मोहीs ए बने ssss चाललो गं दळण, भाजी आणायला!!
हे शब्द कानी पडताच छोटिशी मोठ्या डोळ्यांची, काळ्या कुरळ्या केसांची घेराचा फ्राॅक घातलेली, बाबांची धाकटि मुलगी धावत धावत सायकली पाशी येऊन उभी.
सायकल, डबलसीट आणि बाबा !!!
खरं तर बाबांच्या सोबत भाजी , दळण आणायला किंवा कुठेही बाबा निघाले, की ती आपली तयारच असायची; सायकलवरुन त्यांच्या पुढे बसून सूसाट फिरायला!
खुप खुप खुप आवडायचं !! जणू अंगी वारं भरायचं! सायकल सुरु झाली, गार वारा लागला की बाबांची छोटि मोही लागायची शाळेत शिकवलेल्या कविता, गाणी मोठमोठ्यानी म्हणायला .
आजूबाजूचे लोक आश्चर्याने, कुतुहलाने बघत रहायचे! पण त्या बालवयात कशाची कुणाची तमा होती कुठे? निरागस मन आपलं उचंबळून यायचं...."अंगात वारं शिरणं " ही म्हण का अस्तित्वात आली असावी ते आता कळतं.
कधी ते मे महिन्याच्या सुट्टित मला समुद्रावरही न्यायचे. शिवाजीपार्कला फेरी, कबुतरखान्यावरुन गोल मंदिराहून गोल फिरवून आणायचे. फार फार वेगळं आगळं विश्व होतं ते. जणू त्यांची मी छोटि राजकुमारीच !!!
त्यानंतर बाबांनी कायनॅटिक स्पार्क, बजाज स्कूटर घेतल्या. कधी दादा तर कधी बाबांपाठी बसून जायचे मी डबलसीट. पण जी मजा बाबांसोबत सायकलवर पुढे बसून जाण्यात होती, ती कशातच नाही.
एकदा माझ्या दादाने मला सायकलवरुन शाळेपर्यंत नेले. ईतकी सूसाट जोरात सायकल चालवलीन की मी " वाचवा ss वाचवा sss " असं घाबरुन ओरडू लागले. तेव्हा दादा बोलला, ए बये गप बस कुणाला वाटेल मी तुला पळवून नेतोय. अशी भावा बहिणीची गंमत आजही आठवून आम्ही दोघे हसतो.
बाबांसोबत फिरताना जगाचं खुप मोठं ज्ञान पदरी पडत साचत होतं. आज जुन्या दिवसांचा आढावा घेताना त्या क्षणांचे महत्व कळते. व्यवहार ज्ञान, बोलण्याचं चातुर्य , माणूसकी, लोक संग्रह, वेळ पाळण्याची शिस्त... ह्या व अश्या अनेक गोष्टी कळत नकळत रुजत गेल्या.
त्यानंतर एवढा काळ लोटला, डबलसीट आपणहून कधीच कुणासोबत बसायचा प्रसंग आला नाही. पण काही ईच्छा पुर्ण होतात. योग आले आणि त्या क्षणीही मनातून ती छोटी निलू वारं लागताच नाचू लागली. अशावेळी अवघं आभाळमय होतं मन. निळं निळं माझ्या नावाप्रमाणे निलांबरीचं अथांग निलांबर पण वयाची मर्यादा पाळत ती आतल्या आतच गप्प बसली.....
बाबा द्याल का ते बालपण परत? फक्त तुमच्यासोबत सायकलवरुन पुढे बसून सूसाट न्या... वारं लागताच जोरजोराने कविता गाईन अन् एखाद्या हिरव्यागार जंगलातच थांबवा सायकल... जिथे भरपूर फुलझाडे असतील आणि वाट बघणारी आई, काळजी करणारी मोठी ताई, माझ्या खाऊ मधला वाट्यातला वाटा खाणारा दादा.
अश्या ठिकाणाहून परत माघारी आणू नका ! मी त्या वनातली वनमाला राजकन्या होऊन राहीन
न्याल ना बाबा ????
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा