शनिवार, ५ ऑगस्ट, २०२३

451. पुरूष सुक्त...

          आज एका काॅन्सटेबलने पालघर येथे अंधाधुंद गोळीबार केला त्यात काहीजणांचा मृत्यू झाला. खरतर पोलीस हे कायद्याचे रक्षक असतात तरीही त्यांच्या हातून असं कृत्य घडाव ? काय कारण असेल बरं या मागे ? 
          काल अचानक पोलीस स्टेशन मधून फोन आला, " मॅडम जरा मदत हवी आहे येता का लवकर?" जाऊन पहाते तर तिशीतल्या दोन मुलांना पोलिसांनी पकडलं होतं त्या दोघांनी एका छोट्याशा मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला होता.त्यांच्याशी बोलताना खुप व्यथित झाले मी , त्यांनी सांगितल " आम्ही दोघं ही इंजिनिअर आहोत. नोकरी नाहीये आम्हाला. जिथे जातो तिथे नकार मिळतोय . क्वालिफीकेशनमुळे रिजेक्ट झालो असतो तर नसतं इतकं वाईट वाटलं पण रिजेक्ट होतोय ते टीशर्टची बटणं उघडी टाकून, लाडेलाडे बोलून, वेळप्रसंगी अगदी आणखी पुढची पावलं टाकून नोकरी मिळवणा-या या मुलींमुळे . नोकरी नाही तर घर नाही घर नाही तर लग्न नाही मग समाजात स्थान नाही . बर हमाली करावी तर स्टेटस आडवं येतं . मग आम्ही करू तरी काय ? " 
         खरच गोळीबार करणारा तो काॅन्सटेबल काय किंवा ही उच्च शिक्षित मुलं काय खरंच कोण चुकतं ? 
          पुरूषांना आपण जन्मजात कायम शिकवत आलोय की , " तु पुरुष आहेस तुला रडणं शोभत नाही, तु स्टाॅंगच असलं पाहिजेस . " घरात एखादा मृत्यू झाला तरीही पहा धाय मोकलून स्त्रियाच मोकळेपणाने रडू शकतात पण पुरूषांना आपल्या समाजात तशी मुभा नसते . का त्यांना मन नाही? त्यांना भावना नाहीत ? घराची जबाबदारी सांभाळताना त्यांच ही मन भावभावनांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घेतच ना? त्यांच्या ही काही इच्छा आकांक्षा असतीलच ना ? पण स्त्रीयांच्या तुलनेत पुरुषांच्या बाबतीत आपला समाज हा कायम कठोरच असतो.स्री ही नाजुक सोनसळी तर पुरूष हा रांगडा दगडासारखा हवा . द्वादश पाकळ्यांच्या भावभावनांचे त्याचे कमळरूपी मन हे कधीतरी मद मोह मत्सर या शड़रिपूंच्या बेभान लाटांनी उध्वस्त होऊ शकते ना ? 
          मग या सुखाचा मुखवटा बाळगता बाळगता हे पुरुषच एक मुखवटा होतात आणि मग मुखवट्यांच्या या जगात स्वतःचं अस्तित्वच हरवून बसतात , अन मग द्वैत अद्वैताचा आक्रंद उठतो मनात , यशापयशाच्या तराजूत स्वतःला तोलता तोलता मनात दाटून आलेले घन स्वप्न नगरीच्या पडशाळेत अलौकिक आदर्शांच्या शोधात नवनव्या ठिणग्यांनी करपून जातात.
          मग हे असे त्या आजच्या काॅन्सटेबल सारखे किंवा या मुलांसारखे पडसाद उमटतात. काय वाटतं तुम्हाला त्यांना नसतील का आव्हान  ? नसतील का त्यांना अडचणी ? कित्येकदा ऑफिस मध्येही ती स्त्री आहे तिला लवकर जाऊ दे असं म्हणून पुरूषांना जास्त काम देऊन चेपटवण्यात येतं . बदल्यांच्या वेळी ही तसच का पुरूषांना घर नसतं ? नसतं का त्यांना कुटुंब ? त्यातील जिवाभावाच्या माणसांची ओढ नसते का त्याला ? 
      पण एक मात्र नक्की खरं जबाबदा-यांच्या  या ओझ्याखाली चेपलेला हा पुरूष कधीच हरत नाही , त्याला हरून चालत ही नाही , कारण शेवटी स्री ही शक्ती असेल तर पुरूषांकडे तर्क कठोर बुध्दीमत्ता आहे. स्री ही ममतेची ज्योत तेववत असेल तर पुरूषांकडे धर्माची मशाल सांभाळण्याची जबाबदारी आहे . स्त्री ही सृजनतेच प्रतीक असेल तर पुरूषांकडे चैतन्य निर्माण करण्याची ताकद आहे . स्त्रीच्या भावमय अस्तित्वाचे गोडवे गाताना पुरूष हा परमात्म्याचं प्रतीक आहे हे विसरून चालणार नाही आणि त्याला जर जपलं नाही तर स्त्री पुरुषांची ही जीवननौका या संसार सागरात न तरता बुडून जाईल , म्हणूनच आकाशासारख्या विशाल प्रसंगी अग्नीसारख्या दाहक होणा-या या पुरुषांना आपल्या प्रेमाने भक्तीने जिंका मग पहा आपली प्रपंच रूपी नौका कशी सुरळीत भवसागर तरून पार जाईलं.

- ऋतुजा केळकर.
-  सिंधू वैभव पेपर.
- ऋतूरंग लेखमाला ७
- गुरुवार.   ०३/०८/२०२३.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...