शुक्रवार, १९ मे, २०२३

342. एक सांत्वन...

 आजच्या पिढीतील व्यक्तीने केलेले एक सांत्वन
“बंटी,काय करतोयेस” आईनं विचारलं. 
“गेम खेळतोय” मोबाइलवरची नजर न हटवता बंटीनं उत्तर दिलं.
“राजला फोन कर”
“कोण राज???”
“तुझा मावसभाऊ, सुमा मावशीचा मुलगा,”
“मी कशाला फोन करू?”
“अरे,त्याचे वडील गेले.”
“मग!!”
“अशी घटना घडली की  भेटायचं असतं. तू काही जाणार नाहीस निदान फोन तरी कर. तुम्ही एकाच वयाचे आहात”
“त्याचा काय संबंध,”
“मी सांगते म्हणून फोन कर.”
“फोर्स करू नकोस. काही फोन बिन करणार नाही तसंही आमचं रिलेशन फक्त नावलाच आहे.”
“दोन मिनिटं तर बोलायचयं. मित्रांशी कसा तासनतास बोलतोस.”
“उगीच मित्रांना मध्ये आणू नकोस.” बंटी चिडला. 
“मग फोन कर.”
“आता तर मुद्दाम करणार नाही”
“बंटी, डोकं फिरवू नकोस. फोन कर” 
“नाही म्हणजे नाही”
“अशावेळेस मन सैरभिर होऊन खूप खूप एकटं वाटतं, या दु:खाच्या वेळी धीर देणं आपलं कर्तव्ययं. ”
“माझ्या फोननं असा काय फरक पडणारये.”
“ही जग रीत आहे.. ”
“तू पाळलीस ना. मला आग्रह करू नकोस.  आठवीत असताना तीन वर्षांपूर्वी भेटलो त्यानंतर राजची भेट नाही.”
“काही फरक पडत नाही. राजचा मोबाईल नंबर पाठवलाय.”
“आई, नको ना. काय बोलू काहीच माहिती नाही.”
“फोन कर.आपोआप सुचेल” माय-लेकात बराच वेळ वाद चालू होता. बंटीच्या प्रत्येक प्रश्नावर आईकडं उत्तर होतं. शेवटी बंटी तयार झाला.
“तू तुझ्या कामाला जा. मी कॉल करतो. अशी समोर उभी राहून टेंशन देऊ नको.”
“ओके, शहाणा माझं बाळ!” बंटीच्या डोक्यावरून हात फिरवून आई किचनमध्ये गेली.
बंटीच्या मनात विचारचक्र सुरू झाले. राजचा नंबर डायल करायची हिंमत होत नसल्याने चलबिचल वाढली. शेवटी नंबर डायल केला.रिंग वाजत होती अन बंटीच्या छातीतली धडधड वाढली. 
“हॅलो, राज”
“येस, कोण?”
“मी बंटी”
“सॉरी,मी ओळखलं नाही.”
“मीनू मावशीचा मुलगा. आपण फोनवर पहिल्यांदाच बोलतोय”
“आता लक्षात आलं. बोल!!”
“तुझ्या पप्पांबद्दल कळलं. सॉरी यार!!”
“हंsssम”
“कसायेस आणि मावशी कशीयं?”
“थॅंक यू फॉर कॉल. मी ओकेयं पण ममा सारखी रडतेय आणि मला रडायलाच येत नाही त्यासाठी बाकीचे माझ्यावर प्रेशर टाकतायेत.”
“म्हणजे?”
“सगळं इतकं अचानक घडलंय की काहीच समजत नाही. रात्री अकरापर्यंत छान गप्पा मारणारे पप्पा सकाळी उठतच नाही. इट्स शॉकिंग, अनबिलिवेबल, लाईफ एकदम फ्रीज झालंय. कसल्याच फिलिंग नाहीत.”
“माहिती नाही अशावेळी काय बोलायचं? पण आईनं खूप आग्रह केला म्हणून खरंतर फोन केला.” बंटी 
“मला आवडलं”
“काय??”
“खरं बोललास ते. खूप लोक येऊन भेटतायेत. फोन तर चालूच आहेत. सारखं तेच तेच ऐकुन जाम बोर झालोय. सगळे तेच ते बोलतात.” नंतर बराच वेळ बंटी आणि राजचा फोन चालू होता.
“बंटी, तुझ्याशी बोलून भारी वाटलं.घरी ये ना"
“उद्या येतो. पिझ्झा आणू की बर्गर”बंटीनं विचारलं.
“दोन्ही चालेल”उत्तर देताना राजला एकदम भरून आले.
“राज !”
“पप्पाची खूप आठवण आली. ते सुद्धा पिझ्झा की बर्गर असंच विचारायचे अन माझं ‘दोन्ही’ हे उत्तर ठरलेलं. बंटी, माझे पप्पा खूप चांगले होते. त्यांच्या अचानक जाण्यानं काय नुकसान झालंय, मी काय गमावलं हेच समजत नाहीये. आठवडा झाला पण अजून डोकं सुन्न आहे. हजारदा पप्पांचा नंबर डायल केला. अजूनही वाटतं फोन उचलून नेहमीच्या प्रसन्न आवाजात म्हणतील ‘बोल डार्लिंग !!! पण ........” राजला पुढं बोलता येईना त्यामुळे त्याला शांत कसं करावं हे न समजल्यानं बंटीचा गोंधळ उडाला परंतु राजनंच स्वतःला सावरलं. 
“सॉरी, जरा इमोशनल झालो”
“इट्स ओके, आपण भेटूच. बरं झालं मी फोन केला.” बंटी 
“तुझ्याशी बोलल्यावर खूप रीलक्स वाटतंय. गेला आठवडाभर ‘बिचारा’,’वाईट झालं’,काळजी घे’ ‘आईला आता तुझाच आधार आहे’ हेच सारखं सारखं कानावर पडत होतं. आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आलीय असं वाटतं होतं. माझ्या बाजूने कोणी विचारच करत नव्हतं. ममाला अजून त्रास होईल म्हणून तिच्याशी बोललो नाही. पण तू फोन केलास पण आपलं ट्यूनिंग जमलं. थोड मन हलकं झालं” राज.  
“टेक केअर”
“येस. प्लीज उद्या ये, बाय” राजचा आवाज कातर झाला तेव्हा आलेला हुंदका बंटीनं कसाबसा आवरला आणि किचनमध्ये जाऊन आईला बिलगल्यावर बंटी डोळ्यातल्या पाणी रोखू शकला नाही.
एक संपलं, पण सांत्वन कॉलनं दुसरं नातं रिचार्ज झालं.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...