परस्परांशी मतभेद असतानाही, आपण दुसर्यांना ते जसे आहेत तसे स्वीकारु शकतो का?
व्हिएतनाम मधील लढाईनंतर एक सैनिक आपल्या घरी परतत होता. त्याने सॅन फ्रान्सिस्को मधून आपल्या आई-वडिलांना फोन केला आणि म्हणाला, "आई आणि बाबा मी घरी परत येत आहे, परंतु मला तुम्हाला काही विचारायचं आहे. माझा एक मित्र आहे ज्याला मी आपल्या घरी आणू इच्छितो, मी त्याला आपल्या घरी आणू शकतो का?"
"नक्कीच," त्यांनी उत्तर दिले, "आम्हालाही त्याला भेटायला आवडेल."
“पण एक गोष्ट आहे जी तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.” मुलगा पुढे म्हणाला, "तो लढाईत अत्यंत वाईट तऱ्हेने जखमी झाला होता. त्याने त्याचा एक हात आणि एक पाय गमावला आहे. त्याच्याकडे दुसरी कोणतीही अशी जागा नाही जिथे तो राहू शकेल आणि माझी इच्छा अशी आहे की त्याने आपल्याबरोबर राहावं."
आईवडिलांनी उत्तर दिलं, "आम्हाला हे ऐकून खूप वाईट वाटत आहे. परंतु त्याच्या करता आपण
दुसरीकडे जागा शोधण्यास मदत करू शकतो."
"नाही, आई-बाबा, माझी इच्छा आहे की, त्याने आपल्या बरोबरच रहावे." मुलगा हट्टाने म्हणाला.
वडील म्हणाले, "बाळा, तुला कळत नाही आहे, की तू काय विचारत आहेस. अशा अपंग व्यक्तीची आपल्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. आपल्याला आपलं आयुष्य आहे आणि अशी कोणतीही गोष्ट आपल्या जीवनात ढवळाढवळ करू शकत नाही. मला असं वाटतं की तू घरी ये आणि त्या मित्राला विसरून जा. तो स्वतःच जगण्याचा मार्ग शोधून काढेल."
एवढं बोलण ऐकल्यानंतर मुलाने फोन कट केला. त्यानंतर आई-वडिलांना त्याच्याकडून जास्त काही समजले नाही.
काही दिवसानंतर, त्यांना सॅन फ्रान्सिस्कोहून पोलिसांचा फोन आला. पोलिसांनी आई वडिलांना सांगितलं, की एका इमारती वरून पडल्यामुळे त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. पोलिसांचा अंदाज आहे, की ही एक आत्महत्या आहे.
त्या मुलाचे दुःखी आई-वडील विमानाने सॅन फ्रान्सिस्कोला गेले, जिथे त्यांना आपल्या मुलाच्या शवाची ओळख पटविण्यासाठी शहरातील शवागारात नेण्यात आले. त्यांनी त्याला ओळखले, परंतु एक भयानक सत्यही त्यांना समजलं जे त्यांना माहीत नव्हतं : त्यांच्या मुलाला केवळ एकच हात आणि एकच पाय होता.
अशा प्रकारच्या दुर्भाग्यपूर्ण घटनांमध्ये बळी पडलेल्या लोकांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, त्यांच्याबरोबरची आपली वागणूक, आणि त्यांच्याबरोबर असलेलं आपलं नातं का बदलतं?
प्रत्येक जण हे ईश्वराचेच लेकरू आहे. आणि ईश्वर आपल्या सगळ्या मुलांवर एक सारखंच प्रेम करतो!
खरंतर, आपल्याला जे सुंदर दिसतात आणि त्यांच आपल्या अवती-भोवती असणं आपल्यालाही आवडतं, परंतु आपल्याला असे लोक आवडत नाहीत ज्यांच्यामुळे आपली गैरसोय होते किंवा ज्यांच्यामुळे आपले जगणे कठीण होते. आपण अशा लोकांपासून दूर राहतो जे आपल्यासारखे निरोगी, सुंदर आणि हुशार नसतात. जर आपली दृष्टी शारीरिक सौन्दर्या ऐवजी, आत्म्याचे सौन्दर्य पाहू शकली असती तर किती बरं झालं असतं!
ईश्वरावर प्रेम करणं म्हणजे प्रत्येक जीवामधे ईश्वराचा अंश आहे, हे मानणे.
♾
प्रेमाचं हेच वैशिष्ट्य आहे, की प्रिय व्यक्तीच्या सगळ्या उणिवा आणि दोषही हवेहवेसे वाटतात.”
लालाजी
Heartfulness Meditation💌
मराठी अनुवाद टीम, हार्टफुलनेस नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा