे. मी नेहमी तरुण माणसांनी चालवलेल्या गॅरेजमधेच गाडी नेतो. हा तरुण मुलगा पण अगदी चांगला आहे, प्रामाणिक आहे. तो तुम्हाला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. तुम्ही अजूनही कॉलेजात शिकवता का, असं तो विचारत होता.
माझ्या ओळखीचा गॅरेजचा मालक कोण बरं असू शकेल? काही केल्या डोक्यात येत नव्हतं. माझ्या ड्रायव्हरला त्याचं नाव माहीत नव्हतं, त्यामुळे हा तरुण कोण असावा ते काही मला आठवेना. म्हटलं कदाचित आपलाच एखादा जुना असेल; पण मी तर कॉम्प्युटर सायन्स शिकवते. मग माझ्या विषयाचा विद्यार्थी अचानक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगकडे कसा काय वळला असावा, हे कोडं काही सुटेना. 
त्यानंतर परत एकदा माझा ड्रायव्हर येऊन मला म्हणाला, त्या गॅरजचा मालक तुमची सारखी चौकशी करत होता. मग मात्र म्हटलं काही झालं तरी आपण स्वत: जाऊन त्याला भेटायला हवे. ज्या माणसाला आपली वी चौकशी करावीशी वाटते, तो आहे तरी कोण?
दुसऱ्याच दिवशी मी त्या गुड लक गॅरेजमध्ये गेले. ते गरज तसं आधुनिक होतं. चांगलं सुसज्ज होतं. आतल्या बाजूला काचेचं एक छोटंसं केबिन होते. गॅरेजचा मालक आत बसला असणार, असा मी अंदाज केला. मी गॅरेजमध्ये पाऊल टाकताच मेकॅनिकचे निळे कपडे केलेला एक तरुण देखणा माणूस पुढे आला आणि त्यानं माझं स्वागत केलं. त्याच्या हातात स्पॅनर आणि स्क्रूड्रायव्हर होता…
मॅडम या ना... आत या... अशा इकडे केबिनमध्ये बसा. मी हात धुवून एका मिनिटात येतो.
त्याच्या ऑफिसातील सोफ्यावर मी बसले. ऑफिस छोटंसंच, पण नीटनेटकं होतं. त्या तरुणाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होतं. याला आपण नक्कीच कुठेतरी पाहिलं आहे... 
पण कुठे बरं?
काही केल्या आठवेना. मी स्मरणशक्तीला ताण देऊन पाहिला... 
आपण याला प्री-युनिव्हर्सिटीच्या वर्गात तर शिकवायला नव्हतो? 
त्या वेळी मुलं सोळासतरा वर्षांची असतात, उत्साहानं सळसळत असतात. नंतर काही वर्षांनी त्यांची गाठ पडली की ती प्रौढ झालेली असतात आणि मी काही त्यांना ओळखू शकत नाही. आज हा तरुण फारच ओळखीचा वाटत होता. इतक्यात तो एका हातात कॉफीने भरलेला कप आणि दुसऱ्या हातात पाण्याचा ग्लास घेऊन आला. 
मॅडम, तुम्ही खूप बदलला आहात. तुम्ही आता जरा वयस्कर दिसता आणि थकलेल्या दिसता.
सॉरी, पण मला तुझं नाव नाही आठवत. रागावू नको... पण काय नाव तुझं? तू म्हणालास ते बरोबर आहे. मी आता म्हातारी होत चालले आहे. त्यावर तो हसला. त्याच्या गालाला छानशी खळी पडली आणि मला एकदम आठवलं…
दहा वर्षांपूर्वी गॅरेजमध्ये ती जी दोन मुलं काम करायची, त्यांच्यापैकी एक होता हा…
नक्कीच! 
पण हा राम होता… की गोपाल? 
त्या काळीसुद्धा मला त्यांच्यातला कोण कुठला, ते कधी ओळखायला येत नसे. मग मी सरळ त्यालाच विचारलं, तू राम की गोपाल?
मी राम, मॅडम.
जरा इथे बस बघू. आज तुला इथे बघून मला फार फार आनंद झाला आहे. माझ्या गाडीची ओळख पटल्यामुळे रामने माझी इतकी का चौकशी चालवली होती, हे आता मला कळलं.
मॅडम, त्या काळी तुम्ही आम्हाला जी मदत केली, त्याबद्दल मला फार कृतज्ञता वाटते तुमच्याबद्दल.
मदत? मी कुठे काय मदत केली रे? मी जुने कपडे आणि खाऊ घेऊन येत असे... आणि थोड्याफार गोष्टी सांगत असे.
मॅडम, तुम्हाला कल्पना नसेल, पण तुम्ही सांगितलेल्या गोष्टींनी माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. तुम्ही आम्हाला कोणत्या गोष्टी सांगायचात, ते आठवतंय तुम्हाला?
मला काही आठवत नव्हतं. माझ्या डोक्यात भरलेल्या कथासागरातून काही वर्षांपूर्वी मी काही कथा सांगितल्या होत्या.
नाही रे बाबा. काही नाही आठवत.
मग तो माझ्यासमोर बसला, त्याने डोळे मिटले आणि आपली स्वत:ची कथा सांगू लागला…
मॅडम… 
आमचं आयुष्य फार खडतर होतं. तुम्हाला त्याची कल्पना होतीच. आमच्या आयुष्यातील एकमेव आनंद, ज्याची आम्ही आतुरतेनं वाट बघायचो. तो म्हणजे आठवड्यातला शनिवार. तुम्ही दर शनिवारी यायचात आणि आम्हाला गोष्टी सांगायचात. आम्ही तेव्हा आमच्या काकांकडे राहायचो. आम्हाला जे काही पैसे मिळत, ते सगळे आमचे काका काढून घ्यायचे. आमच्या त्या रटाळ आणि कंटाळवाण्या जीवनापासून थोडी सुटका म्हणजे तुमच्या त्या गोष्टी. आम्हाला दिवसभर काम करावं लागायचं. मला वाटायचं आपण पुन्हा शाळेत जायला लागावं, परत शिक्षण सुरू करावं; पण आम्ही जिथे राहत होतो, तिथून रात्रीच्या शाळा फारच लांब होत्या. शिवाय घरातून काहीच आर्थिक मदत नव्हती, की पाठिबाही नव्हता. आमचं शिक्षणाचं स्वप्न हे स्वप्नच राहणार की काय... असं वाटू लागलं होतं. पण त्याच वेळी तुम्ही आम्हाला एक गोष्ट सांगितलीत. ती गोष्ट ऐकून आमचं सगळं आयुष्यच बदलून गेलं.
आता यानंतर काय घडलं हे त्याच्या तोंडून ऐकण्याची मला उत्सुकता लागून राहिली होती…
कोणती कथा होती ती? मला तरी सांग.
आता आमच्या भूमिका बदलल्या होत्या. आता तो कथा सांगू लागला आणि मी ऐकू लागले...
एका गावात खूप गरीब लोक होते. त्या सगळ्यांची एकच इच्छा होती - वाळवंट पार करून नशीब काढायला पलीकडच्या गावी जायचं, तिथे आपल्याला चांगला भविष्यकाळ लाभेल, चांगलं आयुष्य घालवता येईल, असं त्यांना वाटे.
अनेक तरुण मुलांनी तिकडे जाण्यासाठी मनाची तयारी केली. गावातील वडीलधारी माणसं त्यांना सांगायची, तुम्हाला जर आयुष्यात काही कमवायचं असेल तर त्या पलीकडच्या गावाला जा. जाताना वाळवंटात दुर्मिळ खडे मिळतील ते गोळा करा. पलीकडच्या गावी ते खडे विकत घेणारा कोणीतरी भेटेल.
अशाच एका सकाळी दोन तरुण मुलं त्या गावाला जायला निघाली. त्यांनी बरोबर खाण्यासाठी शिदोरी आणि पाणी घेतलं होतं. सुरुवातीला वाळवंटातील वाळू अजून थंडच होती. सूर्याचे ऊनही तापलं नव्हतं. प्रवास तर छानच चालला होता. त्यांना जराही थकवा जाणवत नव्हता. ते वेगानं पुढे निघाले. काही वेळाने सूर्य डोक्यावर आला. वाळू तापू लागली. ते बराच वेळ चालत होते. आता बहुतेक आपण वाळवंटाच्या पलीकडच्या बाजूला पोचलो असू म्हणून त्यांनी जवळची शिदोरी उघडून जेवून घेतलं आणि पोटभर पाणी पण प्यायलं, पण लवकरच त्यांच्या लक्षात आलं अजून निम्मं वाळवंटसुद्धा पार करून झालं नव्हतं.
एकीकडे चालता चालता ते रस्त्यात सापडलेले दुर्मिळ खडे वेचत होते. पलीकडच्या गावी नेऊन विकण्यासाठी! लवकरच त्यांच्या जवळच्या थैल्या खड्यांनी भरून जड झाल्या. त्यांच्यातील एका मुलाने विचार केला हे काही खरं नाही. आपण हे खडे फेकून द्यावे आणि परत जावं, हे बरं; पण तो दुसरा मुलगा त्याला म्हणाला, आपण आपल्या वडीलधाऱ्यांचं ऐकलं पाहिजे. काय वाट्टेल ते झालं, तरी आपण हे वाळवंट पार करून पलीकडच्या गावी जायलाच हवं.
परंतु त्या पहिल्या मुलानं ते काही ऐकलं नाही आणि तो परत फिरला. दुसरा मुलगा मात्र त्या गावाच्या दिशेने चालतच राहिला. प्रवास खडतर होता. एकतर  गावी जावं; पण श्रद्धा आणि आशा या दोन गोष्टींच्या बळावर तो तसाच चालत राहिला. दीर्घकाळ चालल्यानंतर अखेर तो पलीकडच्या गावी जाऊन पोचला. त्या गावात शिरल्यावर मात्र त्याची घोर निराशा झाली. इतर कोणत्याही गावासारखंच गाव होतं ते. जवळच एक धर्मशाळा होती. अंधार होत चालला होता आणि तो खूप थकला होता. मग त्याने रात्र तिथेच घालवायची ठरवली.
दुसरा दिवस उजाडला. त्याला वाटलं हे जड खड्यांचं ओझं द्यावं फेकून आणि सरळ आपल्या गावचा रस्ता धरावा… त्याने आपली थैली उघडली. बघतो तर काय! त्या सगळ्या मोठमोठ्या खड्यांचे आता हिरे झाले होते. क्षणार्धात तो कोट्याधीश झाला होता.
मॅडम, तुम्हाला आठवतं… त्या वेळी तुम्ही आम्हाला या गोष्टीचा खरा अर्थ समजावून सांगितला होता. विद्यार्थीदशा ही वाळवंटासारखी असते. परीक्षा म्हणजे सूर्याचा दाह. आयुष्यात येणाऱ्या अडचणी या तप्त वाळूसारख्या असतात. अभ्यास म्हणजे तहान आणि भूक, विद्यार्थी असताना एकट्यानेच प्रवास करावा लागतो, ज्ञान आणि कौशल्याचे हिरे जमा करावे लागतात. आपण हे जितके जास्त जमा करू, तितकं आपलं पुढील आयुष्य सुखात जातं.
तुमची ही गोष्ट ऐकल्यावरच मी ठरवलं, कितीही अडचणी आल्या तरी आपण शिकायचं. मी दृढ निश्चयाने सर्व संकटांचा सामना करत शाळेचं शिक्षण पूर्ण केलं. सर्विस स्टेशनच्या मालकानेही खूप मदत केली मला. मला जेव्हा उत्तम गुण मिळाले, तेव्हा त्याने माझ्या ऑटोमोबाईल डिप्लोमाच्या शिक्षणाची फी भरली. मी एकीकडे शिकत होतो आणि एकीकडे काम करत होतो. पुढे मी बँकेकडून कर्ज घेऊन हे गॅरेज सुरू केलं. ईश्वराच्या कृपेने मला यश मिळत गेलं. मी माझं सर्व कर्ज फेडलं आहे. मी आता पूर्णपणे कर्जमुक्त आहे.
मॅडम, त्याचं असं आहे… श्रीमंत माणसांना काहीही नवीन सुरू करायचं, म्हणजे भीती वाटते. त्यांना वाटतं, नवीन धंदा चालला नाही तर आपले सगळे पैसे पाण्यात जातील. पण मला काही गमावण्याची मुळी भीतीच नव्हती!
हे तर मी माझ्या स्वत:च्या आयुष्यातील अनुभवानेसुद्धा शिकले होते.
मग आता गोपाल कुठे असतो?
त्याने तुम्ही सांगितलेल्या दुसऱ्याच एका गोष्टीचा पाठपुरावा केला. रामचा चेहरा दुःखी दिसत होता. 
का? काय झालं?
तुम्ही आम्हाला अजून एक गोष्ट सांगितली होती. गोपालची स्थिती आज त्या गोष्टीसारखीच आहे. एका वाळवंटात एक लांडगा राहत होता. एक दिवस सकाळच्या वेळी तो चालला असताना त्याचं स्वतःच्या सावलीकडे लक्ष गेलं. ती सावली त्याच्याहून बरीच मोठी दिसत होती. ती सावली इतकी प्रचंड मोठी होती, की त्याने विचार केला आज दुपारच्या जेवणासाठी आपण एखाद्या उंटाची शिकार करावी. मग तो उंटाच्या शोधात बराच वेळ भटकत राहिला. वाटेत त्याची नजर कितीतरी छोट्या प्राण्यांवर पडली; पण त्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. खरं तर छोटे छोटे प्राणी पकडणं त्याला सहज शक्य होतं. अखेर सायंकाळ झाली तरी त्याला उंट काही मिळाला नाही. एव्हाना त्याची सावली त्याच्यापेक्षा खूपच लहान झाली होती. अखेर त्याने उंटाऐवजी उंदराचा शोध घेण्यास सुरुवात केली.
गोपालच्या बाबतीतही हेच घडलं. तो नेहमी स्वतःच्या आवाक्याबाहेरच्या गोष्टी करायला जायचा आणि त्यात त्याला अपयश यायचं. त्याची तर माझ्याबरोबर येथे काम करायचीसुद्धा इच्छा नाही. आता तो एका ऑफिसात पट्टेवाला आहे.
मी आश्चर्याने थक्क झाले…‌ मी कधी काळी सांगितलेल्या एका छोट्याशा गोष्टीने त्यांच्या आयुष्यात केवढं विलक्षण परिवर्तन घडून आलं होतं. मी त्यांना त्या गोष्टी जेव्हा सांगत असे तेव्हा त्याचा एवढा मोठा परिणाम घडेल, अशी तर मी कधी कल्पनाही केली नव्हती. मुळात या कथा काही मी स्वत: लिहिलेल्या नाहीत. त्या मला नक्की कुणी सांगितल्या, हेही मला आता आठवत नाही. या कथा ज्या कुणाला सुचल्या असतील, त्याला मी मनोमन वंदन करते. आज इतक्या वर्षांनंतर मुलांच्या मनावर त्या गोष्टींचा एवढा सखोल परिणाम होईल, असं त्या लेखकाला किंवा लेखिकेला वाटलं तरी असेल का?
 (सुधा मूर्ती)
-------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...