सोमवार, ७ ऑगस्ट, २०२३

456. समाधान

       एक श्रीमंत सावकार होते. अलोट संपत्ती होती. पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती, तरी पण हा श्रीमंत मात्र सुखी नव्हता. मनात काहीतरी विवंचना होती, त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही. त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता. त्याने प्रत्येकाला विचारले, मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल. त्याला कोणीतरी सांगितले, तू ज्ञानी व्यक्तीला शरण जा म्हणजे तेच तुला यातून सोडवतील. श्रीमंत ज्ञानी व्यक्तीच्या शोधार्थ निघाला. वाटेत एका झाडा खाली एक महाराज बसले होते. त्यांना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला, महाराज मला काहीही कमी नाही. पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे मी. तरी मी सुखी नाही. एक विवंचना मला झोप येवु देत नाही, त्यामुळे मी सुखी नाही. महाराज म्हणाले, आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो. श्रीमंत म्हणाला, महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही, पण एकच विवंचना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल? कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे, चिंता आहे ती फक्त आठव्या पिढिची. महाराज हसले आणि म्हणाले, काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो.
      महाराज नी त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की, त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये, म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो. तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला, ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते. श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने तिची समाधी भंग पावली. तिने वर बघितले आणि म्हणाली, का आलास रे बाबा ईथे? तो म्हणाला, म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे. हे घे मग मी जातो. ती म्हणाली, कारे तुला मी काही मागीतले होते का? तुझ्या समोर हात पसरला होता का? नाही ना? मग का आणलेस तांदूळ? ही पिशवी उचल आणि चालायला लाग. तो म्हणाला, मला त्या झाडाखाली बसलेल्या महाराजने पाठवले आहे म्हणून मी आलोय. ती म्हणाली, त्या महाराजला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत. श्रीमंताने आपली अक्कल चालवली. तो म्हणाला, म्हातारे तिसर्‍या दिवसाला होतील राहू दे. ती म्हणाली, माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या महाराजलाही नको. त्याला सांग की, माझ्या तिसर्‍या दिवसाच्या तांदळाची चिंता कुणीही करू नये. हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि महाराज समोर पिशवी ठेवून निघाला. महाराजने त्याला हाक मारली, अरे विवंचना घेऊन आला होतास ना? मी तुला त्यातुन सोडवतो. श्रीमंत खाली मान घालून म्हणाला, महाराज मला उत्तर मिळाले. तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे, तेवढा मी महामूर्ख आणि दुःखी आहे.
       अर्थात, या कथेचा तात्पर्य हेच आहे की, सुख कशात आहे हेच आम्हाला कळत नाही. तर सुख आपल्या समाधानात आहे. आणि हे समाधान बाजारात कुठे विकत मिळत नाही. त्यासाठी प्रथम मनाने समाधानी असावे लागते. ज्यांचे मनच जर समाधानी नसेल, तर त्यांना महालात तरी सुखाची झोप येईल का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...