मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२५

1728. ती फुलराणी

     "सावे, ह्या कसल्या काड्या खोचून ठेवल्यास गं मातीमध्ये? थांब उद्या सकाळी तुळशीची रोपं आणून लावते त्यात", असं म्हणत अनुसयाबाईंनी सावित्रीने आणून लावलेल्या त्या मोगऱ्याच्या काड्या तिच्या देखत मातीतून उपटून फेकून दिल्या. त्या घरात जाताच धावत खाली जाऊन ती त्या काड्या पुन्हा घेऊन आली. मिठाच्या रिकाम्या पिशवीत थोडीशी माती घेऊन त्यात त्या काड्या तिने खोचल्या आणि जरा आडोशाला लवकर दिसणार नाही अशा ठिकाणी ती पिशवी तिने ठेवली.संध्याकाळी तिचे पती शाळेतून घरी आले त्यावेळी चपला काढतांना ती मिठाची पिशवी त्यांना दिसली त्यावरून काय समजायचे ते त्यांना समजले.
     लहानपणीच आई गेलेली कोमेजलेली पोर सावी, मुळातच कमी बोलणारी त्यात परिस्थितीमुळे अजूनच अबोल होत गेली. आई नंतर तिच्या बाबांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आई वाईट नव्हती. पण तिने कधी फार जीवही नाही लावला त्या निरागस जीवाला. पण ती कायम म्हणायची, "सावे, घडाघडा बोलावं गं मनातलं, फार चांगलं बनून राहू नये, नाहीतर जग काय आपला फायदा घ्यायला तयारच असतं. पण ऐकून घेऊ लागलो की सारे आपल्यावरच अरेरावी करत सुटतात. माणसानं कसं बोलून मोकळं असावं."पण सावीला कधी ते जमलंच नाही.तिच्या दुसऱ्या आईला दोन मुली झाल्या त्यामुळे बहिणींसोबत मात्र सावी मोकळी होऊ लागली. फुलांचं तिला फार वेड, बकुळाच्या झाडाखालून फ्रॉकच्या घेरात आणता येतील इतकी फुलं ती आणायची. लांब दांडीच्या त्या फुलांना एकमेकांत गुंफुन आई वेण्या करीत असे आणि तिघी मुलींच्या केसांमध्ये त्या माळून देत असे. फुलांमध्ये फुले गुंफणं तिला कधी जमलंच नाही, आई वेण्या करायची त्यावेळी पूर्णवेळ ती मन लावून बघायची आणि करून बघायला गेली की फुलं निसटून जायची, मग तिच्या बहिणी खूप हसत, ती पण हसायला लागायची. दूर गावाबाहेर असलेला पिवळा बहावा बघून तर ती कित्येक वर्ष हाच विचार करायची की या फुलांपासूनच सोनं बनवीत असणार सोनार लोक.कधी कधी शाळेत जातांना वाटेत मोरे काकूंच्या फाटकाबाहेरच्या अबोलीची काही फुलं ती अलगद तोडायची आणि दप्तरात आधीच टाकून ठेवलेल्या साडीच्या पिनेत ती फुलं नीट खोचून आपल्या वेणीच्या वर ती पिन ती लावायची. तिच्या मैत्रिणी तिला थट्टेनं म्हणायच्यादेखील, "घराला मोठं अंगण असलेला नवरा कर सावे, आणि अंगणभर फुलझाडं लाव बरं."
     तिच्या बाबतीत नेमकं उलट घडलं. गुरुजी माणूस फार छान होते, पण कसलं अंगण आणि कसलं काय. भाड्याच्या लहान लहान दोन खोल्यांत लग्न होऊन ती आली. खाली घरमालक आणि वर नवरा, सासू आणि ती असे तिघे राहायचे. सासू कधी सरळ बोलायची नाही, सतत तिला कसे राबवून घेता येईल याकडेच कल त्यांचा. गुरुजी घरी असले तरी त्यांच्या कामांत कायम व्यस्त. गरजून्ना मदत करण्यात सतत पुढे. त्यांना वाटायचं तळागाळातल्या सर्वांना शिक्षण देता यावं. त्यासाठी शक्य त्या त्या मुलांना ते शिकवीत असत. जे लोक मुलांना दिवसा शाळेत पाठवू शकत नसायचे त्यांच्या मुलांना गुरुजी संध्याकाळी घरी आणून शिकवीत असत. कधीकधी त्यांना बाहेर काही कामानिमित्ताने जावे लागल्यास सावित्रीला ते मुलांची पाठांतरे घेण्यास सांगत.
      सासूच्या करड्या नजरेखाली ती सतत खालमानेने कामात बुडालेलीच असायची. कधी निवांत बसणं नाही की शेजारी कुणाजवळ जाऊन बोलणं नाही. मात्र एके दिवशी भाजी आणायला गेलेल्या तिने एका काकांना मोगऱ्याची छाटणी करतांना बघितलं आणि त्यांनी कापलेल्या काड्यांमधून शोधून तिने रुजू शकतील अशा दोन काड्या आणल्या. येतांना वाण्याकडून त्याला नको असलेली रिकामी बरणी आणायला विसरली नाही ती. खालच्या घरमालकांना विचारून थोडीशी काळी माती आणून त्यात त्या काड्या तिने खोचल्या, थोडं पाणी घातलं. मनाला जरा छान वाटतच होतं की सासूबाईंनी त्या काड्या उपटून फेकल्या.गुरुजी आले, त्यांच्या हातात बघते तर मघा आडोशाला ठेवलेली ती पिशवी होती. ते आईला दाखवू लागले, "आई,बघ मोगऱ्याच्या काड्या मिळाल्या", मग सावित्रीकडे बघून बोलले,"रोज पाणी घालत जा, म्हणजे रुजतील लवकरच." यावर आई काही बोलली नाही पण तोंडातल्या तोंडात बडबड करीत होती,"काय करायचीत ही झाडं लावून, टिचभराच्या खोल्यांत तर राहतो आपण, वाढवायला जमणारंय का?"तिला मात्र फार बरं वाटलं. थोड्या दिवसांत त्या काड्या रुजल्या, पण बहरल्या नाहीच कधी सावीसारख्या. त्यांना येणारी नवी कोवळी पालवी पाहून सावीच्या मनातही अंकुर फुटतच होते की एक दिवस जोराच्या वाऱ्याने ती पिशवीची पिशवीच धाप्पदिशी खाली पडली. घरमालकीण काकू त्या दिवशी खूप ओरडल्या सावीला. ती पिशवी त्यांनी दिली फेकून. त्यात भरीस भर सासूबाई सुद्धा तिला बोलल्या. पुन्हा तिची ईच्छा झालीच नाही झाडाचं नाव घ्यायची.
     सासूबाई कायम तिला पाण्यात पाहायच्या, त्यात लग्नाला सहा सात वर्ष होऊन कूस उजवली नाही त्यामुळे त्यांना बोलायला अजूनच संधी मिळाली. गुरुजींनी त्यांच्या आईला समजावून सांगितलं देखील, की मूल होणं न होणं यात तिचा एकटीचा दोष नाही. काही कमी असेल तर ती गुरुजींमध्ये देखील असू शकते. पण समजून घेतील त्या अनुसयाबाई कसल्या. त्यांच्या सततच्या कटकटीला कंटाळून गुरुजी बाहेर जास्त वेळ राहू लागले. पण त्यांची एक चूक अशी झाली की सावीत्रीला या जाचातून बाहेर काढण्यात त्यांना यश आलं नाही. मात्र काही वर्षांत लहानसं का होईना हक्काचं घर त्यांना घेता आलं, दारापुढे लहानसं अंगण असलेलं घर.
    आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत अनुसयाबाईंनी अंथरुण धरलं. त्यावेळी आपली या जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत असल्याचं त्यांना कळलं असावं बहुदा, कारण आपल्या वाईट वागण्याचा पश्चाताप त्यांना झाला. एक दिवस सावीत्रीला आपल्या जवळ बसवून तिचा हात हातात घेऊन त्या तिला विचारू लागल्या, "सावे, मला कधी माफ करू शकशील का गं तू? फार वाईट वागले मी तुझ्याशी." सावीत्रीला रडू आलं, "असं का बोलताय सासूबाई?" "आज बोलून मोकळं होऊ दे गं मला. अशाच सासवा बघत आले होते गं जन्मभर. माझी सासू वागायची त्यापेक्षा कणभर जास्तच वाईट वागले तुझ्याशी. सून पण एक बाई असते, तिला मन असतं, आपण प्रेम दिलं तर दुपटीने आपल्याला मिळेल असा कधी विचार शिवलाच नाही मनाला. आज मरण दारात येऊन ठेपलं तेव्हा थोडं शहाणपण आलं असं वाटतंय." त्यांच्या शेवटच्या दिवसांत दोघी मायलेकीसारख्या राहिल्या. त्याचवेळी सावीने इकडूनतिकडून आणून कुंदा, मोगरा, चाफा, अबोली अशी काही रोपं, कलमा आणून लावली . ती नित्य नियमाने त्यांना पाणी घालू लागली. मनात हेच भाव की लवकरच सासूबाई बऱ्या होऊन बाहेर येतील आणि त्यांना आपली लहानशी बाग दाखवता येईल. पण देवाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. अनुसयाबाईंची तब्येत अजूनच बिघडली, त्यांनी जेवणही बंद केलं. एक दिवस दुपारी तिला जाणवलं की त्यांचा श्वासही लागत नाहीय. ती घाबरून गेली, ती लहान असतांना तिच्या आईचं सोडून जाणं तिला एकदम आठवलं. लगोलग बाजूच्या घरी जाऊन शेजारच्या मुलाला तिने गुरुजींना शाळेतून बोलावून आणण्यास सांगितलं. त्या धावपळीत कधी नव्हे ते त्यांच्या घराचं फाटकही उघडं राहून गेलं. एक दोन बकऱ्या आत शिरून त्यांनी सावीच्या सर्व झाडांवर यथेच्छ ताव मारला.
      सावी आता अगदीच एकटी पडली होती सासूबाईंच्या जाण्यानं. तिच्या बागेसारखं तिचं मनही अस्ताव्यस्त झालं होतं. गुरुजी फार बोलून दाखवणारे नसले तरी त्यांना कळत होतं. त्यांच्या आईच्या जाण्याचं त्यांच्यापेक्षा जास्त दुःख सावीला झालं होतं. तिला थोड्या बदलाची फारच गरज होती. गेल्या आठ वर्षांत असंही ती मोजून चार ते पाच वेळा पहिल्या दिवळसणाला,बहिणींच्या लग्नात, तिचे बाबा वारले त्यावेळी अशी फारच कमी माहेरी गेली होती. आईने तर कितीदा बोलावलं होतं, पण सासूबाईंमुळे ती गेलीच नव्हती. यावेळी मात्र गुरुजींनी अगदी मनावर घेतलं आणि कधी नव्हे ते सुटी काढून चार दिवस ते सुद्धा तिला घेऊन तिच्या गावी गेले. तिच्या आईला खूप आनंद झाला सावी इतक्या दिवसांनी माहेरी आल्यामुळे. तिने जावयाला बोलूनही दाखवलं, "मी माया लावायला हवी होती हो, पण संसारात, जवाबदाऱ्यांत अशी काही गुरफटले की तिच्या मनाचा विचार केला नाही कधी. आता माझ्या मुली लग्न होऊन सासरी गेल्या तेव्हा कळतंय." ते तरी काय बोलणार यावर, त्यांनी तरी तिच्या मनाचा करायला हवा तेवढा विचार केलाच नव्हता कधी. दोघे नवरा बायको पहिल्यांदाच इतका वेळ एकत्र घालवीत होते. त्यावेळी गुरुजींनी तिला आपण मूल दत्तक घेऊयात का असं देखील विचारलं, ती तयारही झाली. नंतर मग ते गावात, माळरानावर फिरून आले. दोन तीन दिवसांत तिचं मन खूपच हलकं झालं. एक दिवस तिच्या त्या बहाव्याखाली निवांत बसले देखील, सोनं देणारी फुलं, तिचं तिलाच हसू आलं.
     त्या रात्री पाण्याचा तांब्या घेऊन ती झोपायला आली तर मनावर अलगद मोरपीसं फिरवली जावीत असं काहीसं तिला वाटलं. पाण्याचा तांब्या ठेवायला गेली तर तिच्या आवडीची बकुळ फुलं तिथे टेबलावर एका ग्लासमध्ये पाण्यात गुच्छ करून ठेवलेली होती. त्या सुगंधानं तिला वेड लावलं. दीर्घ श्वास घेऊन तो सुगंध पार अंतर्मनापर्यंत तिने साठवला. उरात खूप सारी फुलपाखरं उडत असल्यासारखं जाणवलं तिला. त्या गंधानं ती मोहरली, बहरली. खऱ्या अर्थानं बहरत गेली. अंतरमनात साठवलेला तो सुगंध तिला नवजीवन देणारा ठरला. देवानं त्या जोडप्याला सुखाचा कौल दिला. काही महिन्यातच तिच्या आईनं तिला हक्कानं बाळंतपणासाठी बोलावलं, सुंदरशा कन्येनं त्यांच्या घरी जन्म घेतल्या. सासूबाईंच्या नावावरून "अनुश्री "असं तिचं नाव ठेवलं गेलं. दोन महिन्यांनी ती घरी परतली तर तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिचं अंगण फुलांनी बहरलं होतं. तिच्यासाठी काही करू न शकलेल्या तिच्या नवऱ्याने स्वतः मेहनत घेऊन तिच्यासाठी तिची आवडती गोष्ट तिची बाग पुन्हा फुलवली होती.

-- समाप्त --

प्रज्ञा गवई
कथा कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या सर्व कथा वाचण्यासाठी माझ्या 'एक पान कथेचे 'या पेजला like व follow करा. कथा share करावीशी वाटल्यास नावासहित share करा.😊😊

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2700. अंधा कानून

 गंगवानी रियल्टर्स’च्या बांद्र्यातल्या नव्या टॉवरची आज वास्तुशांत होती. जितेंद्र गंगवानीनं व्यक्तिशः फोन करून आग्रहाचं निमंत्रण दिल्यानं मला...