शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५

1710. एकाला एक

 सुमन आणि सुभाष दोघांचा प्रेम विवाह. दोन्ही कुटूंब उच्च शिक्षित त्यामुळे दोन्ही घरून होकरच मिळाला.  सुमन मराठी तर सुभाष केरला.  दोघांचा थाटात विवाह पार पडला. खरतर सुभाष चे वडील नोकरी निमित्य मुंबईला आले आणि इथेच स्थाईक झाले. त्यामुळे घरातील प्रत्येकाला उत्तम मराठी बोलता येत होते. त्यामुळे भाषेचा तसा प्रॉब्लेम आलाच नाही. पण हो जे लोक मुद्दाम लग्नासाठी केरळ वरून आले. त्यानां मात्र हिंदी, मराठी आणि इंग्लिश कोणतीच भाषा येत नव्हती. पण कुटुंब फारच प्रेमळ, त्यामुळे फक्त हातात हात घेऊन माना डोलवत होते. न बोलताही त्यांच्या मनातले भाव टिपता येत होते. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला, असेच काहीसे त्यानां सांगायचे असावे. निदान त्यांच्या कृती वरून तरी तसेच वाटत होते. लग्न सोहळा पार पडला आणि सुमन सासरी गेली. महाराष्ट्रीयन मुलगी केरला झाली आणि मग वरात सांबर  भाताकडे वळली. इडली सांबार, वडा सांबार खाणारी सुमन सांबार भात, अरे देवा ! विचारच पडायचा ! त्यामुळे सुमनला सुरवातीला त्या कुटूंबात जेवणाचे अडजेस्ट करायला खूप जड गेले. सकाळ संध्याकाळ चपाती खाणारी मुलगी ती इथे जास्त करून भातच बनायचा, कधीतरी चपाती. सांबार भात जो कधीच खाल्ला नाही तो खात्तांना खूप जड जायचे पण स्वपसंतीने लग्न केले त्यात सुमन मुळात खूप  समझदार. तक्रार तरी कुठे आणि काय करणार ? 
  सुभाष म्हणायचा , मला माहित आहे तुझे पोट भरत नाही ? 
कर ना मग तू चपाती ?
 एक दोन वेळा तिने प्रयत्न केला चपाती बनवायचा.  सासूबाई लगेच म्हणाल्या आपल्याकडे कोणाला चपाती नाही आवडत ,नको करू . त्यान्च्या हे लक्षात आलेच नाही  की, हिला सांबार भाताची सवय नाही. पोट भरत नसणार.
   तिने सुभाषला सांगून ठेवले. मी करेन अडजेस्ट पण तू तुझ्या आईला याबद्दल काही बोलू नकोस. नॉनव्हेज आणले तर ब्रेड सोबत खायचे. पण चपाती नाही. मग हळूहळू सवय झाली. माहेरी सुद्धा कधी सांगितले नाही. कुणाला आणि काय सांगणार?
 इथे पसंतीच आपली तर? 
   बाकी इतके सोडले तर सासूबाई भारी प्रेमळ.  सुमनला जेव्हा दोन दिवस माहेरी यायचे असेल तर, सासूबाईंना कसे समजावू हाच प्रश्न सुमनला पडायचा त्यांना ती माहेरी जावी असे अजिबात वाटत नव्हते . पण हो त्यात सुनेला माहेरी पाठवायचे नाही हा उद्देश अजिबात नव्हता. तू गेल्यावर मला घरात करमत नाही. एकटे एकटे वाटते म्हणून  तू जाऊ नको. सुमन ला तर त्यांना,  मी  माहेरी जाते हे सांगायला जायचे पण धाडस होत नव्हते. कारण त्या इतक्या केविलवाण्या आणि रडकुंडीला आलेल्या दिसायच्या, असे वाटायचे रडतच आहेत. इकडून तिकडून संगितले माहेरी जाते म्हणून तर,  लगेच पुढचा प्रश्न . 
कधी येशील...? 
सुमनने दोन दिवस म्हंटले तर ,त्या म्हणायच्या अग इतके दिवस ? 
सुमन म्हणायची आई,  अहो !  दोन दिवस फक्त ! 
तर पुढचा प्रश्न . 
मग दुपारी जेवायला घरी ये? इतकी माया करणारी सासू भाग्यवंतालाच मिळते. त्यातली सुमन एक भाग्यवंत. 
  त्यांचा सुमन माहेरी निघातांनाचा चेहरा बघितला की, सुमनचेच डोळे भरून यायचे. मुली माहेरून जातांना रडतात. सुमनचे सासरहून माहेरी जातांना डोळे पानवायचे. कधी वाटायचे नकोच माहेरी जायला. पण काय करणार दोन घरातला समतोल तर सांभाळावा लागेलच ना ! 
सासुबाईना कसेबसे समजावून जायची माहेरी. 
  एक धाकटा दीर ,तोही तसाच माया करणारा खरतर त्या दोघी बहिणी, त्यांना भाऊ नाही आणि हे दोघे भाऊ,  बहीण नाही. त्यामुळे त्याने सुमनला मोठ्या बहिणी प्रमाणे जपले, प्रेम केले. 
  सुमन पहिल्यांदा गरोदर होती. तीन महिने झाले होते. डॉक्टरांनी बेडरेस्ट घ्यायला सांगितली. त्याचे नुकतेच  इंजिनिअरिंग झाले होते. मनासारख्या नोकरीच्या शोधात होता.  सुमनला खूप त्रास व्हायला लागला, गर्भाशयाचे तोंड उघडले होते.  दवाखान्यात ऍडमिट केले. तेव्हा मग दवाखान्यात तोच असायचा जवळ. अलगद झोपवायचे, अलगद मानेत हात घालून उठवायचे, लोडाला टेकवून बसवायचे. सगळे धाकटा दीर  करायचा. 
एकदा सुमनचा नवरा होता सोबत. त्याने उठवले पण तेवढा अलवार पणा नव्हता त्याच्यात. सुमन त्याला म्हणाली सुद्धा. सतीश हे काम खूप छान करतो, धक्का सुद्धा लागत नाही. मग नवरा सोबत असला तरी सतीशलाच हे काम सांगायचा. तो सुध्दा खूप मनापासून हे सगळे करायचा. दवाखान्यातून घरी आले. एक दिवस सुमन त्याला म्हणाली, सतीश आता मी करेन हळूहळू उठबस, झेपत मला. 
  तर म्हणतो कसा, ताई मला बहीण नाही ग ! 
मी तुझ्यात माझी मोठी बहीण पाहत होतो ! 
नको तो माझा हक्क तू हिरावून घेऊ ! 
खरतर मला आताशी वाटायला लागले, तुझ्या रुपात प्रेमळ बहीण उशिराने का होईना त्याने मला दिली . मनोमन त्याचे धन्यवाद. 
  लहानपणी वाटायचे एक बहीण असावी म्हणून, तुझ्या रुपात दिली बरका ताई !  दिवस भराभर संपले . नववा महिना लागला.  सुमन आईकडे आली बाळांतपणाला.  आईला म्हणाली, आता सकाळ, दुपार, संध्याकाळ फक्त पोळ्याचं खायला दे बाई, बाकी काही नको आणि येथेच्छ पोळ्यावर ताव मारला. बघता बघता नववा सरला.  मुलगा झाला. त्याचे बारसे, पहिला वाढदिवस सगळे कौतुकाने केले. 
  मुलगा मात्र  पूर्ण  पोळी प्रेमी निघाला. त्याला तर नास्त्याला पण पोळी किंवा पराठा लागायचा. आताशी शाळेत जायला लागला होता. सुमनच्या  सासूबाई पुन्हा मागे लागल्या. आता हा चार वर्षाचा झाला. पुन्हा एक चान्स घे. एकाला एक सोबती होऊ दे. बरं असत ग ! 
नाहीतर पोर एकलकोंडी होतात ! 
दोनचार दिवस झाले की पुन्हा तोच विषय. एक दिवस सतीश म्हणाला, ये ताई माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. आई  ! 
ताई ! 
बघा तुम्हाला माझी आयडिया पसंद पडली तर. मग तो सांगू लागला ,आई आपण एक मुलगी दत्तक घेऊ अनाथ आश्रमातून. म्हणजे एकाला एक सोबत आणि एका अनाथ मुलीचे संगोपन ! 
किती मस्त कल्पना आहे ! निदान मी तरी हेच करणार ! ताई तुझ्या पासून सुरवात करू. ! 
  सुमनला  सतीशची ती कल्पना आवडली. लगेच रात्री सुभाषला सांगितली. त्यालाही आवडली. बाबा तर ग्रेटच होते. लगेच तयार. आई सुरवातीला तयार नव्हत्या. पण सतीशने खूप वेगळ्या पद्धतीने समजावून सांगितले. 
  सतीश म्हणाला, आई बघ ताई वेगळ्या कास्टची पण तू तिला किती सहज आपलेसे केले. अग ती चार दिवस माहेरी गेलेली तुला चालत नाही. कारण तू तिच्यावर जीवापाड प्रेम करते. आपण कोणावर किती माया करतो. हे खूप महत्वाचे आहे आणि आपल्या घरात तुझ्या इतकी माया कोणीच नाही करू शकणार  ! 
जसा ताईचा स्वीकार तू आनंदाने केला. तसाच त्या जात नसलेल्या बाळाचा करशील ! 
आई !  कदाचित ते बाळ केरला पण असू शकते ! 
बघ तू विचार कर  ! 
ताईचे मला माहित नाही ! 
पण माझे पहिले बाळ माझे असेल, दुसरे  बाळ मात्र मी दत्तक घेणार हे नक्की ! 
होणाऱ्या बायकोला आधीच सांगून ठेवेन. जी कोणी हे धाडस करायला तयार होईल, तिच्याशीच माझे लग्न होईल. यात बदल नाही. आई तू आत्ता पासूनच लक्षात ठेव !
  मग घरात सगळे जमले की याच विषयाला उधाण येत होते. सगळे तयार होते. सासूबाईचे हो, नाही,  हो ,नाही चालले होते. मग सतीश म्हणाला आई  ! इतकी मायाळू तू, हा निर्णय घेताना इतका विलंब . खरतर तुझ्याकडून हि अपेक्षा नाही. अग साधी ती लादी,भांडी करायला बाई येते, काय नाव तीच ? 
आठवलं नीलिमा ! 
अग तिला गरम गरम नास्ता आणि रोज वाफाळलेला चहा देणारी तू. सणावाराला तिच्या मुलांना आठवणीने काहीतरी खायला  बांधून देणारी तू,  आणि हो केरळ वरून येतांना मुद्दाम तिकडचा खाऊ आणून तिला देणारी तू ! 
खरंच खूप वेगळी आहे आई तू !  मला तर कधीकधी वाटते  देवाने तुला फक्त मायाच करायला पाठवले या पृथ्वी तलावावर !  सतीश आज कौतुकाचे खूप जड जड शब्द वापरत होता. बाकी सगळे मनोमन हसत होते. तो बोलतो त्यात चुकीचे असे काहीच नव्हते. खरंच माया कशी?  आणि किती करावी? त्यान्च्या कडून शिकावे. 
  सुमनला आठवले, ती मराठी सिरिअल पाहायची. पण ऑफिस मधून आल्यावर आधी कामाला हातभार लावू लागावा म्हणून  किचन मध्ये जावे तर ही माउली बोलायची,  मी करते राहिलेले काम. तू बघ ती सिरिअल. आजचा भाग खूप छान होता. 
  खरंच भाग्यच लागत ना अशी सासू मिळायला. कधी कधी सुमन आईला म्हणायची तुझ्यापेक्षा माझी सासू चांगली. कधी काही बोलत नाही. मी अजूनही माझ्या सासरी चहा बनवलेला नाही. कारण मी चहा पीत नाही.  त्यामुळे माझ्या सासू सास र्यांनी  कधीच  मला चहा करायला सांगितला नाही. नाहीतर तू मम्मी ! सारखी ओरडत असायची ! चहा करायला शीक आधी ! 
बघ माझी सासू ! 
किती प्रेमळ ! 
   आज पुन्हा सगळे एकत्र जेवायला बसलो. सतीश ने पुन्हा एकाला एक हा विषय काढला. आई म्हणाल्या करू विचार .तुम्ही सगळे म्हणताय तर ! 
   चार दिवसा आधी सुमन ची पिरियड ची तारीख होती, पाळी चुकली.टेस्ट केले निकाल positive. मग तूर्तास तो विषय बंद झाला. यथावकाश एका गोंडस मुलीचा जन्म झाला..खूप वर्षानंतर त्या घरी मुलगी झाली होती. सगळेच खुश होते. सासूबाईंच्या म्हणण्या नुसार एकाला एक  हे सत्यात उतरले होत. बहीण मिळाली म्हणून भाऊ खुश होता. मुग्धा नाव ठेवले तिचे. सगळ्यांना मंत्रमुग्ध केले तिने. बघता बघता दोन वर्षांची झाली. 
  सतीश आता बऱ्यापैकी कमवत होता . मग  त्याच्या साठी मुली पाहणे सुरु केले.  त्याच्या डोक्यातली एकाला एक ही जरा हटके संकल्पना जात नव्हती. मुलगी बघायला गेला , सगळी पसंदी झाली की सतीश सांगायचा मला मुलीशी थोडे बोलायचे आहे आणि त्याची कल्पना त्या मुलीला पटवून सांगायचा . अजून तरी कोणत्याही मुलीने त्याला होकार दिला नाही. पण देईल कोणीतरी खात्री आहे. शेवटी परिवर्तनाची सुरवात हि घरातूनच करावी लागते. सतीशने ते चांगलेच मनावर घेतले .त्याच्या  एकास एक या संकल्पनेला समजून घेणारी त्याला नक्की मिळेल का ?
हो ! हो ! 
सहाच महिन्यात मिळाली, त्याला समजून घेणारी मुलगी. मुलगी पाहायला गेला.  त्याने आता ठरवले होते मुलगी घरी पाहायची नाही. बाहेर भेटायचे म्हणजे जास्त मोकळीक असते बोलण्यात.
   आज तो तिला भेटायला गेला . सानवी नाव तिचे. सॉफ्ट वेअर इंजिनीअर होती  . आईवडील केरळला राहत होते.  ती काकांकडे राहत होती . छानसा गुलाबी सलवार सूट घालून आली. फोटो पहिला होता पण प्रत्यक्षात त्याहूनही सुंदर होती. हसली की गालावर खळी पडायची. तिच्या त्या खळीच्या खड्यात असा काही पडला तो की देहभान हरपून गेला. 
त्यात लांब सडक ,  काळेभोर केस, निमगोरा वर्ण, गुलाब पाकळी प्रमाणे लाल चुटुक ओठ आणि सडपातळ बांधा. मुलगी पसंत तर पडली पण प्रश्न होत्या त्याच्या पुढच्या अटीचा. इकडच्या तिकडच्या गप्पा, एकमेकांच्या आवडी निवडी यावर सविस्तर चर्चा केली. मग सतीशने हळूच त्याची  'एकाला एक ' पण ते काय आणि कसे हि कल्पना सांगितली ? 
  उच्च शिक्षित आणि उच्च विचार. दोन्हीची सांगड होती तिच्यात. म्हणाली खूप छान कल्पना आहे तुमची. एकाला एक ची.
एक बाळ आपले, एक बाळ दत्तक. असे जर प्रत्येकाने ठरवले तर !!!  तर !!! खरंच यातून दोन प्रश्न सुटायला मदत होईल .एक  म्हणजे लोकसंख्या नियंत्रणात राहील आणि अनाथ आश्रमात राहणाऱ्या मुलांना हक्काचे घर मिळेल. त्याच्या माथी लागलेला अनाथ हा कलंक मिटेल. 
  सतीशला हे एकूण खूप आनंद झाला. त्याने डायरेक्ट विचारले तुझे विचार खरंच असे असेल तर,  बायको म्हणून मला तू पसंद आहे. खरतर मी पाहताक्षणी तुझ्या सौदर्यावर भाळलो होतो. पण आता तुझ्या प्रगल्भ विचारांच्या प्रेमात पडलो. तुला जर मी पसंत असेल तर. पुढचे सगळे घरचे मोठे बसून ठरवतील. 
  ती म्हणाली तुला नकार द्यायचा प्रश्नच नाही. कारण मी इथे तुला भेटायला आले तेव्हा माझ्या आईबाबांनी त्याच्या एका मित्रा कडून तुझी आणि तुझ्या घरची सगळी माहिती काढली होती. तुझे हे विचार माझ्या घरी सगळ्यांना माहित आहे. मला तू आयुष्य भराचा जोडीदार म्हणून पसंत आहे.  दोघे आनंदातच घरी गेले.मग मोठयाची बोलणी ठरवून लवकरच लग्नाचा मुहूर्त काढला. लग्न झाले हनीमूनला गेले. येतांना एकाला घेऊनच आले . म्हणजे लग्न झाले तेव्हा पाळी येऊन जेमतेम सात दिवस झाले होते. हनीमून ला गेले,आल्यावर पाळी आलीच नाही. खरतर ते दोघे जरा नाराजच होतो. त्यांना इतक्या लवकर बाळ नको होते. पण ताईने खूप समजावले आणि गोंडस असा मुलगा झाला. सिद्धांत नाव ठेवले. बघता बघता सिद्धांत तीन वर्षांचा झाला आणि काय आश्चर्य  ? आई म्हणाली, सतीश आता सिद्धांत तीन वर्षांचा झाला.  माझ्या तुझे ते एकाला एक लक्षात आहे . पण हो ! हे बाळ मात्र आपण आश्रमातून आणू बर का ! 
सगळेच आईकडे कुतूहलाने पाहू लागले. 
आई म्हणाली , मनातून बोलते रे! 
 सतीश लवकरच आता ही दत्तक प्रक्रिया पूर्ण करा. लगेच online अनाथ आश्रम शोधले. online फॉर्म भरले. जवळ जवळ एक वर्ष प्रतीक्षा करावी लागली. तेव्हा कुठे त्यांना आश्रमातून बोलावणे आले . ती दोघे जाऊन पाहून आले. चार, पाच मुली दाखवल्या. त्यात एक तीन महिन्यांची मुलगी त्यांना दाखवली.सतीशची बायको सानवीला ती निरागस बालिका खूप आवडली. तिला एक दिवसाचीच टाकून दिली होती म्हणे.
 बापरे ! 
ऐकून अंगावर सरसरून काटा आला. 
पोटचा गोळा असा टाकून देतांना खरंच लोकांना काहीच वाटत नसावे ? 
 इतका माणूस निर्दयी असू शकतो ?
  आई , जी नऊ महीने त्या बाळाला आपल्या उदरात वाढवते. तिचे काळीज पाझरू नये ? 
  प्रश्नांनी काळजात गोधळ माजवला होता. राग नाही,  उलट कीव आली त्या दुर्देवी आई बापाची. 
  सावरले त्यांनी स्वतःला. आठच दिवसात त्या मुलीचा त्यांना ताबा मिळाला. आज ती पूर्णर्थाने सतीश श्रावणी कृष्णनंन  झाली. तिला पहिल्यादा पाहिलं तेव्हाच तीच नाव श्रावणी ठेवायचं त्या दोघांनी नक्की केले होते. 
घरी सर्व श्रावणीच्या स्वागताची तयारी करीत होते. जंगी स्वागत केलं तीच. दारात रांगोळी, घराला तोरण ,आरतीचे ताट . फुल आणि फुग्यांनी रूम सजवली होती. औक्षण करून सानवी बाळाला घेऊन बेडरूम मध्ये गेली. तिच्या मागे सतीश आला. बाळ जरा रडतच होत...तिने चक्क ब्लॉउजच्या बटन काढायला सुरवात केली...क्षणभर त्याला कळलेच नाही...हि काय करते ते...आणि तिने बाळाला चक्क छातीशी लावून दूध पाजायला घेतले...आणि काय आश्चर्य बाळ रडायचे थांबले.
   माय लेकीचे ते दृश्य, सारेच कौतुकाने पाहत होते. 
सतीश तर खूप आनंदात होता. 
  आई म्हणाली, सतीश खरंच माझ्या " एकाला एक ला",  "तुझे एक, दत्तक एक".  खरच खूप छान सामाजिक संदेश रुजवला जनमानसात. तुमच्या दोघांच्या कर्तुत्वाला माझा सलाम मुलांनो.
      समाप्त.

©️®️  सौ प्रभा कृष्णा निपाणे कल्याण.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2900. निशब्द

 आज आईने सकाळपासून माझ्यासमोर तिचं दुःख मांडायला सुरुवात केली होती. “अरे, तुझी बायको असं कोणतं मोठं काम करते? हे सगळं काम तर आम्ही रोज करत आ...