शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

449. सगळ्यांना कलेक्टर होता येईल का ??

         एका जाहीर व्याख्यानात विविध करिअर्स ची माहिती सांगत असताना  मी सगळ्यांना उद्देशून प्रश्न विचारला ,''कलेक्टर कुणाकुणाला व्हायचेय ?'' समोर सहाशे च्या वर संख्या होती. जवळ जवळ ९०% विद्यार्थ्यांनी हात वर केला. विशेष म्हणजे आयोजकांपैकी अनेक तरुणांनी पण होकार दर्शविला. अगदी, फोटो काढणाऱ्या पंचविशीतल्या फोटोग्राफर ने सुद्धा एका हातात कॅमेरा आणि दुसरा हात वर सरकवला. व्यासपीठावरील सन्माननीय सदस्यांनी कौतुकाने टाळ्या वाजवल्या. 
     आता मला प्रतिक्रिया द्यायची होती. मी सगळ्यांना हात खाली घ्यायला सांगितला. स्पर्धापरीक्षांमधील करिअर, त्याचे माहात्म्य, अधिकारी झाल्यावर कर्तृत्व दाखविण्याची मोठी संधी  हे सांगतानाच त्यातील काळजी, समस्या, अडचणी , काठिण्य अशा सगळ्या बाबी सांगणे खूपच गरजेचे असते. एकाच तालुक्यातील चारपाचशे युवक कलेक्टर होण्याचे स्वप्न पाहतात, हे जितके सकारात्मक आहे  तितकेच काळजी करण्यासारखे आहे. अहो, सगळ्यांना कसे कलेक्टर होता येईल ?साधारणपणे बारा पंधरा लाख उमेदवार या परीक्षेला देशभरातून बसतात. त्यातील कलेक्टर वरच सर्वांचे लक्ष्य असते. म्हणजेच मुख्यतः आय ए एस. आय ए एस मध्ये वर्णी लागण्यासाठी पहिल्या चार पाचशे मध्ये नंबर लागणे गरजेचेच असते. कारण यासाठीच्या राष्ट्रीय स्तरावरील जागा  दोनशे तीनशे  पेक्षा  जास्त नसतात. आपण पहिले पाचशे धरुयात. म्हणजे समजा  दहा लाख जण बसले, तर पहिल्या पाचशे .. समजा  पहिल्या हजार...पहिल्या हजार मध्ये येणे हे भयंकर अवघड आहे. अवघड आहे म्हणून बसायचे नाही असे अजिबात नाही. पण नुसतेच बसायचे म्हणून आपण बसायचे का या परीक्षेला ?  मी ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी हे पाहतो. स्पर्धा परीक्षा हाच जणू एकमेव करिअर मार्ग आहे , असे त्यांना वाटते. माझ्या मते स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होणे हे भारतातील सरकारी नोकरी मधील सर्वोच्च यश नक्कीच आहे. ते मोठेच करिअर आहे. पण कलेक्टर ,सॉरी , आय ए एस का व्हायचे हे जाणीवपूर्वक ठरते कि उगीच असेच मोठे स्वप्न पाहायचे म्हणून ?  कितीही विद्यार्थी बसले तरीही अंतिम उत्तीर्ण होणारे मोजकेच असणार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातील , कष्ट आणि संघर्ष  करून तळमळीने शिकणारे पास होतायेत, यशस्वी होणाऱ्यांमध्ये हुशार, गरीब, होतकरू , ग्रामीण भागातील यांची संख्या कौतुकास्पदरित्या मोठी आहे. खरी सामाजिक आस्था असणारे चांगले प्रामाणिक काम करतीलच, पण पास  न होणारे, वय वाढल्यामुळे समस्यांनी ग्रस्त , नोकरी नाही, लग्न लांबले , करिअरचा बोऱ्या वाजला असेही अनेक जण या स्पर्धापरीक्षेच्या नावाने अपयशी झालेल्यांच्या व्यथा  आहेत. 
        प्रामाणिक अधिकारी होणार असाल, खूप नियोजनबद्ध अभ्यास करणार असाल, सातत्याने आणि एकाग्रतेने कष्ट करणार असाल तर करा स्पर्धा परीक्षांची तयारी. दोन वर्षे पदवीनंतर द्यायलाही हरकत नाही. पण त्यापेक्षा जास्त शक्यतो नको. निर्णय वैयक्तिक आहे, पण परिणाम अनेकांवर असल्याने आणि तुमच्यावर अनेक जण अवलंबून असल्याने जपून विचार करावा.  खरे तर अभ्यास आधीच चालू केला असेल तर ती दोन वर्षेही वाचतील , असे नियोजन करावे.  मी या करिअरला नॅरो एन्ड करिअर्स म्हणतो. बसणारे खूप आणि पास होणारे कमी यासाठी. क्रिकेट , चित्रपट, एन डी ए , मेडिकल ही  सुद्धा अशीच करिअर्स आहेत. (दर्जेदार करिअर्स अशीच असतात. आपण या सर्व करिअर्सचा सन्मानचं करतोय.) यूपीएससी ला मात्र पर्याय ठेवावा का हा चर्चेचा विषय आहे ज्याचे उत्तर ज्याने त्याने आपल्या हिशोबाने द्यावे. तसाच मुद्दा पदवी कोणत्या शाखेतून करावी यासाठी आहे. याला कोणताच नियम नाही. आर्टस् घेतले तर यूपीएससी च्या अभ्यासाला जास्त वेळ मिळेल पण बफर करिअर जरा कष्टाचे राहू शकेल. इंजिनीअरिंग सारखी शाखा निवडली तर पर्यायी करिअर आश्वासक आहे पण दरम्यानच्या काळात यूपीएससी च्या अभ्यासाला जास्त वेळ देता येईल का , हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तर स्पर्धा परीक्षा या अर्थांनी आपल्या वैयक्तिक निर्णयांवर , शिस्तबद्ध  प्रयत्नांवर आणि किंचितशी  नशिबावर अवलंबून आहे. पण नुसते नशीब बिशीब असून काही होणार नाही, इच्छाशक्ती सर्वात जास्त महत्वाची. कुणी शिकविण्यापेक्षा  वैयक्तिक अभ्यास अधिक उपयुक्त. पण जिथे अडेल तिथे विचारण्यासाठी ची व्यवस्था असायला हरकत नाही. तर , सगळे जण कलेक्टर होणार का ? हा चिंतेचा विषय आहे. अनेकांना स्पर्धा परीक्षांना प्रवृत्त करणे , हे काही बरोबर नाही. एक जण मला म्हणाले, आपल्याकडे स्पर्धापरीक्षांच्या अवेअरनेस कमी आहे. मी हसून म्हणालो, अहो खूप झाला आता. खूप खूप डोंगरदऱ्यांपर्यंत एम पी एस सी , यु  पी एस सी पोचले आहे.  आता बास. चालू करिअर मधून कुणाला अस्थिर करणे, चुकीचे आहे. देशाला दर्जेदार अधिकारी मिळावेत, याबाबत मात्र दुमत नाही. मात्र  खोटी स्वप्ने नकोत. निर्णय व्यवहारिकपणे आणि समंजसपणे  घ्यावा. उलट खेड्यापाड्यातील घरांमधून अपेक्षा असतात, मुलगा -मुलगी शिकली, आता नोकरी करून कुटुंबाला हातभार लावतील . पण स्पर्धापरीक्षांच्या नाद लागला , आणि यश नाही मिळाले , तर अनेक वर्षे वायाला  जाणे , आणि अशी अनेक-असंख्य-हजारो मुलांची वर्षे व्हायला जाणे हे देशाच्या हिताचे नाही. अर्थशास्त्राच्या नियमानुसार कमावती पिढी अर्थार्जन करत नसेल तर इकोनोमी स्टॅग्नन्ट होऊ शकते , संबंधितांची. त्यामुळे उत्तम अधिकारी निश्चितच व्हावेत, ते अगदी होतकरू युवक युवतींमधून व्हावेत पण त्यासाठी त्यांची बेसुमार संख्या हा काळजाचा ठोका चुकवणार मुद्दा आहे. 
         हे वाचूनही ज्यांना वाटते कि तरीही मी आय ए एस साठीच तयारी करणार , त्याला नक्कीच शुभेच्छा  आहेत. जोरदार अभ्यास करा. मात्र ज्यांना संभ्रम वाटतोय त्यांनी ताबडतोब आपापल्या करिअरच्या दिशेने कूच करावे. नोकरी, उद्योजकता ही सुद्द्धा मोठी करिअर्स असतात. त्यात सुद्धा छान काम करणारी माणसे हवी आहेत. आय ए एस साठी जेवढ्या शुभेच्छा तेवढ्याच याही करिअर्स साठी शुभेच्छा !!
- प्रा. विजय नवले 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...