शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1657. कॉन्ट्रॅक्ट

 ॲना तिच्या घराच्या पोर्चमधल्या झोपाळ्यावर बसली होती. हातात भलंमोठं पुस्तक होते. तिचे सोनेरी केस वाऱ्याच्या झुळकीनं उडत होते. दोन चुकार बटा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेत उडून तिच्या चेहऱ्यावर महिरप करत होत्या.
गौर तांबूस रंग, सरळ नाक आणि बोलके निळे डोळे असलेली सौंदर्यवती ॲना शेतातून नुकतीच घरी आली होती. काम होताच ॲना पुस्तकाच्या विश्वात हरवून जात असे.
“ॲना, चांगला ड्रेस घाल ग आज. पाहुणे येणार आहेत.” तिची आई किचन मध्ये टोमॅटो सॉस करता करता घर आवरत होती.
“घालते ग… पुस्तक खाली ठेवावंसं वाटत नाहीये… ममा, 1000 places to see before you die मधल्या फक्त वीस जागा बघून झाल्यात. आणि ममा, Listen… निसर्गाशी नातं जुळलं की पृथ्वीचं गाणं पण ऐकू येतं!”
पुस्तकाची पानं अचानक आलेल्या वाऱ्यानं उलटली गेली व पॅरीस या पानावरचा आयफेल टॉवर दिसू लागला. शुभ्र ड्रेस वर मोत्याचा सर घालून आपण तिथं उभे आहोत असं ॲनाला वाटू लागले.
_“माहितीये ग…ये आत! चिकन स्ट्यू करायला मदत कर… सेजची ताजी पानं आणलीस का शेतातून?” आईला स्ट्यू मधे घालण्यासाठी ताजा सेज हवा होता. ॲनाचं स्वप्नरंजन तिथंच थांबलं.
शेताच्या मध्यावर असलेलं जुन्या पद्धतीचे कौलारू घर, कुरकुर वाजणाऱ्या लाकडाच्या जमिनी, आत येताच ढणाणा पेटलेली शेकोटी, तिच्या शेजारी ठेवलेली आराम खुर्ची, आणि बाहेरच्या पडवीतला झोपाळा… एवढंच त्यांचं वैभव होतं. ॲना आणि तिची आई अनेक पदार्थ घरी बनवून विकत असत. शेतातल्या ताज्या भाज्या व घरी बनवलेले मसाले यांमुळं त्यांनी बनवलेले चिकन, मटण, मासे, टर्की, सुप, सँडविचेस अत्यंत चविष्ट लागत.
आईची परत एक हाक आल्यानं ॲनानं पुस्तक बाजूला ठेवलं व ती आत जाऊन आईला मदत करू लागली.
तासाभरात पाहुणे आले. एक पन्नाशीतील बाई, एक सुंदर युवती आणि एक उंचापुरा देखणा तरूण आत आले.
“मी जेन! ही माझी मुलगी नीना आणि हा माझा मुलगा टोनी. नीनाचं लग्न तीन महिन्यांवर आलंय. तुम्ही कोणकोणते पदार्थ बनवून देऊ शकाल?” जेन वैतागलेल्या चेहऱ्यानं विचारत होती…
“मी सगळं घरीच केलं असतं हो… पण माझा गुडघा हल्ली फार दुखतो. ऑपरेशन झालंय पण पहिलं बरं होतं अशी तऱ्हा आहे! उठता बसता त्रास होतो. बरं, तुमची ही तरूण मुलगी मला लग्नात इतर मदत करू शकेल का?” जेन खुर्चीत बसून भरभर चिकन चिरणाऱ्या ॲनाकडे बघत होती.
“आधी तुम्ही केलेले पदार्थ खाऊन बघा. त्यानंतर बाकीचं ठरवू.” आई तिचा ॲप्रन नीट करत एकेक पदार्थ बाहेर घेऊन आली. ते चविष्ट पदार्थ खाऊन जेन खूष झाली. 
‘मार्व्हलस’, ‘डेलिशियस’, ‘लव्ह इट’ म्हणत पाहुणे चिकन स्ट्यू, बारा धान्यं वापरून बनवलेली ब्रेड, अंडी व कांदा याचं किश आणि कस्टर्ड खाऊन तृप्त झाले होते.
“अहो, सारं गाव मला सुगरण म्हणतं पण या गुडघ्यामुळं मी अगदी अपंग झालेय बघा. पन्नाशीला एवढा दुखतो तर आणि दहा वर्षांनी मी चालू तरी शकेन का, असं वाटतं. कामाचे डोंगर उपसायची मी पण माझं नशीब फुटकं म्हणून ही गुडघेदुखी मागे लागली… बरं, डेस्टिनेशन वेडिंग आहे! करेबियन आयलंडवर! अँटिगा बेटावर एक सुंदर राजवाडा आहे. तिथं आहे आमच्या या राजकुमारीचं लग्न!” जेनची टकळी चालू होती…
ॲना ते ऐकून उत्साहित झाली. “अँटिगा मध्ये लग्न…? अहाहा, मोरपंखी, निळ्या पाण्याचे उन्हात झळाळणारे बीच, शुभ्र गार वाळूत बुडलेले पाय, बाजूनी गेलेली पर्वतरांग, नारळाची झाडं, निळं मोकळं आकाश असलेलं अँटिगा मन मोहून टाकतं. मनाचं खुजेपण निघून जातं!” ॲना प्रथमच बोलली.
टोनीनं विचारलं, “तुम्ही गेला आहात का ॲंटिगाला?”
“नाही! माझा प्रवास त्या आरामखुर्चीवर बसूनच होतो. जगातल्या कुठल्याही रम्य ठिकाणी मी आरामखुर्ची रूपी विमानात बसून जाऊन येते. पुस्तकं हा या विमानांचा पायलट असतो!” ॲना स्मितहास्य करत असताना तिच्या गालावर पडलेल्या मोहक खळ्या बघून पुढं काय बोलायचं हे टोनी विसरून गेला होता.
“तुम्ही लग्नाचं काम घेतलंत, तर तुम्हाला ते प्रत्यक्षात बघायला मिळेल बरं!” टोनी आईचा अंदाज घेत बोलत होता.
जेन गुडघा चोळत म्हणाली, “हो… तुम्ही दोघी आणि तुमचा स्टाफ या तिकडे. तुमचं बिल किती होणार अंदाज द्या हं… आणि तुमचं शेत फार छान आहे. मला ताज्या भाज्या हव्या होत्या. दाखवतेस का ॲना?”
ॲनानं आईकडे बघितलं. “हो, दाखवते की…” म्हणत ती खुर्चीवरून खाली घसरली. तिचे बारीक कृश पाय तिनं ड्रेस खाली झाकले व ती सरकत सरकत पुढे जाऊ लागली.
“चला… पुढे व्हा तुम्ही. मला थोडा वेळ लागेल…” दोन हातांवर भार देऊन ती तिथल्या चार चाकं असलेल्या बोर्डवर बसली. थोडे पुढे मागे केलं व दोन्ही हातानं स्वत:ला पुढं ढकलत ती शेतातल्या पाऊलवाटेवर आली.
“कोणत्या भाज्या हव्या आहेत सांगा… मी तोडून देईन.” ती मान करून पाहुण्यांकडे बघत होती.
जेनचा अवाक् झालेला चेहरा बघत ती म्हणाली, “मला पोलिओ आहे. एक पाय अजिबात काम करत नाहीत आणि दुसरा ओव्हर कॉम्पनसेट करून दुखतो पण it is okay. देवानं उत्तम मन दिलंय, वाचनाची आवड दिलीय आणि खणखणीत हातही दिलेत. मी कोणतंही काम करण्यास समर्थ आहे!”
ॲनाची आई कौतुकानं तिच्याकडे बघत होती. जेन अचानक न लंगडता थोडीशी सरळ चालू लागली असं तिला वाटलं. टोनी ॲनाला मदत करत भाज्या गोळा करत होता.
“मनाला सांगितलं ना की मला जे हवं ते करू दे, की ते ऐकतं. आणि मनाला सतत सांगितलं की माझा पाय दुखतोय, तर तो आहे त्याहून जास्त दुखतो! माझा उजवा पाय बरेचदा दुखत असतो… पण it's okay. मी मॅनेज करते. कामात रमले की आठवत नाही काही. ज्या दिवशी पाय खूप दुखतो त्यादिवशी म्हणते… ‘देवानं बाकीचं शरीर उत्तम दिलंय ना, मग का तक्रार करायची?’”
ॲना जेनला तिच्या विश्वात आत आणू पाहत होती. पंचवीस वर्षांची ॲना कुणालाही दोष देत नव्हती.
जेननं भाजीचे पैसे दिले. “ही अपंग मुलगी आपल्याला काय मदत करणार लग्नात?” ती नीना व टोनी जवळ जात पुटपुटली.
“ममा, ती शरीराने अपंग आहे… मनानं नाही ! ती तुला हवी ती मदत करेल. दे तिला कॉन्ट्रॅक्ट!” टोनीनं खिशातून एक पेपर बाहेर काढला व जेनकडे दिला. पंचवीस वर्षांची नीना थक्क होऊन ॲनाकडे बघत होती.
“तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतेय… या ॲंटिगाला. मी तिथं तुमच्यासाठी व्हीलचेअरची सोय करेन.” टॉनीनं ॲडव्हान्स देता देता सांगितलं.
“नक्की या बरं का… निळं पाणी व शुभ्र वाळूत पाय बुडवून बसायला… मी वाट बघतो…” असं टॉनी ॲनाच्या कानात पुटपुटला व पाहुणे परतीच्या मार्गाला लागले.
जेन जाताना लंगडत नव्हती हे बघून ॲनाच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं.
“गुडघ्याची तक्रार करूनच ही बाई दमून गेलीय, ममा!” म्हणत तिनं पुस्तक हातात घेतलं व ॲंटिगाचं पान उघडलं.
आजपर्यंत आरामखुर्चीतून बघितलेलं कॅरेबियन आयलंड आता खरंखुरं बघण्याची वेळ आली होती… निळं पाणी, शुभ्र वाळू आणि पृथ्वीचं संगीत तिथं ऐकताना मन कसं तृप्त होईल!  
ज्युडीच्या लग्नात घातलेला मरून ड्रेस नेला पाहिजे… त्यात  आपण छान दिसतो म्हणतात सगळे! न जाणो टोनीनं बीचवर जाऊया म्हटलं तर बरा ड्रेस हवा… टोनी वाट बघत असेल हे आठवून तिचा चेहरा आरक्त झाला.
सरकत ती ख्रिस्ताच्या फोटोपुढे जाऊन बसली. हातातलं कॉन्ट्रॅक्ट समोर ठेवून त्यांचे आभार मानले. मेणबत्ती पेटवली.
“My Lord, शरीर कितीही दुबळं झालं तरी मन मात्र दुबळं होऊ देणार नाही. हे आपलं कॉन्ट्रॅक्ट जप म्हणजे झालं!”
‘Amen… तथास्तु!’ असा चहूकडून येणारा नाद ऐकत तिनं प्रसन्न चेहऱ्याने डोळे मिटले… पृथ्वीचं संगीत ऐकत.

 ज्योती रानडे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...