सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३

492. प्राणुसकी...

 लहानपणी शाळेच्या परिसरच्या पुस्तकात वाचलं होतं, ज्याच्यात जीव तो सजीव. उदाहरणार्थ वनस्पती, प्राणी, पक्षी आणि माणूस.
खरच माणूस किती हुशार आहे. त्याने बोलणाऱ्या मशीनी बनवल्या, मशीनींशी संवाद साधायाला भाषा बनवली, तरीही एक प्रश्न आहे माणसाने निर्जीव गोष्टींशी संपर्क केला तसं, प्राणी वनस्पतींशी का संपर्क केला नाही. कदाचित ते पण आपल्याला भरपूर काही सांगण्याचा प्रयत्न करत असतील.
तसं पाळीव प्राणी म्हणजे माझा जीव कि प्राणच. मला मासे, कासव, पोपट, चिमण्या, कबुतर, मांजर किंवा कुत्रा पाळायची खूप इच्छा होती, पण माझ्या गोड आईमुळे ती पूर्ण झाली नाही.
मी कोणता प्राणी, पक्षी पाळायला आणू का ? असं आईला प्रेमाने विचारलं, तर आईचा सेम डॉयलॉग... आईः आम्हाला सर्वांना घरातून बाहेर काढ. आणि तू घरात प्राणी संग्राहलय उघड. पाळीवच कशाला वाघ, सिंह, हत्ती पण पाळ. घर बसल्या तुझी कमाईपण होईल.
आता असं आई बोलली की, मला पुढे बोलायला शब्दच नसतात. तोंड बंद करुन प्रश्न खिशात टाकून मी घराबाहेर निघायचो. आईचा राग यायचा. पण माझी आई तिखट गुळासारखीच आहे. आईच्या गोष्टी आता मला पटायला लागल्यात.
खरंतर प्राणी पाळायला घरी आणणं खूप सोपं असतं, पण त्यांची जवाबदारी स्वीकारणं तेवढंच अवघड असतन. मी प्राणी आणणार आणि आईला साभांळायला लागणार. म्हणजे आईच्या न संपणाऱ्या कामात अजून भर पडणार. आणि असं पण पाळीव पाळीव म्हणता म्हणता आपण त्या मुक्याप्राण्यांना बंदिस्तच करुन ठेवतो, हे तेवढच खरं आहे. आपण बाहेरगावी सगळे गेलो, कि त्यांचे हाल नको. म्हणून मी माझी प्राणी पाळायची इच्छा बाजूलाच ठेवली.
पण मला असं वाटतं, प्राण्यांचं माझं जास्तच जमतं. न बोलताच त्यांचे पाणीदार डोळे मला भरपूर काही सांगून जातात. गावी गेलो कि, मी काकांची म्हैस, शेजाऱ्याच्या शेळ्यांसोबत खेळत बसतो. बरं वाटतं मला. नंतर शेजाऱ्यांचा टोमणा असतोच " आता लग्नाचं वय झालाय तरी जनावरांशी खेळतोय."
मी दुर्लक्ष करुन पुढे निघून जातो. कारण असं आहे कि, त्यांना मारणारी जनावरं माझ्याशी प्रेमळ वागतात. असं वाटतं, ही मुकी जनावरच मला जास्त ओळखत असावीत. या गोष्टीचा खरा अनुभव मला काही दिवसानंतर आलाच. पण एक असा प्रश्न तयार झाला कि, त्याच उत्तर कदाचित कुणालाच मिळणार नाही.
त्या दिवशी शुक्रवार होता. उद्या हाफ डे आणि परवा सुट्टी या विचाराने मी खूश होतो, पण माझ्या खुशीवर साहेबांनी पाण्याचा ड्रम ओतला. शुक्रवारी रात्रीच मोबाईलवर सरांचा संदेश आला. उद्या आपल्या नाशिकच्या अॉफिसला भेट द्या. आणि राणेंच काम कुठपर्यत झालंय हे तपासून पाहायला सांगितलं.
पहाटेची ची ठाणे लोकल पकडून, ठाण्यावरुन कसारा लोकल पकडून, कसाऱ्यावरुन नाशिकला बसने जायाचन, असं माझं ठरलं. स्वस्तात वेगात तोच एक प्रवासाचा मार्ग. पहाटे आटपून मी घरातून बाहेर पडलो. घरातून बाहेर पडून काही अंतर पार करताच मी एक विचित्र गोष्ट लांबून पाहिली, एका झाडावर कावळे काव काव करत घिरट्या घालत होते. आणि त्याच झाडाकडे बघत खाली कुत्रे भुंकत होते. त्या कावळ्याच्या कावकाव आणि कुत्र्यांच्या भो भो ने पहाटेची शांतता भंग झाली होती. मला वाटलं, कोणता तरी प्राणी मेला असावा. पण तसं नव्हतं. त्या झाडाजवळ गेल्यावर खरी गोष्ट कळली. एक कबूतर त्या झाडाच्या मध्यावर लटकला होता, त्याच्या पायाला एक दोरी होती आणि ती दोरी त्या झाडात अडकली होती. त्यातही तो स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे प्रयत्न पाहून आजूबाजूला कुत्रे, कावळे एकवटले होते. मी तिथ गेलो, पण ज्या फांदीला तो अडकला होता ती खूप उंच होती. झाडाच्या खोडापासून पण लांब होती. त्याची धडपड बघून मी इकडे तिकडे पाहिलं, तसं मला एक उंच काठी दिसली ती मी त्या फांदीत अडकवून फांदी खाली खेचली आणि त्याची अडकलेल्या दोरीतून सुटका केली. जशी त्याची सुटका झाली, तसा तो काहीच न बोलता दूर उडून गेला. मी तिथून घड्याळ बघून निघालो तेव्हा मला एक गोष्ट जाणवली आजुबाजूला असणारे कुत्रे, कावळे जणू गायबच झाले होते.
मी पळत सुटलो. ठाणे लोकल पकडायची होती. तिकीट न काढताच लोकल पकडली. मनात विचारांचा थंडगार पाऊस सुरु झाला, त्या कबूतराची धडपड बघून कावळे, कुत्रे धावून आले. पण काही दिवसापूर्वी खारघर मध्ये एक महिला दुचाकी वरुन पडली. तिच्या डोक्यावरुन मागून आलेला क्रेन गेला, मान्य आहे नंतर ती मेली असावी. पण ती पडल्यावर २० ते ४० गाड्या बाजूने तिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं बघून पुढे गेल्या. एकाने जरी पडल्याक्षणी त्या महिलेला जवळ येऊन पाहिलं असतं, तरी कदाचित ती वाचू शकली असती. ठाण्याला पोहचून तिकीट काढून कसारा लोकल पकडली.
परत विचार सुरु झाले.  रस्त्यावर खूप अपघात होतात. पण काही लोक माणसाला बघायचं सोडून त्याचे पैसै, पाकिट, मोबाईल, अंगावरच सोनं लंपास करतात. विचार करुन दिवसाची खंतमय, उदास सुरवात झाली.
कसाऱ्यावरुन नाशिकच्या आमच्या शाखेत पोहचलो. दिवसभर काम केलं, पण जेवलो नाही. दोनदा चहा फक्त पिला. भूकच विचारांनी मारली होती. मी समजत होतो मी माणूस म्हणून माझ्या आजूबाजूंच्या माणसांना सुख वाटायला जन्माला आलोय, पण आता कळलं, त्यांना तर माझ्या कडच्या सुखाची गरजच नाही. कारण ते दुसऱ्यांना दुखी करुन सुखी राहायला शिकलेत.
संध्याकाळी काम आपटून सरांना कामाचं पूर्ण स्टेटस् मेल केलं, आणि परत घरी निघायची तयारी करु लागलो.
तेवढ्यात फोन वाजला.
मीः हा सर.
सरः अरे तुझा मेल मिळाला. अरे अजून एक काम होतं, काही सामान आणायचं होतं नाशिक मधून. आत CBS रोडला ते मिळेल तुला. तु जा तिकडे आणि तिथून त्या मशीनची माहिती, फोटो घेऊनच ये. मी तुला त्या अॉफिसचा पत्ता पाठवला आहे.
मी नाईलाजाने होकार देऊन फोन ठेवला. नशीबाने परत मदत केली. माझ्या नाशिकच्या अॉफीसमधला मित्र समीरने मला त्याची  दुचाकी गाडी आणि हेल्मेट दिलं.
माझ्या मित्राची इंटरनॅशनल दुचाकी गाडी घेऊन मी निघालो. इंटरनॅशनल बोलायचं कारण म्हणजे त्याला हॉर्न नव्हता, एक साईडचं इंडिकेटर चालत नव्हतं, पुढचा ब्रेक लागत नव्हता. कसाबसा मी त्या पत्त्यावर पोहचलो. तिकडून काम आटपून निघण्यासाठी अर्धातास गेला.
जसा त्या अॉफिसमधून बाहेर पडलो, तसं पाहिलं, अंधार झाला होता, घड्याळ पाहिलं, संध्याकाळचे सात वाजले होते. एवढ्या लवकर अंधार पडल्याच आश्चर्य वाटलं, पण मी निघालो.
पुढे एक टपरी लागली. तिथे चहा आणि वडापाव खाल्ला. त्या टपरीतल्या काकांना विचारलं,
मीः काका... हायवेला जायाला चांगला शॉर्टकट रस्ता आहे का ?
त्याने हात दाखवून सांगितलं.
काकाः ह्या रस्त्याने जा. १५ मिनटात हायवे.
मी निघालो... २० मिनटं झालघ, तरी हायवे नाही, माणस नाहीत, दुकान नाही.
फक्त तिघ जण... मी, माझी दोनचाकी आणि शांत रस्ता. मला अशी पत्ता सांगणारी माणसं का भेटतात तेच कळत नाही.
पण एक छान गोष्ट होती, ती म्हणजे शांत रात्र, मला कळून चूकलं की मी रस्ता चुकलोय. आजूबाजूला फक्त शेतच होती. या इंटरनॅशनल गाडीची हेडलाईट अचानक बंदच झाली. मी थांबलो. त्यात चांदोबा मामांनी डीम लाईट लावली होतीच. उगाच परत चुकण्यापेक्षा कुणाला तरी विचारु. पण कोणीच आजूबाजूला दिसत नव्हतं. कुणाला फोन लावून विचारायचं तर मीच कुठे आहे मला सांगता येणार नाही.
तिथे  थंड हवेचा वारा, भयानक शांतता, कुझबुझ करणारी रानं, रातकिड्याचा आवाज, आणि त्यात चिंताग्रस्त मी.
थोडी भिती वाटू लागली, मनात भासांचे खेळ सुरु झाले, पैजणाचा आवाज, उलटे पाय आणि सफेद साडी घातलेली, लांब केस असलेली बाई मनात दिसू लागली.
लगेच गाडीवरुन उतरलो, बँगेतून पाण्याची बॉटल काढून तोंड धुतलं. दीर्घ श्वास घेवून मनाला सावरलं. आणि स्वतःलाच सांगितलं, भास भास असतात यार... अशी बाई काही नसते. आल इज वेल.. आल इज वेल....
मी गाडीवरच थोडं घाबरत बसून शेवटी माझा विश्वास नसणाऱ्या जीपीएस ला विचारलं, मी कुठे आहे ? आणि अचानक मला मागून हॉर्नचा आवाज आला आणि मी मागे वळलो तसा मला धक्काच बसला आणि मी गाडीसकट फरफटत काही अंतरावर शेतात जाऊन पडलो.
एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. मला सगळीकडे धूळ उडलेली जाणवली. मी शेतात गाडीसकट पडलो होतो. फक्त मला आवाज आला, पळ पळ आणि बाजूने जोरात चारचाकी गाडी निघून गेली. वेदना काय असतात, ते क्षणातच जाणवलं. हेल्मेटमुळे डोकं वाचलं होतं. डाव्या हाताने उजव्या बाजूला हात लागताच जाणवलं की, उजव्या बाजूचे कपडे फाटून उजव्या बाजूचा हात, कंबर, मांडी पाय सोलून निघालं होतं. एक बाजू सुन्न पडली होती. पाय दोनचाकीत अडकला होता. माझी शुध्द हरपली मी बेशुद्ध पडलो.
जाग आली तेव्हा सकाळ झाली होती. सगळं अंग वेदनामय झालं होतं. मी दवाखान्यात अपघात विभागात बेडवर होतो. रक्ताची बाटली लावली होती. बाजूला एक अनोळखी गृहस्थ पेंगत होते. समीर झोपला होता. मी उठायचा प्रयत्न करत होतो, पण जमल नाही. पूर्ण उजव्या बाजूला सूज आली होती. माझ्या हालचालीमुळे ते अनोळखी गृहस्थ जागे झाले.
गृहस्थः अरे थांब... काय हवं तुला मला सांग ?
मीः पाणी..
समीर उठला, त्याने पाणी दिलं.
मी पाणी पिलं.
समीरः आता कसा आहेस ?
मीः सॉरी यार तुझ्या दुचाकीचा माझ्याकडून अपघात झाला.
समीरः तू शांत पडून राहा. पोलीस आलेत, तुला काहीतरी विचारायचं आहे त्यांना.
मीः पण मी खरंच काही नाही केलं सर.
पोलीसः अरे घाबरु नको. शांत हो.  मी रात्री आठच्या सुमारास माझ्या दुचाकी वरुन ड्युटी संपवून पलीकडच्या रस्त्याने घरी चाललो होतो. अचानक मला कुत्रे भुंकायचा आणि रडण्याचा आवाज आला. संशय आला काही तरी गडबड आहे. पाहिलं तर चार कुत्रे तुझ्या बाजूला उभे राहून जोरजोरात भुंकत आणि वेगळा आवाज काढून रडत होते, तू तिथे बेशुध्द अवस्थेत पडला होतास. कुत्रे नसते, तर खरंच मला काही कळलं नसतं, कारण तो माळरानाचा रस्ता. पुढे जाऊन हायवेला मिळतो.
मला थोडं आश्चर्य वाटलं, कारण मी तुझ्याजवळ येताच ते शांतपणे शेतात पसार झाले. पण तुझी अवस्था बघून मी तिकडे दुर्लक्ष केलं. आणि तुला इथं घेऊन आलो. तुझ्या गाडीच्या अवस्थेमुळे कळालं, तुझा अपघात झालाय, काही ठिकाणी मुक्का मार आणि खरचटलय. उजव्या पायामध्ये गाडीचा पत्रा घुसून गंभीर जखम झालीय. आणि त्यामुळे रक्त खूप वाया गेलं होतं. पण डॉक्टरांनी सांगितलय आता काळजी करायची काही गरज नाही. तुला काय रात्रीचं आठवतंय का ?
मीः नशीब चांगल आहे. शरीराचे सर्व भाग ठीक आहेत. फक्त खरचटलय तरी सहन होत नाही. मी रस्ता चुकलो होतो. माझ्या गाडीची पुढची लाईट बंद झाली. नंतर मी  जीपीएस वर माझन ठिकाण शोधत होतो, आणि अचानक चारचाकी गाडींनी धक्का दिला आणि मी दूरवर फेकलो गेलो. मी फक्त पळपळ आवाज ऐकला बस.. ऐवढच आठवतय.
पोलीसः ठीक आहे. वेळ आठवतेय का तुला ?
मीः नाही. पण माझं सगळं सामान कुठाय ?
पोलीसः काळजी करु नको सगळं सुरक्षित आहे. तुला साहेबांचा आणि आईचा फोन येऊन गेलाय फक्त. साहेबांना सांगितलंय खरं खरं. पण आईला खोटं सांगितलय कि, तु कामासाठी नाशिकला थांबलायस आणि मोबाईल विसरुन बाहेर गेलायस. फिरोजचा फोन आल्यावर त्याला बोलवून घेतलं इथे. सर्व सामान त्याच्याकडेच आहे.
मीः धन्यवाद सर.
पोलीसः आईला फोन कर आधी.
मीः हो.
मला अचानक आठवलं.
मीः सर माझं घड्याळ कुठाय.
समीरः अरे आहे माझ्याकडे तुला आता कशाला पाहिजे.
मीः काढ ते.
घड्याळ फुटलं होतं. आणि तिथच थांबल होतं.
पोलीसः अरे ह्यात तर ७.४० झालेत.
मीः हो. माझा अपघात झाल्यावर ते फुटलं असेल. आणि वेळ थांबली असेल.
पोलीसः ठीक आहे, मी पुढचा तपास करण्यासाठी निघतो. तु आराम कर. लवकरच भेटू.
समीरः अरे तू आराम कर. गाडीचं टेन्शन घेऊ नको. अशी पण ती बदलायची होती.
मीः तरीपण. मी तुला गाडीला सरळ करायला मदत करेन.
समीरः तू आराम कर. मी बाहेर थांबतो. आपले सर येतायत तुला भेटायला.
आठवडा झाला.
मी बरा होऊन दवाखान्यातून बाहेर पडलो. घरात कुणाला सांगितलं नव्हतं. साहेबांनी पण आराम करायला सात दिवस सुट्टी दिली होती. नाशिक पोलीसांच्या चातुर्यामुळे सीसीटीव्हीच्या चित्रफितीमध्ये चारचाकी गाडी सापडली. मध्यधुंद अवस्थेत कॉलेजच्या तरुणाकडून तो अपघात झाला. मला उडवल्यानंतर हायवेला त्याने एका वयोवृध्द माणसाला उडवलं, तो जागीच मेला.
घरी गेल्यावर आईला सर्व कळाल्यावर मला खूप शिव्या पडल्या. खोटं बोललो म्हणून. नंतर मिठीत घेऊन रडायला लागली.
एक गोष्ट आठवली. मी कबुतराला निस्वार्थी मनाने केलेल्या मदतीची कुत्र्यांनी परतफेड केली असावी. आपण निस्वार्थी मनाने केलेली मदत कधीतरी आपल्यालाच मोठ्या संकटात परत मिळते हे चांगलच जाणवल मला.
प्राणी पण परतफेड करत असतील का ? पण मी तर मुंबईच्या कबुतराला वाचवलं, मग नाशिकच्या कुत्र्यांनी कशी मला मदत केली? निसर्गाने प्रत्येक गोष्ट विचार करुन बनवलीय. कदाचित या प्राणी आणि पक्षाच्या मदतीने कोणीतरी २४ तास आपल्यावर नजर ठेवत असावं. प्राण्यांची भाषा बोलता आणि समजता आली असती, तर खूप मोठ मोठी रहस्य उलघडली असती. आज पण कोणताही कुत्रा भुंकला, तरी त्या न दिसलेल्या कुत्र्यांचा आवाज जाणवतो. असं वाटतं, आता माणसापेक्षा प्राण्याला जास्त चांगली प्राणुसकी जपता येते. वाईट या गोष्टींचं वाटतं, या भटक्या मुक्या प्राण्यांना कोण विचारणार नाही म्हणून भरपूर जण त्यांना त्रास देतात. कोणी होळीत रंगानी रंगवतात. कोणी दिवाळीत त्यांच्याजवळ, अंगावर फटाके लावतात. आणि काहीच नसलं, तर कोणी मज्जा म्हणून दगडच मारतात. विचार करा... कधीतरी तुमचेपण प्राण माझ्याप्रमाणेच एखादा मुका प्राणीच मदत करुन वाचवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...