सोमवार, २८ ऑगस्ट, २०२३

518. मी काय म्हणतोय पोरा, तु येणार हायेसा तर गाव...

 मी काय म्हणतोय पोरा, तु येणार हायेसा तर गाव शिवाराला वळसा घालुन ये !!
पोरा.., 
बऱ्याच दिसापासनं येतो येतो म्हणून खोटे वायदे करुन आखीर तु येणार म्हुनशान मी लई आनंदलो...पांढऱ्याफेक हायफाय गाडीतून येताना बायकुपोरांना  बी सोबत आण... मातुर येता येता वाकडी वाट करुन रानात जावून ये,  पिक मान टाकतं म्हंजी काय व्हतं हे स्वता बगुन घे.. शेतात जरा जपून चाल.. पावसानं गुंगारा दिल्यानं रान भेगाडलंय.. तुझ्या बायकुची उच टाचाची वहाण त्या भेगात गुतली तर साऱ्या गावात बोंबाबोंब व्हईल.. पोरांना बोटाला धरुन ठेव.. वाळलेलेली बुडखं पायात घुसतील... तुला तर ल्हानपणापासुन हे समदं माह्यती हायेस...सुकलेली पिकं बघ, मातीत गेलेला खर्च बघ...पिकाला एखाद्या अट्टल जुगाऱ्यासारखे आवंदा बी फुक्कट पैसे लावले म्हुणशान मला बोल लावू नकोस...कितीतरी येळा जुगार हारलो पण हार मानली नाही... मिरीग नक्शत्र लागलं की जुगाराचा एक डाव खेळुन बघायचाच, असं अंगात वारं भरतं बग.... पण जव्हा जव्हा जितलो व्हतो तो पैका तुझ्या मायच्या औषधपाण्याला कात्री लावून तुझ्या शिक्शनालाच लावला व्हता....माझ्या अंगावर कापडं चोपडं हायेत का नाही याची मला कधीच फिकिर नव्हती.....हां, एवढं मातुर खरं हाये की मला जुगार खेळायचं लई येसन लागलंय.... ते वाईट का चांगलं हे समजत नाय मला... पण ते काय सुटता सुटणार नाय बग.. या जुगाऱ्याचं पोरं शिकुन मोठ्ठा सायेब झालं एवढ्या आठवणीनं सुदीक मी हरखुन जातो.... आरं,, मी आख्खं आयुष्य ह्योच जुगार खेळतोय... जुगार खेळता खेळता एक दिस सरणावर जाईल बघ...जमलंच तर थोडंसक पुढं जाऊन गोठ्यात चाऱ्याविना टाचा घासणारी गायीम्हसरं बघ, बांधावर आभाळाकडं डोळं लावून बसलेली भावकीतली माणसं बघ, पण कोणाशी काही बोलू नको, तत्वज्ञानाच्या गप्पा, दुप्पट उत्पन्नाचे सल्ले तर देवूच नको, सेंद्रिय शब्दाचा उच्चार सुदीक करु नकोस...बियानं, खतं, औषधं, मशागतीवर लंब्याचौड्या गप्पा मारु नकोस..... शेतमालाचे पाडलेले भाव, चढवलेले भाव, सबसिडी, साठेबाजी, रस्त्यावर फेकलेले दुध आणिक कांदे टमाटे, आयात, निर्यात, चाळीस टक्के कराच्या चौकश्याच्या भानगडीत पडु नको...चार महिने कांदा खायचा का नाही खायचा या ईषयाला तोंड फोडु नको... ते पिकईमा, कर्ज माफी, गारपीठ, अतिवृष्टी, हमीभाव, आत्महत्या, बळीराजा, पोशिंदा, पंचनामे, स्वामीनाथन असल्या वांझोट्या ईषयाच्या वाट्याला जाऊ नकोस..."साल्या शेतकऱ्यांना कितीबी दिलं तरी बोंबाच मारत्यात...भाव आकाशाला भिडले शेतकरी मालामाल हुणार" पेपरात असलं भलतं सलतं छापुन आलेलं त्यांना सांगु नकोस.... लोक तुझं खेटरानं थोबाड रंगवतील... तोंडात शेण घालतील.... पायाखाली तुडवून रक्तबंबाळ करतील...ते गरीब हायेती पण स्वाभिमानी हायेती... लाचार नाहीती....मरेस्तोवर काळ्या आईबरोबर निष्ठा बाळगुन राहाणारी हायेती....निष्ठेचा धंदा करुन पैका कमावणारी जात नाय त्यांची.......काही लय वंगाळ बोलला तर तुझ्या आयचा पण उध्दार करायला कमी करणार नाय ते......आयुष्यात काहीही कर फक्त आईचा उद्धार होईल असं वागू नको... सारं आयुष्य करपलं तरी तरी खानदानाची इज्जत म्हत्वाची असती बघ ...तव्हा जिभेला लगाम र्‍हाऊदे...उगीच बिन वाऱ्याचं उफनीत बसु नको !! 
        गुदस्ता तू मागितलेल्या शेतीचा हिशोब तुला नी तुझ्या बायकोला द्यायचाय तसाच राह्यला व्हता .या जुगारी बापानं आयुष्यभर सुपारीचं खांडही खाल्लं नाय की पायाला पायतान आणलं नाही.  उरली सुरल्या शिळ्या भाकरीचे  कोरक्यावर दिसभर नांगर हाकलाय म्या ... माला फक्त एकच व्यसन होतं  ते दर वरसाला दर हंगामात जुगाराचं....हां बरोबर ऐकलंस तु... पुन्ह्यांदा सांगतुया.. तोच जुगार, शेतीचा...नांगरणी केली..बियानं आणुन पेरणी केली... पण पेरललं उगवलंच नाही, उगवलेलं ते सुकुन गेलं.. खळ्यात फकस्त भुस्काट आलं.... त्याच्यात थोडंफार दाणं आलं...पण भाव मिळाला नाही.... ठरुन पाडला बग... दरवर्षीच्या हिशोबाचा ताळेबंद उणे जातोय, दरवर्षी कर्जाचा डोंगर होतोय.... एक दिवस याच डोंगरात गडप होईल, कायमचा... नाय म्हणायला फुगुशान वर आल्यावर नायतर वढ्याच्या बांधावरच्या बाभळीच्या फांटीला दिसंल एखाद्या वाटसरुला !! 
       पोरा.. मन मोकळं करायचंय म्हुण सांगतोय मी तुला.... पावसाने दगा दिलाय तुझ्या बापाच्या इश्वासाला...लई आशा धरुन व्हतो मी... पेरलेलं सुकून गेलंय, वावटळी उठू लागल्यात नी पिकं मुळासकट उलटून चाललीयत.... उन्हाळ्यागत हंडाभर पाण्यासाठी तूझी माय नाय ते आठ परसाच्या हिरीत दररोज खोल उतरतीय.... हे कवतीक म्हुण सांगत नाय म्या...कधी कधी वाटतं मी फसवलं की काय तिला... तव्हा मी हा नसतो म्हणलो तरी बिचारी दुसरीकडे कुठं तरी सुखात पडली आसती....माझ्या पायी वणवण झाली तिची... सोसीक अन् लई कष्टाळू ,मायाळु, धिराची लक्ष्मी हाये बघ ती.... तिच्यामुळंच तर मी इथवर आलोय.... तु बारिक व्हतास तव्हा वाटलं व्हतं, सायब झाला तर हिरीतून पाणी काढायचं चुकल तीचं.. काट्याकुट्याचं सरपण तोडायचं बंद व्हईल.. अंगावरील धुडकं जाऊन इरकली पैठणी येईल.....धुराच्या चुलीपुढं धुपणं संपल... पाणी शेंदायचं बंद व्हईल..... पण अजुन तरी ते सपानच राहिलंय.... असो, चार दिसाखाली, आपल्या पल्याड र्‍हाणाऱ्या बायजा काकूचा हिरीत तोल गेला नी ती जिवंत परतली नाही.... मला तुझ्या मायीचीबी लई भीती वाटतीय....तुला पाठकुळी घेणारा तो कुशाभाऊ वावराला चकरा मारून बेजार झालाय....रोज  दावं हातात घेतो, मारोतीच्या पाराला येढा हानतो अन् हात जोडत शेवटाचा आलोय असे सांगतो ...पण लेकीच लगीन राहिलंय म्हणून तो मागे फिरतो. गुदास्ता लेकीच लगीन झालं असतं तर आज त्याच्या बापाच्या थडग्याला चिटकून ह्याच्याही थडग्याला निवद दाखवायची येळ आली असती !! बापाचे हाल बघुन लेकीनं जीवाचं काय बरं वायट करु नये म्हुण मी देवाला साकडं घातलंय !! 
        तुझी शिकली सवरलेली बायको दरवरसाला येवून शेतीचा हिशोब मागते, तलाट्याकडे चवकशी करते, भावकीत खरंखोटं करते, पै पाव्हण्यात काय बी बोभाटा करते आन् तु मातुर एक शबद सुदीक बोलत नाय तव्हा माझ्या जिंदगीचाच हिशोब चुकलाय अस मला वाटून जातं. कधीतरी पाप केलेलं फेडतोय असं बारामस वाटत असतं मला. "हे थेरडं काहीच कामाचं नाहीत , खायला काळ भुईला भार, किती दिस जगतंय अजुन कुणास ठाऊक.. उगीच आमच्या डोक्याला ताप" असं जव्हा ती बाहेर सांगत फिरते  तव्हा तर विशाची बाटली घ्यावी नी संपूस्तर खाली टाकू नये, असंच वाटतं मला . पन तुला आडचण आली तर कोण सोडविल म्हणून तीचं विशारी बोलनं गिळून घेतो, गोड समजून.... आदली पायलीनं घरात आलेल्या धान्याचा हिशोब तरी देणार कसा, तूच सांग.... तरी दोन वेळचा विचार न करता तुला दरवर्षी चार पोते टेम्पोत पाठवून देतोय मायेच्या ममतेन. पिकलं नाही तरी उसनवार करुन इकत घेवून पाठवत असतो आणि पुढंही जीवात जीव हाये तोपर्यंत पाठवंत राहील त्याची काळजी करू नको, फक्त गावात लै मज्जा हाय , सुखसमाधान हाय, गावाशिवाय जिंदगी नाही, मोकळं ढाकळं हवापाणी हाय, डोंगरझाडी झॅक हाये, मोप गारेगार रानवारा हाय, असलं दिशाभुल करणारं काय बाय खोट्टं नाटं शहरात बसून तिथल्या लोकास्नी सांगु नकोस, इतकीच हात जोडून सांगणं हाय तुला !!
तुझाच बापमाणूस बाप 

उत्तमराव निर्मळ सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...