शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1672. आनंदी

      आनंदी कधीच आनंदी दिसली नाही पण कधी फारशी दुःखीही दिसली नाही. अनेक संकटांचे डोंगर कोसळले तरी रडत बसली नाही की रडतखडत का होईना चार गोष्टी ठीक झाल्या म्हणून फारशी हसलीही नाही. काही माणसे खरंच पोलादाची बनलेली असतात. आनंदी अशा लोकांपैकी एक असावी..”ताटात जेवढं वाढलंय तेवढचं आपलं” ह्या तत्वावर ती जगत होती.
गावात साऱ्यांना आनंदी भाजीवाली म्हणून माहित होती. सावळा रंग, नऊवारी इरकल, कपाळावर भले मोठे गोल कुंकू, हातभर हिरव्या बांगड्या घालणारी आनंदी खूप मोठ्या आवाजात बोलायची. गळ्यात चार मंगळसूत्राचे मणी होते पण तिचा नवरा कधी कुणाला दिसला नाही. तो कुठे बाहेरगावी काम करायचा म्हणे. त्यांची तीन पोरे तिला भाजी विकायला मदत करायची. भाजी विकून घरी चालत जाताना "विठू माझा देव सावळा" नाहीतर "तुम्हीच मजवर रुसल्या वरती बोलू मी कोणाशी..असे अभंग गात ती घरी यायची. मुले हुशार निघाली. शिकून मोठी होणार माझी मुलं हे ती अभिमानाने सांगायची.
आनंदी संध्याकाळी गरम भाकऱ्या व डाळ बनवून मुलांना जेवायला द्यायची. लगेच त्यांना ती अभ्यासाला बसवायची. न शिकलेली आनंदी मुलांना निबंधात काय लिहायचे सांगताना कधी डगमगली नाही की धाकटीला गणित येत नाही म्हणून शेजारच्या आण्णांकडे विचारायला जायला कधी कचरली नाही. कोणी कशाची तिच्याजवळ तक्रार केली की ती वर आकाशाकडे बघायची.
"तू का रडतीयेस? तो वर बसलाय की. तो बघलं की. तुज्या हातात काय हाय म्हणून तुला वाईट वाटतयं? तुज्या ताटात जे पडलय ते ग्वाड मानून घे" म्हणताना ती निर्विकार असायची. तिला ऊन, पाणी, वारे, पाऊस कशाचाच त्रास होत नसे.
एक दिवस बातमी आली की आनंदीचा नवरा परत आला आहे. लोकांना वाटले बिचारीला आता जरा आराम मिळेल पण तिचे आयुष्य बदलले नाही. नंतर कळलं की नवरा फ़ार आजारी झाला होता. दारू पिऊन तब्बेतीची वाट लागली होती. सहा महिन्यात तो गेला असे समजले. त्याला अग्नी देऊन घरी येत असताना आनंदी शांत होती. "दारू पिणारा असाच मरणार" एवढेच वाक्य ती बोलली. 
तो तिला बघायला आला तेव्हा आनंदी हुरळून गेली होती. पण त्यांचे लग्न झाले आणि चार महिन्यात नवरा तिला म्हणाला, ”मला तुज्या संग न्हाई करायचा संसार कारन माज एका मुलीवर प्रेम हाय” त्याची पहिली बायको गेली होती. त्यांची तीन मुले तू सांभाळायची आहेस हे आनंदीला सांगताना त्याला लाज वाटली नव्हती. दारू तर पाचवीला पुजली होती म्हणून आनंदी या तीन मुलांना घेऊन तिथून बाहेर पडली व शेजारच्या गावात कष्टाने तिने तिचा संसार उभा केला होता.
नवरा आजारी झाला तेव्हा ती बाई निघून गेली आणि तो आनंदीकडे परत आला. आनंदीने त्याला एकही प्रश्न न विचारता घरात का आसरा दिला कुणालाही कळले नाही. त्याची मोठी झालेली मुलं बघून तो क्षणभर का होईना सुखावला होता. मोठा बॅंकेत काम करत होता. मधला एका हॅास्पिटलमधे कामाला होता व धाकटी लग्न होऊन घरी गेली होती. मोठ्याची बायको अगदी सालस व गुणी मुलगी होती. त्या दिवशी रात्री आनंदीला मोठ्याच्या खोलीतून रडल्याचा आवाज आला म्हणून आनंदी जवळ गेली. मोठा बायकोला सांगत होता.. "मला कामावर एक मुलगी आवडू लागल्याय.. मला तुज्या बरोबर संसार करायचा नाही.."
आनंदी संतापाने धावून आत गेली व जे मिळेल ते घेऊन मोठ्याला मारू लागली. कधीही  बोट न लावणाऱ्या आयेला एकदम काय झालं ते मोठ्याला कळेना.
तिनं मोठ्याला ठणकावून सांगितलं, “सात पावलं हिच्याबरोबर चालताना शपता घेतल्यास नव्ह.. त्याची आठवन ठ्येव. बाई हा भाजीपाला नाही. बरा दिसतो म्हणून हात लावला आणि मग इचार बदलला. ही थेरं थांबावं नाहीतर मी तुजा व त्या बाईचा जीव घेईन. सुन घाबरून सासूला बिलगली."
"ताटात पडलेली वाळकी भाकर अन डाल खाताना म्या कधी तक्रार केली नाय. पन एकदा पक्वानाची आशा धरली. नातवंडं होतील. त्यांना ओव्या म्हणत दिस घालवीन ह्ये मनात येताच तू परत शिक्षा का देतो आहेस." म्हणून रड रड रडली.
थोडाही आधार नसलेल्या नवऱ्याने दुसरी बाई घरी आणली तेव्हा, स्वतःची नसलेली मुलं स्वत:ची म्हणून वाढवण्यासाठी जीवाचे रान करताना, आधार न देणाऱ्या नवऱ्याने घातलेले चार काळे मणी काढताना ती कधी कोलमडली नव्हती. पण गुणी, गरीब सुनेवर होणारा अन्याय ती पाहू शकली नाही. एका तापमानाला पोलाद सुध्दा वितळतं.
मोठा रडत तिच्या पायाशी बसून तिची माफी मागत होता. "चुकलो मी..मला माफ कर' म्हणत होता आणि आनंदी "बा रे पांडुरंगा.."गात विठ्ठलाला बोलावत होती.
आज मात्र तिला विठ्ठलाला जाब विचारायचा होता.

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...