गुरुवार, ११ मे, २०२३

327. समतोल कृष्ण...

        मला जर कोणी विचारलं की कृष्ण म्हणजे काय हे एका शब्दात सांग तर मी त्याचं उत्तर समतोल असं देईन. आयुष्यात समतोल कसा साधावा हे कृष्ण शिकवतो. मग तो यमुनेचा काठ असू दे वा कुरूक्षेत्राचं रण, रासलीला असू दे वा युद्धकला, राधेची प्रिती असू दे वा मीरेची भक्ती, जन्मदात्री देवकी असू दे वा पालनकर्ती यशोदा, कृष्ण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समतोल साधतो. 
       आपण जर कृष्णाचे आयुष्य पाहिले तर तो विष्णूचा आठवा अवतार, त्याची जन्मतिथी अष्टमी, जन्मवेळ मध्यरात्री १२ वाजता, देवकी आणि वसुदेवाचे आठवे अपत्य, कृष्णाच्या लग्नाच्या बायका ८, ज्या बायकांना सोडवून तो त्यांचा पती अर्थात पालक झाला त्यांची संख्या १६,०००, श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद् गीतेचे अध्याय १८, गीतेतले एकूण श्लोक ७००. हे सगळे आकडे जर नीट पाहिले तर या सम संख्या आहेत. इतकच कशाला श्रीकृष्णाचा रंग पाहिला तरी त्यात समतोल आढळतो. ना तो काळा आहे ना गोरा आहे. तो सूर्यासारखा तेजस्वीही आहे आणि चंद्रासारखा शीतलही. तो अग्नीसारखा दाहकही आहे आणि पाण्यासारखा प्रवाहीसुद्धा. तो विरक्तही आहे आणि आसक्तही. जेवढा नटखट, चंचल आहे, तेवढाच स्थितप्रज्ञही, तो नियम मोडणारा आहे, पण नितिमत्ता पाळणारा. तो धर्माने चालणाऱ्याला मार्गही दाखवतो आणि अधर्माने वागणाऱ्याला शासनही करतो. कालानुरूप त्याच्या भूमिका बदलतात. परिस्थितीनुसार निर्णय बदलतात. पण असे असतानाही प्रत्येक भूमिकेत, प्रत्येक निर्णयात ठसठशीत दिसतो तो समतोल. मग लोक आपल्याबद्दल काय म्हणतील, काय लिहीतील याची त्याला परवा नसते. कारण कृती करण्याआधी त्याने पूर्ण विचार केलेला असतो. तो अर्जुनाला रणसंग्रामासाठी प्रोत्साहन देतो, पण प्रसंगी स्वतः मात्र रणछोडदासही होतो. बालपणी गोपिकांचे कपडे लपवणारा कान्हा, मयसभेत पांचालीचा तारणहार होतो. क्षणार्धात अनेको दैत्यांचा संहार करणारा तो, शिशुपालाचे मात्र १०० अपराध पूर्ण होण्याची वाट बघतो. तो रूक्मिणीला जवळ करतो, पण सत्यभामेला अंतर देत नाही. तो मुरलीधर ज्या मुखातून बासरीचे सुर छेडतो, त्यातूनच युद्धाचा शंखनादही करतो. लहानपणी जे हात नवनीताने लडबडलेले असतात, तेच हात रणांगणात पार्थाच्या रथाचे दोरही सावरतात. त्याचे मोरपंख हाताळणे जेवढे नाजूक असते, चक्र चालवणे तेवढेच घातक. तो अर्जुनालाही उपदेश करतो आणि दुर्योधनालाही. कौरवांनाही समज देतो आणि पांडवांनाही. जिथे शब्दाचा मार पुरेसा असतो तिथे तो गीतेचा उपदेश करतो, जिथे शब्द अपुरे पडतात तिथे तो शांतीदूत असूनही विराट रूप दाखवतो. आलिशान महालातले पंचपक्वान ग्रहण करणारा तो द्वारकाधीश, सुदाम्याचे पोहे पण तेवढ्याच प्रेमाने खातो. जेवढ्या भक्तीभावाने तो भजन-किर्तनातून आठवला जातो, तितक्याच श्रद्धेने गण, गवळण आणि तमाशातून गायला जातो.
       माझ्यामते आज कृष्णाकडून हा समतोल शिकण्याची सर्वाधिक गरज आहे. कारण आज आपल्या आयुष्यातून हा समतोलच हरवत चालला आहे. आचार, विचार, आहार, भावना, राहणीमान, भूमिका या प्रत्येक बाबतीत तो हरवतोय. विद्यार्थीदशेत असताना शालेय अभ्यास-Extra curricular activities ते आजच्या काळात फार सातत्याने वापरली जाणारी संज्ञा Work-Life Balance अशा प्रत्येक बाबतीत समतोल साधता येणे गरजेचे आहे. इतकच कशाला अगदी समाजमाध्यमांवरचा वावर आणि खरे आयुष्य यात समतोल साधणे आज अत्यावश्यक आहे. हा समतोल ज्याला साधता येतो तो तरतो. अर्थात तारून नेणारा तो योगेश्वरच असतो. त्याने दाखवलेल्या 'गीता' नावाच्या मार्गावरून प्रवास सुरू झाला की आयुष्यात समतोल साधण्याची कला आपोआप अवगत होते. मग संकटांचा, दुःखांचा, आव्हानांचा कितीही मोठा 'गोवर्धन' कोसळला तरी तो एका करंगळीवर पेलता येतो.

संकलन : श्री. अर्जुन कृष्णात पाटील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...