गुरुवार, ११ मे, २०२३

317. बाबा , समजायचं असतं हो...

       हॅल्लो...रेड्डी...थ्री..टु..वन् ..गेट ..सेट...अॅन गोऽऽऽ.. गेम सुरु झाला. नातुबा मोबाईलवरचा गेम दाखवत होता. स्वर्ग सुख ,स्वर्गसुख म्हणजे तरी काय हो? जेंव्हा आपला नातु मोबाईलवरची फंक्शने आपल्या ईवल्या ईवल्या बोटांनी बटणे दाबत गुरुच्या थाटात आपल्याला शिकवतो ना, तो क्षण म्हणजे  स्वर्गसुखच. तो एक वेगळाच आनंद असतो. एरव्ही आपण त्याचे गुरु असतो,पण ते गेम खेळतांनाचे कसब तो आपल्याला लहान बाळासारखं शिकवतो ते ऐकण्यात एक आनंद असतो. त्याच्या बोबड्या बोलांना ऐकतांना अंगावरुन अलगदपणे मोरपीस फिरत असल्याचा फिल येतो. कारंज्यांच्या रिमझीम वर्षावात न्हात असल्याचा भास येतो. आज तो आनंद अनुभवला.  नातुबा मला मोबाईलचा गेम दाखवत होता. त्याची फिरणारी बोटे ,नि बोबड्या बोलात चाललेली काॅमेंट्री मला सुखद आनंद देत होती. मोबाईल गेम दाखवत असतांना तो जो माहीती देत होता,ती ऐकुनच मी अवाक् झालो. या एवढ्या टिभ्या चिमुरड्यांना एवढी कशी हो माहीती? नि किती ज्ञान ही हो..
       जे आपल्याला तरुणपणी कळत नव्हते,ते यांना बालवयातच सर्व कळतय म्हणुन मी आश्चर्य चकीत होतो,पण त्या स्वर्गानंदाचाही आनंद घेत होतो. त्यावेळी मला बरेच माहीत नसायचे. मग मी शंका विचारायचो. त्याचे तो व्यवस्थित निरसन करायचा. त्यामुळे मुद्दामच मग मी त्याला वेडेवाकडे प्रश्न ही विचारायचो. जेणेकरुन त्याचे ते समजावणे मला ऐकायला मिळायचे, हां चला आता गेम स्टाट झाला. ही थ्री डी बाईक गेम बरं का. आता हा ट्रॅंकलीन. त्याने सुरुवात केली. पण याचे नाव ट्रॅंकलीॅन कसे ? माझा बालीश प्रश्न. अहो आपण मनात ठेवायचे.
असं असं.  छगन, मगन, दगडु, धोंडु,शेणपडु, ऊखल्ला अशा नावांत जन्म गेलेल्या माझ्या सारख्या बुढ्याला हे नाव जरा जडच. हां चला आता याला कोणता ड्रेस घालायचा? अरे बापरे आपण घालायचा? नाही हो येथुन सिलेक्ट करायचा. सदरा चड्डी. अहो हे काय? सदरा चड्डी? नाव सांगा. अच्छा ड्रेसला नावे असतात का? आपण हा सिलेक्ट करु? असं म्हणत त्याने एक ड्रेस चढवला. क्रिप्सी जीन्स. आता  ही  पिशवी कसली? अहो ती सॅक असते बाबा, ठिक आहे. सॅक तर सॅक,  हं आता कोणती टु व्हिलर?  "राजदुत"मो.सा मी आपली जुन्या जमान्याची याद केली.
काय असते ही? अरे आमच्या काळातली फेमस मो,सा..जाउ द्या फोर व्हिलर सांगा. "अॅम्बेसेडर..,," पुन्हा जुना जमाना. आ? काय? अरे आमच्या काळातली फेमस फोर व्हिलर., नही नाही,आताची सांगा..रिसेंट., मारुती..माझी मोठ्यात मोठी ऊडी. काय हो बाबा?दुसरी सांगा,चला थार गाडी घेतो. बापरे कोन्ती अस्तेरेही, चाचरतच मी विचारले. एव्हाना त्याची थार स्र्किनवर अवतरली होती, तो गडी गाडीत बसला. कोणत्या गावाला जायचे? धुळ्याला.. अहो लांबचे सांगा.. मुंबँई.. माझी छलांग जाऊन जाऊन मुंबई पर्यंतच. अहो अजुन दुरचे. दूऽऽऽर चे सांगा
चला आपण गोवाला जाऊ. असं म्हणत ती गाडी सुसाट गोव्याला निघाली. ती रोडवर पळायची,तर कधी फुटपाथवर ,तर कधी लाॅनवर धावायची,तर कधी रेल्वेच्या पट्यावर ही धुम ठोकायची. अरेरेरेरे हे काय रे बाळा? तुझी गाडी तर रेल्वेच्या रुळावरुन ही धावतेय. अहो बाबा,ईतकं पाहायचं नसतं. धावतेय ना..पुढे पळतेय ना..बस्स.,
चला चला आता हे आले गोवा. आं..? कुठे आहे ते? येथे तर दिसत नाही? अहो बाबा ते समजायचं असतं,
        हैततेची..असं असतं का? अरे समुद्रही दिसत नाही तेथे? समजायचं असतं हो, हं आता जेवण करु या, गाडी हाॅटेल जवळ थांबली. दोन मिनिटात तो हिरो हाॅटेलात जावुन परत  बाहेर आला. अरे एवढ्यात जेवण झालं? अहो बाबा समजायचं असतं ते. अरे तो पडला ना,त्याला लागलं असेल. काहीच लागलं नाही असं समजायचं हो. असा आमचा गेम चालु होता. आणि हळुच तो मला सुचवत होता.असं समजायचं असतं बरं का. असं समजायचं. हां समजा आता तो झोपला. आता उठला, आता भुक लागली, आता पोट भरलं, आता आनंदी आहे. वगैरे वगैरे तो बोलत होता.गेम मध्ये रमत होता,असंतसं समजुन टाळ्या पिटत होता. आणि मी मात्र त्या बालकाच्या "समजायचं असतो हो बाबा" अशा शब्दांच्या धाग्याने चिंतनाच्या गावात पोहचुन मनन करत होतो. 
       खरच ही बालके भातुकलीचा खेळ खेळतांनाही असंच समजुन घेतात. एकाच मातीच्या ईवल्याशा भांड्यातुन भात,वरण,श्रीखंड वाढतात. पाणी मागीतलं तर त्याच भांड्याने देतात, बळे बळे पैसे घेतात. बळेबळे जेवतात. बळेबळेचा संसार थाटतात, आणि मस्त मजेशीर खेळतात. केवळ असे समजुन घेतात म्हणून..ते आनंदी असतात.
काश ! जीवन जगतांना "असं समजण्याची"कला अवगत झाली तर? अहो दुःखातही आनंद  समजायचा. उपाशी पोटाला भरलं पोट समजायचं. गरीबीला श्रीमंती समजायची. कुणी आपली निंदा  केली तर तिला स्तुती समजायची. चटणी भाकरीला मेजवाणी समजायची. संकटांना चुनौती समजायची. दुर्धर आजारांना मित्र समजायचे. संघर्षांना मजा समजायचे. नेमकं हे समजणं,आपल्याला जमत नाही म्हणुनच सर्व सुख सुविधा असतांनाही आपण दुःखी असतो. सगळी कडे आनंद असतांना आपण उदास असतो, हे "समजणं" समजायला हवे.
खरच त्या बालकाने खेळलेल्या गेममध्ये असं समजण्याने किती रंग भरत होता. भ्रामक पडद्यावरच्या त्या आभाषी प्रतिमांमधुनही जीवन नावाच्या गेमच्या क्लृप्त्या प्रतिबिंबीत होत होत्या. बाबा,चला..आता गेम ओव्हर झाला. आपल्याला हंड्रेड मार्क्स मिळालेत बरं का? नातवाने माझी तंद्री भंगवली. जीवनाच्या वाळवंटाला मी ही नंदनवन समजलो.अश्रुंना फुलं समजलो. अमावस्येला पौर्णिमा समजलो. काट्यांना फुल समजलो, खाचखडग्यांना पायघड्या समजलो. अखेर समजायला काय हरकत आहे हो? शेवटी त्या गेम सारखच हंड्रेड मार्क्सही मिळतीलच की., 
समजा तो धोत्राभी सुगंधी फुल बन जाता है
वर्ना ना समजा तो मिठा आम भी  बभुल बन जाता है
मेरे स्वभाव भी मुलायम है मोमकी तरह
आजाए कोई गमका दुश्मन तो त्रिशुल बन जाता है
ना दिवार ना दरवाजा सिधा साधा घर मेरा
लेकीन जब समजता हुॅं तो वो भी गोकुल बन जाता है

जगण्याला जगणं समजलं तर जगणं असतं
ना समजलं तर जगणं ही मरणं असतं.
आनंदला आनंद समजलं की आनंदी आनंद असतो.
ना समजलं तर आनंदातही आनंदाचा आनंद नसतो.
समजलं तर कांट्या कांट्यातही गुलाबाची फुले असतात
नाही समजलं तर गुलाबाच्या ताटव्यातही टोचणारे कांटे भासतात.

मी आपला विचारांच्या तंद्रीत गुंग झालो आणि आनंदी जीवनाचे सुत्र सांगणारा माझा नातु गेम खेळता खेळता झोपी गेला.

©  M.K  भामरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...